माझी ट्रेकिंगिरी - पंकज घारे

प्रवासासारखा दूसरा छंद नाही. थोडा खर्चिक असला तरीही हा वाचनाच्या तोडीस तोड आहे. खास प्रवासाच्या छंदासाठी नोकरी करणारे, त्यासाठी बचत करणारे अनेकजण आहेत. मी इथे माझ्या एकूण प्रवासाबद्दल सांगेन जो फार म्हणजे फार कमी आहे. 

माझी ट्रेकिंगिरी -पंकज घारे 

marathi blog on trekking experience
मी विजयदुर्गावर(दुर्गसाहित्य संमेलंननिमित्त असताना)
सहल ( मराठीत 'पिकनिक') वगळता बाकी इतर प्रवासाबद्दल मला काहीच माहीत नव्हतं. सर्वप्रथम मी नव्या मित्रांसोबत आसनगाव येथे  'माहुली येथे Trek ( जून २००१ मध्ये) केला. माहुलीगड पळसगड, माहुली नि  भंडारगड असे एकाच गडाचे तीन भाग अशी नावं, अनेक सुळके असलेला डोंगर, मोठा दरवाजा, देवड्या, देवड्यासमोरील टाक्यातील पाणी, तिथे वाघ पण येतो अशी कोणीतरी सांगितलं नि चटकन विश्वास ठेवलेलं वाक्य, चालत डोंगरावर जाता येतं आणि 'दुरून डोंगर साजरे' ही म्हण किती नकारार्थी अर्थाने सांगितली जाते याचा आलेला अनुभव या सर्वांनी Trek या अद्भुत छंदाशी ओळख करून दिली. वैचारिक पातळी तेंव्हा पिकनिक प्रकाराची होती. ट्रेकला जाऊन ती बदलली. म्हणजे फक्त खाणं- पिणं, कुठेही फोटो काढणं हा उद्देश बाजूला पडून फूल निरखून बघणं, उंचावर पोहोचताना मागे वळून जमेल तितका परिसर न्याहाळणं , किल्ल्याची माहिती वाचणं, त्याचा इतिहास जाणून घेणं, तोच खरा न मानता, त्यावर Trek करताना चर्चा करणं, गडावरच्या वास्तूंचे नीट म्हणजे प्रदर्शनात फोटो देण्याजोगे फोटो काढणं ही सगळी Trekkingची देणगी आहे. Trek करताना पुढचा Trek आणि इतर किल्ल्यांबद्दल बोलत Trek करणं याला मी खरा Trek मानतो. 

माहुलीचा Trek करताना एक विशेष गोष्ट घडली. आमच्यासोबत असलेल्यांनी देवड्यांमध्ये स्वत: जेवण बनवलं. गडावर असलेली केळीची पानं तोडून सर्व म्हणजे १८ जण पोटभर पंगतीत जेवलो. त्यावेळी माझ्यासाठी ही गोष्ट फार मजेशीर होती. म्हणून असा प्रवास आता पुन: पुन्हा करायचं ठरवलं. 

माहुलीनंतर प्रत्येक Trekची एक एक आठवण बनत गेली. राजगडावर तीन तास थकत चालल्यानंतर रात्री माचीवर ग्रह-तारे बघत झोपणं, तोरणावर 'ब्रम्हपिशाच्च' आहे ही गोष्ट ऐकणं, सिंहगड किल्ल्यावर 'तानाजी'कडा पाहणं, शिवनेरी किल्ल्यावर सहलीला येणार्‍या मुलांची उत्सुकता, सरसगड किल्ल्यावर कलिंगड खात केलेला प्रवास, प्रतापगडावर शाही शैलीत बसून पिठलं-भाकरीचा आस्वाद घेणं, पेठ किल्ल्यावर नवीन गटासोबत Trek करणे नि नंतर 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ' नावाचं काहीतरी आहे आणि आपण त्यांच्यासोबत आहोत हे उशिराने  माहीत होणं. हे माझे सुरूवातीचे काही महत्त्वाचे Trek. जे Trekप्रमाणे खवय्येगिरी वाढवणारे ठरले. 

नोकरी लागल्यानंतर मात्र ट्रेकला उधाण आलं. खिशात पैसा आला तर तो सत्कारणी लागला पाहिजे. शिवाय व्यसन लागण्याच्या वयात ट्रेक नावाचं दर्जेदार व्यसन लागल्याचा अभिमान छातीवर नव्हे, पाठीवर मोठ्या बॅगमध्ये असायचा. मी स्वत: आयोजन केलेला राजमाचीचा ट्रेक  तिथल्या गावकर्‍यांच्या आदरातिथ्य व जेवणाची, झोपण्याची सुरेख सोय यामुळे विसमरणीय ठरला. मी अजूनही भीमाशंकरला गेलो नाही, पण त्याशेजारी असलेल्या पदरगडावर शेवटी कठीण पद्धतीने वर जावे लागते. मलंगगडावर एका टप्प्यावर डोंगराच्या कडेला दोन पाईप बांधलेले आहेत. सेफ्टी हार्नेस नसल्याने त्या पाईपपर्यंत जाऊन पुन्हा मागे फिरताना लटपटणारे पाय आजही लक्षात आहेत. असं पाय लटपटणं इरशाळगडावर शेवटचा टप्पा सर करताना अनुभवलं होतं. त्यावेळी मी पुरेसा नाश्ता केला नव्हता ही माझी चूक. असाच एक टप्पा लोहगड ते विसापूर ट्रेक करताना लागला होता. विसापूर उतरताना आम्ही अशा ठिकाणी उतरलो की उतरल्यावर एका लेण्याचा दरवाजा बंद होत होता. ती लेणी ज्या डोंगरातल्या गुहेत आहेत त्या गुहेच्या वरून आम्ही विसापूर किल्ला उतरलो. हरवण्याचा असाच प्रकार भैरवगडावर झाला होता. आधी रंगपंचमी करून ट्रेक सुरू झाला. शेवटी इतका उशीर झाला की सर्वांना एकत्र आणण्यासाठी एके ठिकाणी होळी पेटवावी लागली. होती. रस्ताच न सापडल्याने माणिकगड आम्ही किती सर केला आणि नेमका गड सर केला का नाही हा प्रश्न आजही पडतो. पेब किल्ल्यावर मी आमच्या शाळेतल्या ( अमर कोर विद्यालय) मित्रांसोबत गेलो. इतकी गर्दी होती की उतरताना आम्ही माथेरानमार्गे आलो. अनेक दिवसांनी भेटल्याने गप्पा मारण्यासाठी हा प्रवास 'गेट-टुगेदर'साठी जरूर करावा. 
marathi blog on trekking experience at Sahyadri
मी नेहमीच्या ट्रेकिंगच्या वेशात 
नाणेघाट सर करताना आम्ही दोनचजण होतो. आधी एकदा जाऊन आल्याने यावेळी रात्री पावसात Trek सुरू करून मध्यरात्री गुहेत वास्तव्य करायचं असा आमचा बेत होता. पण आम्ही रस्ता चुकत-चुकत फार वेगळ्या दिशेने त्या ( बहुतेक) त्याच्या शेजारील डोंगरावर सकाळी पाच वाजेपर्यंत चढत होतो. एका डोंगराच्या उतारावर मांडी घालून उतारादिशेने झुकलेल्या झाडाला टेकून झोपलो. धो-धो पावसात डोक्यावर चटई घेतली होती. सकाळी माणसाप्रमाणे शिळ घालणार्‍या पक्ष्याच्या आवाजाने जागे झालो. सकाळीदेखील इतकं धुकं होतं की आम्ही साधा नाणेघाटसुद्धा सर केला नाही. याला म्हणतात अतिआत्मविश्वास. जीवधन, चावंड आणि हडसर हे त्याच्याजवळील किल्ले आजही यादीत शिल्लक आहेत. 

दुसर्‍याचा मृत्यू जवळून पाहण्याचं दुर्दैव त्रिंगलवाडी या किल्ल्यावर अनुभवला होता. किल्ल्याचा सर्वोच्च टप्पा ओलांडल्यानंतर मागे एका वयस्कर Trekkerला हृदयविकाराचा धक्का आला. त्याला शुद्धीवर आणण्याचे अनेक प्रयत्न 'ट्रेकलव्हर्स'च्या विवेक पाटील नि त्यांच्यासोबतच्या आम्ही मित्रांनी केला. भर पावसात सर्वांनी स्वत:चे शर्ट काढून त्यापासून स्ट्रेचर बनवून आळीपाळीने एकत्र उचलून त्यांना गावात आणले. तोपर्यंत डॉक्टरना पाचारण केले. पण त्यांनी 'सॉरी' म्हटले.....

साल्हेर किल्ल्यावर पोहोचल्यानंतर लगेच थंड पाण्याने केलेली आंघोळ, सालोटा किल्ल्यातील गुहेत चाखलेले जगातील सर्वोत्तम चवीचे पाणी, मुल्हेरला पहाटे पूर्व दिशेला गडावर दिसणारा सूर्योदय, मोरागडच्या पायर्‍या, हरगडवरील तोफ, तांदूळवाडीचा धबधबा, कर्नाळाचा सुळका, सांगली ते पन्हाळगड हा ब्रेकफेल असलेल्या दुचाकीवर केलेला प्रवास या नि अशा कित्येक आठवणी मनात कायम आहेत.

कोहोजगडावरील माणसाच्या आकाराचा डोंगर, प्रबलगडच्या जंगलात लपलेल्या वाटा शोधणं, ढाक किल्ल्यावर डोंगराला मिठी मारत तिरक्या दिशेने गुहेत शिरणे, कलावंतीणच्या वळणदार पायर्‍या, उन्हात चटका लावणार्‍या पायर्‍यांना स्पर्श करत सर केलेला गोरखगड, ( मनात एकाचा मृत्यू असलेली आठवण असलेला) कसरत केलेला सिद्धगड, Larsen and Toubro च्या इतर अनोळखी सहकर्मचार्‍यांसोबत रात्री सर केलेला सुधागड,Larsen and Toubro च्या मित्रांसोबत पाहिलेला भूलभुलैया म्हणजे दौलताबाद, आजोबागडावरील जंगलात उंबरफळाचा सुगंध, हरिश्चंद्रगडावर कोकणकडाच्या दिशेने होणारा सूर्यास्त, अजिंक्यतारावर दिसणारी फुले, तिकोणावर जाताना कोणी आवाहन केले म्हणून जमेल तितकी माती / रेती किल्ल्यावर नेणे, कोरीगडवर माकडांचा उच्छाद, कमळगडवरील कावेची डोंगरात लपलेली खोल नि पायर्‍या असलेली विहीर, रोहिडा किल्ल्याचे बुरूज, ब्रह्मगिरीच्या कातळात खोदलेल्या पायर्‍या, लोहगडचा विंचूकाटा, लोहगड, विसापूरवरून दिसणारे पवना जलाशयाचे दृश्य, कळसूबाई शिखरावर चढताना वाटेत लागणार्‍या अनेक लोखंडी शिड्या, विश्रामगडावर वास्तव्य करताना तिथे शिवाजी महाराजांनीही वास्तव्य केले होते ही जाणीव, जंगली जयगडवरील घनदाट जंगल नि एका बाजूला रत्नागिरी तर दुसर्‍या बाजूला सातारा असे होणारे दर्शन अशा कित्येक गडांच्या आठवणी त्या त्या गडाच्या वैशिष्ट्यमुळे लक्षात आहेत. 

माझ्या स्वत:च्या मर्यादा वाढत गेल्या नि नेहमीच्या मित्रांसोबत जाणं जसं कमी झालं तसं Trekshitiz या संस्थेसोबत अनेक रेंज ( शुंखला) Trek करण्याची मी संधि साधली. अंकाई किल्ल्यावरील लेणी नि आजही टिकून असलेले अनेक अवशेष, श्रीदत्त राऊत यांच्यासोबत वसई परिसरातील  बावीस किल्ले, अचला-अहिवंत-मोहनदरी हे एकत्र केलेले ट्रेक, भवानीगड-गोवळकोट- महीमतगड मोठा परिसर डोळ्यांखाली घालून गेले. Trekshitiz सोबत Trek केला की ट्रेककडे पाहण्याचा दृष्टीकोण रुंदावतो. नकाशे तयार करणारे महेंद्र गोवेकर नि पुष्कळ लिखाण करणारे अमित सामंत तुम्हाला प्रेरणा देतात. शिस्तीत, सुरक्षित नि अनुभवसंपन्न Trek करण्यासाठी Trekshitiz सर्वोत्तम आहे.

मी माझ्या तुळस गावापासून ( तालुका वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग) जवळ एकट्याने भरतगड, भगवंतगड, सर्जेकोट, निवतीचा किल्ला, यशवंतगड, गोव्याच्या सीमेवर असलेला तेरेखोलचा किल्ला पाहिला. कोल्हापूरहून आधी उतरून जावा लागणारा रांगणा किल्ला मी मात्र कुडाळ येथील नारूर गावातून चढून केला तेंव्हा पूर्ण वाटेत कुणीच नव्हतं. त्यामुळे घाबरत तो मी वेगात केला. वर पोहोचल्यावर कोल्हापूरहून आलेले अनेकजण भेटले. 

तरीही स्वत:च्या मित्रांसोबत Trekkingचा  एकेक टप्पा गाठणे सवोत्तम. अलंग-मदन किल्ला सर करण्यासाठी रॉक-क्लायंबिंग ( प्रस्तरारोहण) करताना मोठा गत नसलेला बरा नाहीतर बराच वेळ वाया जातो. इतर किल्ले केले नसते तर अलंग-मदन सर करता आले नसते. सज्जनगडावरील दुर्गसाहित्य संमेलनात परिसंवादात विशेष पाहुणे नि परिसंवादात भाग घेता आला नसता. विजयदुर्ग येथे झालेल्या दुर्गसाहित्य संमेलनात तर अजून कितीजणांनी किल्ले विषयक मोठमोठी कामे केली आहेत हे कळलं. सिंहगड येथे भरलेल्या दुर्गसाहित्यसंमेलनात मी स्पर्धेत भाग घेताना इतर अनेकांप्रमाणे टिपलेली छायाचित्रे लावली होती. अनेक मोठे दुर्गमित्र जोडले गेले. विजयदुर्गची बोटीतून परिक्रमा करताना सागरी किल्ले बघण्याचा बेत केला जो शारीरिक क्षमता कमी झाली की करेन. 


सर्वांत महत्त्वाचा, रायगड. माझं मंदिर. जास्त नाही लिहणार. माझी लायकी नाही. 
marathi blog on trekking experience at Maharashtra
रायगड ( सुलेखन पद्धतीने )
मी खरंतर आयुष्यातल्या आतापर्यंतच्या सर्व प्रवासांबद्दल लिहणार होतो. लिखाण इतकं मोठं झालंय की मी यात फक्त महाराष्ट्रातील गड-किल्ले यांबद्दल थोडक्यात लिहतोय. मी यापेक्षा खूप नि विस्तृतपणे लिहू शकतो. पण वाचकांना किमान गड-किल्ल्यांची ओळख करून देण्याचा हा हेतू आहे. स्वत: पाहिलेल्या किल्ल्यांबद्दल हक्काने स्तुति करतोय व त्यांचीच नावे दिली. महाराष्ट्रातले अनेक इतर किल्ले पाहण्यासारखे आहेत. अजून सर करायचे आहेत. त्यामुळे प्रवास अजून सुरू आहे.

माझ्याविषयी अधिक माहिती 

मराठी पुस्तक  - पहिले पाऊल , सफरछंद 
Online Books PDF on esahity.com : मुल्हेर ते साल्हेर, कधी सरस कधी कळस, गोरखगड ते सिद्धगड, अलंगाशी संग मदनाशी गाठ  
लोकसत्ता 'ट्रेक इट' मध्ये भैरवगड, कलावंतीण , वैराटगड, आजोबागड आणि इतर लेख प्रकाशित.
माझी ट्रेकिंगिरी - पंकज घारे माझी ट्रेकिंगिरी - पंकज घारे Reviewed by Marathi Blog by Pankaj Ghare on May 16, 2020 Rating: 5

No comments:

मनात आलं म्हणून

मनात आलं म्हणून
थोडं माझ्याविषयी
Powered by Blogger.