खरे उत्तर गुगलमध्ये की पुस्तकांमध्ये ?

गुगल किंवा इंटरनेट वापरणारे फार आळशी झाले किंवा होत आहेत. खरा चोखंदळ व्यक्ती ही माहिती शोधत शोधत माहितीच्या मुलापर्यंत जातो. विषयाशी संबंधित इतर अनेक विषयांना स्पर्श करून येतो किंवा त्या दिशेनेही प्रवास करतो. त्यामुळे वाचनाकडे वळवताना वेबसाईटवरील लिंक नेमकी कशी नि काय माहिती देतात त्याबद्दल...

Marathi Blog - मनात आलं म्हणून

खरे उत्तर गुगलमध्ये की पुस्तकांमध्ये ?

marathi blog- information from internet or book
चित्र गुगलहून साभार 

स्मार्टफोनचा काळ आहे. जो स्मार्टफोनवर पटकन उत्तर शोधून दाखवतो तो खरा हुशार असा समज सध्या पसरला आहे. उच्चशिक्षित व्यक्तीकडे मोबाईल नसेल किंवा त्याच्या मोबाईलमध्ये इंटरनेट नसेल तर त्याकडे कोणीही उत्तर विचारायला जाणार नाही त्याऐवजी ते स्वत: गुगल करतील. निवडक माहिती मिळाली की आजकाल अनेक तज्ञ तयार होतात. 

या गूगलमध्ये प्रश्न विचारला की काही ना काही उत्तर मिळतंच. पण उत्तर मिळते की अनेक लिंक दिसतात ? .
या प्रश्नाचे उत्तर हे की 'उत्तराची लिंक मिळते'. अनेक लिंकपैकी आपल्याला आवडेल ते , पटेल ते उत्तर आपण निवडतो नि त्याला उत्तर मानतो आणि त्यामुळे ते खरं मानतो. 

उत्तर नसेल तर ' नो रिझल्ट फाउंड' असे दिसते नि त्याखाली तुम्ही जी माहिती शोधलेली असते त्यातली शब्द नि अक्षरे यांच्या जवळपास जाणारी माहिती तुम्हाला दिली जाते. ही माहिती गूगलने स्वत: शोधून पुरवलेली असते का ? नाही.

जगभरात जितकी संकेतस्थळे आहेत त्यापैकी एखाद्या संकेतस्थळांवर असलेल्या माहितीची लिंक आपल्याला पहिल्या पानावर उत्तर म्हणून दिली जाते. 

मग साहजिकच आपण पहिल्या पानावर दिसलेली सर्वात पहिली लिंक पाहण्याचा प्रयत्न करतो. गूगलने शोधून दिलेल्या उत्तरांपैकी पहिलं उत्तर हे बरोब्बर उत्तर असे मानण्याची आपल्या सर्वांची सवय आहे. 

अधिक माहिती हवी असेल किंवा पहिल्या लिंकमधील उत्तर खरेच बरोबर आहे हे पडताळून पाहाण्यासाठी दुसरी, तिसरी लिंक पहिली जाते नि त्यातली माहिती वाचली जाते. अगदीच एखाद्या व्यक्तिला अधिकपेक्षा अधिक माहिती हवी असेल तर तो गूगलचे 'नेक्स्ट पेज' बघत बघत त्या पेज वरील लिंक पाहतो.

पण वेळ वाचवण्यासाठी आपण आपल्या प्रश्नामध्ये सुधारणा करतो म्हणजे त्या प्रश्नातले शब्द वाढवले जातात. शब्द वाढले किंवा वाढवले की गूगलद्वारे पुन्हा पहिल्या लिंकमध्ये उत्तर मिळण्याची शक्यता जास्त असते. 
पहिल्या पानावर शेवटच्या लिंकच्या खाली तुम्ही कदाचित शोधत असलेल्या महितीशी संबंधित शब्द दिलेले असतात. 

गूगलवर तुम्ही प्रश्न असलेला शब्द म्हणजे का ?, कोण ?, केंव्हा इत्यादि शब्द लिहिले नाही तरीही काही ना काही उत्तर असलेली लिंक मिळतेच. म्हणजे 'व्हू इज सचिन तेंडुलकर' असा प्रश्न विचारण्याऐवजी फक्त 'सचिन तेंडुलकर' असा शब्द लिहिला तरीही तीच माहिती मिळते. 

पण प्रश्न हा आहे की गूगलला कोणते उत्तर खरे, कोणते खोटे, कोणते उत्तर अर्धवट, कोणते उत्तर नेमके, कोणते उत्तर कोणत्या हेतूने लिहिलेले असते याचा विचार गूगलने स्वत: केलेला नसतो. म्हणजे आपण शाळेत- कॉलेजमध्ये जसं उत्तर देतो नि ते तपासलं जातं असा प्रकार नसतो. 

मग गूगलद्वारे उत्तर मिळतं तरी कसं ? 

ब्लॉग लिहिणार्‍या अनेकांना, ब्लॉगद्वारे पैसे कमावणार्‍या अनेकांना, वेबसाइट बनवणार्‍या अनेकांना, कंपन्यांमध्ये सोशल मार्केटिंग करणार्‍या अनेकांना या प्रश्नाचं उत्तर माहिती आहे. याचे शिक्षण घेतानाच या प्रश्नाचे उत्तर मिळते. त्यांच्याकडून तपासून मी खालील उत्तर देतो. 

'गूगल  रॅंकिंग' हा शब्द कायम लक्षात ठेवावा. गूगलद्वारे वेबसाइटला, ब्लॉगला रॅंकिंग केले जाते. पण हे रॅंकिंग करताना अनेक पात्रतांना त्या वेबसाइटने पार केलेले असते. 

एखादी वेबसाइट ( संकेतस्थळ ) ज्या मुख्य विषयावर माहिती देते त्या वेबसाईटवर त्यातले महत्त्वाचे शब्द ( किवर्ड्स) किती वेळा म्हणजे त्या शब्दाची दाटी त्या संकेतस्थळात किती जास्त आहे ? 

एखादी वेबसाइट, ब्लॉग जितका जुना, जितका नियमित तितके त्याचे रॅंकिंग होण्याची शक्यता जास्त असते.

या आणि अशा अनेक पूर्तता असलेल्या लिंक पहिल्या नि वाचल्या जातात. ज्या जितक्या जास्त वाचल्या जातात, त्यांचे रॅंकिंग पहिल्या क्रमांकावर होते. 

आपल्या वेबपेजचे रॅंक चांगले व्हावे या हेतूने त्या बनवल्या जातात. यात वावगे काहीही नाही. 

पण वेबसाईट किंवा संकेतस्थळांवर माहिती देणारेही सामान्य व्यक्तीच असतात. त्यांना माहित असलेले ज्ञान त्यांनी काढलेलं कोणत्याही विषयावरचं अनुमान हे परिपूर्ण आणि शेवटचं असू शकत नाही. 

पण दुर्दैवाने एखादा प्रश्न विचारला की गुगल कर असा सहज सल्ला अनेकजण अनेकांना देत असतात. यात आपण अनेकदा प्रश्न विचारणाऱ्याचे नुकसान करतो. एखादी माहिती अनेक पुस्तके वाचून, अनेक माणसांना भेटून मिळाली किंवा मिळवली तर त्यातून नि त्यावर केलेल्या विचाराअंती घेतलेला निर्णय हा जास्त परिणामकारक नि दीर्घकाळ टिकणारा असू शकतो.

म्हणजे आज मी शोधलेल्या प्रश्नाचे उत्तर गूगलने दाखवलेल्या पहिल्या लिंकमध्ये असेल पण ती लिंक नेहमीच पहिल्या रॅंकवर असेलच असे नाही. त्यामुळे आपल्याला मिळालेले उत्तर हे कायमस्वरूपी बरोब्बर नि परिपूर्ण असेल यावर शंका आहे. शिवाय ते आयते मिळालेले उत्तर आहे. म्हणजे एक प्रकारे परीक्षेत दुसऱ्याला प्रश्न विचारून उत्तर मिळवल्यासारखे आहे.

खरे उत्तर हे अनेकवेळा एखादा विषय मनात आणून, त्यावर विचार करून नि त्यावर स्वत:चे मत बनवून मिळवायचे असते. 
मुंबई हा शब्द गुगलवर लिहिल्यावर गेट-वे ऑफ इंडिया दिसली की ती मुंबई नसते. शिवाय त्याची भौगोलिक माहिती म्हणजे सुद्धा मुंबई नसते. प्रत्येकाने पाहिलेली मुंबई ही वेगळी असते.

त्यामुळे खरे उत्तर हे अनुभवातून, विचार करून नि वेळ घेऊन मिळवावे. 

फक्त शोधा नि लगेच सापडेल असे नसते. गुगलवर दिसते केवळ तसेच नसते. अनेक महिने, वर्षे माहितीचा शोध घेऊन , अभ्यास करून लिहिलेल्या पुस्तकात जी माहिती मिळते, ती सर्वसामान्य व्यक्तीने तंत्रज्ञानाचा आधार घेऊन 'गूगल  रॅंकिंग'द्वारे समोर आणलेल्या माहितीपेक्षा जास्त खोल, सविस्तर, अचूक नि अफाट असते.

इंटरनेटवरून तुटपुंजी माहिती मिळाली नि त्या विषयावर आपले मत मांडले की लिंकचा आधार घेत सोशल मीडियावर वाद घालता येतो. पण उथळ पाण्याला खळखळाट फार असतो ही म्हण लक्षात असावी. 


मराठी पुस्तक ( सशुल्क)  - पहिले पाऊल , सफरछंद ( अ‍ॅमेझॉन किंडलवर उपलब्ध )
इंग्रजी पुस्तक : 'THE SAR PASS TREK' ( 'पहिले पाऊल'चा अनुवाद, अ‍ॅमेझॉन किंडलवर उपलब्ध )
Online Books PDF on esahity.com (Free) : मुल्हेर ते साल्हेर, कधी सरस कधी कळस, गोरखगड ते सिद्धगड, अलंगाशी संग मदनाशी गाठ  

लोकसत्ता 'ट्रेक इट' मध्ये भैरवगड, कलावंतीण , वैराटगड, आजोबागड, कोहोजगड आणि अनेक मासिकांमध्ये  प्रकाशित.
खरे उत्तर गुगलमध्ये की पुस्तकांमध्ये ? खरे उत्तर गुगलमध्ये की पुस्तकांमध्ये ? Reviewed by Marathi Blog by Pankaj Ghare on January 01, 2022 Rating: 5

No comments:

मनात आलं म्हणून

मनात आलं म्हणून
थोडं माझ्याविषयी
Powered by Blogger.