माणसाच्या आकृतीप्रमाणे दिसणारा डोंगर कोहोजगडावर पाहायला मिळतो. त्या गडावर केलेल्या पदभ्रमण ( Trekking ) अनुभव :
Marathi Blog - मनात आलं म्हणून
किल्ले कोहोजगड
माणसाच्या आकृतीप्रमाणे असलेली डोंगराची रचना : कोहोजगड |
पाऊस म्हणजे आकाशाने धरतीला पाठवलेलं प्रेम! ती रुसते , रागावते, चिडते आणि सगळं वातावरण तापू लागतं. ढगांच्या कुशीत साठवलेलं प्रेम आकाशातून असं काही बरसतं की हळूहळू धरती सजू लागते, बहरू लागते आणि आनंदाने भिजून जाते. शहरातला पाऊस हा पाऊस नाहीच मुळी. तो सिमेंटच्या रस्त्यावर पडतो, पण त्याला मातीचा सुगंध येत नाही. पक्षी प्राण्यांचा आवाज सोडाच पण पावसामुळे होणाऱ्या तक्रारी जास्त ! तो कचऱ्यात पडतो, गटारात पडतो, रोगराई पसरवतो. खरोखर, पावसाची खरी मजा निसर्गातच लुटता येते.
या पावसाचा, निसर्गाचा आणि Trekkingचा आस्वाद घ्यायचे ठरले . पालघरमध्ये ‘वाडा’ येथून काही अंतरावर बसने ‘वाघोटा’ येथे ‘कोहोजगड’ आहे. ‘ठाणे’ स्थानकापासून अडीच तासात गडाजवळच्या रस्त्यावर पोहोचलो आणि मन एका सेकंदात शिखरावर !
फार आधी गडावर अपघात झाल्याचंही माहीत होतं. कोहोजगड चढण्यासाठी सोपा असला तरी गावातील व्यक्ती सोबत घेऊन जा अशी आगाऊ सूचना मिळालेली होती. त्याप्रमाणे सिमेंटच्या रस्त्याला दूर लोटत मातीच्या रस्त्यावरून चालण्यास सुरुवात केली. शेत ओलांडण्यासाठी बांधलेल्या पुलामुळे शेताचे नुकसान टळले. अगदी थोड्याच अंतरावर (पत्त्यांमधील) बदामाच्या आकाराचा तलाव डोळ्यांना सुखावतो.
कोहोजगडावरून दिसणारे ( काल्पनिक) हृदयाच्या आकाराचे तलाव |
काठाशीच गड उभा असूनही त्याचं प्रतिबिंब पाण्यात दिसेना. तलावाकाठी अनेक लहान-मोठी मुले मासे पकडण्यासाठी गळ टाकून बसलेली. तलावासभोवातालचा परिसर गोल्फच्या मैदानाप्रमाणे उंचसखल पण हिरवेगार दिसते.
तलावापुढचा काही सपाट भाग ओलांडल्यावर जंगलातील झाडा-झुडूपांमधील वाट सुरू झाली आणि चालण्याची शैली वारंवार बदलू लागली. वळून पाहिल्यास जास्तीत जास्त दूरचा प्रदेश दिसू लागला. वाट जंगलातूनच जात असल्याने वातावरणात गारवा होता. उन्हाळ्यात रुक्ष वाटणारे वृक्ष उन्हाळ्यातले चटके विसरून पावसाळ्यात बहरून गेले होते. सहज दु:खं विसरायची शिकवण घेत वाट काढू लागलो. गडाच्या एका टप्प्यावर फुलपाखरांची संख्या आणि विविधता फार आहे. फुले मात्र संख्येने फारच कमी असली तरीही !
मोकळ्या मैदानात मध्यावर एक सुंदर शिवमंदीर असून समोर नंदी आहे. काही अंतरावरील झाडाखाली काही मूर्त्या शेंदुराने रंगवलेल्या दिसतात.
कोहोजगडावरील पाण्याचे टाके |
इथून पुढे माथ्यावर जाण्याचा रस्ता आणखी आनंददायी आहे. वाटेत लागणारी तळी आपल्याला लहान बनवून पाण्यात खेळायला भाग पाडतात. मंदिराजवळील दोन टाक्या अस्वच्छ पाण्याने भरलेल्या आहेत. मंदिरामागील झाडावर चढून आपल्यातल्या लहान मुलाचे हट्ट पुरवता येतात. मागून वाहणारा झरा , पलीकडे डोंगराच्या कड्यावरून दिसणारे सृष्टीसौंदर्य हा इतका परिसर रमणीय असाच आहे.
इथूनच गडमाथ्यावर दगडाचा एक उंच माणूस मिठी मारण्यासाठी हात पसरून बोलावत आहे असे वाटते. पुढे चढाई करताना उजवीकडे कातळात पाण्याची टाकी आहेत. त्यातील तिसऱ्या टाक्यांमधील पाणी पिण्यायोग्य आहे. अगदी थोड्या अंतरावर पायऱ्या चढून गेल्यावर डावीकडे बुरूज दिसतो.
कोहोजगडावरील पायर्या |
बुरुजावरच एक छोटेसे मंदीर आहे. मंदिरासमोरील वाटेने दगडी माणसाकडे पोहोचता येते. ‘फार जवळ गेल्यानंतर माणसातला फक्त दगडच दिसतो’. त्याच्या आसपास उभे राहण्यासाठी फारशी जागा नसून पलीकडेही खोल दरीत जंगल आहे. थोड्या अंतरावर आणखी एक छोटेसे मंदीर आहे.
दोन-अडीच तासांची आरामदायी चढाई करून शिखर गाठल्यानंतर रिमझिम पाऊस वेगाने शिखरावर पोहोचला आणि दिवसभर दडी मारलेल्या पावसाची कमी भरून निघाली. शिवाय गडावरील तळ्यांमध्येही पाण्यासोबत आनंदही वाहू लागला. उतरताना पाऊस आधीच उतरून गेला. पावसामुळे परतीचा मार्ग चिखलाने माखला होता. चढताना वाट दाखवणाऱ्याची गरज वाटली नाही; पण उतरताना त्याचीच मदत घेत उतरलो. पूर्ण उतरून झाल्यानंतर पुन्हा पाऊस वेगाने उतरून आला आणि निरोप देऊन निघून गेला.
कोहोजगडाच्या पायथ्याशी |
अजून काही किल्ल्यांविषयी :
Marathi Blog - मनात आलं म्हणून,
मराठी पुस्तक - पहिले पाऊल , सफरछंद
Online Books PDF on esahity.com : मुल्हेर ते साल्हेर, कधी सरस कधी कळस, गोरखगड ते सिद्धगड, अलंगाशी संग मदनाशी गाठ
लोकसत्ता 'ट्रेक इट' मध्ये भैरवगड, कलावंतीण , वैराटगड, आजोबागड आणि इतर लेख प्रकाशित.
कोहोजगड - Trek अनुभव
Reviewed by Marathi Blog by Pankaj Ghare
on
May 17, 2020
Rating:
No comments: