कधीकधी लिहिताना आपण का नि कोणासाठी लिहितोय असं सारखं वाटत राहतं. असं नेमकं का वाटतं ? मनात काय विचार येतात नि त्यावर तोडगा काय ? याबद्दल थोडं विचारमंथन
Marathi Blog - मनात आलं म्हणून
कुणासाठी नि का लिहू?
सौजन्य : गुगलहून साभार |
अशाच एखाद्या क्षणी लिहायची इच्छा झाली की वही आणि पेन शोधण्यासाठी कोण उठेल असा विचार येऊन लिहिणं बाजूलाच राहतं. त्यापेक्षा वाचन बरं. जे समोर लिहिलं आहे ते गपगुमान वाचायचं. लिहिताना कसं थोडा डोक्याला त्रास होतो. काय लिहू, कोणत्या विषयावर लिहू. त्याचा हेतू काय ? लिहिलं ते त्याचा मला काय फायदा ? अगदी लिहिलं तरी कोण वाचणार आहे का ? वाचलं तरी त्याला पटणार आहे का ? पटलं तरी पुढे काय ? त्यामुळे माझ्या किंवा वाचणाऱ्याच्या आयुष्यात काही फरक पडणार आहे का ? इतके लेखक, कवी,संत, विचारवंत, साहित्यिक, तत्त्वज्ञानी, महापुरुष लिहून गेले, सांगून गेले तरीही काही समाजावर परिणाम झाला आहे का ? मग आपण लिहून असं काय होणार आहे ? म्हणजे वेळ, कष्ट वायाच जाणार आहे ना ?
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे असे म्हणत स्वत: लेखक एखादी कृती करेलही पण तो कृती करत राहिला तर मग लिखाण कोण करेल ? आणि परिणाम होईपर्यंत कृती करत राहिला तर इतर विषयांचं काय ?
आजही जगात खून, चोऱ्या, दरोडे, फसवाफसवी, दुराचार, व्यसन, अनैतिक कृत्ये आणि अनेक वाईट गोष्टी घडत असतात. अगदी सुशिक्षित आणि सुसंस्कारी व्यक्ती किंवा समाजात अनेक गुन्हे होतात. त्या त्या समाजात अनेक आदर्श व्यक्ती होऊन गेल्या तरीही त्यांच्याप्रमाणे किंवा त्यांनी सांगितलेल्या मार्गाने जाणारे फारच कमी आणि चुकीचं वर्तन करणारेही जास्त का सापडतात ? म्हणजे भले एखादा महापुरुष एखादं महत्त्वाचं वाक्य बोलून गेला तरी त्यानुसार वागणारे किती असतात ? साधं ' नेहमी खरे बोलावे' हा सर्वांना माहीत असलेला सुविचार कितीजण अंमलात आणतात ?
लिहिणारा भले कितीही चांगलं लिहेल हो, पण परिणाम होणार नसेल तर लिहिणाऱ्याने का लिहावं, त्याने का डोकेफोडी करावी ? लेख छापून आला की त्याचं नाव आणि कदाचित छायाचित्र प्रकाशित होईल त्यात आणि कदाचित त्या लेखातून मिळणाऱ्या मानधनात आनंद मानावा का ? पण त्यामुळे समाजावर परिणाम, समाजात बदल किंवा एखादी कृती दिसते का ? तेच तर महत्त्वाचं आहे. मान आणि धन ही नंतरची दुय्यम गोष्ट. त्याला दुय्यम मानले गेले की आपोआप त्या लेखकाला नि त्याने लिहिलेल्या लेखाला दुय्यम मानले जाते का ? आणि म्हणूनच त्याने मांडलेले विचार बाजूलाच पडतात का ? असेलही. पाच रुपयाच्या वर्तमानपत्रात मथळे १०० असतील त्यात ७५ बातम्या २० करमणुकीची सदरे, ५ लेख असतील तर त्या एका लेखाची किंमत वर्तमानपत्र विकत घेणाऱ्याला खरंच वाटते का ? की तो सहज त्याकडे दुर्लक्ष करतो नि शेवटच्या कला नि क्रीडाच्या पानापर्यंत पोहोचतो ? बरं हे नि असे अनेक लेख लिहून जर त्यांचं पुस्तक केलं तर ते वाचणारे किती होतील ? ते विकत घेऊन वाचतील का ? ज्यांनी आधी लेख वाचलेत ते पुस्तक का घेतील ? ज्यांनी आधीही लेख वाचला नसेल ते तरी पुन्हा पुस्तक का घेतील ? मुळात समाजातील एकूण कितीजण वाचतील ? आणि पुन्हा तेच ? परिणाम होणार का ?
अमुक एखाद्या महान किंवा प्रसिद्ध लेखकाचा लेख वाचला तर आत्मगौरवाने सांगता तरी येतं पण नवीन लेखकाचे इतके शब्द वाचायचे म्हणजे वर्तमानपत्र वाचणाऱ्याच्या जीवावर येतं. टी. व्ही. वर माहीत झालेल्या बातम्या पुन्हा वाचण्यात काय अर्थ आहे ? तितक्या वेळात लेख वाचले का जात नाहीत ? डोक्याला ताप नको असतो अनेकांना. फार रटाळ लिहितात लेखक लोक. काही संबंध तरी असतो का जगण्याशी.
हेच तर. तुम्ही वाचत असलेल्या किंवा पाहत असलेल्या बातम्या या तुम्ही स्वतः वाचत नसता. त्या तुम्हाला दाखवल्या जातात. त्याच तुम्ही वाचाव्यात आणि तुम्ही त्याचाच विचार करावा म्हणून त्या मोठ्या नि ठळक अक्षरात छापलेल्या असतात. जगात घडलेल्या घटनेमुळे तुमच्या प्रत्यक्ष आयुष्यावर परिणाम होतो का ? तर उत्तर आहे ....नाही. पण तुम्ही मनातल्या मनात उत्तर शोधत असलेल्या प्रश्नांवर आधीच लेखकांनी उत्तरे दिलेली असतात. कधीकधी थेट तर कधी अप्रत्यक्षपणे. कधी लगेचच तर कधी हळुवारपणे. जे न देखे रवी ते देखे कवी असं बोलताना आपण फार मोठी कल्पना करत असतो की ही गोष्ट लेखक किंवा कवीच विचार करू शकतो. पण खरंतर तो तुमच्या घरात न डोकावता तुमच्या घरातील , मनातील समस्या जाणून उपायही सांगून जातो.
आज बहुतांश लोकांकडे मोबाईलमुळे वेळ नाही. जितकं सहज नि आकर्षकपणे त्यांना माहिती मिळेल त्या मार्गाने ते माहिती मिळवतात नव्हे ती त्यांना तशी पुरविण्याचा प्रयत्न होतो. म्हणून सोशल मिडिया, खासगी वृत्तवाहिन्या जास्त पहिल्या जातात. पण त्यामुळे पूर्ण नि खरी माहिती लोकांपर्यंत पोहोचत असेल असं नाही वाटत. नाहीच पोहोचत. रोज नवीन माहिती देणारा देत जातो नि बघणारा आपला आधीचा वेळ फुकट गेला हे माहीत होऊनही पुन्हा त्याच माध्यमातून नवी माहिती घेतो, जी थोड्याच वेळात जुनी किंवा चुकीची होणार आहे !! त्यामुळे गंभीर लिहिणाऱ्या नि परिणाम पाहू इच्छिणाऱ्यांना लोकांच्या हातातील मोबाईल हा मोठा स्पर्धक आहे. वाचताना कष्ट होतात पण व्हिडीओ पाहताना होत नाही. त्यामुळे लेखकांनी फार अपेक्षाही ठेवू नये. काही पालथे घडे हे पालथेच राहतील.
मग लिहायचं तर कोणासाठी ? उत्तम लिहिणारे पुरस्कारही मिळवतात ? पण त्यांचे साहित्य तितके वाचले जात नाही जितके उत्तम सिनेमे सिनेमागृहात जाऊन पहिली जातात. सिनेमागृहात देशभक्तीचे , सुविचार असलेले , शौर्य करण्यासाठी प्रवृत्त करणारे, समाजाशी सेवा करण्यास प्रवृत्त करणारे संवाद ऐकून काही क्षण प्रत्येकातील चांगला माणूस जागा होतही असतो, नाही असे नाही. पण तो चांगला माणूस त्या सिनेमागृहातून बाहेर पडत नाही. वाचनाचं तसं नाही. वाचन खोलवर परिणाम करतं. त्यामुळे लिहायचं असेल तर त्या चांगल्या माणसासाठी. जो प्रत्येकाच्या आतल्या गृहात बसलेला आहे. आणि परिणाम ?
यावर एक उपाय मिळालाय
? तो सुद्धा लिहिता लिहिता. लिहिताना ते एखाद्या अनोळखी व्यक्तीसाठी आहे असं मनात
आणून लिहिलं तर ? मग तो कोणत्याही काळातील असो. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ आत्ता
कुठे वाटू लागली आहेत. म्हणजे इतक्या वर्षांनी !! ज्यांनी लिहिलं किंवा सांगितलं
त्यांची नि आपली भेटही नाही तरीही आज अनेकांना वृक्ष आपले सोयरे वाटत आहेत हे एक
सकारात्मक उदाहरण म्हणावं लागेल. 'कुणी एका भाषणात ' बंधुंनो आणि भगिनींनो असं संबोधलं होतं. आज अनेकजण इतरांना दादा, भाऊ, ताई अशी किमान हाक मारतात. हेही नसे थोडके
No comments: