पुस्तके का वाचावीत ?

'वाचन करणाऱ्यांनी' हा लेख पटला तर तो 'वाचन न करणाऱ्यांना' जरूर पाठवावा. वाचन करणाऱ्यांची संख्या वाढावी. त्या वाचनाचा फायदा त्यांनाच होणार आहे पण कसा आणि काय फायदा होणार हे सांगण्याचा हा प्रयत्न !

Marathi Blog - मनात आलं म्हणून

पुस्तके का वाचावीत ?

marathi blog-benefits of reading books

महाभारत किंवा रामायण  किंवा अनेक कथा अनेकांना तेंव्हा माहीत झाल्या जेंव्हा त्या टीव्हीवर दाखवल्या गेल्या.  ज्यावेळी निरक्षरांची संख्या जास्त होती, त्यांच्यासाठी टीव्ही हे कथा सांगण्याचं माध्यम योग्य होतं नि आहे. पण सध्या बहुतेकजण साक्षर आणि अनेकजण सुशिक्षित असूनही वाचन करत नाहीत. 'वाचन' या सुंदर अनुभवाला मुकणारेही  अनेकजण आहेत असे वाचन करणाऱ्यांना वाटत असते. कारण टीव्ही, मोबाईल किंवा चित्रपटात दाखवलेल्या रामायण / महाभारतापेक्षा ती कथा जास्त मोठी आहे हे वाचन करणाऱ्यांना जास्त माहीत असतं.  

पुस्तके न वाचणाऱ्यांबद्दल 

अनेकांना आयुष्यात कोणता न कोणता छंद असतो. पण सध्या सर्वजण बिझी असतात त्यामुळे त्यांना वेळच नसतो आणि तरीही त्यांनी सोशल मीडियावर अनेक पोस्ट, व्हिडीओ ( आणि लेख ) पाहिलेले असतात. नुसते पाहून त्यांना सर्व विषयातले सर्व कळते. इतके ज्ञान मिळते की ते वादही घालू शकतात! काहीना फक्त पुस्तकातील अक्षरे छोटी दिसतात पण तरीही ते मोबाईलमध्ये आत घुसून असतात. मोबाईलवरची छोटी अक्षरे मात्र त्यांना दिसतात.   मोबाईलआधी टीव्ही बघायला आवडणारे जास्त होते. एखादा विषय किंवा कथा थेट बघण्यात सवय झालेल्यांना वाचनाचा छंद फार कष्टाचा वाटतो. मोबाईल किंवा टीव्हीवर दिसणारी कथा पाहताना मेंदूला कष्ट होत नाही. ज्या अवयवाला कष्ट दिले जात नाही त्याचा विकास होत नाही. म्हणजे व्यायामशाळेत पायांचा व्यायाम केला नाही तर त्याचे स्नायू बळकट होत नाहीत. मेंदूची वाचनातून शक्य होऊ शकलेली जास्त प्रगतीची संधी तो टीव्ही / मोबाईल वापरणारे चुकवतात, जेंव्हा तेच स्वत:मधल्या वाचकाला जवळपास नष्ट करतात. वाचनामुळे कोणतीही कथा कोणीही स्वतः कोणीही डोळे बंद करून पाहू शकतो. शिवाय कथेतून निघणारा अर्थ हा स्वतःच्या अनुभवांशी जोडत असल्याने ती जास्त परिणाम करते. 

कष्ट होऊ नये म्हणून अनेकजण वाचन न करण्याच्या अनेक सबबी देत असतात. वाचताना डोळे दुखतात किंवा झोप येते असे म्हणणारे अनेकजण मोबाईलमधला लांबलचक नि छोट्या अक्षरातला मजकूर मात्र कसे काय वाचतात याचे आश्चर्य मला नेहमी वाटते. त्यातील अनेकजण असेही आहेत ज्यांना मुळात शाळेत कमी गुण मिळाल्याने वाचनाची आवडच नसते. हे तर अगदी काही दिवस सक्तीचा व्यायाम नाईलाजाने करून तो महत्त्वाचा आहे हे माहीत होऊनही नंतर पूर्णपणे व्यायाम सोडल्यासारखं झालं. अवांतर वाचन केलेल्या पुस्तकांवर परीक्षा कुठे होते? पुस्तके जड असतात हातापेक्षा मोठी वाटतात अशी सबब सांगणारे कमी वजनाची किंवा छोट्या आकाराची पुस्तकेही वाचायला घेत नाहीत !! अशा व्यक्तींनी किमान मोबाईलवर ई-पुस्तके तरी वाचावीत. इतकं सर्व असलं तरीही आंबट पुस्तकं मात्र आवर्जून वाचली जातात. इतकेच नव्हे तर ज्यातून थेट धनलाभ होतो किंवा संकटे दूर होतात अशी पातळ पुस्तके १०८ वेळा वाचतानाही त्यांना कोणताच त्रास होत नाही. हे कसे काय ?

आर्थिक प्रगती :

वाचून थेट धनलाभ होत नाही. नाहीतर सर्वांनी तो छंद जोपासला असता. पण वाचनानेच अर्थप्राप्तीचे नवनवीन मार्ग सुचतात. तसेच आपण करत असलेल्या नोकरी / व्यवसायात अधिक धनलाभ कसा होईल किंवा गुंतवणूक कशी करायची ? याची उत्तरे पुस्तकांत मिळतात. त्यासाठी अनेक पुस्तके आहेत. अनेक व्यक्तींच्या चरित्रातून कळते की अगदी बेताची आर्थिक परिस्थिती असलेल्या व्यक्तीही हळूहळू कशा श्रीमंत झाल्या आहेत. वेगाने किंवा गैरमार्गाने मिळालेल्या श्रीमंतीचे परिणाम काय होतात ? व्यसने कशी लागतात? फसवणूक कशी होते ? त्यातून मार्ग कसा काढायचा ? सावध कसे राहायचे ? जगण्याची धडपड काय असते? यश हुलकावणी कशी देतं नि यशाला गवसणी कोणी कशी घातली? याचा पूर्वानुभव आधीच काहींना आलेला असतो. काही पुस्तकांत तर अशी घटना असते जणू काही ती आपल्या आयुष्यातील प्रसंगापासून लिहिली आहे की काय असे वाटते. अनेक पुस्तके अशी आहेत जी थेट एखादा व्यवसाय कसा करावा ? यावर असते तर त्याच क्षेत्रातील व्यक्तीचे चरित्र मिळाले तर त्या व्यवसायातले खाचखळगे कळतात. उदाहरण म्हणजे, केसरी पाटील हे व्यवसायाने शिक्षक होते, त्यांनी सहली आयोजित करायला सुरुवात केली नि नंतर त्यांचा केसरी टूर्स आणि ट्रॅव्हल्सचा यशस्वी व्यवसाय कसा केला हे कळते. त्या जोडीला अनेक पर्यटनस्थळांची माहिती देणारी माहितीपर पुस्तके नि प्रवासवर्णनेसुद्धा वाचली की या व्यवसायात कार्य करणाऱ्याला उत्तम मार्गदर्शन मिळते. 


मन:शांती: 

जगात, आयुष्यात कितीही ताणतणाव का असेना मन एकाग्र करण्यासाठी उत्तम छंद म्हणजे वाचन. नुसतं ध्यान लावायचे असेल तर हिमालयात जाऊन बसणार आहोत का आपण? घरी ध्यानाला बसलो तर किती वेळ बसू ? त्यापेक्षा पुस्तक वाचायचे. लेखकाचं बोट धरायचं, त्याच्याच खर्चात पूर्ण प्रवास करायचा. एखाद्या लेखकाने शब्दांचा आधार घेऊन उभ्या केलेल्या काल्पनिक आयुष्यात जायचं, मनातल्या मनात सगळे प्रसंग तयार, सगळी पात्रसुद्धा लेखक सांगेल तशी आपल्या डोळ्यांसमोर येत राहतात. अगदी निर्जीव वस्तूसुद्धा आजूबाजूला नीट ठेवलेली दिसतात जी आपल्याला उचलावी लागत नाहीत. जादूची पुस्तके नसली तरीही प्रत्येक पुस्तक ही एक जादूच असते. हे कसं घडतं ? कारण आपलं मन कामाला लागतं आणि हळूहळू मनाची कल्पनाशक्ती वाढत जाते. शब्द किंवा वाक्य वाचून जी व्यक्ती मनातल्या मनात चित्र तयार करू शकते ती नंतर केंव्हाही मनातल्या मनात एखादं चित्र तयार करू शकते तसेच तिचं वर्णन शब्दांत करू शकते. सांगायचं हे आहे की कधी निराश वाटत असेल वाचलेली सुंदर शब्द, वाक्य, पुस्तकं आपल्याला आधार देतात, सांत्वन करतात. सुंदर वर्णन केलेली ठिकाणं मनात सुंदर चित्र तयार करतात. अगदी काही वाईट घडलं तर सरळ ती जागा, घर किंवा ऑफिस (मनाने) सोडावं आणि थेट कोणत्याही विश्वात विनारॉकेट जावं नि स्वतःला शांत करून आणावं इतकी ताकद या पुस्तकांत आहे. यातली कोणतीही पुस्तकं १०८ वेळा वाचण्याची गरज नाही. कारण वाचता वाचता मनात निर्माण होणारं चित्रच उदासीनतेतून बाहेर काढण्यास समर्थ असतं. तरीही एखादे पुस्तक अनेकदा वाचायची इच्छा आपसूकच होऊ शकते इतकी दर्जेदार असतात. लेखक श्री. ना. पेंडसे याच्या गारंबीचा बापू या पुस्तकातली पहिली ३५-४० पाने अख्खं गाव अप्रतिमपणे डोळ्यांसमोर उभे करतात. 


नैतिकता / नीतिमत्ता सुधारणारी पुस्तके

अनेक कादंबऱ्या, चरित्रे, काव्यसंग्रह, इतर अनेक लेखनप्रकार एकेका व्यक्तीवर संस्कार करत पूर्ण समाजावर योग्य संस्कार करू शकतो असे व्यक्तिश: मला वाटते. आतापर्यंत अनेक वाईट घटनाही घडल्या आहेत. असे प्रसंग वाचताना 'अरेरे असं व्हायला नको होतं' असं वाटत असतानाच नेमकं कसं वागायला हवं होतं हे सर्वसामान्य माणूस वाचताना स्वत:च ठरवतो. प्रत्यक्षात एक माणूस किंवा अनेक माणसे वैयक्तिक आयुष्यात कितीही कोणाशी वाईट वागत असली तरीही मनातल्या मनात सर्वांना काय चांगलं होऊ शकलं असतं हे कळत असतं. वाचताना तो ठरवतही असतो. शिवाय लेखकही काही न काही योग्य मार्ग काढून देतोच. योग्य किंवा मनासारखा उपाय मिळाला नाही तरीही त्या प्रकाराची वाईट माणसं असतात याची किमान जाणीव वाचकाला असते नि त्यानुसार आधीच अयोग्य मार्ग / उपाय वाचकाला माहीत होतो. एखाद्या प्रसंगी कसे वागावे नि कसे वागू नये, कसे वागले की काय परिणाम होतात याची पूर्वकल्पना पुस्तकांमुळे होत असते.

साने गुरुजींचे 'श्यामची आई' हे पूर्णपणे अनुकरणीय आता या काळात व्यक्तिश: मला वाटत नाही. इसापनीतीसारखी अनेक पुस्तके ही ' वागावे कसे' या प्रकारातली आहेत. ती लहान मुलांसाठी करमणूक म्हणून असतीलही पण अशा पुस्तकांची खरी गरज तर मोठ्यांना आहे. म्हणून तर सोशल मीडियावर अनेकजण Quotes वाचत असतात.


करमणूक

आता इतकी सारी करमणुकीची साधनं असताना पुस्तक नावाची बोअरिंग वस्तू किती करमणूक करणार ? याचं उत्तर  किमान एक पुस्तक वाचल्याशिवाय किंवा मित्राने अशा पुस्तकाबद्दल सांगितल्याशिवाय, मिळेल असं वाटत नाही. ते कशाला? शाळेत असताना गोकूळ धडा किंवा पुलंचा उपास धडा किती सहज आठवतो. शाळेतल्या शिक्षिका कितीही मारकुट्या किंवा खडूस असल्या तरीही असे विनोदी धडे ऐकताना मजा आलीच होती. मान्य आहे, की काळानुसार विनोदाची भाषा समजत नाही किंवा विनोदच समजत नाही. पण अनेक पुस्तके फार हसवतात. अगदी मारामारीची दृश्ये, युद्धे, प्रेमप्रसंगही खुलवतात. त्यावेळी आपण आपल्या मित्रांपैकी काहींना नायक, नायिका, खलनायक, विनोदी नट म्हणून मनातल्या दृश्यात पाहत असतो. म्हणजे एक प्रकारे आपण त्या चित्रपटाचे दिग्दर्शक असतो. त्यासाठी कुठेही शुटींग करण्याची, महागडं तंत्रज्ञान, तंत्रज्ञ, कलाकार, त्यांच्याशी करार करण्याची गरज नाही. प्रभाकर पेंढारकर यांची  'रारंगढांग' कादंबरी वाचताना विश्वनाथचं पात्र मी स्वत: केलं होतं. 'राधेय' वाचताना मी तिथेच बाजूला होतो. तुम्हाला म्हणून सांगतो, कोलंबससोबत मी प्रवासात होतो. त्याला माहीत नव्हतं पण मला कळलेलं की 'मोराचं पीस कुठून येत?' हे शोधताना तो भारतात नाही अमेरिकेत गेला होता. 

रहस्यकथा वाचणाऱ्यांची नि ती आवडणाऱ्यांची संख्या इतर प्रकारांपेक्षा जास्त आहे. पुस्तक वाचता वाचता काही पाने मागे जाऊन एखादं पान शोधायला लावणारी अनेक पुस्तके असतात. किमान अशी पुस्तके वाचली की वाचनाची आवड निर्माण होते. शेरलॉक होम्सच्या कथा मी लहानपणी वाचल्या होत्या. सध्या प्रकाशित झालेल्या कादंबऱ्यांपैकी मुरलीधर खैरनार यांची ' शोध' ही कादंबरी फार रहस्यमय आहे.


शब्दसमृद्धी वाढवा :

माणूस हा एकमेव प्राणी आहे जो बोलू शकतो, वाचू शकतो, लिहू शकतो. तो केवळ टाईप नि स्क्रोल करू शकतो असं नव्हे. एखाद्या शब्दाला अनेक सुंदर समानार्थी शब्द आहेत. जेंव्हा आपण म्हणतो ना, शब्दच नाहीत वर्णन करायला तेंव्हा त्या वस्तू, व्यक्ती किंवा घटनेचे वर्णन करायला घ्यायचे. अशा वेळी जे शब्द सुचतील त्यांचा वापर करताना शब्दसमृद्धी वाढत असते. पण वाचन असेल तर असे शब्द सुचायला वेळ लागत नाही. एखाद्या रंगाला लाल म्हणावं की लालसर की लालभडक की लालेलाल की लालबुंद हे निश्चित ठरवण्याआधी वाचन असावं. प्रवासवर्णने, कविता, ललितलेखन वाचताना असे अनेक शब्द कळत जातात जे आपण रोजच्या आयुष्यात वापरत नाही पण त्यांचा अर्थ माहीत असेल तर इतर वाचताना काहीतरी नवीन वाचत असल्याचा आनंद मिळतो. 'युगंधर' वाचताना श्रीकृष्णाच्या एका  घोड्याचे नाव  'सुग्रीव' म्हणजे सुंदर गळा असलेला हे वाचायला मिळालं. हाच शब्द जेंव्हा केवळ 'ग्रीव' म्हणून एक पुस्तकात वर्णन केला गेला तेंव्हा तो मला लगेच कळला होता. त्या पुस्तकाचे नाव 'प्रणवीर महाराणा प्रताप'. लेखिका डॉ. भारती सुदामे यांच्या या पुस्तकाने समानार्थी शब्द सहज नि सुंदरपणे कशी वापरावीत हे माझ्यासारख्या छोट्या नवलेखकाला शिकवले.


व्यक्तिमत्त्व विकास :

अशा पुस्तकांची लाट भारताबाहेरून आली असे मला वाटते. मित्र जोडा, श्रीमंत व्हा, यशस्वी व्हा, शांत व्हा, चांगल्या सवयी बाळगा, या नि अशा अनेक चांगल्या शीर्षकांचा वापर करून लिहिलेली पुस्तके फार विकली जातात. खरंतर अनेक पुस्तकांतून अनेक लेखकांना हेच सांगायचं असतं. पण असे शीर्षक असलेली पुस्तके, ग्राहकाचा नि पुस्तकं वाचून काय मिळतं असा विचार करणाऱ्यांचा वेळ वाचवतात असे म्हणावे लागेल. पुस्तक वाचून कुणी यशस्वी होतं का असा विचार मी पुस्तकाचं मुखपृष्ठ बघून करत असे. पण त्यात यशस्वी कसे होऊ शकता याबद्दल लिहिलेले असते हे तशी पुस्तके वाचून कळले. आपलं तेच खरं असतं, आपलं तेच बरोबर असतं, आपली चूक नसतेच आणि तरीही आपण अपयशी किंवा निराश असतो ही अशी अवस्था होऊ नये म्हणून आधीच अशी पुस्तके वाचायला हवीत.अनेक हयात असलेल्या नि जग सोडून गेलेल्या व्यक्तींचे चरित्र वाचताना त्या व्यक्तीला भेटण्याची संधी पुस्तकाद्वारे मिळते. कॉलेजमध्ये शिकताना सुट्टीच्या काळात आणि खासकरून नोकरी किंवा व्यवसायाच्या सुरुवातीला ही पुस्तके जरूर वाचावीत हे मी स्वत: केलेल्या चुकीतून सांगेन कारण या प्रकारातली पुस्तके मी फार उशिरा वाचतोय असे वाटते.


समजूतदारपणा वाढवा.

सध्याचा काळ बऱ्यापैकी वाद घालणाऱ्यांचा आहे. याला 'वादयुग' म्हणायला हरकत नाही. माझाच धर्म महान, त्या धर्मातली, माझीच जात महान, त्यातली माझीच पोटजात महान, माझाच देश, माझंच राज्य, जिल्हा, तालुका, शहर, भाषा, महान आहे आणि हे जर समोरच्या व्यक्तीने लगेच मान्य नाही केलं तर तो  मान्य करेपर्यंत त्याच्याशी वाद घालायचा. मी ज्याला महापुरुष मानतो तो सगळ्यात मोठा युगपुरुष, तो म्हणजे माझ्यासाठी देव. देवाला एकेरी म्हणजे 'तो' असे संबोधन करायचं पण महापुरुषाला देव मानलं तरीही एकरी उल्लेख ?? म्हणजे एकेरी उल्लेख करणारा पृथ्वीवरचा भयंकर दुष्ट माणूस असतो! हे ओळखून लोकांमध्ये भांडणं लावली की लोक त्यांच्या गरजेची मुख्य कामे विसरतात आणि खरी विकासाची कामे नाही केली तरी चालतंय. कोणतं विधान तुम्ही कोणत्या काळात केलं तर त्यावरून तुम्ही कोणत्या गटाचे हे आधीच गृहीत धरलं जातं. वाचनच नाही त्यामुळे एखाद्या जुन्या किंवा हयात नसलेल्या नेत्याने त्याच्या अनुभवानुसार, त्याला उपलब्ध असलेल्या माहिती आणि साधनसामुग्रीच्या आधारे त्या काळाला अनुसरून तेंव्हा असलेल्या परिस्थितीत, तेंव्हा असलेल्या लोकांच्या साथीने काय कार्य केलं किंवा विधाने केली यावरून तो कसा वाईट होता हे बिंबवण्यात सगळा आटापिटा चालू आहे. कुणी वाचतच नाही आणि वाचणारही नाही. वाचणाऱ्या किंवा न वाचणाऱ्या व्यक्तीला स्वतःच्या समर्थनापुरता एखादा परिच्छेद एका पुस्तकातून दाखवून शेरा मारला नि समोरच्याला गप्प केलं की बस्स !! त्यासाठी अर्धवट नि निवडक माहिती असलेली सोशल मिडीयावरील लिंक दिली की झालं. लिंक पाठवणाऱ्याला स्वतःचं मत नसतं. 


पण पुस्तकांमुळे एकच बाजू, दोन्ही बाजू, नव्हे अनेक बाजूंनी विचार करण्याची सवय लागते. कमी माहिती असलेल्यांचा गोंधळ नि आवाजाचा स्तर वाचन करणाऱ्यांच्या वाट्याला येत नाही. कानांचा उपयोग ऐकण्यासाठी होतो. फक्त ऐकून घाईने प्रत्युत्तर देण्यासाठी होत नाही. एखादा नियम / कायदा कोणत्या देशात कोणत्या काळात, कोणत्या परिस्थितीत योग्य होता / असतो ही समज आपोआपच वाचकाला येते. समाजासाठी चांगले नि अधिक चांगले कसे करता येईल यासाठी समाजाला कसे सोबत घेता येईल याची जाणीव समाजासाठी काम करणाऱ्यांना होते. ज्यांचे गैरसमज करून घेणारे अनेक अनुयायी असतात अशा व्यक्ती नि अनेक माध्यमे सध्या  अनेक गैरसमज पसरवण्रयाचा प्रयत्न सतत करत असतात. अशावेळी समाजाने केलेलं वाचन फार उपयोगी पडेल.  


नातेसंबंध सुधारा.

अनेक नाती नि आपल्या आसपास असणाऱ्या अनेक व्यक्ती या अवघड जागेचे दुखणे असतात, काहींशी नीट बोलायचं कसं हेही कळत नाही. कोण केंव्हा कसा वागेल, आपण कसं वागावं काय बोलावं, काय बोलू नये की बोलूच नये. बोललो नाही तर मनातल्या मनात व्यक्ती किती प्रकारे अर्थ काढून गैरसमज करून घेतो याची जाण अनेक पुस्तकांतून होते. रक्तातली नाती, जातीतली व्यक्ती,  आपल्यासोबत लहानाचे मोठे झालेले व्यक्ती, अचानक आयुष्यात येणाऱ्या व्यक्ती, कधीही विनाकारण अबोला धरणाऱ्या व्यक्ती, वायफळ बोलणाऱ्या किंवा मोजकेच बोलणाऱ्या व्यक्ती, परदेशी व्यक्ती, परसंस्कृतीतील व्यक्ती, कमी शिकलेल्या वयस्कर नि जुन्या विचारांच्या व्यक्ती ते अतिशिक्षित गर्विष्ठ व्यक्ती अशा अनेकांशी नेमका संवाद कसा साधावा किंवा कशा हाताळाव्यात याबद्दल ही अबोल पुस्तके बरेच काही सांगून जातात. 'चिकन सूप फॉर द सोल' प्रकारातली अनेक पुस्तके ही त्याच प्रकारातली.

लहान मुलांचे पालनपोषण, त्यांचा सर्वांगीण विकास, त्यांच्याशी पालकांनी कसं वागावं, वयात येणाऱ्या मुलांशी / मुलींशी कसं वागावं हे काळानुसार बदलत जातं. नाती बिघडण्यापेक्षा आधीच मुलांशी सुदृढ नाते होणार असेल तर ते पुस्तकामुळे शक्य आहे. 


आहार आणि आरोग्य 

आपल्या शरीरासोबत सर्वांत जास्त वेळ आपणच असतो. व्यक्ती कोणत्याही क्षेत्रातील असो आयुष्य फार सुंदर जगता येते हे अनेक चरित्रांतून कळतेच. पण त्यासाठी आधी आपले शरीरही योग्य प्रकारे कार्यरत असले पाहिजे. आपले शरीर कसे कार्य करते. कोणत्या वयात शरीराची काय गरज असते, शरीराची क्षमता किती असते, ते सक्षम किंवा सुदृढ कसे नि कितपत होते, काही व्याधींवर किती प्रकारे उपाय आहेत, अशा आजारांतून जाताना मनाची अवस्था काय असते याबद्दल आधीच कल्पना असलेली बरी आणि ती अनेक पुस्तकांतून कळते. दिव्यांग, गतिमंद, दुर्धर आजार असलेले, गैरसमज असलेले रोग जडलेले रोगी, त्यांवर उपचार करणाऱ्या व्यक्तींचे अनुभव वाचताना समाजकार्याशी जोडून देऊ शकतात. कधी कोणते सत्कार्य करण्याची मनाची तयारी होईल हे सांगता येत नाही. 

क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींनी तर शरीराची आतून नि सर्वांसमोर सतत दिसणाऱ्यांना बाहेरून शरीराची विशेष काळजी घेतलीच पाहिजे. त्यासाठी त्यांनी ते नीट समजून घेतले पाहिजे. अनेक कारणांमुळे आपले शरीर हाताळणारे बदलत राहावे लागतात. डॉक्टरप्रमाणे नव्हे तर पण किमान महत्त्वाची माहिती प्रत्येकाला असावीच. केवळ मानवी शरीरच नव्हे, प्राणी आणि वनस्पतींची वाढ याबद्दल त्यांची जोपासना करणाऱ्यांना असलीच पाहिजे. शेतकऱ्याला बैलाबद्दल माहिती असावीच ना ? 

आता केवळ मानवी शरीर आणि सजीवांचे आरोग्य महत्त्वाचे नाही. सभोवतालचे वातावरणही निरोगी असणे आपल्या शरीरासाठी महत्त्वाचे आहे. किमान या स्वार्थासाठी निसर्ग, हवा, पाणी, माती, जंतू यांबद्दल प्रत्येकाला किमान कल्पना हवी.


एक उत्तम नागरिक होण्यासाठी

आपल्याला केवळ आपल्याच क्षेत्रात सर्वोत्तम व्हायचं असतं. पण उत्तम नागरिक का नाही ? केवळ उत्तम नागरिक असा पुरस्कार नाही म्हणून ? नुसते उत्तम खेळाडू, वैज्ञानिक, कलाकार असून काय फायदा ? जर  प्राण्यांची शिकार करण्याचा, गाडीखाली चिरडण्याचा गुन्हा हातून घडत असेल तर त्याला झाकण्यासाठी चांगली कामे करण्यात काय अर्थ आहे ? त्यासाठी आधीच ' माणूस म्हणून' ( Being Human) काही जाणीव नको का ? आपली किंवा आपल्या आप्तेष्टांची फसवणूक होऊ नये आणि झालीच तर उपाय म्हणून कायदा नि अर्थ याचे ज्ञान असणारा सोबत असावा किंवा ओळखीचा असावा नि त्याचा फायदा व्हावा. पण त्याआधी आपल्याला किमान कायद्याचे ज्ञान असावे तसेच अर्थसाक्षर व्हावे. 'रिच डॅड पुअर डॅड' सारखे पुस्तक प्रत्येकाने वाचावे कारण त्यात 'फायदा' आहे. व्यक्तिश: मला कायदा, अर्थ, खगोल, वैज्ञानिक दृष्टीकोन नि अशा अनेकविध पुस्तकांचे वाचन करण्याची इच्छा भासत राहते. 

अनेक ऐतिहासिक पुस्तके वाचताना तत्कालीन राजाला किंवा राज्याला, राज्यासाठी कशा प्रजेची मदत झाली हे केवळ वाचकाला माहीत पडते. ऐतिहासिक चित्रपट पाहणाऱ्यासाठी प्रजेतील नागरिक हा केवळ एक दुर्लक्षित  सहाय्यक कलाकार ठरतो. आपण फक्त त्या राजांचे वागणे कसे महान नि त्यामुळे त्याच्याशी संबंधित भाषा, धर्म, जातसुद्धा महान आणि त्याच गटातला मी म्हणून मी पण श्रेष्ठ हे सिद्ध करताना पूर्ण प्रयत्न करतो. इतिहासात लोकांचे जीवन कसे होते. त्यांचे उत्पन्नाचे साधन काय होते. किती कष्ट करून किती कमाई व्हायची, बंक नसताना पैसे कुठे जमा करायचे, कर कसा भरत, त्या बदल्यात त्यांना काय मिळायचे ? सत्ता बदलली की आधी भरलेला कर पुन्हा भरावा लागायचा का ? हे कळते. हे एकदा जरी नीट वाचले तरीही आपण आज एकविसाव्या शतकात किती सुखी आहोत याची जाणीव होऊन आपल्या तक्रारी कमी होतात. नव्हे होतातच. 


पुस्तके का वाचावीत ? याबद्दल बोलावे, लिहावे ते थोडेच ठरेल. आता जे लिहिले तेही थोडेच लिहिले आहे. नाहीतर वाचनाची आवड नसणाऱ्यांना हा प्रयत्न अजिबात आवडणार नाही :-) 

मराठी पुस्तक ( सशुल्क)  - पहिले पाऊल , सफरछंद ( अ‍ॅमेझॉन किंडलवर उपलब्ध )
इंग्रजी पुस्तक : 'THE SAR PASS TREK' ( 'पहिले पाऊल'चा अनुवाद, अ‍ॅमेझॉन किंडलवर उपलब्ध )
Online Books PDF on esahity.com (Free) : मुल्हेर ते साल्हेर, कधी सरस कधी कळस, गोरखगड ते सिद्धगड, अलंगाशी संग मदनाशी गाठ  

लोकसत्ता 'ट्रेक इट' मध्ये भैरवगड, कलावंतीण , वैराटगड, आजोबागड आणि इतर लेख प्रकाशित.
पुस्तके का वाचावीत ? पुस्तके का वाचावीत ? Reviewed by Marathi Blog by Pankaj Ghare on December 05, 2021 Rating: 5

1 comment:

मनात आलं म्हणून

मनात आलं म्हणून
थोडं माझ्याविषयी
Powered by Blogger.