कोरोंनाच्या जागतिक संकटात आपण एकमेकांना सध्या तरी फक्त मानसिक आधार देऊ शकतो म्हणून हा शब्दांचा आधार :
Marathi Blog - मनात आलं म्हणून
कोरोना हरणार जेंव्हा माणूसकी जिंकणार
जग थांबलंय ? खरंच जग थांबलंय ? की फक्त माणूस थांबलाय ? हो, माणूस थांबलाय. सूर्याभोवती पृथ्वी नि पृथ्वीभोवती चंद्र फिरतच आहे. सगळे तारे-ग्रह फिरत आहेत. पृथ्वीवरचा प्रत्येक प्राणी- पक्षी-कीटक सर्वजण फिरताहेत. वेली-रोप-वृक्ष सर्वांची वाढ होतेय. पण थांबलाय तो फक्त माणूस. माणूस घरात थांबला. इतर माणसांना थांबायला सांगू लागला की तुम्ही सुद्धा थांबा. आहात तिथेच थांबा. भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, भारतीय नागरिकांनी थांबा. महाराष्ट्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. आहेत तिथेच थांबा.पण तो कोण आहे कसा दिसतो, माहीत नाही. जो जाण्याची आपण वाट पाहतोय तो कधी जाणार माहीत नाही ? एक छोटा, डोळ्यांनी न दिसणार्या विषाणूने, इतर प्राण्यांना गुलाम करणार्या माणसाला त्याच्या घरात बांधून कसे ठेवले ? या सगळ्याची उत्तरं मेंदूचा उत्तम वापर करणार्या माणसाला अजूनही मिळाली नाहीत. कोरोनाच पेपर इतका कठीण आहे का ? की चालू असलेल्या परीक्षा थांबल्या. चालू असलेले व्यवहार थांबले. प्रवास थांबले. काम थांबली. विचारशक्ती थांबली. ही फक्त परीक्षा आहे की युद्ध.
सध्या तरी ही माणसाच्या अस्तित्त्वासाठी युद्ध जाणवतंय. पण माणसाने कोरोना नावा च्या कोणत्या प्राण्याला लक्ष्य करून त्रास दिला होता का ?
माणसाने त्याचे अवयव, दात, चामडी, नखं, त्याचं मांस, काळीज विकायला किंवा खायला घेतलं होतं का ? त्याला प्रयोगशाळेत माणसाच्या फायद्यासाठी पाळून ठेवलं होतं का ? मग हा इतका छोटा विषाणू माणसाच्या मागे हात धुवून का लागलाय ?
नेमकं हेच. हात धुवायचे आहेत. फक्त माणसाने हात धुवायचे आहेत. त्याने स्वच्छ राहायचे आहे. त्याने गर्दी करायची नाही. त्याने शरीर, घर, रस्ता, वाहनं, काम करायची जागा स्वच्छ ठेवायची आहे आणि ती स्वच्छता ठेवायचीच आहे म्हणून कोरोनाने दिलेल्या या सूचनांचे पालन प्रत्येकाला करायचेच आहे. तोंडावर रूमाल / मास्क, खोकताना / शिंकताना तोंडावर हात ठेवणं, आजारी असेल तर इतरांच्या संपर्कात न येणं, प्रवासाआधी, प्रवासानंतर स्वत:ची आरोग्य तपासणी करणे या माणसाला माणसासाठी कोरोंनाने दिलेल्या अटी आहेत. खरंतर माणूस ज्या पद्धतीने पृथ्वीवर वावरतो ते निसर्गाला मान्य नाही आहे. म्हणून माणसाने त्याची पृथ्वीवर वावरण्याची शैली बदलायची आहे.
कोणत्याही देशातला माणूस असो. त्याने इतर कोणत्या प्राण्यांना खायचे याची काही मर्यादा आहे. ती मर्यादा एकाने ओलांडली की इतर माणूस व इतर देशही ती ओलांडतील म्हणून निसर्गाने दिलेला हा इशारा वेळीच ओळखावा. पृथ्वी ही फक्त एकट्या माणसाच्या मालकीची नाही. त्याचं आयुष्यसुद्धा सर्व प्राण्यांमध्ये सर्वात जास्त नाही. तरीही, जमिनीच्या मालकीचे व्यवहार फक्त माणसांमध्ये होतात. त्यासाठी प्राण्यांची हत्या त्यांना न विचारता होते. लोकशाही ही एखाद्या देशापुरता असते पण निसर्गासाठी मात्र निसर्गशाहीच असली पाहिजे हे आता माणसाने मान्य केले पाहिजे.
माणसाने बुद्धीच्या जिवावर आजवर अनेक संकटांवर मात केली. काही आजारांवर उपचार शोधायला वेळ गेला पण शेवटी माणूस जिंकला. देवीच्या आजारावर 'लुई पाश्चर यांनी लस शोधली तशी COVID-19 वरही लस निघेल. पण त्यासाठी शास्त्रज्ञांना थोडा वेळ मिळायला हवा. त्यांच्यासाठी सुद्धा हे नवीन आव्हान आहे.
तोपर्यंत मात्र आपण 'कोविड योद्धा' म्हणजे जे आपली काळजी घेण्यासाठी रस्त्यावर आहेत त्यांना साथ द्यायला हवी. कुणीही घराबाहेर पडू नये या आदेशाचे पालन व्हावे म्हणून ते कोरोनाच्या संपर्कात येत आहेत नि कदाचित स्वत:च्या कुटुंबालाही दूर लोटत आहेत. अशा पोलिसांची आपल्याला जाण हवी.
आपण रस्त्यावर थुंकत, कचरा टाकत, कुणी घाण करणारा असला की त्याकडे दुर्लक्ष केलं, आपला मित्र असेल तरी 'चलता है' म्हणत त्याला पाठिंबा दिला तीच घाण सध्या सफाई कर्मचारी काढून टाकून तुमचा देश स्वच्छ करत आहेत. अशा वेळी आपणही कचर्याची नीट विल्हेवाट लावण्याची सवय लावून घ्यायला हवी. अशा कर्मचार्यांची आपल्याला जाण हवी.
आपण घरीच थांबलोय. पण रोजच्या व्यवहारातल्या महत्त्वाच्या वस्तू आपल्यापर्यंत पोहोचणं थांबलंय का ? नाही. ती अस्तित्वात आणणार्या शेतकर्याचे, गायी-म्हंशींचे, ती बाजारात आणून देणार्या वाहनांचे, वाहनचालकांचे, त्यासाठी लागणार्या इंधन, इतर सुविधा उपलब्ध करणार्यांचे, या सर्व गोष्टींचे व्यवस्थापन करणार्या केंद्र नि राज्य सरकारचे आभार मानायला हवेत.
या सर्वांच्या पलीकडे कोणाचे आभार मानायचे असतील तर ते डॉक्टर, नर्स, हॉस्पिटलमधील कर्मचार्यांचे. डोळ्यांनी न दिसणार्या शत्रूशी लढायची त्यांची तयारी, त्यांची मेहनत वाखाणण्याजोगी आहे. नाहीतर फक्त मृतांचे आकडे आपण मोजत बसलो असतो. पण जगभर या आजारातून मुक्त होणार्यांची संख्या मृत पावणार्यांपेक्षा खूप जास्त आहे.
त्यामुळे आपण माणसं हे युद्ध जिंकणारच हे स्पष्ट आहे. फक्त आपण एकमेकांना साथ द्यायला हवी. देशातल्या अंतर्गत वादाच्या वेळी जात-धर्म-वर्ग विसरणं महत्त्वाचं असतं तसं यावेळी तर सर्व देशांनी पृथ्वीवर तयार केलेल्या काल्पनिक मालकी हक्क सांगणार्या काल्पनिक सीमारेषा पुसायला हव्यात. एखाद्या धर्माने दुसर्या धर्मातील चांगल्या गोष्टींचं आचरण करणं म्हणजे स्पर्श न करता वंदन करणे, चपला बाहेर काढणे, चेहरा किंवा फक्त नाक-तोंड झाकणे, प्रार्थनेआधी हात-पाय धुतली जातात तशी नेहमीच धुणे, गरजूंना जेवण पुरवणे नि हे सर्व करताना त्याला माझा धर्मच मोठा याची जाहिरात न करणे गरजेचे आहे. शेजारधर्म म्हणजे फक्त शेजारचं घर अशी संकुचित व्याख्या न धरता शेजारचं गाव, राज्य, देश, खंड, सर्वत्र राहणार्या माणसाने माणसाशी माणसासम वागणे हाच मोठा बदल करावा लागेल.
एकंदर काय, सध्या माणसाची माणूस म्हणून कसोटी आहे. माणूसकी काय असते हे त्यांनी हवं तर प्राण्यांकडून शिकावं. म्हणजे फक्त मानवजातीचा विचार न करता पूर्ण निसर्गाचा विचार करावा. तरच कोरोना हरेल नि माणूस
माणूसकीच्या जोरावर जिंकेल.Marathi Blog - मनात आलं म्हणून,
मराठी पुस्तक - पहिले पाऊल , सफरछंद
Online Books PDF on esahity.com : मुल्हेर ते साल्हेर, कधी सरस कधी कळस, गोरखगड ते सिद्धगड, अलंगाशी संग मदनाशी गाठ
लोकसत्ता 'ट्रेक इट' मध्ये भैरवगड, कलावंतीण , वैराटगड, आजोबागड आणि इतर लेख प्रकाशित.
कोरोना हरणार माणूसकी जिंकणार
Reviewed by Marathi Blog by Pankaj Ghare
on
May 19, 2020
Rating:
No comments: