तेचतेच राशिभविष्य

कोरोनाचं संकट येण्याआधी राशिभविष्य सांगणार्‍या ज्योतिषांनी भविष्य किंवा त्याचा अंदाज द्यायला हवा होता. राशिभविष्य ही अंधश्रद्धा आहे हे सांगणारा हा लेख.

राशिभविष्य एक अंधश्रद्धा 

marathi blog on superstition

जगावर, देशांवर, राज्यावर, शहर-गावावर, अनेक माणसांवर कोरोनाचं संकट आलं. याआधीसुद्धा अनेक संकटं आंतरराष्ट्रीय नि राष्ट्रीय स्तरावर येऊन गेली. पण....

प्रत्येक संकटाप्रमाणे हे कोरोनाचं संकटसुद्धा एकाही ज्योतिषाला माहीत झालं नाही. इतकंच काय, कोरोनाचं संकट सध्या चालू असताना सुद्धा उद्या कुठेकुठे कोणकोण कोरोनाग्रस्त होणार हे अजूनही सांगत नाही. 

एकीकडे सरकारला नेमक्या याच गोष्टीची माहिती हवी आहे तर पूर्वापार चालत आलेली आणि अनेक लोक खरी मानत असलेली महान ज्योतिष'विद्या', ज्योतिष'शास्त्र' वापरून कोरोनाबाधितांची संख्या आधीच का सांगत नाही? 

शास्त्र किंवा विद्या असा शब्द जोडला की ते 'विज्ञान'च आहे असा आपण गैरसमज करून घेतला आहे. शास्त्र म्हणजे जे प्रयोग करून सिद्ध करता येतं ते.  सिद्ध झालं तरीही त्याला आवाहन दिलं जाऊ शकतं आणि आधी सर्वमान्य केलेलं उत्तर बदलता येतं. 

ज्यांच्या मनात ज्योतिषश्रद्धा, वास्तुश्रद्धा, अंकश्रद्धा असते, त्यांवर 'शास्त्र' या शब्दाचा चटकन नि खोल परिणाम होतो. लोकांच्या श्रद्धेचा वापर करून उपाय सुचवायचा, तो नाही केला की नुकसान होणार किंवा 'करून बघा, झाला तर फायदाच होणार, नुकसान काय त्यात?' असं म्हणायचं नि स्वत:चा केवळ फायदाच करून घ्यायचा अशी योजना असलेले ज्योतिष'तज्ञ' सध्या कोरोनाप्रमाणे दिसत नाहीत. कोरोना प्रथम भारतात आढळला असता तर बाबांची तावीज, बापूंंची उदी, मैय्या की मांग, देवीचा दृष्टांत, अंगठीतले खडे, अमुक दिशेला नमस्कार, नवसाला पावणाऱ्या जाग्र जागृत देवाला आर्थिक नवस, अशोकाच्या झाडाला प्रदक्षिणा असे उपाय झाले असते.

पण 'नुकसान काय त्यात' याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. रोज आपला वेळ वाया जातो, भविष्य सांगणाऱ्याला पैसे द्यावे लागतात यापेक्षा मोठे तोटेही आहेत. त्याची काही उदाहरणे.... 

१. भविष्य सांगणारे विद्यार्थ्यांला तुझा अमुक एक विषय चांगला आहे असं सांगून इतर विषयांत कितीही मेहनत केली तर कमीच गुण मिळणार आणि अभ्यास केला नाही तरी ज्योतिषाने सांगितलेल्या विषयात चांगले गुण मिळणारच असे वाटून दोन्ही प्रकारात अभ्यास होत नाही.

२. ज्योतिषाकडे जाण्याचा नाईलाज लग्नाच्या विषयात जास्त वेळा होतो. कारण आपण समजवू शकत नाही अशा अनोळखी व्यक्तींना आपल्या शिक्षण-प्रगती- कर्तृत्वापेक्षा 'कायमचं सुख' (पैसा, घर, जमीन, वडिलोपार्जित संपत्तीचे कमीतकमी वाटेकरी, स्वत:च्या कुटुंबाचा पालक, दीर्घकाळ जोडीदार जिवंत राहण्याची 'गॅरंटी' ) हवं असतं. ज्योतिष आपल्याला 'हवा असलेला जोडीदार' हा विषयच बाजूला करून जन्मवेळ नि जन्मस्थळावरून आधी ग्रह- नक्षत्रांच्या जोड्या लावतात. पण खरंतर (वर सांगितलेलं) 'सुख' मिळणार का या प्रश्र्न-उत्तरावरूनच माणसं कळतात, नाती जुळतात, लग्न ठरतात किंवा मोडतात आणि टीकतात. ज्योतिष श्रद्धेमुळे इच्छा-अपेक्षांशी तडजोड  होता 'तह' / 'करार' / 'व्यवहार' होतो.

३. एखाद्या प्रगती करणाऱ्या किंवा प्रगती केलेेल्या व्यक्तीला जमिनीवर आणायचं असेल तर तुझं नशीब चांगलं आहे असं म्हणत ग्रहांना श्रेय द्यायचं नि  अपयशी झाला तर त्या अपयशाचं खापर ग्रहांवर टाकलं की निराश होणाऱ्याचं नैराश्य कमी होतं. 
ज्योतिष श्रद्धे चा आधार घेतला हमखास यशाचा एक मार्ग दाखवला जातो ज्यात अंगठी, नैवेद्य, नवस, सत्यनारायण, ग्रह शांती, वास्तू, मंत्र, यात्रा यांचा हमखास उल्लेख असतो  नि कामात-नोकरी-व्यवसायात गरजेचे असलेले ज्ञान, शिस्त, सातत्य, हुशारी, सतर्कता, नवीन शिक्षण, स्वभाव , योजना, कृती, गुंतवणूक यासाठी लागणारा वेळ-पैसा-मेहनत कमी होतात.

marathi blog on superstition wrong information
 एकंदर आपल्या मनाचा ताबा आपण दुसऱ्या अनोळखी व्यक्तीला सोपवतो. तो तुमच्या शिक्षण, लग्न, प्रगती, आरोग्याची जबाबदारी घेतो का? की फक्त दक्षिणा घेतो ? सोनं जसं तपासून घेतलं जातं, वस्तू /सेवा घेताना दर्जा आहे की नाही ( त्याला ISO आहे की नाही) हे तपासलं जातं तसं ज्योतिष'शास्त्रा'चं काय ? ते खरं नि महत्त्वाचं आहे तर शाळेत अ,आ,इ A,B,C,D, १,२,३ सोबत का शिकवत नाहीत ?

इतकं सांगूनही ज्योतिष श्रद्धेवर विश्र्वास असेल तर तुमचाच वेळ वाचण्यासाठी खाली भविष्य देतोय. बरीच वर्षे बर्‍याच ठिकाणी राशिभविष्य वाचून, टीव्हीवर ऐकून शेवटी माझ्याच घरातल्या दिनदर्शिकेच्या ३ महिन्यांचं सर्व राशींचं भविष्य एकत्र करून ते विषयानुसार वेगळं केलंय. जे वाक्य पुनः पुन्हा वेगवेगळ्या राशीसाठी वाचलं त्यापढे ते किती वेळा वाचलं याचा आकडा दिला आहे.( यापेक्षा वेगळं भविष्य दिसल्यास कोणी सांगितल्यास स्वत: याप्रमाणे भविष्याचं वर्गीकरण करा.) यापेक्षा वेगळं कुणाच्या आयुष्यात नि भविष्यात कधीच घडलं नाही, घडत नाही, घडणार नाही. 

तुमच्या लक्षात येईल की जे भविष्य म्हणून सांगितलं जातं ते तर सामान्य ज्ञान, साधे सल्ले, सुविचार असतात. त्यासाठी ज्योतिषीची गरज नसते. ( लेख मोठा वाटू नये म्हणून आधी नोंदवलेल्या सर्व वाक्यांमधील समानार्थी वाक्य एकत्र केली आहेत.)

आर्थिक:
मोठे आर्थिक लाभ होतील.(१०) आर्थिक समस्या सुटतील (२). अवास्तव खर्च होण्याची शक्यता आहे (२). स्थावर प्रॉपर्टीची खरेदी होईल (११). स्थावर प्रॉपर्टीचे लाभ होतील (२). स्थावर प्रॉपर्टीची निर्णायक कामे होतील.(२) आर्थिक प्राप्ती चांगली होईल. धार्मिक कार्यासाठी खर्च होईल. सरकारी कामासाठी खर्च होईल. (२) अचानक आर्थिक लाभ संभवतात(४). कर्ज घेणे शक्यतो टाळा (२). आर्थिक प्रगती जेमतेम राहील (३). मोठे खर्च निघतील.(२) कायदेशीर बाबींसाठी व अनाकलनीय खर्च होतील.(२) कायदेशीर अडचणी जाणवतील. मोठी गुंतवणूक होईल (२). मोठ्या उलाढाली किंवा अस्थिरता होईल. खरेदी विक्री वाढेल. आर्थिक कोंडी होईल. (१). सुवर्णलंकाराची खरेदी कराल.  शेती-बागायतीची खरेदी कराल. सावधपणे व्यवहार कराल.

प्रवास:
परदेशगमन होईल(१०). कामासाठी प्रवास घडेल.(४). प्रवास घडेल.(६) वाहन जपून चालवा. वाहन खरेदी कराल. 

नातेसंबंध:
विवाह जुळेल.(१६) कुटुंबात समस्या असतील.(४) जोडीदाराची काळजी घ्या. मित्रांवर फार विसंबून राहू नका. आई-वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. घरगृहस्थीची काळजी राहील(७). भाऊबंदकी जाणवेल. (२) जवळच्या व्यक्तींना नाराज करू नका. थोरांच्या सहवास लाभेल.(२) नातेवाईकांची सरबराई करावी लागेल. वरिष्ठांशी संघर्ष टाळा. विवाह ठरल्यास श्रीमंत स्थळ मिळेल. अहंपणामुळे घरोघरी संघर्ष होईल. अहंपणामुळे गैरसमज होतील(२). जवळच्या व्यक्तींना दुखवू नका. पती-पत्नीमध्ये गैरसमज होणे शक्य आहे. जोडीदाराचा सल्ला उपयुक्त राहील. प्रिय मित्राचा वियोग संभवतो. मित्रांमुळे अडचणीत याल. स्वत:ची व जोडीदाराची तब्येत सांभाळा.(२) अनारोग्य जाणवेल. संतती होईल.

आरोग्य:
शारिरीक व्याधी असतील(७). पितृसम व्यक्तीला त्रास संभवतो. गुडघेदुखीचा त्रास संभवतो. पोटाची तक्रार जाणवेल(७). प्रकृती नरम-गरम राहील.(२) प्रसुतीच्या वेळी सिझरिनची शक्यता राहील. (२) कर्णविकार जाणवेल.(२) घशाचे विकार जाणवतील.(२) मानसिक त्रास होईल. शारिरीक दगदग होईल.

नोकरी/ व्यवसाय:
धंद्यातील बदल संमिश्र अनुभव देणारे असतील. परदेशी व्यवहारातून फायदा होईल (४). विपरीत घटनेतून फायदा संभवतो.(४) वरिष्ठांची गैरमर्जी होऊ शकेल.शेतीपासून लाभ होतील (४). अहंकारामुळे त्रास होईल. धंद्यात त्रास संभावतो. धंद्यासाठी भरभराटीचा काळ आहे.   निर्णायक कामात यश मिळेल (३). महत्त्वाची कामे होतील.(३) कलाक्षेत्रात उत्तम कामगिरी कराल (५). रोजगार मिळेल.(२) झटपट कामे उरकाल. कायदेशीर बाबींचा त्रास राहील. धंदा-व्यवसायात स्पर्धा वाढेल. स्पर्धकांची भीती राहील.(२) स्पर्धकांचा अंदाज घ्या. बक्षिसे मिळतील (३). पुरस्कार मिळतील. अधिकार असतील.(२) नोकरदारांना अनुकूलता भासेल. धंदा-व्यवसायाला चालना द्याल. कामात अडथळे येतील. विलंब लागेल. नोकरीत कौतुक होऊ शकेल.(२) धंद्यात अडथळे, विलंब अनुभवाल.  धंद्याला चालना द्याल.(२) नोकरीत जबाबदारी वाढेल.धंद्यात मर्जी राहील. धंद्याच्या विकासासाठी योजना आखाल. 

स्वभावविशेष:
अतिमहत्त्वाकांक्षा व अहमपणामुळे नुकसान होऊ शकेल. आव्हानात्मक बाबीत तुमचाच विजय होईल. (२) गुप्त कारस्थानांचा त्रास संभवतो (५). आत्मविश्वास चांगला राहिल. (२) संघर्षातून यश मिळेल. क्रोध आवरा(६). महत्त्वाकांक्षी रहाल (७). प्रयत्नवादी, आशावादी रहाल. बोलून इतरांना दुखवू नका. प्रलोभने टाळा. लहरीपणा राहील. इतरांना तुच्छ समजाल. मनाची कुचंबणा होईल (४). विसरभोळेपणामुळे नुकसान संभवतो. मनमानी कराल (२). सावधपणे वागाल. उद्दीष्टपूर्तीसाठी प्रयत्नशील रहाल. मानसिक क्लेश होईल. आनंदी बनाल. बुद्धिकौशल्याने लाभ होतील.(३) जवळच्या व्यक्तींना दुखवू नका.स्वत:ला सिद्ध कराल. तुमच्या उदारपणामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकाल.

शिक्षण:
शिक्षणात प्रगती होईल (२). विद्याव्यासंग वाढेल.(४) प्रशिक्षणासाठी निवड होईल. शिक्षणाला भाग्याची जोड मिळेल (३). शिक्षणात अडचणी येतील. गुणवत्ता वाढवा.(२)

सामाजिक:
गुणांना वाव मिळेल. सामाजिक कार्यात वाद होतील. विकासयोजना राबवाल.(२) मानसन्मान लाभेल.(३) सामाजिक व राजकीय क्षेत्रात प्रभावी रहाल. नावलौकिक होईल. सामाजिक कार्यात सहभागी रहाल. समाजाभिमुख रहाल.  निवडणूकीत यश मिळेल (२).

इतर:
नवीन वस्त्रांचा लाभ होईल.भाग्यकारक अनुभव येतील. भाग्यकारक संधी चालत येतील(४). प्रगतीकारक व भाग्यकार काळ आहे. धार्मिक कृत्ये कराल. हौसमौज कराल(५). रिकाम्या उठाठेवी करू नका. जोखमीच्या ठिकाणी सुरक्षा बाळगा (६).

कोणत्याही राशीचं भविष्य वेगवेगळ्या ज्योतिषाकडून, वेगवेगळ्या वर्तमानपत्रात, दिनदर्शिकेत वेबसाईटवर नेहमी वेगळं येतं म्हणून भूतकाळातल्या अनुभवातून शिकत वर्तमानकाळात कृती केली तर ??

मराठी पुस्तक  - पहिले पाऊल , सफरछंद 
Online Books PDF on esahity.com : मुल्हेर ते साल्हेर, कधी सरस कधी कळस, गोरखगड ते सिद्धगड, अलंगाशी संग मदनाशी गाठ  
तेचतेच राशिभविष्य तेचतेच राशिभविष्य Reviewed by Marathi Blog by Pankaj Ghare on May 19, 2020 Rating: 5

2 comments:

  1. जर कुणाला ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवायचा नसेल तर नका ठेवु पण ते चुकीचं आहे असे म्हणायचा अधिकार तर नक्कीच नाही. अहो मुल कसेही असले तरी ते आई वडिलांना प्रेमाचे असते.

    ReplyDelete
  2. अर्थात. इथे प्रत्येकाला धंदा-व्यवसाय करण्याचा अधिकार आहे. पण शास्त्र कशाला म्हणावं याबद्दल जनजागृतीहोणं गरजेचं आहे. नाहीतर लोकांच्या अज्ञान, विश्वास व श्रद्धा यांचा वापर करून होऊन होणारे व्यवसाय चालूच राहतील. होतं असं की लोकांची विचार करण्याची वृत्ती काळानुसार सुधारण्याऐवजी, अंधश्रद्धा पसरविणारे नि त्यातून चरितार्थ करणारे आधुनिक माध्यमांचा वापर करून पुन्हा अंधश्रद्धा पसरवत असतात. काळानुसार विज्ञानाच्या कसोटीवर भविष्य सांगणारी पद्धत अस्तित्त्वात आणून त्याद्वारे भविष्य सांगता आले असते तर नक्कीच स्वागत झाले असते. फक्त शास्त्र हा शब्द जोडला की जनमानसाचा ताबा घेणं सोप्पं होतं.
    मूल, आई-वडील, प्रेम या उपमा या लेखात नि उत्तरात लागू होत नाहीत.

    ReplyDelete

मनात आलं म्हणून

मनात आलं म्हणून
थोडं माझ्याविषयी
Powered by Blogger.