उद्योग करणे फारसे कठीण नाही. मराठी माणूस उद्योग करू शकतो. ही दोन वाक्ये पसरवण्याचा नि जनमानसात रुजवण्याची वेळ आली आहे. त्यासाठी व्यवसायाला सुरुवात कशी होते याबद्दलचा स्वानुभव.
Marathi Blog - मनात आलं म्हणून
व्यवसायाच्या सुरुवातीला
सौजन्य: गुगलवरून साभार |
व्यवसायाआधी आपण नोकरी किंवा नोकरीचा विचार का करतो?
नोकरी हा आपल्याला ठरवून दिलेला आणि समाजाने सर्वांत सुरक्षित मानलेला एकमेव 'महा-राज-मार्ग' आहे. मोठ्या कंपनीमध्ये नोकरी करतो हे सांगताना पालकांना अभिमान वाटतो. आपल्या मुलाने लवकरात लवकर नि नियमितपणे घरात कमवून आणून दाखवावे, आर्थिक हातभार लावावा, मेहनत करणाऱ्या ज्येष्ठांवरचा भार कमी करावा. ज्या वस्तू घरात दिसाव्यात पण खर्च परवडत नाही अशा वस्तू इतरांकडे आहेत पण आपल्याकडे नाहीत याचे दु:ख आणि वारंवार त्याची करून दिलेली आठवण (कधी टोमणे ) हेही एक कारण महिन्याला कमावण्याचा मार्ग निवडण्याकडे असते.
जास्तीत जास्त म्हणजे स्वत:चे घर घेण्यासाठी कर्ज मिळेल इतके उत्पन्न कमवावे किंवा कमीतकमी स्वत:मुळे घरात होणारा खर्च तरी स्वत: कमवावा अशी कुटुंबाची अपेक्षा असते. शिवाय आपल्याभोवती अनेकांकडे व्यवसाय करताना किती धोका असतो, कोणाचे किती नुकसान झाले आणि सर्वांना किती त्रास झाला याची उदाहरणे देणारे अनेक नोकरदार राहत असतात. व्यवसायातून प्रगती केलेल्या एकाचेही उदाहरण नसते. त्यामुळे नोकरीच श्रेष्ठ असं वातावरण असतं. पण असो.
अशीच परिस्थिती असेल तरीही व्यवसाय सुरू करता येतो आणि यशस्वी होतो.
व्यवसायाआधी आपण नोकरी का करावी ?
(व्यवसाय करू इच्छिणाऱ्या अनेकांना अनुभवातून काही सल्ले द्यावेसे वाटतात. हे सल्ले मी आत्ताच ब्लॉगद्वारे लिहू शकतो कारण सध्या लॉकडाऊनमुळे लिहायला बराच वेळ मिळाला.)
व्यवसाय सुरू करण्याआधी नकारार्थी विचार सोडा.
उद्योग करणे खूप कठीण असते, मराठी माणूस उद्योग करू शकत नाही, खूप मोठी गुंतवणूक लागते, खूप धोका असतो, फायदा होतच नाही, स्वत:ला वेळ देताच येत नाही, ताणतणाव वाढून आरोग्यावर परिणाम होतो, बिझनेस म्हणजे २४ तासांची नोकरी, घरून पाठींबा मिळत नाही, घरची परिस्थिती चांगली असावी लागते, बिझनेस कसा करायचा सांगणारं कोणीतरी पाहिजे ? असे अनेक गैरसमज हे आपल्या मनात, तसेच कुटुंब आणि वेळ घालवण्यासाठी त्यांच्याशी बोलणाऱ्या लोकांच्या मनात असतात.
व्यवसाय सुरू करणाऱ्यांनी आधी नकारार्थी विचार आणि ते जिथून येतात ते मार्ग बंद करावेत. पण या लोकांशी जरूर बोलावे कारण कदाचित तेच आपले ग्राहक किंवा ग्राहकांपर्यंत पोहोचवणारे मार्केटिंगचे ऑफिसर किंवा कच्च्या मालाचा पुरवठा करणारे किंवा आपल्या कामाशी संबंधित माणसांशी जोडणारे ठरू शकतात. पण व्यवसाय कसा करावा या विषयावर शक्यतो नोकरी करणाऱ्यांशी बोलू नये. किमान घरच्यांसमोर तरी बोलू नये. माणूस कोणीही असला तरी त्याच्याशी उत्तम संवाद साधता आला पाहिजे. उत्तम संवादकौशल्य हा गुण आपल्या अंगात भिनला तर एक सुंदर गुण तुमच्या व्यवसायामुळे तुम्हाला मिळतो जो नोकरी करताना मिळत नाही. अशा अनेक गुणांची मिळकत ही व्यवसायात होते. जी नोकरीत मिळाली तरी त्याचा फायदा किंवा उपयोग हा दुसऱ्याला अधिक होत असतो.
व्यवसाय सुरू करताना घरी आर्थिक परिस्थितीची जाणीव असावी.
काहीही करून व्यवसायात यश मिळणारच अशी मनाची धारणा हवीच. पण ते पहिल्या दिवसापासून रोज मिळते असा गैरसमज नसावा.
फार कठीण मानसिक परिस्थिती कुटुंबात असलेल्या ठिकाणी व्यावसायिकाने कशी सुरुवात करावी याबद्दल सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. वर सांगितल्याप्रमाणे आधी नोकरीतून फायदा घ्या. ती करताना घरी जी रक्कम घरखर्चासाठी देता ती पुढील काही महिने देता येईल अशी तजवीज करा. व्यवसाय सुरू केल्यानंतर महिन्याला ठराविक रक्कम मिळण्याऐवजी एखाद्या महिन्यात अनेकदा, किंवा एकदाच एकूण मिळून एका वर्षाएवढी मिळकत होते किंवा एखाद्या महिन्यात शून्य मिळकत होऊ शकते हे स्वत:ला नि कुटुंबाला माहित असू द्या. तरीही सुरुवातीच्या काही महिन्यांत घरून मिळणारा पाठींबा टिकून रहावा म्हणून छोटी मोठी रक्कम घरी देत व्यवसाय सुरू आहे असे चित्र उभे करण्याचा प्रयत्न करावा.( ती रक्कम खर्च नाही झाली तर पुन्हा व्यवसायात कशी आणता येईल असा प्रयत्न करावा.) घरी व्यवसाय करताना आपण किती आनंदी, उत्साही नि यशस्वी होण्याच्या दिशेने जात आहोत हे बोलत राहावे किंवा मोबाईलवर कोणाला तरी सांगताना आपला फायदा कसा होतोय हे जरूर मोठ्या आवाजात बोलावे. 'हा / ही काय करते काय माहीत?' असे इतरांना सांगितले जात नाही ना याची काळजी घ्यावी. खरंतर नकळत त्यांच्या तोंडून आपल्या व्यवसायाची जाहिरात कशी होईल इतकी माहितीयुक्त जाहिरात त्यांच्या कानावर पडत राहिली पाहिजे.
व्यवसायासाठी काही महत्त्वाचे प्रमाणपत्र / क्रमांक
त्यानंतर तुमच्या आस्थापनेचे ( दुकानाचे / व्यवसायाचे ) समर्पक नाव ठरवून GST क्रमांक मिळवावा. गुगलवर संकेतस्थळ शोधून GST नंबर ऑनलाईन मिळवता येतो.( मी स्वत: मिळवला कारण हे फार सोपे काम आहे.) त्यासाठी तुमचा आधार व पॅन क्रमांक तयार असावा. नसेल तर GST आधी आधार व पॅन क्रमांक मिळवला पाहिजे. या तीनही नोंदी न करता व्यवसाय करायचा असेल तर फार छोट्या स्वरूपाच्या व्यवसायासाठी योग्य ठरतील. खूप जास्त उत्पन्न देणारा व्यवसाय वरील कागदपत्रे किंवा नोंदींशिवाय शक्य नाही. करण्याचा प्रयत्न केला तर कधी ना कधी मोठे नुकसान झेलण्याची तयारी ठेवावी.
काही उद्योगांमध्ये PF आणि ESIC क्रमांक असण्याची गरज असते. अनेकदा तुमचा ग्राहक म्हणजे एखादी कंपनी असेल तर त्यांच्या प्रणालीत (System मध्ये ) आपली पात्रता असण्यासाठी तसेच प्रकल्प ( प्रोजेक्ट) मिळवताना कमीतकमी कागदांची पूर्तता म्हणून PF आणि ESIC क्रमांक आधीच असणे गरजेचे असते. यासाठी सल्लागार (कन्सल्टंट ) असतात जे फार काळजीपूर्वक निवडले पाहिजेत. व्यवसाय सुरू केल्यानंतर प्रोफेशनल टॅक्स (PT) भरावा लागतो. GST, PT , PF आणि ESIC ची जबाबदारी इतरांवर सोपवल्यास ते काम करणाऱ्या व्यक्तीला महिन्याला किंवा ३ महिन्यांमागे किंवा वर्षाला त्याचे मानधन द्यावे लागते.
PF आणि ESIC चा क्रमांक मिळवताना जितक्या व्यक्तींची नावे नोंदवली गेली आहेत त्यांच्या नावे PF आणि ESICची रक्कम वेळेवर भरणे अतिशय महत्त्वाचे असते. तुम्ही आस्थापनेच्या नावे विकत घेऊ शकत असलेल्या वस्तू GST ची रक्कम घेतली असल्यास तसेच ग्राहकाला GST क्रमांक असलेले बिल दिल्यास दोन्ही प्रकारच्या बिलाची नोंद GST च्या संकेतस्थळावर द्यावी लागते.
एक उदाहरण, जर GST बिल घेऊन फक्त खरेदी केली असेल आणि त्या सर्व बिलांतील GSTची रक्कम रू. १०००/- असेल तर आपल्या खात्यात त्याची नोंद होते. जर खरेदीसोबत विक्रीही झाली असेल नि बिलांतील एकूण GST रक्कम जर रू. २०००/- असेल तर सरकारला केवळ रू. १०००/- द्यावे लागतात. एखाद्या महिन्यात काहीच व्यवहार झाला नसेल तर Nil Return भरणे गरजेचे असते. GST भरणे आणि सर्व बिलांची नोंद करणे फार महत्त्वाचे असते.
ESIC नसल्यास कामगारांचा विमा विकत घ्यावा लागतो. कधीकधी ESIC असतानाही ESICमध्ये समावेश नसलेल्या कामगारास काम करण्याच्या जागी उपस्थित राहायचे असल्यास वेगळा विमा घ्यावा लागतो. ESIC किंवा विमाशिवाय काम करण्याची परवानगी मिळत नाही.
व्यवसाय सुरू करताना बँकेत चालू खाते असावे.
व्यवसाय सुरू करताना बँकेत चालू खाते असणे गरजेचे आहे. मोठ्या बँकांमध्ये कमीतकमी ठेव ही रू. १०,०००/- असते तर सहकारी बँकांमध्ये ती रू. २,५००/- इतकी कमी असते. दोन्ही प्रकारच्या वित्तीय संस्थांमध्ये मिळणारे फायदे किंवा अडचणी ह्या प्रकारानुसार तसेच त्या त्या बँकेनुसार भिन्न असतात. त्याची माहिती स्वत: घेवून निर्णय घ्यावा नि अनुभव घेऊन पुढील निर्णय घ्यावेत. हे खाते उघडताना काही महत्त्वाच्या कागदपत्रांची गरज असते.
GSTची रक्कम अदा करत व्यवसायाशी संबंधित वस्तू विकत घेताना शक्यतो ती या खात्यातून करावी. तसेच ग्राहकांकडून येणारा धनादेश किंवा ऑनलाईन येणारी रक्कम याच खात्यात जावी.
GST ची रक्कम वाचवण्यासाठी अनेक ग्राहक रोख व्यवहार करणार का? अशी विचारणा करतात. वस्तूंवरील कर हा टाळता येत नसला तरी सेवेवरचा कर वाचला पाहिजे अशी त्यांची अपेक्षा असते. अनेकजण या मार्गाने मिळणारे कामे घेतात कारण त्यांना हाती आलेले काम सोडायचे नसते.
अनेकजण फायदा मिळवण्याच्या नादात GST न आकारलेले बिल स्वीकारतात व त्यासाठी बचत खात्यातील पैसे वापरतात किंवा जमा करतात. अशा वेळी विक्री करणारे मुद्दाम १८% ऐवजी ९% रक्कम ग्राहकाकडून घेतात. या सर्व कृती खरंतर गुन्हा आहेत. याची लागण लावून न घेणे हेच उत्तम. आपल्यापेक्षा फार हुशार मंडळी जगात आहेत याची जाण असावी.
सुरुवातीचे एक वर्ष :
व्यवसायाच्या सुरुवातीचे ग्राहक :
- काही ग्राहकांचे कर्मचारी आपण दिलेल्या खर्चाच्या अंदाजात त्यांची टक्केवारी जोडायला सांगतात. काहींना पैशांची हाव असते तर काहींचा पगार होत नसतो.
- अनेक ग्राहक त्यांना हव्या असलेल्या वस्तूची किंवा सेवेची केवळ किंमत जाणून घेण्यासाठीच संपर्क साधतात. प्रत्यक्ष काम मात्र त्यांच्या नेहमीच्या विक्रेत्याला देतात. त्या विक्रेत्याशी किंमतीच्या बाबतीत घासाघीस करताना त्यांना फायदा होत असतो.
- अनेक कंपन्यांचे कर्मचारी त्यांना तीन अंदाज ( कोटेशन्स) हवे असतात म्हणून आपल्याशी संपर्क साधतात.
- काही कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना स्वत: खर्चाचा अंदाज काढता येत नाही त्यामुळे सेवा देणाऱ्या व्यक्तीच्या वेळेचा वापर करून अंदाज कसा काढायचा हे शिकण्यासाठी बोलवत असतात.
सौजन्य : गुगलवरून साभार |
व्यवसायाच्या सुरुवातीचे ग्राहक कसे मिळतात?
सुरुवातीचे कामगार
अगदी सुरूवातीला कायमस्वरूपी नोकर मिळणं, खरंतर ठेवणं आर्थिकदृष्ट्या फार नुकसानकारक ठरू शकतं. गरजेनुसार एक किंवा दोन कर्मचाऱ्यांपासून सुरुवात करणं योग्य. कंत्राट तत्त्वावर काम करण्यास अनेक कामगार उपलब्ध असतात. त्यांच्यापैकी निवडक कामगार निवडक कामांसाठी ठरवल्यास उत्तम. एक प्रकारचे काम करण्यासाठी किमान दोन टीम तयार ठेवणे केंव्हाही चांगले. याच कर्मचाऱ्यांपैकी काहीजण भविष्यात तुमचे स्वत:चे कामगार होऊ शकतात. कर्मचाऱ्यांचं काम, कामाची पद्धत, वेग जाणून घेणे महत्त्वाचे आहेच; पण शिवाय त्यांच्या काम करणाऱ्याच्या नेमका वेळा, सवयी, नियमांचे व शिस्तीचे पालन, सुट्टी घेण्याची कारणे, व्यसने, व्यवहार करण्याची पद्धत, सुरक्षितता उपकरणांचा वापर, आपसातली मैत्री नि भांडणे, त्यांच्या खऱ्या गरजा, त्यांच्या समस्या, अशा अनेक इतर गोष्टी जाणून घेतल्यास स्वत:चे कामगार नियुक्त करताना तसेच प्रत्यक्ष काम करताना फायदा होतो.
No comments: