लेखक होण्यापूर्वी आधी कोणती पुस्तके वाचली होती ? एकंदर वाचनप्रवास कसा होता ? वाचायचे असेल तर काय वाचू अशा अनेक प्रश्नांना माझी उत्तरे
Marathi Blog - मनात आलं म्हणून
वाचत रहा वाचत रहा
साक्षर झाल्याचा सर्वात जास्त फायदा करून देणारा छंद म्हणजे वाचन.
अगदी अनेक छंदांच्या मुळाशी जोडलेला छंद हा वाचनच असतो.
रोज आंघोळ केल्यावर जर शरीर स्वच्छ होत असेल तर मनाची आंघोळ जर कशामुळे होत असेल तर ते असतं वाचन.
रोज शरीराची भूक जर अन्न भागवत असेल तर मनाची भूक कशाने भागत असेल तर ते अन्न म्हणजे वाचन.
शुद्ध हवा आत घेऊन अशुद्ध हवा उत्सर्जित करणे हे जर शरीरासाठी 'श्वसन' असेल तर 'हवा' ऐवजी 'विचार' शब्दाचा वापर केलात तर ते आयुष्यासाठी सेल वाचन.
खरंतर अशी बरीच वाक्य लिहू शकतो त्यालाही कारण वाचन.
माझ्या वाचनाची सुरुवात:
अगदी आठवलं तरी उपकारांची जाणीव होते. फार लहान असताना मला माझे वडील ठकठक, चंपक आणि चांदोबा आणून द्यायचे. त्यातलं ठकठक मला विशेषकरून आठवतं नि त्यावर माझं विशेष प्रेम होतं. त्यातलं बन्या, दिपू दी ग्रेट आजही माझ्या डोळ्यांसमोर आहेत. ठकठक नि चंपक मला माझ्या बालमित्रांप्रमाणे आहेत.नेमकी कधीपासून कधीपर्यंत मी तिन्ही पुस्तके दर महिन्याला किंवा पंधरा दिवसांनी वाचत होतो हे मला लक्षात नाही. दिवाळीत मला भाऊबीज भेट म्हणून मी हीच पुस्तकं मागून घ्यायचो. फार कमी किंमत असल्याने मला इतर पुस्तकंसुद्धा न मागता मिळायची.
ग्रंथालयातील पहिलं पुस्तक:
माझी शाळा 'अमरकोर विद्यालय'मध्ये ग्रंथालयात उत्तमोत्तम पुस्तके मिळायची. त्यातलं लक्षात राहिलेलं पुस्तक म्हणजे इसापनीती. या प्रकारातले एकतरी पुस्तक लिहिले पाहिजे त्याशिवाय उपकारांची परतफेड होईल असे वाटत नाही. मी चौथी इयत्तेत असताना ग्रंथालयाचा सभासद झालो. पहिल्या पुस्तकाचं नाव होतं चीन. स्कॉलरशिपचा अभ्यासही होता. त्यामुळे मी ते वाचलंच नाही आणि ते माझ्याकडून हरवलंसुद्धा. आता त्या पुस्तकाच्या किमतीएवढी रक्कम ग्रंथालयाला द्यावी लागेल या भीतीपोटी एक-दीड वर्ष मी ग्रंथालयात गेलोच नाही. मध्येच एकदा श्री. संदीप पाटील सरांनी वर्गात " काही मुलं अशी आहेत ज्यांनी लायब्ररी जोडल्यानंतर फक्त एकच पुस्तक वाचलं" असं म्हटलं. ते माझ्याबद्दलच बोलत होते असं वाटून मी ग्रंथालयाच्या बाईंना केवळ रू. १०/- देऊन जोमाने पुस्तकं वाचायला सुरुवात केली. तो जोम आजही तसाच सुरू आहे.
शाळेच्या लायब्ररीमध्ये खजाना मिळाला. मधल्या सुट्टीत पुस्तक बदलण्यासाठी खूप गर्दी असायची. माझी वारंवारता खूप जास्त असायची. माझ्या नावाचं पान लवकर भरलं पाहिजे असंसुद्धा वाटायचं. कधीकधी वक्तृत्व स्पर्धेसाठी सर किंवा मॅडम स्वत: मोठीमोठी पुस्तकं आणायचे. अभ्यास असताना, तेंव्हा इतकं मोठं पुस्तक कधी वाचू शकेन असं वाटायचं. त्यामुळे २०० पानांपेक्षा मोठं पुस्तक उचलताना भीती वाटायची. पुन्हा पुस्तक हरवलं तर ?
शेरलॉक होम्स आणि द्वारकानाथ संझगिरी
शाळेत असताना शेरलॉक होम्सच्या चातुर्यकथा मला प्रचंड आवडायच्या. त्या मला का आवडतात आणि किती चांगल्या असतात हे मी कोणालाही सांगत नसे. उगाच वाचक वाढले तर मला ती पुस्तकं मिळणार नाहीत. क्रिकेटची आवड असल्याने 'बाळ पंडित' यांचं क्रिकेटमधील गमतीजमती हे पुस्तक नि त्यातल्या गमती आजही लक्षात आहेत. सध्या द्वारकानाथ संझगिरी यांची पुस्तकं वाचण्याचा खूप मोह होतो. आधी लोकसत्तामध्ये ते लिहायचे तेंव्हाच त्यांच्या लेखनाचा चाहता झालो होतो. चाहता असूनही त्यांचे फक्त लेख नि सध्या फेसबुक पोस्ट वाचतो! वर्तमानपत्रातले लेख वाचून मला आवडलेले अजून काही लेखक म्हणजे उत्तम कांबळे आणि राजन खान. मला या दोन लेखकांसारखं लिहिता आलं पाहिजे. शिवाय गारंबीचा बापू पुस्तकातील पहिल्या ४० पानांत ज्या शब्दांत गावाचं वर्णन श्री. ना. पेंडसे यांनी केलं तसं वर्णन करायला जमलं पाहिजे. एका नेमक्या वेळी, म्हणजे त्याच पठडीतील पुस्तक लिहावंसं वाटलं किंवा करिअरचा सध्याचा टप्पा ओलांडला की शेरलॉक होम्स म्हणजे मला आवडलेलं पहिलं पात्र नि आवडणाऱ्या लेखकांची पुस्तकं विकत घेऊन वाचायला सुरुवात करेन.
मनोरंजक पौराणिक तरीही अंधश्रद्धेपासून दूर
शाळेत असतानाच मला रामायण आणि महाभारतातील मुख्य कथानक सोडून इतर कथा असलेलं पुस्तक वाचायला मिळालं. या कथा वाचल्यानंतर मूळ कथा पुन्हा वाचताना ऐकताना नि बघताना इतर कथा इतरांना सांगताना खरी मजा येते. तुम्हाला लहान मुलांप्रमाणे मोठ्यांना गोष्टी सांगायच्या असतील तर या इतर कथा वाचा. मजा येते. याचा अर्थ मी धार्मिक आहे आहे असं मात्र नाही. पण मुख्य कथानकासोबत इतर गोष्टी शोधण्याची किंवा त्यावर आधारित पुस्तके वाचायची सवय आजही लागली. प्रदीप दळवी यांचं 'संभवामि युगे युगे' हे पुस्तक सध्या मिळत नाही. त्यातल्या कथेबद्दल मला किंचित माहिती आहे. पण मी अनेक वर्षांपासून ते पुस्तक शोधतोय.
गैरसमज दूर करणारी पुस्तके
नरेंद्र दाभोळकरांच्या पुस्तकात हिंदूंसोबत इतर धर्मांतील अंधश्रद्धांवर भाष्य केलेले मी स्वत: वाचले होते. ते पुस्तक आठवत नाही. अंधश्रद्धा निर्मूलन समिती केवळ हिंदू धर्मावर टीका करते असा अर्थ त्यांची पुस्तकं न वाचलेली मंडळी सोशल मिडीयावर पसरवत असतात. त्यांना फक्त त्यांना नको असलेल्या धर्मावर टीका केलेल्या पानाचा फोटो हवा आहे. केवळ तो आयता मिळाला तरी बस्स. पण ते पूर्ण पुस्तक वाचून 'एखाद्या घटनेमागचा 'कार्यकारणभाव जाणून घ्या' हा उद्देश महत्त्वाचा आहे हे लोकांना समजेल असं वाटत नाही. हा गैरसमज दूर होणार अशी चिन्हेही नाहीत. शिवाय हा परिच्छेद लिहिल्याने मीही एका विशिष्ट धर्माचा समर्थक नि एका विशिष्ट धर्माचा विरोधक असल्याचे मनातही आले असेल.
असाच मोठा गैरसमज कॉ. गोविंद पानसरे यांच्या ' शिवाजी कोण होता ?' या पुस्तकाचा त्याच्या शीर्षकामुळे झाला आहे. त्यात महापुरुषांबद्दल गैरसमज किंवा अतिसमज कसा होतो हे फार उत्तमरीत्या पटवून दिले आहे. मी स्वतः छत्रपतींचा शिवाजी महाराजांचा भक्त, मावळा, शिवप्रेमी नि बरंच काही आहे. पण मला स्वत:ला अशाच प्रकारच्या पुस्तकांची समाजाला गरज असल्याचे भासते. विशेषकरून फार थोर महापुरुषांची, ज्यांना एकाच जातीतील किंवा धर्मातील माणसांनी बांधून ठेवले आहे.
नुकतंच वाचलेलं 'गांधी का मरत नाही ?' फार आधी वाचलेलं 'शिवछत्रपती - समज नि अपसमज' ही पुस्तके त्याच पठडीतली.
सौजन्य : गूगलहून साभार |
कवितांच्या प्रेमात
इयत्ता नववी नि दहावीपर्यंत बरंच वाचन झालं असं म्हणावं लागेल. कारण माझ्या लेखनात वाचकाला आवडेल असं काहीतरी मिळत होतं. माझे निबंध वेगळे होऊ लागले होते. कवी चंद्रशेखर गोखले यांचं 'मी माझा' हे चारोळींचं पुस्तक नि त्याची कॅसेट हा माझ्या वाचनप्रवासातलं असं वळण आहे जिथून लेखन आकर्षक होण्यास सुरुवात झाली. मीसुद्धा खरंतर कवितांनी लिखाणाला सुरुवात केली होती. जवळपास सर्वांच्या कविता मला मनापासून आवडतात. कविता वाचण्यापेक्षा ऐकण्यात जास्त आनंद मिळतो.
न संपणारा इतिहास
म्हणजे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांविषयी किंवा संभाजी महाराजांविषयी न वाचता औरंगजेबवर आधारित सुद्धा वाचणे महत्त्वाचे वाटू लागले. एक वेळ अशीही होती की केमिकल लोचा होऊन मला शिवाजी महाराज दिसू लागले होते. ( लगे रहो मुन्नाभाई पहिला तेंव्हा मला विशेष मजा वाटत होती). हळूहळू प्रभाव कमी करण्यासाठी मग कधी कोलंबस, कधी 'एक होता कार्व्हर', कधी आंग्रे, कधी नेपोलियन, मग अकबर आणि मग पुन्हा महाराणा प्रताप. मग पानिपत. मग बाजीराव पेशवे. मग माधवराव पेशवे. दहावी झाल्यानंतर इंजिनीअरिंगच्या पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतल्यानंतर मराठी वाचन बऱ्यापैकी कमी झालं होतं. पण बाबासाहेब पुरंदरे यांचं 'शिवछत्रपती' पुस्तकामुळे वाचन टिकून राहिलं. मी वाचलेलं पहिलं हे पहिलं मोठं पुस्तक. त्यानंतर छावा, राधेय, महानायक, हसरे दु:खं, स्वामी, राऊ, ययाति, रारंगढांग अशा अनेक पुस्तकांमुळे 'वाचन म्हणजे अहाहा' हे मी जाहीर केलं.
कॉलेजमधला प्रवेश नि नोकरीमध्ये बढती या विषयांवर इतरांशी विशेषत: न वाचणाऱ्यांशी गप्पा किंवा वाद व्हायचे. तेंव्हा वाचनात आलेली अनेक जाती-धर्माविषयींची पुस्तके, गांधी-आंबेडकर वाद, शिवाजी कोण होता ?, माझी जन्मठेप, प्रबोधनकार ठाकरेंची पुस्तके, भगतसिंग - राजगुरू, अनेक क्रांतिकारकांशी संबंधित पुस्तकांमुळे विशेषतः मी इतिहास वाचतोय हे माझ्या लक्षात आलं. आणि फक्त एकाच प्रकारातली पुस्तकं वाचणं चूक असल्याची जाणीव झाली.
खास ट्रेकिंगसाठी
ट्रेकिंगच्या नादात प्र. के. घाणेकर, आनंद पाळंदे, मिलिंद गुणाजी, सतीश अक्कलकोट आणि गड-किल्ल्यांविषयी नि इतिहासाविषयी पुस्तकांचे वाचन होत राहिलं. हा प्रवास न संपणारा आहे हे कळलं. ट्रेकमध्ये भेटणाऱ्या माणसांमुळे अनेक पुस्तकांची नावे माहीत झाली. ट्रेकिंगबद्दल शेवटचं वाचलेलं पुस्तक म्हणजे बेअर ग्रील्सच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद 'चिखल, घाम आणि अश्रू'.
इतर अनेक स्पर्श न केलेले विषय
निसर्ग, प्राणी, खगोल, वैज्ञानिक कथा, इतर राज्यांतील महापुरुष, जगातील अनेक महापुरुष यांच्याविषयी वाचन पूर्णपणे बाकी आहे. भरपूर सारी माहिती कोणत्या पुस्तकात मिळेल याचा शोध घेताना मला अच्युत गोडबोले यांचं मनात आणि अर्थात हे पुस्तक नि त्यात माहिती देण्याची पद्धत आवडली.
प्रवासवर्णन : वाचलेच नाही पण लिहिले भरपूर
दुसऱ्याने केलेला प्रवास मी का वाचू ? असे मी म्हणायचो पण एकही प्रवासवर्णन करणाऱ्या मीच दोन पुस्तके लिहिली. ती लोकांना तर आवडली पण खूप प्रती का विकल्या गेल्या नाहीत याचे उत्तर शोधताना चेतन भगत यांची काही पुस्तके वाचली. ती फार भावली नाही. सध्या अमिष यांची पुस्तके चर्चेत असली तरीही अजून मी त्यांचं एकही पुस्तक वाचलं नाही. कौटुंबिक जबाबदाऱ्या नि कामाचा व्याप वाढल्यामुळे माझा मूळ विनोदी स्वभाव मी स्वत: शोधतोय. त्यामुळे लवकरच मी विनोदी पुस्तकांकडे वळेन अशी आशा आहे.
सध्याच्या व्यवसायासाठी
सध्या स्वत:चा व्यवसाय करतोय. त्या अनुषंगाने 'द पॉवर ऑफ सबकॉन्शस माईंड', 'द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग', ७ हॅबिट्स ऑफ हायलि इफेक्टिव्ह पीपल', 'इट दॅट फ्रॉग', 'शांततेने काम करा', 'मित्र जोडा नि लोकांवर प्रभाव पाडा' ही पुस्तके वाचून झाल्यावर 'संन्यासी ज्याने आपली संपत्ती विकली' हे पुस्तक वाचतोय. '
'छे ! अशी पुस्तकं वाचून श्रीमंत किंवा यशस्वी होता आलं असतं तर सगळेच पुस्तक वाचत बसले असते' या मताचा मी होतो, पण सकारात्मक विचार व कृती करताना किंवा नकारार्थी स्थिती असताना हीच पुस्तके नि त्यातली वाक्ये महत्त्वाची ठरत आहेत.
भगवद्गीता वाचली आहे. अभंग, ज्ञानेश्वरी, कुराण , बायबल नक्की वाचेन.
एकंदर काय ? भरपूर वाचलं नि साहजिकच पुष्कळ बाकी आहे.
इतर लेख :
No comments: