आवरण कादंबरीबद्दल समाजमाध्यमात फार एकांगी लिहिलेले आढळले. पुस्तक विकणारेही पुस्तकातील मोजका मजकूर सध्याच्या राजकीय घटनांना जोडून त्याद्वारे पुस्तक विकत घेण्यास आकर्षित करताना दिसतात. पण कादंबरी त्यापलीकडे आहे. नीट, शांतपणे विचार केल्यास ती एकाच धर्माच्या विरुद्ध भाष्य करणारे नाही. कादंबरीविषयी माझे मत ....
Marathi Blog - मनात आलं म्हणून
'आवरण' कादंबरीतून
आवरण ( मुखपृष्ठ ) |
एखादी कादंबरी वाचावी आणि त्यात मांडलेला विषय सारखा सारखा मनात येत असेल तर त्याविषयी शक्यतो लवकर लिहिणं महत्त्वाचं आहे. अशा महत्त्वाच्या कादंबऱ्यांपैकी एक म्हणजे आवरण.
जगात इतकी पुस्तके किंवा लेख लिहिली गेली त्यातली काही पुस्तके समाजावर परिणाम करतात. जर सर्वांनी , विशेषतः भारतातल्या सर्वांनी 'आवरण' हे पुस्तक वाचलं तर ? अशी कल्पना मी पुस्तक वाचताना आणि वाचून झाल्यावर करू लागलो. वाचकांची संख्या एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात फार कमी असल्याचे वास्तव असल्याने माझी कल्पना काहीच कामाची नाही. लेखकाने , डॉ. एस. एल. भैरप्पा यांनी, समाजाच्या नकळत आणि पद्धतशीरपणे विचार लादू इच्छिणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांना या पुस्तकाद्वारे सरळसरळ चेकमेट केले आहे. इतकं परिणामकारक, गंभीर आणि तरीही अजिबात न कंटाळवणारं दर्जेदार पुस्तक आहे हे. याची स्तुती करावी तितकी कमीच.
आंतरधर्मीय ( हिंदू - मुस्लिम) लग्न केलेल्या एका जोडप्याची कहाणी सुरू होते. चित्रपटक्षेत्रात काम करणारे दोघेही सुधारित विचारांचे असल्याने नि नातेसंबंधांमध्ये कोणाचाही धर्म नि त्यातील प्रथा आड येणार नाही असे दोघांचे मत असते. परंतु .... (मुळची हिंदू) मुलीच्या सासरचे घर नि त्यांच्या धर्मातील प्रथा पाळण्यासाठी मुलीवर येणारा किंवा दिला जाणारा दबाव नि त्यामुळे होणाऱ्या अडचणी आपल्या डोळ्यांसमोर उभ्या राहतात. लहानपणापासून ज्या धर्माच्या रूढी -परंपरा पाळत आलो आहोत त्याच योग्य आणि सर्वश्रेष्ठ अशी मानसिकता होत असते त्यामुळे भिन्न धर्मात लग्न झालेल्या जोडप्यांच्या मुलाचा कोणत्या धर्माच्या व्यक्तीशी बालवयात संपर्क येतो नि त्या व्यक्तीमुळे बालवयापासून वैचारिक बैठक कशी बनते याचे उत्तम उदाहरण पुस्तकात पाहायला मिळते. या उदाहरणामुळे कोणत्याही व्यक्तीला आज असलेले आपले स्वत:चे विचार हे कशाचा परिणाम आहे यावर विचार करायला भाग पाडेल.
त्यामुळेच जोडप्यामधील ( मुस्लिम) पुरूषाची मानसिकता ही त्याच्या धर्माकडे झुकलेली असल्याने आपोआपच त्याचे वागणे त्याच्या धर्मातील चुकीच्या गोष्टींकडे झुकत जाते. त्या धर्मातील नियमांचा आधार घेऊन दोघांमध्ये मतभेद, भांडणे, विरहही होतो. या सर्वांत कथेतील स्त्रीला तिच्या माहेरच्या व्यक्तींशी आलेला दुरावा, नवीन धर्मातील न पटणाऱ्या पण केवळ पतीच्या समाधानासाठी कराव्या लागणाऱ्या कृत्यातून तिची होणारी कुचंबणा दिसून येते. दोन भिन्न धर्मांत विवाहसंबंध नकोच या निष्कर्षापर्यंत वाचक पोहचू शकतो.
अशा विवाहाला पाठींबा देणारे एक ( हिंदू) पात्र कादंबरीत आहे. त्या व्यक्तीच्या विवाह तिसऱ्या (खिश्चन ) धर्माचा पुस्तकात उल्लेख करतो. स्वत: मुक्त विचारांचा असल्याने त्याची पत्नी नि मुलांवर बंधने नाहीत परंतु सर्वांच्या घरी सणासुदीला कार्यक्रम होत असताना अशा व्यक्तीच्या घरात नीरस वातावरण तयार होते. शिवाय त्याची पत्नी मात्र स्वत:च्या धर्मातील नियमांकडे झुकलेली आहे. ही व्यक्ती कोणत्याही परंपरांचे पालन करत नाही. परंतु स्वत:च्या आईच्या निधनानंतर तिची नि वडिलांची इच्छा किंवा नकळत येणारा नातेवाईकांकडून येणाऱ्या दबावामुळे त्याला श्राद्ध नि त्यासंबंधित काही कृती करताना होणारी तारांबळ दाखवली आहे. सुरूवातीपासून त्याला हिंदू-मुस्लिम जोडप्यातील मुलीमध्येही स्वारस्य दाखवले आहे त्याचे कारण आंतरधर्मीय विवाहातून त्याच्या वाट्याला आलेले मानसिक असमाधानही कारणीभूत असेल.
वरील दोन्ही कुटुंबाच्या अपत्यांचा आपसात विवाहाबद्दल चर्चा नि निर्णयही होतो. मुलाचे अरब देशात नोकरी करताना भारताबद्दल झालेले मत ऐकून परदेशात जाणाऱ्या भारतीयांच्या मानसिकतेबद्दल आपल्याला चिंता वाटू लागते. शिवाय विचारांनी प्रगत होण्याचा प्रयत्न केला तरी काही धार्मिक रूढी नि परंपरा पाळाव्या लागतील तेंव्हा काय करावे याबद्दल विचार करावा लागेल. कादंबरीतील कथेनुसार राजकीय दबावापुढे खोट्या कथा सादर करणाऱ्यांना प्रोत्साहन नि सत्य जगापुढे आणणाऱ्या कलाकारांना वगळून सत्य लपवण्याचा होणारा प्रयत्न आपले डोळे उघडे करतो. त्यावेळी आपल्या हातूनही याच प्रकारचे सत्य उलगडणारे लिखाण व्हावे अहि इच्छा होते.
कादंबरीतील विशेष गोष्ट म्हणजे त्यात पुन्हा एक कादंबरी दडलेली आहे. ज्यात सतराव्या शतकात मुस्लिम राजवटीकडून होणारे अतोनात हाल, जुलूम यावर भाष्य आहे. त्याचे वर्णन करताना मुघलांकडून एका राजपुत्राला होणारी कैद, त्याला नपुंसक करणे, त्याचे धर्मांतर, मृत्यूपेक्षा जिवंत राहण्याचा सोप्पा पर्याय निवडल्याचा त्याला होणारा पश्चाताप, काही वर्षांनी धर्मांतर केलेल्या नि मुघल सरदारांकडून अपत्ये झालेल्या पत्नीला भेटणे , काशी -विश्वनाथ मंदिराचे उद्ध्वस्त होणे, ही अशी अनेक प्रसंगे काळीज पिळवटून टाकतात. कलाकृती तयार करताना टिपू सुलतान, औरंगजेबचे उदात्तीकरण कसे होते नि नेमकी त्यांनी काय कृत्ये केली होती याबद्दल माहिती मिळत जाते. या सर्व माहितीबद्दल लेखकाने संदर्भसूचीही दिली आहे जी आपोआपच कथेचा भाग बनली आहेत. या संदर्भसूचीलाच मी चेकमेट म्हणतो. म्हणजे लेखकाने मुस्लिम राजवटीवर केलेल्या भाष्याला सबळ पुरावाही आहे.
कादंबरीला अनेक छोटे मोठे अनेक कंगोरे आहेत. पुस्तकाची प्रत्येक ओळ, प्रत्येक पान महत्त्वाचे आहे. पूर्ण पुस्तक वाचणारा वाचक अंतर्मुख होत जातो. विशेषकरून सर्वसमावेशक धर्मातील व्यक्तीचे डोळे या पुस्तकामुळे उघडे होतात. वैचारिक प्रगती साधताना काही निर्णय मात्र परंपरेला धरूनच घ्यावे लागतील याची जाणीव होते. समाजापुढे स्वतंत्र विचारांचा, धर्मनिरपेक्ष व्यक्ती नि त्याचे उत्तम उदाहरण म्हणून वैयक्तिक आयुष्यात निर्णय घेण्याचा प्रयत्न किती कठीण आहे हे कादंबरीतून कळेल.
जुन्या परंपरांना झुगारून वैचारिक प्रगती करू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी हे पुस्तक जरूर वाचावे. कारण स्वत:च्या वैयक्तिक आयुष्यातही काही प्रसंग पुढे जरूर येणार आहेत.
जसे आंतरधर्मीय विवाहाबद्दल या पुस्तकात भाष्य आहे तसेच 'आंतरजातीय' विवाह केल्यानेही परिणाम होत असेल का ? स्त्री- पुरुषावर कुटुंब, आधीची पिढी, सभोवतालची माणसे, नातेवाईक यांचा दबाव येत असेल का ? मुघल राजवटीविषयी सत्य लपवून असत्य दाखवण्याचा प्रयत्न होत असतो हे मान्य केले तर तसाच प्रयत्न उच्च जातीतील व्यक्ती किंवा महापुरुषांबद्दल होत असेल का ?
एस. एल. भैरप्पा यांच्या आत्मचरित्राविषयी
No comments: