सोशल मीडियावर लहानपणीची आठवण म्हणून गोट्या, भोवरा, अनेक कार्टून्सची चित्रे पसरवली जातात. पण केवळ खेळ नि टीव्ही म्हणजे बालपण नव्हे. शाळा तिथला अभ्यास, वेगवेगळे विषय हा सुद्धा बालपणाचा भाग होता. आज अनेकांना वाचनाची आवड असेल पण त्याआधीच बालभारतीच्या पुस्तकांमुळे आजच्या वाचकांना अनेक पुस्तके, लेखक नि कवी बालपणीच माहीत झाले होते. त्या पुस्तकातील काही महत्त्वाच्या धड्यांविषयी
Marathi Blog - मनात आलं म्हणून
आठवणीतील बालभारती
चित्र: गुगलहून साभार |
हा लेख लिहिताना, मी शाळेत असताना त्यावेळच्या अभ्यासक्रमात आलेले नि लक्षात राहिलेल्या मराठी विषयासाठी वापरल्या जाणाऱ्या बालभारती पुस्तकातील धड्यांविषयी लिहिणार आहे. १९९०-९१ ते २०००-०१ या वर्षात माझे पहिली ते दहावी शिक्षण झाले होते. बघू कितपत आठवतंय.
आधी आठवायला जे सोपं आहे तिथून सुरू करतो. दहावीला असताना पहिला धडा 'नरीन्द्रबासा भेटी अनुसरण' आणि दुसरा धडा 'पराक्रमाचा तमाशा दाखवा' होता. पहिल्या धड्यातले नीट नाही आठवत पण दुसरा धडा हा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे सावत्रभाऊ व्यंकोजीराजे यांच्यासाठी लिहिलेल्या प्रोत्साहनदायी पत्राबद्दल होता. त्याच पुस्तकात सावरकरांचा 'अंदमानातून सुटका' हा ( अंदाजे पाचवा ) धडा होता. नंतर माझी जन्मठेप वाचलं तेंव्हा कळलं की आपल्या वाट्याला आलेला हा धडा हा त्यांच्या एकूण अनुभवातील सर्वात सौम्य भाग होता. अंदमानात जाताना किंवा असतानाचा अनुभव वाचायलाही त्या वयात जमला असता का ? त्यानंतर होता डॉ. आंबेडकरांचा 'उन्नतीचा मूलमंत्र' नेहमी प्रमाणेच विचारांनी संपन्न आणि बरचसं मार्गदर्शन करणारा. खरं सांगायचं तर माझी कुवतच नव्हती तो समजून घ्यायची. इथून पुढे इयत्तेनुसार आठवेल असं वाटत नाही.
हे लिहिल्याबरोबर पु. ल. देशपांडे यांचा 'उपास' धडा आठवला. मजा आली होती धडा ऐकताना. विनोदी धडे जास्त लक्षात राहतात. त्यामुळे सातवीला गोकूळ नि आठवीला गोकूळची साक्ष हे दोन्ही धड्यांची किमान नावं कायम लक्षात राहील. लक्षात रहावं म्हणून तो उपरण्याला गाठोडं बांधायचा आणि कोणती गाठ कशासाठी हेही विसरायचा. सातवीला असताना 'चोरी झालीच नाही' हे नाटक आठवतंय. त्यातले संवाद वाचताना एका पात्राचे संवाद मला वाचायला सांगितले होते. पावसात जेंव्हा जेंव्हा छत्री पकडताना दुसऱ्या व्यक्तीला सोबत घेतो तेंव्हा आणखी एका व्यक्तीला दुसऱ्या बाजूला घेतले की आपण भिजत नाही आणि इतर दोघे पागोळ्यांमुळे भिजतात ही एका धड्यात वाचलेली युक्ती आजही लक्षात आहे. शिवाय बाहेर पाउस असेल तरच छत्री किंवा रेनकोट न्यायचे लक्षात राहते नाहीतर विसरायला होते हे माझ्या विसराळू स्वभावाशी तंतोतंत लागू पडते.
'विजयस्तंभ' नावाचा एक छोटा धडा राजाचे गर्वहरण करायचा. मी शांतीचा उपासक आहे असा शिलालेख त्याला उत्खनन केलेल्या स्तंभात सापडला होता. हा धडा सुद्धा कायम लक्षात ठेवण्यासारखा. आपण कोणतेही यश कमावले तरीही ते कमावणारे आपण पहिले किंवा एकटे नाही हे कायम ध्यानात ठेवावे. हा धडा आठवता आठवता 'सुंदर' नावाचा हत्ती आठवला. रमतगमत चालताना माणूस इकडे तिकडे बघत किंवा हातातली कीचैन गरागरा फिरवत चालतो तसा तो हत्ती सोंडेत पानाची डहाळी घेऊन ती झुलवत चालायचा. त्यावेळी 'अमर कोर विद्यालय, भांडूप' शाळेत मीना सावंत मॅड्मनी शिकवलेलं आजही अचानक लक्षात आलं.
मला तो 'लाल चिखल' धडा आठवतो. ज्यात टोमॅटो विकले जात नाहीत म्हणून तो त्याचे भाव कमी करत जातो आणि नंतर फुकटही कोणी घेत नाही म्हणून पायाखाली टोमॅटोचा चिखल करतो. एक 'बुद्धदर्शन' नावाचा धडा आठवतो. ज्यात लेण्यांमधील बुद्धाच्या पुतळ्यांचे वर्णन होते आणि एक 'दर्शनमात्रे' नावाचा धडा होता. पुलंच्या पत्नी सुनिता देशपांडे यांच्या पुस्तकातून घेतलेला. वाघाची वात बघणाऱ्यांना पहिल्यांदा वाघ बघताना काय भावना मनात आल्या त्याचं ते चित्रण होतं. त्याला जोडून 'स्मशानातील सोनं' धडा आठवतोय. एखादा सिनेमा बघावा असा भयपट. अण्णाभाऊ साठे त्या धड्यामुळे पक्के लक्षात राहिले. नववीच्या जुन्या पुस्तकात 'रेडीओची गोष्ट' नावाचा धडा होता. तो ( कदाचित प्रेमकथेमुळे) वगळला असला तरी उत्तम होता. आगीत उडी मारून दुसऱ्यांचा जीव वाचवणारा 'वीर बापू गायधनी' देखील आठवतो तर नेहरूंच्या कोटला स्वत:च्या कुपीतील अत्तर लावणाऱ्याचे चित्रसुद्धा.
'भारत माझा देश आहे' ऐवजी 'भारत आपला देश आहे' म्हणायला लावणारा धडा आठवतो. पाखऱ्या, दावं ही बैलाशी संबंधित गोष्टी वाचताना भाऊक झालो होतो. प्राणी पक्ष्यांची -प्राण्यांची गोष्ट आठवली की 'जिद्द हीच खरी दौलत' हा धडा आठवतो ज्यात पक्षी घरटे बांधता बांधता पडतात तरीही हार मानत नाहीत. शिवाय 'अरण्य प्रकाश' या पाचवीला असलेल्या धड्यात प्राणी एकमेकांशी संवाद साधायचे. चंपक पुस्तकातील गोष्टींप्रमाणे कल्पना असल्याने तो लक्षात राहिला. शितू, दमडीची गोष्ट पूर्ण आठवत नाही. 'ठोकळ्याची गोष्ट' ऐकताना त्याच्या बाजूला एक डोळा बंद करून ठोकळ्याचे माप घेणाऱ्याचे चित्र आजही आठवते.
'स्वरूप पहा' हा विनोबा भावेंचा धडा मला जवळपास रोज आठवतो. सध्या जवळपास सर्वच राजकीय पक्ष, नेते, कार्यकर्ते, त्यांचे ऑनलाईन समर्थक त्याच भाषेत दुसऱ्याला बोलत असतात किंवा कमेंट करतात. उदाहरणार्थ, तुम्ही अमुक अमुक साली असं केलं होतं किंवा तुमच्या पक्षातल्या या व्यक्तीने त्या राज्यात असंअसं केलं होतं आधी त्याला सांगा मग आम्हाला शिकवा. नाहीतर तुम्हाला दुसऱ्याला सांगायचं नैतिक अधिकारच नाही. म्हणजे बोंबला. तो चुकला म्हणून हा आता मुद्दाम चूक करणार. 'स्वरूप पहा' धड्यानुसार वागण्याचा पुरेपूर प्रयत्न आहे. पण माझ्या सभोवतालचा समाज अंधश्रद्धा सोडेल असं वाटत नाही.
अजून थोडे मागे गेल्यावर.... चौथीचे पुस्तक नीटसे आठवत नाही. तिसरीला असलेली 'एक होता बाळू' गोष्ट आठवते. त्याला खिशातले पैसे सांभाळायला जमले नाही म्हणून पुढच्या वेळी खिशात ठेव असे आई म्हणते. तर पुढच्या वेळी त्याला आई हातात लोणी देते. ते तो खिशात ठेवून प्रवास करतो. मग त्याला आई म्हणते की पुढील वेळी केळीच्या पानातून आण. पण पुढील वेळी त्याला कुत्रा न्यायाचा असतो तर तो कुत्र्याच्या पिलाला केळीच्या पानात बांधतो. त्याला आई म्हणते की मुक्या प्राण्याला खांद्यावर घ्यावं. तर त्याला पुढील वेळी गाढव आणावं लागतं. गाढवाला खांद्यावरून आणताना एक कधीच न हसलेली (की कधीच न बोललेली मुलगी) हसू लागते. तिचे वडील त्या बाळूला घोडा नि उंची वस्त्रे वगैरे भेट देऊन सत्कार करतात. तिसरीला असताना प्रीतीलता वड्डेदार या क्रांतिकारक मुलीची गोष्टही लक्षात राहिली होती. काझीरंगा अभयारण्य तिसरीत असलेल्या गोष्टीमुळे लक्षात राहिले. एकशिंगी गेंड्यापासून स्वत:चे नि वडिलांचे रक्षण करणारा समीर जीपचा हॉर्न वाजवून त्याचे लक्ष वेधून घेतो. त्यात त्या गेंड्याचे शिंग जीपमध्ये अडकते आणि सर्वांचा जीव वाचतो.
इयत्ता दुसरीत असताना दिनूचे बिल नावाची गोष्ट होती. ती पुन्हा कुठेतरी वाचनात आली म्हणून लक्षात आली. दुकानातील वस्तूंचे बिल बघून दिनू त्याला कराव्या लागणाऱ्या कामांचे पैसे बिलाद्वारे आईकडे मागतो. तर आईसुद्धा मुलासाठी कराव्या लागणाऱ्या कामांचे बिल बनवते पण किंमत काहीच नाही असे लिहते तेंव्हा दिनूला आईच्या प्रेमाचे नि तिचे महत्त्व समजते.
बालपणीच्या अनेक आठवणींमध्ये शाळेची आठवणही असते. अभ्यासाची आवड असली किंवा नसली तरीही बालभारतीचे पुस्तक, काही धडे, कविता, सोबतची चित्रे अभ्यासाची मजा वाढवत असत. लहानपणी पाहिलेली जंगलबुक आणि अनेक कार्टून अनेकांच्या लक्षात आहेत. काहींच्या लक्षात हे नि आणखी अनेक धडे लक्षात असतील कदाचित.
त्या आठवणींसाठी धन्यवाद बालभारती. धन्यवाद मराठी.
(धडे आठवता आठवता काही कविताही आठवल्या. विस्तारभयास्तव लेख थांबवतो. )
इतर लेख :
No comments: