सातार्यातील वैराटगड किल्ल्यावर पदभ्रमण (Trek) उन्हात प्रवास करतानाही तिथली रंगीत माती आश्चर्य देऊन गेली. फार अवशेष नसले तरी किल्ल्यावर Trek करताना फार आनंद मिळतो.
Marathi Blog - मनात आलं म्हणून
किल्ले वैराटगड
गडाचा इतिहास फारसा उपलब्ध नाही, म्हणजे तिथे नवा इतिहास घडवण्यासाठी भरपूर वाव !! गडावर फारसे अवशेष नाही; पण तरीही अर्धा ग्लास रिकामा म्हणून दु:ख करण्यापेक्षा आहेत ते अवशेष बघण्यात, जपण्यात आणि सांगण्यात काय हरकत आहे ? वैराटगड हा काहीसा असाच !!!कडेगाव गावाचे प्रवेशद्वार- सातारा |
वैराटगडसाठी साताऱ्याला वाईहून व्याजवाडी या पायथ्याच्या गावी यावे. या बस फक्त सकाळी व संध्याकाळी आहेत. सणाच्या दिवशी (होळीला) तर बस नव्हती. अशावेळी ‘कडेगाव’ ह्या गावातून गडाकडे जाता येते. कडेगाव हे २६/११ च्या हल्ल्यात...नव्हे विजयात शहीद झालेल्या जयवंत पाटील यांचे गाव आहे, हे सांगताना गावाला आणि गडाला लाभलेल्या नव्या इतिहासाला अभिमान वाटतो. कडेगावापासून गडाच्या दिशेने गावात शिरताना शेतात पिकांमधले वैविध्य दिसते. या पिकांमुळे आणि अनेक फुलांमुळे रंगीबेरंगी पक्षीही आपल्यासोबत पायथ्यापर्यंत येतात. गावाच्या या ‘खऱ्या’ श्रीमंतीचे कारण असलेला कालवा ओलांडल्यानंतर गडाकडे जाणारा रस्ता विचारून घ्यावा. पावसाळ्यात सर्वच झाकलेले तर उन्हाळ्यात सर्वच ओसाड; त्यामुळे नेमकी वाट समजणे आणि तीच वाट योग्य आहे असे सांगणेही अवघड आहे.
वैराटगडावरील मंदिर |
पण माथ्यावर पोहोचायचेच असेल तर अडथळ्यांना लक्षात कोण घेतो ? जागोजागी ढीगभर पालापाचोळा तुडवताना एखादा मोठा दगड लागणार नाही याची काळजी घेत होतो.एखाद्या पट्ट्यावर गवत नाही म्हणजे ती वाट असेल असे वाटून तपासूनही झाले. वृक्षांना पाने सोडून गेलेली, तरीही उलट तेच आम्हाला आधार देत होते. डाव्या बाजूला ऊन अंगावर घेऊन उजव्या बाजूला गड ठेऊन मार्गक्रमण चालूच होते.
वैराटगडावरील अवशेष |
दीड-दोन तासांच्या चढाईनंतर बरेच बुरूज समोर एकत्र दिसतात. त्यासमोरील वाटेवरून वळणे घेत आपण गडाच्या प्रवेशद्वाराशी पोहोचतो. टिकून असलेल्या पायऱ्या चढून गेल्यावर पठारावर सुरुवातीला मारुतीचे मंदीर दिसते. तर बाहेरही मारुतीची मूर्ती मोकळ्या हवेतही दिसते. याचा अर्थ देव देवळाबाहेरसुद्धा आहे....फक्त देवळातल्या छोट्या चौकोनात शक्य नाही. गडाला तटबंदी फारशी नाही. पण कड्यावरून फेरफटका मारताना तटबंदी आणि नैसर्गिक रक्षण सहज लक्षात येते. गडावर उद्ध्वस्त चौथरे आणि काही झोपड्या आहेत. वैराटेश्वर महादेवाचे मंदीर सुशोभित असून आत विजेचीही सोय आहे. विजेच्या तारा गडावरून आणि फारच जवळून जातात. मंडपात शिल्प कोरलेला दगड आहे. माथ्यावर एका मोठ्या टाक्यातील पाणी आमरसासारखे होते; पण फक्त रंगाने. चव घेण्याची इच्छाही होत नाही. गडाच्या पायऱ्या उतरून उजवीकडे सहा ते सात पाण्याच्या टाक्या आहेत. इतर गडांप्रमाणे स्वच्छ, नितळ, चवदार पाणी या गडावरही आहे. ती चव भटक्यांनाच माहीत. उन्हाळ्यात काहीच निसर्गसौंदर्य दिसले नाही हे खरे आणि सर्व बाजूंनी दूरपर्यंत गावात नजर जाते हेही खरे आणि तेथे राज्य करणाऱ्यांसाठी महत्वाचे !!!
कदाचित याच कारणासाठी अकराव्या शतकात भोज राजाने याची निर्मिती केली आणि विराट राजाने चक्क राजधानी म्हणून याची निवड केली.
चढताना झालेली दमछाक, कसरत, गोंधळ टाळण्यासाठी आधीपासूनच उतरण्यासाठीचा मार्ग निवडला होता. किती सोपा रस्ता आपल्याला कोणीच सांगितला नाही असे म्हणता म्हणता तो कमालीचा निसरडा होता. उंचावरून स्पष्ट दिसणारी वाट आव्हानात्मक वाटली. त्यामुळे इथे पावसाळ्यात येणे चुकीचे ठरले असते. ठरवल्या ठिकाणी पाऊल पडेल आणि स्थिर होईल असे झालेच नाही. उंचावरून एखाद्या जागेचा उतार लक्षात घेतला तरी माती कशी असेल हेही सांगता येत नाही, हा नवा अनुभव मिळाला. थोड्या थोड्या अंतरावर (घसरल्याने) वेगळ्या रंगाची मातीही दिसत होती. हा खरोखरच उतरण्याचा मार्ग आहे की थेट वर जाण्याचा हेही तपासून पाहत होतो; पण शेवटी त्याच मातीत पाय रुतूनही बसल्याने मदत झाली. नाहीतर निसर्गावर ‘मात’ करण्याच्या नादात आनंदाची माती झाली असती.
आपण नेहमीच म्हणतो ना ? हे गड-किल्ले चढणे कठीण. पण उतरणे किती कठीण हे वैराटगड दाखवतो. हेच या गडाचे वैशिष्ट्य !!!
वैराटगडावरील वीरगळ |
अजून काही किल्ल्यांविषयी :
मराठी पुस्तक - पहिले पाऊल , सफरछंद
Online Books PDF on esahity.com : मुल्हेर ते साल्हेर, कधी सरस कधी कळस, गोरखगड ते सिद्धगड, अलंगाशी संग मदनाशी गाठ
लोकसत्ता 'ट्रेक इट' मध्ये भैरवगड, कलावंतीण , वैराटगड, आजोबागड आणि इतर लेख प्रकाशित.
वैराटगड - Trek अनुभव
Reviewed by Marathi Blog by Pankaj Ghare
on
May 25, 2020
Rating:
No comments: