Amazon Kindle वर पुस्तक प्रकाशित कसे करावे

अनेकांची स्वत:चे पुस्तक असावे अशी इच्छा असते. सध्या छापील पुस्तके प्रकाशित करण्यासोबत ई -पुस्तक प्रकाशित करण्याकडे लेखकांचा कल वाढतोय. ते Amazon Kindle वर प्रकाशित कसे करावे, काय करू नये, रॉयल्टी किती नि कशी मिळते, पुस्तके विकली जातात की नाही, Amazon Kindle चे अजून फायदे काय आहेत ? त्याविषयी स्वानुभवातून...

Marathi Blog - मनात आलं म्हणून

Amazon Kindle वर पुस्तक प्रकाशन 

marathi-blog-on-publishing-book-on-amazon-kindle
सौजन्य: गुगलहून साभार 

  • छापील की ऑनलाईन पुस्तक प्रकाशित का करावे ?

वेळ आणि शारीरिक श्रम वाचवायचे असतील किंवा शक्य नसतील तर ऑनलाईन विक्री खरेदी उत्तम.

पुस्तकांची खरेदी नि विक्रीसुद्धा त्याला अपवाद नाही. छापील पुस्तके प्रकशित करताना अनेक  प्रकाशकांकडे जाऊन विनंती करून आपले पुस्तक ते प्रकाशित करतीलच असे नाही किंवा प्रकाशकांच्या नकारामागे अनेक कारणेही असतात जी लेखकाला माहीत किंवा मान्य असतीलच असेही नाही. 

अनेक लेखकांना पुस्तक प्रकाशित कसे होते हेच माहीत नसते तर अनेकांना लेखकाला किती मिळकत होते याबद्दल शंका असते. काही लेखकांपर्यंत आलेला ऐकीव अनुभव वाईट असतो. छापील पुस्तक प्रकाशित करताना त्यावर होणारी प्रक्रिया किमान एकदा तरी नक्की अनुभवावी, हे मात्र नक्की. 

छापील पुस्तकांना येणारा सुगंध ऑनलाईन पुस्तकांना येईल का ? आणि ऑनलाईन पुस्तके ज्या वेगाने जगभर पोहोचतात त्या वेगाने छापील पुस्तके पोहोचतील का ?

माझा पहिले पुस्तक प्रकाशित करतानाचा अनुभव हा खऱ्या अर्थाने मिश्र स्वरूपाचा निराश न होता स्वत:च्या  जिद्दीचा अनुभव होता. (तो अनुभव या लेखाच्या तळाशी देत आहे.)

माझे पहिले छापील पुस्तक 'पहिले पाऊल'  'संवेदना प्रकाशन'ने तर दुसरे छापील पुस्तक 'सफरछंद' हे 'ग्रंथाली प्रकाशन'ने केले होते. मी कायमच त्यांचा ऋणी आहे. पण माझ्या पहिल्या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद 'THE SAR PASS TREK' मी केवळ Amazon Kindle वर ऑनलाईन प्रकाशित केले. ते प्रकाशित करताना न झालेले कष्ट, ( लॅपटॉप किंवा संगणक वगळता ) केवळ वेळेची गुंतवणूक आणि फार सोपी पद्धत ही पुस्तक प्रकाशित करू इच्छिणाऱ्या अनेकांना मार्गदर्शक ठरेल अशी आशा करतो. 

  • पुस्तक कोणत्या फॉरमॅटमध्ये असावे नि कोणत्या फॉरमॅटमध्ये नसावे  ?

ज्यांनी आधीच पुस्तक प्रकाशित केले आहे आणि आपले पुस्तक आता Amazon Kindleवर उपलब्ध करायचे आहे त्यांनी किंवा नव्याने प्रकाशित करू इच्छिणाऱ्यांनी अ‍ॅमेझॉन किंडलवर पुस्तक प्रकाशित करण्याआधी सर्वप्रथम आपले लिखाण वर्ड फाईलमध्ये तयार करावे. आपले लिखाण करण्यासाठी शक्यतो साध्या फॉण्टचा वापर करावा.  तुमच्याकडे जर पुस्तकाचे pdf किंवा त्याचे स्कॅन केलेले पान असेल तर थेट पुस्तक तयार होत नाही. पुस्तक वर्डमध्ये असेल तर Amazon Kindle वर फॉण्टची उंची नि पानांची मांडणी आपोआप बदलते. 

  • पुस्तकाची केवळ पीडीएफ उपलब्ध असेल तर..

मी २०११ मध्ये Pagemaker या सॉफ्टवेअरमध्ये पुस्तक टाईप करून घेतले होते. जे सध्या फार वापरले जात नाही. ते डाऊनलोड करून त्यातला मजकूर वर्डमध्ये कॉपी-पेस्ट केल्यानंतर त्यातील फॉण्ट वर्डमध्ये आलाच नाही. ते Microsoft Word मध्ये कॉपी-पेस्ट होत नव्हते. Google Documents मधून कॉपी-पेस्ट केल्यानंतर त्यातील फॉण्टचा आकार वेगळावेगळा झाला होता. ती pdf नसती आणि Google Documents नसते तर माझे आधी प्रकाशित झालेले पहिले पाऊल Amazon Kindleवर आणण्यासाठी मला पुन्हा पूर्ण पुस्तक वर्डमध्ये टाईप करावे लागले असते. Google Documents बद्दल मला आधी कल्पना नव्हती तेंव्हा तर फार बैचेन झालो होतो. पण 'पीडीएफ' मधील मजकूर वर्ड मध्ये आणण्यास Google Documentsमुळे मदत झाली. हे सर्व टाळायचे असेल तर कधीही लेखन कराल तर ते साध्या फॉण्टमध्ये नि वर्डमध्ये सहज मिळेल अशा ठिकाणी सुरक्षित ठेवा हा सल्ला मी देईन. 

  • व्याकरणातील चुका सुधारून घ्या.

मराठीत लिखाण असल्यास त्यातील व्याकरणाच्या जास्तीत जास्त चुका दुरुस्त करून घ्याव्यात. ही कृती शक्यतो एखाद्या व्यावसायिकाकडून शोधून घ्याव्यात. आपल्याला आपणच लिहिलेले पुस्तक सहज कळतेच शिवाय ते पाठ असल्याने त्यातल्या चुका आपल्याला दिसत नाहीत. शिवाय वाचकाला आपल्या वाक्याचा अर्थ कळतोच याबद्दल खात्री देता येत नाही. हे झालं मराठी लेखनाबद्दल. इंग्रजीसाठी Grammerly हे Extension व्याकरणातील चुका सुधारण्यास उपयुक्त ठरते. Microsoft Word मध्ये स्पेलिंगच्या चुका दाखवल्या जातात त्यापेक्षा जास्त चुका Grammerly दाखवते. 

marathi-blog-on-publishing-book-by-kindle-create
सौजन्य: गुगलहून साभार

  • ई- पुस्तक बनवण्यासाठी Amazon Kindle Create चा वापर करा. 

मुळात अ‍ॅमेझॉन किंडल हे पुस्तक प्रकाशनासाठी असल्याने कोणतेही पुस्तक कोणत्याही उपकरणावर चांगले दिसावे यासाठी त्यांनी Amazon Kindle Create हे अ‍ॅप उपलब्ध करून दिले आहे. Amazon Kindle Direct Publishing (KDP) वरून हे डाऊनलोड करता येते. अगदी सुरुवातीलाच, अ‍ॅप कसे वापरावे याबद्दल सूचना दिलेल्या असतात ज्या त्या सूचना अंमलात आणताना समजतात. 
  1. तुमचा पूर्ण मजकूर त्या अ‍ॅपमध्ये अपलोड केल्यानंतर त्यात वेगवेगळे शीर्षक असतील तर ते अ‍ॅपमध्ये ओळखले जाऊन आपोआप अनुक्रमणिका तयार होते. त्या अनुक्रमणिकेत शीर्षकाला ते प्रकरण  आपोआप लिंक होते. पान क्रमांक तपासण्याची गरज भासत नाही. अनुक्रमणिका आपोआप तयार होत असली तुम्ही मान्यता देत नाही तोपर्यंत ती जशीच्या तशी वापरली जात नाही.
  2. परिच्छेदाच्या सुरुवातीला दोन बोटे सोडण्याची जी पद्धत आहे ती तुमच्या वर्डमध्ये आधीच सोडल्यास उत्तम. कारण अ‍ॅपमध्ये ती सोय नाही. स्पेस बटण दाबून जागा सोडण्याचा प्रयत्न केल्यास वेगवेगळ्या परिच्छेदास वेगवेगळे अंतर दिसते.
  3. मजकुरातील प्रत्येक प्रकरणाच्या पहिल्या परिच्छेदाचे पहिले अक्षर फार मोठे करण्याची पद्धत आहे. शिवाय महत्त्वाची वाक्ये अधोरेखित किंवा ठळक करण्याची सोय आहे. 
  4. शीर्षक किंवा उपशीर्षक देता येते.
  5. कवितांसाठी स्वतंत्र सेटिंग दिलेली आहे. 
  6. शिवाय एखाद्या शब्द किंवा वाक्याला इतर संकेतस्थळांवरील मजकुराची लिंक जोडता येते
  7. पुस्तकाचे शीर्षक मधोमध असावे की डाव्या बाजूला यासाठी वेगवेगळ्या थीम दिलेल्या आहेत. 
  8. दोन परिच्छेद किंवा प्रसंगांमध्ये नक्षी असलेले सेपरेटर देण्यासाठी सोय आहे. शिवाय इतर सामान्य सेटिंग्स आहेत. 
  9. प्रकरणाशी जोडलेले चित्र त्याच्या सुरुवातीला शिर्षकाआधी जोडता येते. तसेच इतर अनेक चित्रे जोडून त्यांचा आकार ठरवता येतो. त्यांची जागा म्हणजे डाव्या बाजूला , मध्ये की उजव्या बाजूला चित्र असावे हे ठरवता येते. या छायाचित्रांना नाव देणे गरजेचे आहे. 
  10. ही सगळी मांडणी झाल्यानंतर ती विविध उपकरणांत कशी दिसेल म्हणजे पुस्तक कसे दिसेल हे आधीच Preview मध्ये तपासून अंदाज घेता येतो.
  11. पुस्तकाची फाईल साईझ २५० MB पर्यंत ठेवू शकतो. (किमान ५० छायाचित्रे असलेल्या माझ्या पुस्तकाची फाईल साईझ ५० MB आहे. )

  • पुस्तकातील इतर मजकूर आणि सेटिंग्सविषयी.

Amazon Kindle Create मध्ये अर्पणपत्रिका, कॉपीराईट्स, प्रस्तावना, आभार,  लेखकाचे मनोगत, मलपृष्ठाचा मजकूर, पुस्तकाविषयी मान्यवरांचे किंवा वाचकांचे अभिप्राय, लेखकाची छायाचित्रासहित माहिती देण्यासाठी स्वतंत्र विभाग आहे

लेखकाची इतर पुस्तके Amazon Kindleवर उपलब्ध असल्यास त्यांची लिंकदेखील जोडता येते. 

पुस्तकाचे काम सुरू असताना अधूनमधून ते सेव्ह करण्याची सूचना होत असते. वरील सर्व कृती केल्यानंतर पूर्ण पुस्तक मनासारखे तयार झाले याची खात्री करून 'MANUSCRIPT' 'GENERATE' होते.  'GENERATE' केल्यानंतर ते .kpf फॉरमॅटमध्ये तुमच्या उपकरणात सुरक्षित होते. जे अ‍ॅमेझॉन किंडल डायरेक्ट पब्लिशिंगवर पुस्तक तयार करण्यासाठी अपलोड करावे लागते. 

  • Amazon Kindle द्वारे छापील पुस्तके कशी बनवावीत ?

छापील स्वरूपात लेखकाला पुस्तक प्रकाशित करायचे असल्यास त्याची स्वतंत्र वर्ड फाईल जोडावी लागते. नि त्याचा वेगळा हिशेब आपल्यासमोर दाखवला जातो. पुस्तकाच्या मागणीनुसार त्याची छपाई होते नि त्यासाठी होणारा खर्च लेखकाच्या रॉयल्टीमधून वजा केला जातो. 

  • पुस्तकाचे मुखपृष्ठ:

  1. Amazon Kindleवर पुस्तकाचे मुखपृष्ठ तयार करण्यासाठी स्वतंत्र विभाग आहे. 
  2. Amazon Kindleने उपलब्ध केलेल्या अनेक थीम वापरून अनेक प्रकारची मुखपृष्ठे तयार करून आपण ते निवडू शकतो. ही सोय मोफत आहे. 
  3. पुस्तकाचे मुखपृष्ठ जर आपण स्वत: तयार केले असेल तर तेही आपण जोडू शकतो
माझे वैयक्तिक मत असे आहे की शक्यतो मुखपृष्ठ हे Coral Draw किंवा Photoshop मध्ये बनवावे किंवा बनवून घ्यावे. त्यात केले जाणारे नक्षीकाम फार नाजूकपणे केले जाते. शिवाय मुखपृष्ठाला फार महत्त्व असल्याने शक्यतो ते व्यावसायिक मुखपृष्ठकाराकडून बनवून घ्यावे. थोडा खर्च करण्याची तयारी असावी. अनेक मान्यवर व इतरांचे मत घ्यावे. 
त्यामुळे Amazon Kindle ने उपलब्ध करून दिलेली सोय हा खर्च टाळण्यासाठी  किंवा अनेक थीम पाहण्यासाठी तसेच तुमच्या मुखपृष्ठकाराला तुम्हाला काय हवे आहे याचा अंदाज देण्यासाठी उत्तम आहे. 

marathi-blog-on-reading-book-on-amazon-kindle
सौजन्य: गुगलहून साभार

  • आर्थिक बाबी आणि त्याचा रोजचा अहवाल:

  1. पूर्ण पुस्तक तयार झाल्यानंतर त्याची व लेखकाची माहिती अ‍ॅमेझॉन किंडलवर दिल्यानंतर आर्थिक बाबी ठरविण्यासाठी स्वतंत्र विभाग आहे
  2. आपल्या पुस्तकांची किंमत स्वत: ठरवल्यानंतर लेखकाच्या मानधनाचा प्रकार ठरवता येतो.
  3. ३५% किंवा ७०% रॉयल्टी हे Amazon Kindle ने दिलेले पर्याय आहेत. हे पर्याय निवडल्यानंतर तुम्ही ठरवलेल्या पुस्तकाच्या किमतीनुसार तुम्हाला किती रक्कम मिळेल याची आकडेवारी आपल्यासमोर आधीच मांडली जाते. 
  4. आपल्या खात्यात आपल्याला मिळणारी रक्कम जमा होण्यासाठी आपल्या बँक खात्याचे तपशील द्यावे लागतात. 
  5. धनादेशद्वारे रक्कम हवी असल्यास त्याला कमीत कमी रकमेची अट आहे. ( बहुतेक १०० डॉलर्स)

  • Amazon Kindle Select आणि Amazon Unlimited

एखाद्या ग्रंथालयात तुम्ही तुमचे पुस्तक ठेवले आणि ते कुणी वाचण्यासाठी नेले तर त्या सदस्याने वाचलेल्या पानांच्या संख्येनुसार लेखकाला रॉयल्टी मिळते का ? नाही.

पण लेखकाचे पुस्तक जर Kindle Select वर उपलब्ध केले तर वाचकाच्या खात्यावर केवळ एकदाच त्याने वाचलेल्या पानांच्या संख्येनुसार लेखकाला रॉयल्टी मिळते.

माझ्या तीनही पुस्तकांच्या Amazon Kindle वर प्रकाशनानंतर १६ मे ते १५ जून २०२१ मध्ये वाचलेल्या पानांची संख्या १५५३ होती त्याला रू. १३१.११ /- त्यांच्या प्रणालीमध्ये दाखवले जात होते. आपले पुस्तक कोणी कधी विकत घेतले, सर्व वाचकांनी मिळून कोणत्या पुस्तकाची किती पाने वाचली गेली याची रोजची आकडेवारी रोज उपलब्ध होते. 

प्रत्येक महिन्याच्या आकडेवारीनुसार जमा झालेली रॉयल्टीची रक्कम १५ तारखेनंतर दिसते. जी पुढच्या महिन्यांत जमा होते. उदाहरण म्हणजे. १६ मे ते १५ जून २०२१ जमा झालेली पूर्ण रक्कम १५ जून नंतर मला समजली पण ती जुलैच्या अखेरीस माझ्या खात्यात जमा होईल.

पुस्तकाचा प्रचार करायचा असल्यास आपले पुस्तक काही दिवस मोफत उपलब्ध करून देण्याची सोय उपलब्ध आहे. ते तसे उपलब्ध असताना मात्र वरील प्रकारची रॉयल्टी त्या दिवसांसाठीची मिळत नाही.  

  • कॉपीराईट्स 

ISBN क्रमांक कसा मिळवण्यासाठी राजा राममोहन रॉय नॅशनल एजंसीच्या संकेतस्थळावर मिळते. तिथून मिळालेला क्रमांक Amazon Kindle Create आणि Amazon Kindle वर देता येतो. तो क्रमांक नसेल तरीही काही अडत नाही. पुस्तक प्रकाशित करता येते. 

पुस्तक प्रकाशन आणि नंतरच्या कृती 

वरील सर्व प्रक्रिया ठरवून, विचार करून, तपासून 'PUBLISH' म्हणजे प्रकाशित केल्यानंतर ३-४ तासानंतर पुस्तक प्रकाशित होते आणि ते  Amazon Kindle वर वाचकांसाठी उपलब्ध होते. 

प्रकाशित केल्यानंतरही त्यात काही सुधारणा किंवा प्रगती करायची असल्यास, रॉयल्टी बदलायची असल्यास, प्रकाशन रद्द करायचे असल्यास ती अद्ययावत होण्यास ३ दिवस लागतात. मी केले नाही त्यामुळे नेमके किती तास किंवा दिवस जातात हे माहीत नाही. 

Kindle Author Central या विभागात लेखक स्वत:ची सर्व पुस्तके एकत्र करून त्यांना मिळणारा वाचकांचा प्रतिसाद लेखकाला पाहता येतो. लेखक त्यात स्वत:च्या कार्याशी संबंधित छायाचित्रे नि व्हिडीओ जोडू शकतो. लेखकाने पुन्हा नवे पुस्तक प्रकाशित केल्यास लेखकाच्या वाचकांना ते आपोआप कळते. थोडक्यात, लेखकाचे स्वत:चे लेखनविषयक पेज तयार होते. 


माहितीसाठी माझे Kindle Author Central वरील पेज खालील लिंकवर पाहू शकता. 

वाचकांसाठी महत्त्वाचे :

  1. Amazon वरून एखादी वस्तू विकत घेण्यासाठी आपण जे खाते तयार करतो त्याच लॉगिनने पुस्तक घेता येते.  
  2. Amazon Kindle वर पुस्तक वाचण्यासाठी अनेक पर्याय आहेत. वाचक त्याला हवे असलेले पुस्तक विकत घेऊन वाचू शकतात.
  3. किंवा महिन्याचे किंवा वर्षांचे सबक्रीप्शन्स घेऊन त्या महिन्यात किंवा वर्षात हवी तितकी पुस्तके वाचू शकतात. एका वेळी ते दहा पुस्तके वाचनासाठी घेऊन ठेवू शकतात. 
  4. वाचकांनी दिलेला अभिप्राय आणि रेटिंग Kindle Author Central वर लेखकाला दिसतात. 
  5. शिवाय सर्व पुस्तकांमध्ये तसेच त्याचे पुस्तक ज्या प्रकारात आहे त्यात त्याच्या पुस्तकाचा लोकप्रियतेत कितवा क्रमांक लागतो ते कळतो. 
  6. आवडलेली वाक्ये वाचकाला रंगीत करता येतात. टिप्पणे काढता येतात. त्याच्या मागील बाजूचा रंग पांढरा किंवा काळा ते ठरवता येतो. अक्षरांची उंची / आकार/ शैली ठरवता येते. 
  7. बुकमार्क : कुठपर्यंत वाचून झालेले आहे त्याची खूण करता येते. 
लेखकांनी स्वत: किमान एक पुस्तक अ‍ॅमेझॉन किंडलवरून विकत घेऊन ते नेमके कसे दिसते हे पाहिल्यास उत्तम! 

इतर लेख 



मराठी पुस्तक ( सशुल्क)  - पहिले पाऊल , सफरछंद ( अ‍ॅमेझॉन किंडलवर उपलब्ध )
इंग्रजी पुस्तक : 'THE SAR PASS TREK' ( 'पहिले पाऊल'चा अनुवाद, अ‍ॅमेझॉन किंडलवर उपलब्ध )
Online Books PDF on esahity.com (Free) : मुल्हेर ते साल्हेर, कधी सरस कधी कळस, गोरखगड ते सिद्धगड, अलंगाशी संग मदनाशी गाठ  

लोकसत्ता 'ट्रेक इट' मध्ये भैरवगड, कलावंतीण , वैराटगड, आजोबागड आणि इतर लेख प्रकाशित.
Amazon Kindle वर पुस्तक प्रकाशित कसे करावे Amazon Kindle वर पुस्तक प्रकाशित कसे करावे Reviewed by Marathi Blog by Pankaj Ghare on June 22, 2021 Rating: 5

4 comments:

  1. नवोदितांसाठी खूप छान माहिती दिली

    ReplyDelete
    Replies
    1. अधिकाधिक लेखकांनी कमी खर्चात नि कमी कष्टाने पुस्तके प्रकाशित करावीत हीच इच्छा.

      Delete
  2. छान माहिती दिलीत,
    धन्यवाद,

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद. ही माहिती एखाद्या लेखकाच्या उपयोगी पडावी हीच इच्छा.

      Delete

मनात आलं म्हणून

मनात आलं म्हणून
थोडं माझ्याविषयी
Powered by Blogger.