एखादा कसलेला लेखक कसा घडतो आणि स्वत:ला कसं घडवतो याचं दर्शन घडवणारं परिपूर्ण चरित्र: 'माझं नाव भैरप्पा'. लेखक म्हणून ते फार महान आहेत यात वाद नाही हे त्यांची पुस्तके वाचून कळते. मराठी भाषिकांना, महाराष्ट्राबाहेरील प्रेमचंद, रवींद्रनाथ टागोर माहीत असतील तर कन्नड साहित्यिक लिहिणारे एस. एल. भैरप्पाही माहीत व्हावेत म्हणून हा पुस्तक परिचय. ( परीक्षण होऊ शकत नाही).
Marathi Blog - मनात आलं म्हणून
आत्मचरित्र : माझं नाव भैरप्पा
आत्मचरित्राचे मुखपृष्ठ |
सरांचं आयुष्य फार संघर्षमय आहे. विशेषत: बालपणी दोन वेळच्या जेवणासाठी करावी लागणारी कसरत मन हेलावून टाकते. ते स्वत:च्या घरी कधी जेवले होते असं लक्षातही रहात नाही. त्यांची आई, काही भावंडं लहान असतानाच गेली. पण त्यांचे वडील आधीच का मेले नाहीत असं वाचणाऱ्याच्या मनात येते. मी तर अक्षरशः ते पान केंव्हा येईल याची वाट पाहत होतो. मुलांचं शिक्षण, आरोग्य, लग्न यांकडे लक्ष देणे ही सरांच्या वडलांच्या लेखी फार दूरची गोष्ट होती. नि त्याच वेळी त्यांनी मात्र आपला सांभाळ नि दोन वेळच्या जेवणाची सोय केलीच पाहिजे हा त्यांचा हट्ट नव्हे तर ' मी मुलांना जन्म दिला म्हणून त्याची परतफेड म्हणून त्यांनी माझा सांभाळ करावा ' असा व्यवहारी विचार होता !! आता याला चमत्कारिक किंवा विक्षिप्त म्हणायचं की तेंव्हाची त्यांच्या घरची परिस्थिती किंवा एकूण समाजच असा विचार करायचा का ? असा विचार अधूनमधून येतो. कारण त्यांच्या गावातील लोकांचासुद्धा वडिलांच्या म्हणण्याला पाठींबा होता !!
त्यामुळे सरांनी घर आणि नंतर गाव सोडलं असं वाचलं की आनंद वाटत होता. त्यांच्या आजीने केलेला सांभाळ नि नंतर नाईलाजाने बदललेला स्वभाव, आईच्या श्राद्धासाठी, बहिणीच्या लग्नासाठी होणारी होऊ घातलेल्या खर्चाची तयारी, एकेक पैसा जोडण्याची किंवा वाचावतानाची कसरत आपल्याला अंतर्मुख करते. शिवाय त्यांचा मामासुद्धा एक चमत्कार!! त्यांचा एक जवळचा मित्रही फसवणारा. त्या घटना वाचताना फार दया येते. वाराला जेवणाची सोय करून घेणे हा प्रकार माझ्या वाचनात सरांच्या आत्माचरित्रामुळे आला. जेवण किंवा एका अर्थाने भिक म्हटलं तरी चालेल ते देताना लोकांची वागण्या-बोलण्याची पद्धत संमिश्र स्वरूपाचं वाटलं. म्हटलं तर वाईट पण म्हटलं तर चांगली पद्धत होती ती. कारण त्याशिवाय त्या काळात अनेकांचा उदरनिर्वाह त्या पद्धतीने झाला असेल. अनेक प्रकारच्या छोट्या छोट्या अनेक नोकऱ्या करत नि कोणाचाही पाठींबा नसताना, उलट विचित्र वातावरणात त्यांनी शिक्षण घेतलं आणि ते पुढे कसे शिकत राहिले ती कथा वाचताना शिकण्याची आवड असणाऱ्यांना प्रेरणा मिळते.
शिक्षणासाठी मैसूरला येणं, तिथलं कॉलेज, जातीनुसार मिळणारी वागणूक, राहायला जागा शोधणं, सुट्टीच्या दिवशी घरी न जाता मित्रांकडे थोडेथोडे दिवस राहणं , वक्तृत्वस्पर्धांची तयारी करणं, त्या जिंकणं किंवा त्यातही जातीचं राजकारण, खिशात पैसेच नाहीत तर मजा-मस्ती न करता वाचनाचा छंद लागणं, मित्रांसोबत कुस्ती पहायाला जाणं सरांनी विस्तृतपणे मांडलं आहे. जबाबदारीमुळे नोकरी करायची इच्छा असूनही छोट्या नोकरीने फार काही समस्या सुटतील याची त्यांना जाणीव होती. त्यामुळे थोडी कळ सोसावी लागली ज्यामुळे त्यांच्या बहिणीच्या लग्नाची चिंता आपल्यालाही भेडसावू लागते. लग्न झालं तरीही मुलाच्या जुगाराचा नाद असल्याने दुष्टचक्र काही थांबत नाही हे वाचताना समजून घ्यावं लागेल.
या सर्व घटना वाचताना फक्त सरांचं आयुष्यच नव्हे तर तेंव्हाचा समाज, तेंव्हाची लोकांची मानसिकता, आर्थिक परिस्थिती, व्यवहार करताना बिनधास्तपणे केली जाणारी फसवणूक, स्वातंत्र्यानंतर काहींचे पारंपारिक व्यवसाय बंद होऊन सरकारकडे गेल्याने स्वातंत्र्यामुळे (एखाद्याला झालेले ) नुकसान, मुंज झाल्याशिवाय शिक्षण मिळेल की नाही ही समस्या, मुलींचे शिक्षण, पुरुषांची मानसिकता, असे अनेक विषय नकळतपणे आपल्यासमोर मांडले जातात.
शिक्षण आणि नोकरीनिमित्त त्यांचा भारतभर प्रवास झाला. वाचनाचा छंद होताच. अनेकविध विषयांवर सखोल अभ्यास यांमुळे त्यांच्या वक्तृत्व नि लेखनावर उत्तम परिणाम झाला आहे हे त्यांचं कोणतेही पुस्तक वाचताना कळते. अगदी बालवयात नवस मागूनही काही परिणाम होत नाही हा त्यांनी काढलेला निष्कर्ष. तसेच आईचे श्राद्ध या विषयावर ते अधूनमधून भाष्य करतात. समाजात वर्णभेद असला तरीही सर्वच उच्चवर्णीय श्रीमंत नसतात आणि त्यांनाही मेहनत करावी लागते, आरक्षणामुळे काही उच्चवर्णीयांचेही कसे नुकसान झाले याचे ते स्वत: एक उत्तम उदाहरण आहे हे कळते. त्यांच्या महाविद्यालयीन आयुष्यात असे अनेक प्रसंग आढळतात.
पोहणे, नाटक, चित्रपट, गायनाची आवड; यांसाठी पैशांची जमवाजमव याबद्दल मित्रांसोबतच्या छोट्या छोट्या अनेक कथा आहेत. कथाकथनातून कमाई, शिकताशिकता शिकवणीतून होणारी कमाई, त्यातून जोडली गेलेली अनेक स्वभावाची माणसे वाचकाला भेटत जातात. नोकरी लागल्यानंतर पुढील आयुष्यात 'लेखन' या विषयावर मोलाचे मार्गदर्शन सरांकडून मिळते. ही पाने फार खास आहेत. त्यांच्या अनेक पुस्तकांच्या जन्माची नि प्रकाशनाची कथा नवलेखक तसेच अजून चांगलं काही लिहू इच्छिणाऱ्या अनेकांना विचार करायला भाग पाडेल. गुजरातमध्ये अमूल कंपनीला त्यांनी दिलेली भेट, कंपनीसाठी गावातील म्हशींकडून दूध मिळवण्याच्या पद्धतीवर त्यांनी केलेलं भाष्य महत्त्वाचे आहे. खरंतर अशा अनेक घटना पूर्ण आत्मचरित्रात आहे.
एकंदरीत वाचनप्रिय, संघर्षमय, सहनशील आणि प्रगल्भ व्यक्तीचं आत्मचरित्र वाचायला मिळते.
जरूर वाचा. 'माझं नाव भैरप्पा'
(उत्तम ) अनुवाद : उमा कुलकर्णी
सरांविषयी थोडक्यात पण अतिमहत्त्वाचे |
एस. एल. भैरप्पा लिखित 'आवरण' कादंबरीविषयी
No comments: