ऊब मायेची

लहानपणी एक दिवसासाठी कुत्र्याचं पिल्लू सांभाळलं होतं. तो आई नि मुलातलं नातं शिकवून गेला. त्या प्रसंगाची आठवण 

ऊब मायेची

marathi blog on love between human and dog

सहावीची शालांत परीक्षा संपून मे महिन्याची सुट्टी होती.  वेंगुर्ला तालुक्यात तुळसगावी आजीआजोबांसोबत आम्ही सर्व नातवंडं जमा व्हायचो. पेज जेवून क्रिकेट खेळणं, विहिरीजवळ अंघोळ करणं, आजोबांची घोडा सायकल आळीपाळीने चालवणं, काहीच न करणं आणि मुंबईला येताना हमखास एक जखम आणणं हेच उद्योग होते.
आजीच्या आईला पणजी म्हणतात आणि काहीजणांची पणजी जिवंत असते तशी आमची पणजी जिवंत असल्याचा आनंद होता. तिच्या घरी, आसोली गावी जाणं ठरलेलं असायचं.एक सुमो गाडी भाड्याने घेऊन घरातल्या सर्व सुनांना माहेरी जाण्याची आजीची 'परवानगी ' सुनांना मान्य होती.

त्या वर्षी पणजीच्या घरात एका कुत्रीने अगदी दोन दिवस आधी सात-आठ पिलांना जन्म दिला होता.दोन पिलं जगलीच नाही.उरलेल्या पिलांपैकी दोन पिल्लं खूप अावडली. तिथून पुढच्या गावी निघण्यासाठी मन तयार नव्हतं. भावा-बहिणींना मस्का, आजी आजोबांना विनंती आणि आई-पप्पांकडे हट्ट करून गडद पिवळ्या रंगाचं पिल्लू मी तुळस गावी नेण्यासाठी सोबत घेतलं. त्याची आई कुठेतरी फिरायला गेली असावी. 'रेडी गावच्या गणपती मंदिरात जाण्याआधी पिलाची काळजी घेणार ना याची ड्रायव्हरकडून खात्री करून घेतली. गाडीत उतरताना त्याने सीट ओली केली होती आणि लहान बाळाबद्दल सांगतात तसं मी त्या सीटला हात लावून सर्वांना सांगितलं. भाई आणि ताईने काय हा विचित्रपणा असं म्हणत एकमेकांकडे पाहिलं तेंव्हा मी गुंतलोय हे मला कळलं.
marathi blog on love between human and dog

त्याला घरी आणलं तेंव्हा कोणाला आवडलं असेल, कोणाला नाही. बशीतून दूध,  बिस्किटं, चपाती वगैरे देऊन त्याचे लाड करायला सुरूवात झाली. तिसरीत पाहिलेल्या जंगलबुकचा प्रभाव टिकून होता. शेरखानवरून त्याचं नाव 'शेरु' असं ठरलं. त्याला खेळायला, चेंडू आणायला, मागच्या पायावर उभं रहायला शिकवायचं ठरवलं आणि  समाधानाने सगळे झोपलो. (माणसाची भाषा प्राण्याला समजत असेल आणि त्यामुळे माणसाचं काम होत असेल तर त्या प्राण्याला हुशार हे विशेषण मिळतं.)

पण मध्यरात्री ते पिल्लू जागं झालं आणि वेगळया आवाजात ओरडू  लागलं. मी आणि बरेच जण जागे झालो तर काहींची झोपमोड झाली. माझी आई म्हणाली, शेरू रडतोय आणि तो त्याच्या आईला शोधतोय. केलेल्या कृत्याचं आता वाईट वाटायला लागलं. त्याचा आवाजसुद्धा केविलवाणा होता. तो झोपल्याशिवाय कोणाला झोपही मिळणार नव्हती. मग माझ्या आईने त्याच्या पोटावर हात ठेवला. बराच वेळ हात तसाच ठेवला तेंव्हा तो झोपला. आई म्हणाली, शेरूची आई झोपताना सगळ्या पिलांना पोटाजवळ ठेवून झोपत असणार तेंव्हा तिचा पाय त्याच्या अंगावर कुठेतरी असेल. त्याची शेरूला सवय असेल आणि या वेळेला ती सुद्धा अशीच रडत असेल नाहीतर त्याला शोधत असेल. त्याला त्याच्या आईकडे दिलं की तो नाही रडणार, आईने समजावलं. इतकं ऎकून मी पुढे काहीच न बोलता गुपचूप झोपलो. शेरू शांत झाला आणि आई-पप्पा झोपायला गेले.

पुन्हा थोड्या वेळाने शेरू रडत उठला. आता तर खरंच मला तो आईसाठी रडतोय वाटलं. मी नाही उठलो. कारण सगळी चूक माझीच होती. माझी  आई उठली आणि पुन्हा त्याच्या पोटावर हात ठेवला तसा तो शांत झाला.
सकाळी मला जाग आली तेंव्हा शेरू आधीच दुडदुडत होता. मी दात घासत अंगणापलीकडे चालत गेलो तर माझ्या पायाकडेच घुटमळत होता. इतक्यात त्याला कळलं होतं की त्याच्यावर सर्वात जास्त जीव कोणाचा आहे. पण आम्ही ठरवलं होतं की त्याला त्याच्या आईकडे आसोलीला सोडायचं. मी आणि फक्त पप्पा बसने निघालो. येताना फक्त त्याला आणलं होतं, जाताना एका मऊ कपड्यात गुंडाळलं. तुळस ते वेंगुर्ला प्रवासाची तिकीट काढावी लागली नाही. पण वेंगुर्लापासून आसोलीला जाताना कंडक्टरने हा चावणार नाही ना विचारलं आणि ३ रूपयांची तिकिट काढली तेंव्हा राग आला. बस आसोलीला पोहोचेपर्यंत तो माझ्याच मांडीवर होता.
बसमधून उतरल्यावर रिक्षावाल्या काकांना पप्पांनी 'धुरींचं घर' इतकंच म्हटलं तसा तो निघाला. ज्याची जास्त काळजी तो मध्ये बसणार या नियमाने ' शेरू' ला आमच्या दोघांच्या मधली जागा दिली. अगदी थोड्या वेळात कुणी आमच्या रिक्षामागून धावतंय असं लक्षात आलं. साहजिकच वेगामुळे आम्ही पुढे गेलो. आणि पणजीच्या घरी 'शॆरू'ला ठेवलं. धापा टाकत त्याची आई पणजीच्या अंगणात पोहोचली  आणि शेरूला चाटू लागली. आजीने (पप्पांच्या मामीने) चहा सोबत दिलेल्या आंबोळ्यांचे छोटे तुकडे करत मी, शेरू नि त्याच्या आईकडे फेकले. आजी म्हणाली तू तरी खा.

आणि मी अक्षरशः रडायला लागलो. ( ही पूर्ण आठवण लिहताना सुद्धा कंठ पुनःपुन्हा दाटला आणि दुखू लागला) मी पप्पांना मिठी मारली. त्यावेळी तेच माझी आई होतें. बराच वेळ रडण्यातही गेला. आजी आजोबा काहीच बोलत नव्हते. रडतरडत शेरूला मिठी मारली नि आसोली सोडलं. नंतर पुन्हा रडलो नाही. बसमध्ये पप्पांच्या मांडीवर झोपून होतो. काहीच वाईट झालं नाही असं  म्हणत तो दिवस गेला. त्या रात्री मी झोपेत शेरू-शेरू बडबडत होतो. मोठी काकी (ताईची आई) माझ्या आईला म्हणाली,  त्याला ताप तर नाही ना आला. मध्यरात्री  उठून आईने माझ्या डोक्यावर हात फिरवत ' बरा आहेस ना' विचारलं. कुठेच न पडता त्यावर्षी ही एक जखम आणली. ताप आला नव्हता. आईसुद्धा शांत झोपली.

तिकडे शेरूसुद्धा त्याच्या आईशेजारी शांत झोपला असेल आणि त्याची आईसुद्धा शांत झोपली असेल हे त्या वेळी समजलं.

पुन्हा कधीच पिल्लू घेऊन घरीआलो नाही. पण मुंबईला येऊन त्याचं चित्र काढून रंगवलं नि आईला दाखवलं.
आई म्हणाली, कान तसेच काढलेस. खाली पडलेले.

त्यादिवशी मला 'आई' कळली.आईचं प्रेम कळलं. 

हाच काय तो आनंद.
मराठी पुस्तक  - पहिले पाऊल , सफरछंद 
Online Books PDF on esahity.com : मुल्हेर ते साल्हेर, कधी सरस कधी कळस, गोरखगड ते सिद्धगड, अलंगाशी संग मदनाशी गाठ  
लोकसत्ता 'ट्रेक इट' मध्ये भैरवगड, कलावंतीण , वैराटगड, आजोबागड आणि इतर लेख प्रकाशित.
ऊब मायेची ऊब मायेची Reviewed by Marathi Blog by Pankaj Ghare on May 19, 2020 Rating: 5

No comments:

मनात आलं म्हणून

मनात आलं म्हणून
थोडं माझ्याविषयी
Powered by Blogger.