खरेदी - लॉकडाऊनआधी नि उद्या

लॉकडाऊनमुळे आणि लॉकडाऊननंतर आपल्या खरेदी करण्याच्या पद्धतीत अचानक बदल झाला आहे. त्या अनेक बदलांविषयी 

अन लॉकडाऊन खरेदी 

marathi blog on shopping during lockdown
कोरोनापूर्व खरेदीची पद्धत बदलेल ?

पूर्ण भारतात लॉकडाऊन सुरूहोण्याआधीच महाराष्ट्रात प्रवासावर नि दुकाने उघणार्‍यांवर मर्यादा आल्या होत्या. ज्यांनी दुकान उघडले होते त्यांना ती सक्तीने बंद करायला संगितले होते. एक व्यावसायिक म्हणून ज्या दुकानदाराकडे माझे काम होते त्याने, "सहाब इधर ४०००० रूपया फाईन मारते है" असं म्हटलं नि माझ्या व्यवसायासाठी होणारी खरेदी थांबली. व्यवसाय थांबला. बाहेर फक्त बँकेत एक काम केले तिथेसुद्धा सर्वजण एकमेकांपासून फार लांब होते. मीसुद्धा वेगाने काम केले. अगदी थोडा ठसका लागला तरी मी जणू क्षयरोगी आहे असा भाव चेहर्‍यावर असलेली स्त्री मी आदल्या दिवशी ट्रेनमध्ये पहिली होती. कोण जाणे कुठे, कोणामुळे नि कोणत्या वस्तूमुळे संसर्ग होईल ?

इतर देशातल्या बातम्या ऐकून होतो. असे अनेक आजार (इबोलासारखे) इतर देशात येतात भारतात-महाराष्ट्रात-मुंबईत-माझ्या घरी येत नाहीत असा एक समज होताच. अगदी त्याचदिवशी जनता कर्फ्यूसोबत थाळी वाजवण्याचा कार्यक्रम पार पाडला तेंव्हा भाऊ दुकानात होता. नि ज्या दिवशी पंतप्रधान मोदींनी २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला अगदी त्याचक्षणी आम्ही भावाला फोन करून घरी आणायच्या वस्तूंची यादी वाढवली.  मी दुकानाकडे जाईपर्यंत रस्त्यावर ही तोबा गर्दी. वाटलं की कोरोनाचा प्रसार आत्ताच होत नसेल कशावरून ?

मी दुकानाकडे गेलो तेंव्हा भावाचे सामान घेऊन झाले होते. सर्वत्र गोंधळ मी गोंधळ. पोलिसांच्या गाड्यातून पोलिस उतरून सर्वांना सांगत होते की दुकानं नंतरसुद्धा उघडी असणार आहेत. लोकांचा विश्वास बसत नव्हता. पंतप्रधान तर असं काहीच म्हणाले नव्हते. दुकानात पैसे दिले होते त्यामुळे आम्ही व काही ग्राहक दुकानाकडे थांबले. इतर सर्वजण जे रांगेत होते त्यांनी हळूहळू रांग सोडली. पोलिसांनी दुकान बंद केले तेंव्हा सर्व निघून गेले. नंतर थोड्या वेळाने शटर उघडून आमचे सामान मिळवले. 

आम्ही जिंकलो पण यापुढे सामान कसं आणायचं हा प्रश्न होताच. 

घरी आईला वारंवार एक प्रश्न आम्ही विचारत असू, " सगळं सामान आहे ना?" तर आई म्हणायची, " मुद्दाम पाव किलोऐवजी अर्धा किलो सांगितलं." पण त्यावेळी ती वस्तू थोड्या चढया भावात मिळाल्या. दुकानदाराकडे सुद्धा वेळ नव्हता त्यामुळे वस्तू तपासून घ्यायलासुद्धा वेळ नव्हता. त्यामुळे मिळेल ते किंवा दुकानदार देईल ते चांगलं असं म्हणत आम्ही काही वस्तू विकत घेतल्या ज्या आधी आम्ही स्वत: कधीच घेतल्या नव्हत्या. पण एकंदर आपल्या घरी २१ दिवसांसाठी पुरेल इतकं सामान आहे याची खात्री झाली होती. 

पण पुढचा दिवस उजाडला तेंव्हा लक्षात आलं की काही वस्तूंसाठी तर रोज बाहेर जावं लागणारच आहे. मला एक वर्षाचे बाळ आहे. बाहेरचे दूध सुरू केल्यापासून ( सहा महिन्यांनी) पिशवीतले अमूल दूध द्यायला आम्ही सुरूवात केली. पण लॉकडाऊनच्या सुरूवातीला दूधपुरवठा नियमित राहील ही बातमी फार नंतर आली. एकदा अनेक दुकाने फिरून आल्यानंतर अमूल दूध मिळायचं. त्यामुळे अगदी सकाळी घराबाहेर पडून दूध आणायची जबाबदारी भावाकडे गेली. एकदा त्याला उशीर झाला तेंव्हा थोडे लांब दुकान शोधून अमूल दूध मिळवले जेंव्हा सकाळी आमच्याच बाजूच्या इमारतीत कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले. तेंव्हा आम्ही भांडुपला चाळीत राहत असताना  घरी नियमित दूध देणार्‍या भैय्या नि गुजराती आंटींची आठवण आली.

आम्हाला अगदी दरवाजात दूध, पाव-खारी-बटर-टोस्ट मिळायचे. मच्छी विकणारे तिरकस बोलणारे पण शेवटी व्यवहार करणारे मराठी मामा-मावश्या आठवल्या. नंतर मासेसुद्धा भैय्या आणत असत. एक न्हावी रोज चाळींमधून फिरायचा. दुपारच्या वेळी बोंबलून फळे विकणार्‍यांना सर्वजण फार ओरडायचे कारण झोपमोड व्हायची. भोपू वाजवणारा इडलीवाला, म्हातारीचे गुलाबी केस किंवा रंगीत कापूस विकणारा, मिठवला, कुरमुरेवाला, कुल्फीवाला हे आमच्या आवडीचे होते. तर गृहिणी त्यांच्या वेशभूषा-केशरचनासाठी फिरणार्‍या भेय्यांची नि राजस्थानी महिलांची वाट पहायच्या. मराठी विक्रेते एखाद्या कंपनीची औषधं आणत. एकदा चाळीत अनेकांना सिलेंडर ते शेगडीला जोडणारा पाईप विकणारा पाईप विकून गेला नि अनेकांनी घरात गॅस पसरत आल्याचे संगितले तेंव्हा ती वस्तू पुन्हा कोणीच घेतली नाही. बरेचजण किमान धंदा करताना तरी नम्रपणे बोलत. बर्‍याचदा स्वत: घरापाशी थांबत. स्वत: आपल्याकडे ताजे काय आहे, नवीन काय आहे हे सांगत. 
marathi blog on shopping vegetables
ऑनलाइन खरेदी करताना दर्जेदार वस्तू मिळेल का ?

त्या सर्वांची या लॉकडाऊनमध्ये फार आठवण आली. विश्वासाने चांगली वस्तू, चांगल्या दरात, आपल्या दारात मिळायची नि मोठयाने ते ओरडायचे त्यामुळे आपल्याकडून विसरण्याची शक्यता नव्हती. आता मात्र मी सारखे यादी बनवून घराबाहेर पडत होतो. प्रत्येक वस्तूच्या दर्जावर संशय. सर्व वस्तू आधी पाण्यातून काढायच्या. त्या वस्तू ज्या पिशवीतून आणल्या तिला हात लावायचा नाही. जो घरात येईल त्याला स्पर्श करायचा नाही. वापरलेले कपडे थेट बादलीत पाण्यात ठेवायचे. अशा अनेक सूचना आठवायच्या  आठवण करून द्यायच्या. 

चांगल्या दर्जाची भाजी,फळे, मासे निवडायचे कशी याचे आम्हाला ज्ञान नसल्याने  शक्यतो पप्पा आणायचे. पण त्यांचे वय तर सत्तरीकडे ! कोरोनाकाळात आमच्या सुशिक्षित अज्ञानीपणाची जाणीव होत होती. या प्रश्नांची उत्तरं आम्ही गूगलवर मिळवून काही फायदा नव्हता. तुम्हाला येणार नाही, जमणार नाही, कोणीतरी उल्लू बनवेल हा आमच्यावर बसलेला शिक्का होता. माझ्या शत्रू भाज्या म्हणजे सूरण, भेंडी, दोडके भावाच्या नावडत्या भाज्या गवार, फरसबी, वाल, मला डॉक्टरने नाकारलेली कोबी, भावाला नाकारलेली वांगी, आमच्याकडे कधीच न दिसणार्‍या तोंडली, शेपू या भाज्या बाजारात जास्त दिसायच्या. या सर्वातून नेमकी कोणती भाजी आणायची हा प्रश्न असायचा. तरीही काही नावडीच्या भाज्या आम्ही खात असू. प्रत्येक भाजीत काहीतरी सत्त्व असतं हे माहीत असल्याचे नि एखादा पदार्थ अधिक खाऊ नये याचे थोडे शहाणपण तिशी-चाळीशीच्या वयात येतेच. 

पण तरीही बाजारात प्रत्यक्ष खरेदी करताना इतर अनेक सवयींना बगल द्यावी लागली. मैदानात थोड्या थोड्या अंतरावर विक्रेते असताना जिथे गर्दी आहे तिथे जाणं अनेकांनी टाळलं. मी ज्या विक्रेत्याशी बोलतोय तिथेच गर्दी झाल्यावर मी चटकन माझ्या जवळ एखादी व्यक्ती नाही ना ? असेल तर तिने मास्क घातला आहे ना ?ग्राहकांनी एकमेकांत अंतर ठेवले तरीही ते परिणामकारक आहे की नाही ही शंका आहे ? बरं विक्रेत्याचे हात स्वच्छ आहेत ना ? त्याच्याकडे सर्व ताजे नि स्वच्छ आहे ना ? तो स्वस्त किंवा नेहमीच्या किमतीत देत असेल तर कमी दर्जाचे नाही ना ? असे अनेक प्रश्न मनात असायचे. कारण मला जास्त वेळ विचार करत खरेदी करायची नव्हती पण चांगली वस्तूही हवी होती. मला जास्तीत जास्त दिवसांसाठी पण जास्त दिवस टिकेल अशी वस्तू विकत हवी होती. पुन्हा गर्दीत शिरणं म्हणजे संसर्गाला सामोरे जाण्याची तयारी असल्यासारखं होतं. शिवाय घरात एक वयस्कर नि एक लहान बाळ. बाळा साठी दूधात टाकायचे वावडिंग आम्हाला अनेक दुकानांत मिळाले नाही; पण मैदानातील उन्हात उभ्या असलेल्या एका विक्रेत्याकडे ते मिळालं !! 

अशा वेळी आंधळेपणाने एखाद्या राजकीय नेत्याला पाठिंबा देणारे आठवले. तो नेता सांगेल तेच बरोबर. तेच सर्वोत्तम. त्याच्या आधीचे, सध्याचे, त्याच्या विरोधातले, विरोधी पक्षात नंतर जाणारे सगळेच्या सगळे ढोंगी, दुष्ट, वाईट, लबाड, कपटी, घोटाळा करणारे !!! मग आपण घेतलेल्या सामनात नि त्यांच्या किमतीत काही घोळ नाही ना असा विचार करत आम्ही घरी आलो.
marathi blog on shopping with social distancing
रांगेत उभे न राहता ऑनलाइन खरेदी वाढेल ? 

आमच्या घराजवळच डी-मार्ट आहे. तिथे सकाळी कूपन घेण्यासाठी गर्दी असते. कूपन मिळालं की दुसर्‍या दिवशी कूपनवर दिलेल्या छापील वेळेत ग्राहकांनी तिथे रांगेत अंतर ठेवून उभं रहायचं. आत शिरताना नेहमीसारखी ( तसेच यंत्राद्वारे ताप आला आहे की नाही हीसुद्धा) तपासणी व्हायची. प्रत्येकाच्या हातावर सॅनिटायजर दिले जायचे. आत गेल्यानंतर वीस मिनिटात खरेदी करून काउंटरवर या, नाहीतर खरेदी-विक्री रद्द होईल अशी एकसारखी सूचना व्हायची. आमच्या आधी आत शिरलेले काउंटरजवळ असायचे. आम्ही बिलासाठी रांग लावताना पुढील ग्राहकांना आत सोडले जायचे. आतल्या प्रत्येक सेवकाच्या तोंडाला मास्क व हातात मोजे असायचे. डी-मार्टमध्ये ( सध्यातरी) रोख व्यवहार किंवा कार्ड वापरून व्यवहार होतात. पण तिथे पेटीएम, भीम, गूगलपे, फोनपे वापरून व्यवहार होत नाही याचे मला आश्चर्य वाटले पण मी व्यावसायिक असल्याने डी-मार्ट आणि या ऑनलाइन व्यवहार यंत्रणांनामध्ये व्यवहार होत नाही तोपर्यंत त्या पद्धतीने व्यवहार होईल असे वाटत नाही. इतर दुकानांमध्ये मात्र मोबाइलद्वारे पैशांना हात न लावता व्यवहार झाला तेंव्हा लक्षात आले की मैदानात खरेदी करताना तर नोटा-नाणींना सर्वांचा स्पर्श झाला होता !!!

एकंदर आता आपली जगण्याची, खासकरून समाजात वावरताना, या लेखाचा मुख्य विषय म्हणजे खरेदी करताना प्रत्येक ग्राहकाला नि सेवा पुरवणार्‍या प्रत्येक विक्रेत्याला अनेक आश्वासक बदल करावे लागतील. 


बर्‍याच वस्तू मिळत नाहीत तेंव्हा एखाद्या दुकानदाराकडे आपल्याला रोज लागणार्‍या, एखाद्याकडे आठवड्याला, पंधरा दिवसांनी, महिन्यातून एकदा लागणार्‍या वस्तूंची यादी आधीच असावी अशी कल्पना आता लिहताना मनात आली. (म्हणून हा लिखाणाचा प्रपंच ). शिवाय त्यामुळे त्या दुकानदाराकडेसुद्धा एक निश्चित ग्राहकांची व दुकानात ठेवाव्या लागणार्‍या वस्तूंची यादी असेल व आपण देणे लागू असलेली किंमत ठराविक रकमेच्या पलीकडे गेल्यास विक्रेता सूचना देईल. आपल्याला हव्या असलेल्या वस्तू आधीच खात्रीने उपलब्ध असतील.  

काळाप्रमाणे बदलावे लागेल नाहीतर काळ आपल्याला बदलेल. 


मराठी पुस्तक ( सशुल्क)  - पहिले पाऊल , सफरछंद ( बूकगंगा. कॉम वर उपलब्ध )
Online Books PDF on esahity.com ( Free) : मुल्हेर ते साल्हेर, कधी सरस कधी कळस, गोरखगड ते सिद्धगड, अलंगाशी संग मदनाशी गाठ  
लोकसत्ता 'ट्रेक इट' मध्ये भैरवगड, कलावंतीण , वैराटगड, आजोबागड आणि इतर लेख प्रकाशित.

खरेदी - लॉकडाऊनआधी नि उद्या  खरेदी - लॉकडाऊनआधी  नि उद्या Reviewed by Marathi Blog by Pankaj Ghare on June 01, 2020 Rating: 5

2 comments:

  1. You always write Impromptu with current situation. I like all comedy and current affairs writting by you. Keep it up :)

    ReplyDelete
  2. Thanks. I am trying to write something which will be useful to society and trying to write something their entertainment only though reading.

    ReplyDelete

मनात आलं म्हणून

मनात आलं म्हणून
थोडं माझ्याविषयी
Powered by Blogger.