माझ्या मते, छंद असणारा व्यक्ति कधीही कंटाळत नाही कारण त्याचा मित्र छंद त्याच्या सोबत असतो. शिक्षण, रोजगार या गोष्टीच अस्तित्त्वात नसत्या तर आपण आपल्या आवडीचं काम केलं असतं ? तो म्हणजे छंद.
Marathi Blog - मनात आलं म्हणून
माझ्या छंदांविषयी
मी सर पास Trek करताना |
एखादी गोष्ट आवडते आणि बऱ्याचदा
काहीही शिकण्याआधीच आपल्याला तिच्याशी नातं जडलेलं असतं. बऱ्याचजणांकडून ऐकतो की आपण लहान असताना सतत एखादी कृती करायचो किंवा सुंदर करायचो. ती करताना आपण पूर्णपणे हरवून
जायचो. अशी गोष्ट करताना कधीही काही फायदा होईल हे माहित नसतं नि तशी मनाची तयारीसुद्धा आधीच
झालेली असते. कुटुंब, व्यवसाय, समाज यांच्याशी किमान सुरुवातीला काडीचाही संबंध
नसतो. पण तरीही ती कृती पुनःपुन्हा करावीशी वाटते की कारण ती एकट्याला आनंद देते. असा तो
छंद. अनेक गोष्टी किमान एकदा तरी कराव्याशा वाटल्या तरी तो छंदच.
काम करता करता
अचानक चहा पिल्यासारखा किंवा एखादा फेरफटका मारल्यासारखा छंदाचा परिणाम होतो. नुसतं आठवलं तरीही छंद आनंद देतो.
आदिमानव गुहेत चित्र काढायचा. राजे शिकारी करायचे, कला
जोपासायचे, कलेला कलाकाराला वाव द्यायचे. कलाकुसरीच्या वस्तू बनवणे, कलेचा आनंद
देणे-घेणे फार पूर्वीपासून चाललं आहे. एकाच ठिकाणी काम करणाऱ्यांमध्ये स्वतःचं
वेगळ अस्तित्व दाखवण्यामध्ये छंद महत्वाचा.
मला मुळातच वाचनाचा छंद. रविवारचा एक Trek बरेच आठवडे उत्साहित ठेवू शकतो. शिवचरित्र आणि
संभाजी महाराज, गड-किल्ले यांबद्दल वाचल्यानंतर Trekking ही काय भानगड आहे हे बघण्यासाठी
गडांवर जाऊ लागलो. त्याला Trekking म्हणतात हे मला तेंव्हाच कळलं. Trekkingमुळे अनोळखी अवलियांशी ओळख होण्याचं प्रमाण हळूहळू वाढलं. त्याला जोडून आधी वाचन आलंच.
एखाद्या ठिकाणी पोहोचण्याआधी तिथे जायचं कसं? याची माहिती घेताना आपोआपच
आजूबाजूच्या गावांची नावं, तिथे जाण्याचे वेगवेगळे मार्ग याची माहिती घ्यावी लागतं
होतीच. पण उत्सुकतेमुळे त्याच्याशी संबंधित माहीत असलेला इतिहासही आवडीने वाचू
लागलो. प्रत्यक्ष ठिकाणी पोहोचल्यावर तिथले अवशेष, लेण्या, वास्तू डोक्यात प्रश्न
पाडू लागले. किल्ल्यांची उंची सर करत मी फार जमिनीवर आलोय. शुद्ध हवेत श्वास, निर्मळ पाण्याची चव, चालण्याचा व्यायाम, शिखरावर
निघून जाणारा घाम-थकवा-त्राण, वाटेत भेटणारी मोकळ्या मनाची माणसं,
कावळा-चिमणी-कबूतर सोडून इतर पक्षी, नवीन किटक, फुलपाखरे, फुलं, सूर्य-चंद्रासोबत
पूर्ण प्रवास, साहसी टप्पे, एकत्र जेवण बनवणे-जेवणे, कधी गुहेत तर कधी तंबू बांधून
झोपणे हे सगळं आवडू लागलं. Trekking करणारी व्यक्ति जगात कुठेही कशीही राहू शकते. अशा माणसांकडे आयुष्यभर पुरतील अशा कहाण्या असतात. Trekमुळे वक्तृत्व सुधारण्यास मदत होते असं वाचनात आलं. तुम्ही शहरी असाल तर Trekमुळे तुमची विचार करण्याची मर्यादा शहराबाहेर जाऊन गावांना भिडते. Trek करताना छायाचित्र घेण्याचा छंद जडू शकतो.
मी छायाचित्र प्रदर्शनात |
छायाचित्र घेऊन घेऊन मला जमतंय अशी पावती इतरांनी दिली. त्याला प्रकाशचित्रण म्हटलं पाहिजे हे वाचनातून कळलं. छायाचित्रांमुळे निसर्गात तयार असलेली चित्रे चौकोनी फ्रेममध्ये बसवण्याची कला जमवण्याचा प्रयत्न होतो. छायाचित्रांमुळे चित्रकला अजून किती सुधारित असावी, माणसाने नाव दिलेल्या रंगांपेक्षा जास्त रंग जगात अस्तित्त्वात आहेत हे कळले. त्यामुळे आपली पेन्सिल बरी, नि स्केचिंग केलेलं व्यक्तिचित्र बरं, इतपत माझी पोहोच आहे. लहान
मुलांची चित्र हुबेहूब आली हेच काय ते यश. मनात असूनही व्यंगचित्र काढायला
सुरुवातही नाही केली. शाळेत असताना कविता करायचो. गड किल्ल्यांबद्दल इतरांनी बरेच
लिहिल्याने मी काय वेगळ लिहिणार म्हणून आधी कधीच लिहिलं नाही. पण लिहिलं तर त्याच कविकल्पना, चित्रातले बारकावे आणि जुना झालेला माझा विनोदी स्वभाव लिखाणात उतरला, लिखाण सुरू झालं आणि जग बदललं.
माझ्यातल्या गायकाला शाळेत पहिली
संधी मिळाली होती. नववी-दहावीपर्यंत आवाज बदलू लागला तसा वैयक्तिक सादरीकरणापासून समूहगीतात आणि नंतर प्रेक्षकांमध्ये अशी बढती झाली. पण मी घरात आजही मोठ्याने गाणी
म्हणतो. Trekkingला जाताना प्रवासात किंवा मुक्कामाच्या ठिकाणी गाण्याच्या
मैफिली जमला की गाणं उसळून बाहेर येतं. त्यामुळे गायन थोडं टिकलं. ते तपासायला ‘इंडियन आयडोल' या
मोठ्या स्पर्धेत भागही घेतला. पण असा आत्मविश्वास येण्याआधी मंचावर जाण्याचा
आत्मविश्वास नटांच्या आवाजाच्या नकलांमुळे टिकून राहिला. त्याआधी शाळेत वक्तृत्व
स्पर्धेत अगदी पहिलीपासून भाग घेतला होता. त्या स्पर्धांमुळे पाठांतर, हावभाव, अभिनय जमलं. त्यामुळे पाठांतर करण्याची क्षमता
वाढली असावी. त्यामुळे शाळेतही नेहमी ऐंशी टक्क्यांच्यावर, पदविकाला साठच्या वर,
पदवीला चाळीसच्या वर तरंगलो. कधीच बुडालो नाही. बुडत्याला काडीचा आधारही
दिला-घेतला. सभाधीटपणा नि पाठांतर या गरजा न राहता हळूहळू सवयी होण्यासाठी छंदांची साथ असावी.
सांगायचं हे आहे की छंदामुळे तुमचे विविध विषय एकमेकाशी नि प्रगतिशी जोडले जातात.
तुमच्याकडे ५० रूपयांचं नाणं आहे? दहावी इयत्तेत असताना मी नाणी जमवण्याचा छंद सुरू केला. साधारणपणे आढळणारी नाणी वगळता विशेष चित्र असलेली नाणी गोळा करताना पूजेचं ताट, चिल्लर मोजणारे हात यांकडे लहान मुलांसारखी नजर जाते (असं केवळ मला वाटतं). वेगवेगळ्या मार्गाने स्वत: जमा केलेली १०० हून अधिक (म्हणजे फार कमी) नाणी माझ्याकडे आहेत. शिवाय इतर देशात न जाता काही परदेशी नाणी-नोटादेखील आहेत.
लिखाणामुळे विचार, मत प्रकट करताना नेमके शब्द वापरण्याची कला वाढते. शिवाय सत्य, चांगलं, पूर्ण, स्पष्ट लिहण्याच्या दृष्टीने लिखाण सुधरत जातं नि वैयक्तिक आयुष्यात आपल्या कृती नि वागण्यात हीच स्पष्टता येते. याचा फायदा काम करताना होतो. लेखन व वाचन हे तर सक्तीचं असावं. लिखाणाआधी वाचन फार महत्त्वाचं आहे. वाचनाने आपल्याला काहीच येत नाही हे समजतं नि माणूस आयुष्यभर 'चांगला विद्यार्थी' होतो.
कधीकधी ही मला आत्मस्तुती वाटते. पण मला माझं उदाहरण देताना अनुभवामुळे छंदाचे फायदे सांगणे सोयीचे जाते. लॉकडाऊन असताना सध्या अनेकांना त्यांच्या छंदाची आठवण आली असेल. माझ्या मते, छंद असणारा व्यक्ति कधीही कंटाळत नाही कारण त्याचा मित्र छंद त्याच्यासोबत असतो. छंदांमुळे सिगरेट-दारू-तंबाखू ही व्यसने नि ती लावणारे मित्र दूर जातात. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असाल, त्या क्षेत्रात तेच काम करणारे अनेक आहेत. पण तुमच्या छंदामुळे तुम्हाला ओळखतात. मला स्वत:ला माझे ग्राहक छंदामुळे लक्षात ठेवतात हा माझा अनुभव आहे.
एकंदर, तुम्ही रिकाम्या वेळात काय करता तेच तुम्ही नैसर्गिकरित्या असता. त्यामुळे छंदाचे रूपांतर व्यवसायात झाले तर यश व समाधान जास्त लाभते.
शिक्षण, रोजगार या गोष्टीच अस्तित्त्वात नसत्या तर आपण आपल्या आवडीचं काम केलं असतं ? तो म्हणजे छंद.
माझ्याविषयी अधिक माहिती
Marathi Blog - मनात आलं म्हणून,
मराठी पुस्तक - पहिले पाऊल , सफरछंद
Online Books PDF on esahity.com : मुल्हेर ते साल्हेर, कधी सरस कधी कळस, गोरखगड ते सिद्धगड, अलंगाशी संग मदनाशी गाठ
लोकसत्ता 'ट्रेक इट' मध्ये भैरवगड, कलावंतीण , वैराटगड, आजोबागड आणि इतर लेख प्रकाशित.
छंद आहे साथीला....
Reviewed by Marathi Blog by Pankaj Ghare
on
May 14, 2020
Rating:
No comments: