मुंबई पासून जवळ आणि सोप्पा Trek म्हणून लोहगडचा पर्याय उत्तम. लोहगडचा Trek करताना वाटेत अनेक वळणे लागतात असं प्रवास करताना जाणवलं.
Marathi Blog - मनात आलं म्हणून
किल्ले लोहगड
लोहगड (सुलेखन पद्धतीने ) |
मुंबई-पुणे हमरस्त्यावर सहज दिसणारा लोहगड एका दिवसात पाहून येऊ शकतो. ‘ठाणे बंद’च्या दिवशी आयतीच मिळालेल्या सुट्टीला सत्कारणी लावण्याचे ठरवले. लोणावळा स्थानकापासून मळवली स्थानकावर उतरलो. आधी मन, नंतर नजरेमुळे मान आणि मानेमुळे पायही रस्ता ओलांडणाऱ्या वळणदार पुलावरून वळले. खरंतर हा शहर आणि गाव यांना जोडणारा दुवा आहे.‘तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो, सकळांचे लक्ष तुजकडे वळो’ असे वाचायला मिळाले. हे ‘एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमाच्या फलकावरचे घोषवाक्य होते. त्यानुसार शिवाजी महाराजांनी केलेल्या श्रमाला प्रतिष्ठा मिळाली आहे. त्यानुसार Trekkersचे लक्ष गड-किल्ल्यांकडे वळते.
सिमेंटच्या रस्त्यावरून चालता चालता एक डोंगर पार झाला आणि पलीकडचा विसापूर किल्ला दिसू लागला. उन्हाळा असला तरी दोन्ही बाजूला वनराई, चरणारी गुरे, बकऱ्या, घोडे आसपास उनाडत होते. करवंद- जांभळांचा आस्वाद घेता घेता मोठ्या आशेने कैऱ्यांच्या झाडाखाली थांबत होतो. काही हाताला लागल्या (तर काही आंबट होत्या म्हणून झाडावरच ठेवल्या).
मळलेली वाट सुरू झाली. त्यावर खडी पसरलेली पांगारा, रुई, निरगुडीची फुले रस्ता सुशोभित करत होती. वळणावळणाचा रस्ता लोहगड पहायला जात आहोत की विसापूर, असा गोंधळात टाकत होता. हा गोंधळ गायमुखी खिंडीपाशी येऊन संपला. डावीकडे जाणारी वाट ‘विसापूर’साठी आहे. खिंड बऱ्यापैकी रूंद असून तिथपर्यंत वाहनेही जातात.
लोहगडवाडी सुरू होताच उजव्या बाजूला एक दगडी शिल्प पडलेले दिसले तर डावीकडे मान वर करायला लावणारी सिंहासनावर शिवरायांची लोहगडाकडे पाहणारी मूर्ती......
गड चढताना सुरूवातीला दिसणार्या तोफा |
उजवीकडे वनराईत शिरून काही वळणे संपताच दोन तोफा पहायला मिळतात आणि पायऱ्यांचा मार्ग सुरू होतो पण टप्प्याटप्प्याने दिशा बदलावी लागतेच. दोन पायऱ्यांमधील अंतर असे की माणसाचा एक पाय चढण्यासाठी तर दुसरे पाऊल पुढे टाकण्यासाठी वापरला जातो. बहुधा येथून घोडे जात असावेत.
पायऱ्या चढतानाच गडाच्या मजबूतीचे व विलक्षण बांधकामाचे दर्शन होते. दोन दगडांमध्ये असलेल्या सिमेंटमुळे नवीन व जुने बांधकाम सहज ओळखता येते. दोन्हीही सुंदर आहेत हे विशेष! कधी उजव्या तर कधी डाव्या बाजूला असलेल्या भिंतीची कडा हा उताराला समांतर नसून पायऱ्यांची आहे. त्या अरुंद कडेवरून माकडे लीलया जात होती. तेथे उभे राहून तुंग, तिकोणा , विसापूरचे व पवना धरणाचे रमणीय दर्शन होते.
पायऱ्यांची वळणे संपताच गोमुखी प्रवेशद्वारापाशी अजस्त्र ‘गणेश दरवाजा’ दिसतो. हा अंधश्रद्धा व अजब व्यवहाराच्याही पायावर उभा आहे. ह्याच्या डाव्या-उजव्या बाजूला बुरुजाखाली एका दाम्पत्याचा बळी देण्यात आला होता व त्या बदल्यात त्यांना गावाची पाटीलकी देण्यात आली होती (असे वाचनात आले होते). गणेश दरवाजाच्या वरच्या बाजूस असलेली नक्षी, फुलांचा आकार, दोन्ही बाजूला उंचावर कोरलेल्या गणेशमूर्ती सुबक आहेत. दरवाजा जरा घाबरवणाराच आहे. लाकडी दाराच्या किनाऱ्यावर आणि मधोमध लोखंडाचे अणकुचीदार दात आहेत. हे दात , साखळदंड, पूर्ण दरवाजा आजही उत्तम स्थितीत आहेत. आत शिरताच उजव्या बाजूला पहारेकऱ्यांसाठी देवडी व पुढे मोकळ्या जागेत एक शिलालेख दिसतो. डावीकडील स्तंभाचा वरचा भाग थोडा ढासळलेला दिसतो. काही अंतरावर तीन तोफा समोरून येणाऱ्यांचे स्वागत (?) करतात.
लोहगड प्रवेशद्वार |
वळसा घालून पुन्हा पायऱ्या चढून डाव्या बाजूला एक द्वार सुस्थितीत आहे. तेथून बुरुजावर जाता येते आणि प्रवेशद्वारापासून लांबपर्यंतचा वळणावळणाचा रस्ता दिसतो. अगदी लोहमार्ग व त्यापलीकडचा परिसरसुद्धा. प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवता येते. मागे फिरून गडाच्या दिशेने जाताना नाना फडणवीसांनी बांधलेला ‘नारायण दरवाजा’ आहे. जवळचे भात व नाचणी साठवून ठेवण्यासाठीचे भुयार सहज ध्यानात येत नाही. आता काही जुन्या पायऱ्या सुरू होतात आणि सर्वात प्राचीन असा ‘हनुमान दरवाजा’ दिसतो. याच्या सरळ रेषेत पायऱ्या चढून गेल्यावर आणखी एक दरवाजा आहे पण पहिल्या दोन दरवाजांप्रमाणे या दरवाजावर मागच्या बाजूने चढून पाहता येत नाही. आधी पाहिलेल्या दरवाजाचे नाव ‘हनुमान दरवाजा असले तरीही तेथे हनुमानाची मूर्ती नाही. ती महादरवाजाच्या शेजारी कोरलेली दिसते. दरवाजांना असलेल्या जंग्या, झरोके, कोनाडे खूपच उपयुक्त असाव्यात. महादरवाजा पार करून उजवीकडे वळून शेवटचा सातवा कमानीसारखा दरवाजा आहे.
धान्य कोठार : लोहगड |
लोहगडावरील दरवाजा |
लगेचच डावीकडे दर्गा दिसतो. त्याच्याशेजारी भग्न अवशेष व समोर ध्वज आहे. ज्या दिशेने गडावर आलो त्याच दिशेने समोर काही गुहा दिसतात. उजवीकडे गडाच्या कडेने चालत पुढे गेल्यास लक्ष्मीकोठीकडे जाता येते. तेथे तीस-चाळीस जण राहू शकतात आणि तशा खाणा-खुणाही त्यांनी ठेवलेल्या आहेत.
लोहगडवरून दृश्य पाहताना |
मागे फिरून दर्ग्याच्या उजवीकडे थोड्या उंचवट भागावर शिवमंदीर आढळते. अगदी बाहेरही दीड उंचीचे शिवलिंग दगडांच्या आधाराने उभे केलेले आहे. त्यामागे काही तळी आहेत. त्यापैकी अष्टकोनी तळ्याच्या बाजूच्या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. पंधरा मिनिटाच्या अंतरावर नाना फडणविसांनी बांधलेले सोळाकोनी तळे आहे. लांबलचक माचीच्या दिशेने चालताना वाटेत अनेक छोटी-मोठी डबकी-टाक्या दिसतात. काहींमध्ये हिरवी झाडी दिसते. तर काहींमध्ये गवत डोकावते.
लोहगडावरील धार्मिक वास्तू |
निमुळता भाग सुरू होतो आणि संपूर्ण माचीचे दर्शन होते. विंचवाच्या नांगीप्रमाणे वळण असल्याने तिला ‘विंचूकाटा’ म्हणतात. सुरुवातीला अगदी सोपी उतरण उतरल्यानंतर डावीकडून अगादी कडेने जाताना काळजी घ्यावी. धाडसी उद्योग करायची संधी मिळाल्याने गुळगुळीत मोठ्या दगडांवरून उतरून गेलो. विंचूकाटाच्या दोन्ही बाजूच्या तटबंदीवरूनही सहज चालता येते. त्यासाठी मध्येच समसमान पायऱ्याही आहेत. मधल्या जागेत एक मोठे टाकेही दिसते. अगदी टोकाला गेल्यावर चिलखती बुरूज दिसतो. दोन्ही बाजूला वाकून पाहिल्यास डोंगराला वळ्या पडलेल्या दिसतात आणि घनदाट जंगलही.
विंचूकाटा : लोहगड |
माचीवरून परतल्यानंतर डाव्या बाजूला सुरू, साग यांची लागवड करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पूर्ण गडावर फारच थोडी झुडुपे आहेत. पावसाळ्यात, हिवाळ्यात दिसणारी मोठी तळी उन्हाळ्यात वाळून वाळूच दिसते.
लोहगडावरून दृश्य |
पूर्ण गड एका तासात पाहून होतो. भेदक विंचूकाटा , भक्कम दरवाजे आणि पायऱ्या उतरताना लोहगडाचा उपदुर्ग विसापुरकडे लक्ष जाते. दोघांमधले अंतर इतके कमी आहे की, रोप-वे नसतानाही मन विसापुरला स्पर्श करून परतते.
अजून वाचा
Marathi Blog - मनात आलं म्हणून,
मराठी पुस्तक - पहिले पाऊल , सफरछंद
Online Books PDF on esahity.com : मुल्हेर ते साल्हेर, कधी सरस कधी कळस, गोरखगड ते सिद्धगड, अलंगाशी संग मदनाशी गाठ
लोकसत्ता 'ट्रेक इट' मध्ये भैरवगड, कलावंतीण , वैराटगड, आजोबागड आणि इतर लेख प्रकाशित.
लोहगडचा वळणदार Trek अनुभव
Reviewed by Marathi Blog by Pankaj Ghare
on
May 17, 2020
Rating:
No comments: