पुस्तकाची पीडीएफ मिळेल का ?

पुस्तकांची पीडीएफ मिळेल का ? ते खरंच दिले किंवा घेतले पाहिजे का ? या विषयावर सदर लेख आहे. 
तुमचे मत ब्लॉग खाली लिहिल्यास उत्तम. चर्चा सुरू राहील.  

पीडीएफ मिळेल का?

marathi blog on reading pdf books for free
पुस्तक की रद्दी ?

मूळ मुद्दयापूर्वी :

लॉकडाउनच्या काळात अनेकांना त्यांचा छंद आठवला नि जोराने कामाला लागले. घरात बसून अनेकांनी त्यांच्या छंदावर जोर दिला आहे. पुस्तक वाचून त्यावर स्वत:चे मत किंवा परीक्षण सोशल मीडियावर पोस्ट करणारे वाढले आहेत. तसंच पुस्तकांशी संबंधित अनेक ग्रुपशी जोडून घेण्याचे प्रमाण वाढले आहे. ( यात मी सुद्धा एक आहेच.) 
पण त्यासोबत अनेकजण पीडीएफ आहे का ? हा प्रश्न विचारू लागली आहेत. या प्रश्नावर एक लेखक म्हणून व एक वाचक म्हणून माझे मत व अनुभव व्यक्त करत आहे. छापील पुस्तकेसुद्धा एकमेकांना, पण शक्यतो वाचन करणार्‍याला वाचायला दिली जातात. पीडीएफ किती जणांच्या हाती पोहोचतात नि ते नक्की वाचतात का हे सांगता येणं कठीण आहे. मी या दोन्ही बाजू मांडेन शिवाय काही पर्यायदेखील सुचवेन. लिहिता लिहिता इतर काही गोष्टी सांगेन. प्रयत्न करतो.

वाचनप्रवास:

अधिकाधिक लोकांनी पुस्तकं वाचावीत. यातच समाजसुधारणेचा धागा आहे. पण समाजसुधारणेशी संबंधित पुस्तके फार कमी वाचली जातात. ही पुस्तके कोण वाचतं ? ज्यांना आधीपासून वाचनाचा छंद आहे आणि वाचनाचा एक एक टप्पा त्यांनी पार पाडला आहे... म्हणजे ज्यांची सुरूवात ठकठक, चंपक, चांदोबाने झाली, नंतर ती शौर्यकथा, रहस्यकथा, विनोदीकथा यांवर आधारित पुस्तके वाचून ज्यांना वाचनाची गोडी लागली, ज्यांना कविता वाचताना भाषेचे सौंदर्य कळले, त्यांना हळूहळू जाड कादंबरी, जड व्याकरण, जड विचार वाचता येऊ लागलं नि त्यातून त्यांना बोध घेता येऊ लागला. हा बर्‍याच वर्षांचा वाचकाचा प्रवास मी फार लहान करून मांडला आहे. 

सद्यस्थिती 

सध्या होतंय असं की अशा अनेक दर्जेदार नि अवघड पुस्तकांची ओळख करून दिली की लगेच पीडीएफ आहे का अशी विचारणा होते. हे विचारणार्‍यांवर, जर ते नवीन वाचक असतील तर माझा काही आक्षेप नाही. लेखक, प्रकाशक, वितरक किंवा पुस्तक विक्रेता नसलेल्या व्यक्तींना एका पुस्तकामागे वेळ व मेहनत किती घेतली गेलेली असते नि त्या पुस्तकामुळे किती जणांना आर्थिक हातभार मिळणार असतो याचा अंदाज नसतो. पण, ज्यांनी पुस्तकं वाचली आहेत त्यांना ते पुस्तक लिहिताना लेखकाला घ्यावी लागणार्‍या मेहनतीचा अंदाज आलेला असतो. अशांनी मात्र हात आखूडता घ्यावा असे मनापासून वाटते. का ?

आर्थिक गणिते:

पुस्तकाची जी छापील किंमत असते. त्याच्या निम्मी किंमत ( ५० %) ही त्याच्या उत्पादनासाठी खर्च होते. पुस्तकाच्या प्रतींची संख्या जितकी अधिक तितका एका पुस्तकामागे होणारा खर्च हा कमी होत जातो. १०% रक्कम ही लेखकाची, १० % रक्कम प्रकाशकाची, १०% रक्कम ही वितरकाची, १० % रक्कम ही दुकानदाराची असते. १०% रक्कम ही पुस्तकविक्रीला प्रोत्साहन म्हणून आधीच वाचकाला आमच्याकडे सवलत आहे असे म्हनांत ती रक्कम पुस्तकाच्या छापील किंमतीत जोडलेली असते. लेखक जर नावाजलेला असेल तर १०% चे जास्तीत जास्त १५% होतात. प्रकाशनाच्या कार्यक्रमात नि संमेलनात वितरक व दुकानदार नसल्याने अधिक सवलत मिळते. प्रकाशनाच्या कार्यक्रमात 'वाचकाकडे' एकच तर संमेलनात 'खरेदी करणार्‍या'कडे अनेक पर्याय असतात. 

फरक लक्षात घ्या. 'वाचक' आणि केवळ 'खरेदी करणारा'. मी स्वत: लिहू की स्वत: अर्थ काढाल ?

आपण पार्टी देताना खर्चाचा किती नि काय विचार करतो नि पार्टी घेताना किती विचार करतो ? हा जो फरक आहे तोच फरक पुस्तक विकत घेऊन वाचताना नि पुस्तक मोफत घेऊन वाचताना आहे. 

marathi blog on book shop
या पुस्तकांना येणारा सुगंध ई-पुस्तकांना येईल का ?

'वाचक' व 'ग्राहक' 

कुणाचा गैरसमज नको म्हणून मी माझे मत सांगतो. मी स्वत: साहित्य संमेलनात माझी पुस्तके विक्रीसाठी घेऊन बसलो आहे. संमेलनात सर्व स्टॉलना भेटही देतोच. मला वाचक दिसतात. अनेक पुस्तके वाचून त्यावर आधारित, त्याच प्रकारातली किंवा त्याच्या विरोधी मतातली पुस्तके शोधत असतात. त्यांना आतापर्यंत न मिळालेली पुस्तके मिळतात का हे विचारताना, शोधताना स्वत: साठी नवीन विषयावर पुस्तके विकत घेतात. वाचकांची पुस्तक वाचण्याची यादी कधीच संपत नाही. स्पष्ट शब्दात तो हावरा असतो, त्याची भूक जास्त असते नि त्याची पचनशक्तीसुद्धा छान असते. पण कधीच समाधानाचा ढेकर तो देत नाही. आधी वाचलेली पुस्तकंसुद्धा वाचक संग्रही ठेवतो. त्याच्या पुढच्या पिढीला मिळेल न मिळेल ही भीती त्याला असते. याउलट, खरेदी करणारा, माझ्याकडे असलेल्या पैशांमध्ये जास्तीत जास्त पुस्तकं घेऊन पुस्तकांची संख्या कशी वाढेल याकडे त्याचा कल असतो. ही संख्या मिरवण्यामध्ये त्याला जास्त आनंद असतो. त्यामुळे पुस्तकांची यादी असलेली अनेक कागदे गोळा करून हिशेब करून तो पुस्तकं घेतो. कधीकधी घेतच नाही. 

ही जी खरेदी करणारी मंडळी आहेत त्यांचंच एक रूप म्हणजे पीडीएफ आहे का हे विचारणारी व्यक्ति. य प्रश्नामध्ये ' मोफत' हा शब्द गृहीत धरलेला असतो. त्याला ते हवं असतं. कितीजणांना वाचायचं असतं का हे तर सांगता येत नाही. पण प्रमाण मात्र नक्की कमी असेल. सध्या म्हणजे लॉकडाऊनमध्ये ही मागणी वाढली आहे. विचारलेले पुस्तक हे ऑनलाइन विक्रीसाठी उपलब्ध असेल तर ती लिंक द्यावी. खरंच तो वाचक असेल तर तो विकत घेऊन वाचेल. लॉकडाऊनच्या काळात फिरणे कठीण आहे ? दुकाने बंद आहेत असा युक्तिवाद मांडणार्‍यांसाठी इतर अनेक संकेतस्थळे आहेत जिथे अनेक उत्तम पुस्तकांची पीडीएफ विनामूल्य उपलब्ध आहेत. बरं त्याने मागितलेले पुस्तकच हवे असेल पण लॉकडाऊनमध्ये कमाई नाही तर पुस्तकावर खर्च का करू ? असा युक्तिवाद केवळ समोरच्याला गप्प करण्यासाठी मांडला जातो. हा युक्तिवाद तो महागड्या मोबाईलचा वापर करत दरमहा नेटपॅकचा रीचार्ज करत मांडलेला असतो हे कुणाच्याच लक्षात येत नाही. शिवाय लॉकडाऊन नंतरही पुस्तक विकत घेता येईल की ? इतके दिवस जे वाचलं नाही ते लॉकडाऊनमध्ये वाचलंच पाहिजे असंही नाही.

पीडीएफच्या विक्रीचे लेखकाला फायदे 

इंटरनेटच्या युगात परदेशप्रवास न करता पुस्तक अनेक वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पीडीएफ विक्री लेखकाला व प्रकाशकाला करावीच लागेल. पीडीएफ एकदा बाहेर गेली की पुढे ते लिखाण किंवा पीडीएफ मोफत तर दिली जाणार नाही ना ? अशी भीती लेखकाला वाटत असते. एकतर विक्रीसाठी असलेले पीडीएफ दुसर्‍या मोबाइल किंवा संगणकात कॉपी-पेस्ट केल्यास ती ओपन होत नाही. ओपन होण्यासाठी पासवर्ड विकत घ्यावा लागतो म्हणजे तेच पुस्तक विकत घ्यावे लागते. कोणतेही आर्थिक नुकसान होत नाही. 

पण ही भीती तर तेंव्हाही वाटू शकते जेंव्हा पुस्तकाची एक प्रत एका ग्रंथालयात असते नि अनेकजण ती वाचून पुन्हा ग्रंथालयात ठेवतात. तसेच एखाद्या वाचकाने एक प्रत घेतली की तो अनेकांना ती वाचण्यास देतो. तेंव्हा भीती असा नकारार्थी भाव मनात न येता प्रसार हा सकारात्मक भाव मनात येतो. 

मोफत  किंवा कमी किमतीत असलेले पीडीएफ कुठे वाचाल ?

esahity, प्रतिलिपी, मिसळपाव,ट्रेकक्षितिजची वेबसाइट व अनेक ब्लॉग आहेत की जिथे मोफत वाचन करता येते. वाचन करणार्‍यांसाठी व खरोखर आर्थिक परिस्थिति नसलेल्यांसाठी esahity.com सारख्या वेबसाइटवर अनेक पुस्तके मिळतील. माझीही पाच पुस्तके तिथे मोफत आहेत. ती का मोफत आहेत कारण त्या विषयावर आधीच अनेकजणांनी अनेक वेळा लिहिले आहे. शिवाय त्याविषयाचे भांडवल करून आर्थिक पोळी भाजणं योग्य नाही. माझा स्वत:चं ब्लॉग मोफत आहे नि त्यात अनेक विषयांवर लिहिले आहे. कारण सर्व विषयांवर पुस्तक लिहेनच असे नाही.

अ‍ॅमेझॉन किंडलवर महिन्याचे केवळ रू.१९९/-  वापरून केवळ त्या महिन्यात हवी तितकी पुस्तके चाळू शकता किंवा वाचू शकता. अगदी फारच आवडलेले पुस्तक पुन्हा वेगळी किंमत देऊन विकत घेऊ शकता किंवा केवळ एकच पुस्तक ज्याची किंमत महिन्याच्या फी (रू.१९९-/) पेक्षा कमी आहे,तेच विकत घेतल्यास वाचकाचा खर्च कमी होऊ शकतो. अनेकजण माझ्या पुस्तकांच्या पीडीएफसाठी विचारणा करत असतात. अनेक मित्र परदेशातून संपर्क साधतात. त्यामुळे 'सरपास ट्रेक'वर आधरित 'पहिले पाऊल' व लडाखमधील सायकलप्रवासावर आधारित 'सफरछंद' हे पुस्तक किंडलवर उपलब्ध केले आहे.

पीडीएफची गरज 

पीडीएफ कोणत्या पुस्तकांची पसरवली जावीत तर गावी शिकवत असलेल्या शिक्षकाकडे शालेय पाठ्यपुस्तके. गावातल्या शालेय विद्यार्थ्यांच्या घरी विशेष मोबाईल ( पुस्तकासाठी) असतील की नाही शंका आहे. एखादं तंत्रज्ञान त्या गरजूपर्यंत पोहोचलंच पाहिजे. पण कथा कादंबर्‍या नव्हे. 

अनेक महापुरुषांनी लिहिलेली पुस्तके अनेक वेबसाइटवर आहेत. मी नाव सांगत नाही कारण मग एक विशेषण लावून व्यक्तिविषयी मत बनवलं जातं. अशी पुस्तके जरूर सर्वांच्या संग्रही असावीत नि वाचली जावीत. पण कितीही तांत्रिक प्रगति झाली तरी तंत्रज्ञानाचा वापर करून पुन्हा तीच विज्ञानाचा आधार नसलेली पुस्तके पसरवली नि मागितली जातात ही एक शोकांतिका आहे. म्हणजे वैज्ञानिक दृष्टीकोन वाढवणार्‍या पुस्तकांपेक्षा उपास, आरत्या, बाबा -बापूंची पुस्तके जास्त विकली जातात. त्यांची किंमत कमी का असते हे आधीच संगितले आहे.( एखाद्याला लिखाणातून कमाई करायची असेल तर त्याने नक्की हा विषय निवडावा.) मोफत लिखाण सध्या बर्‍याच प्रमाणात उपलब्ध आहे. पण ते खरंच मोफत आहे की त्यासाठी महिना रीचार्ज केलेला असतो ? शिवाय वेबसाइटवर अनेक जाहिराती असतात की नाही ? हो असतात. ती जाहिरात येण्याआधी वेबसाइटला गूगलवर रॅंक मिळणं महत्त्वाचं असतं म्हणून ते जास्तीत जास्त जणांनी वेबसाइटला भेट द्यावं म्हणून आवाहन केलेलं असतं. सांगायचं हे आहे की मोफत देण्यामागे काहीतरी आर्थिक किंवा इतर हेतू असतोच. 

वैचारिक पुस्तके फार वर्षे विचार करून अभ्यास करून लिहिली जातात. ते लिखाण दुर्मिळ असतं ते वाचणारे कमी असतात म्हणून प्रती कमी छापल्या जातात. त्यामुळे त्यांची किंमत जास्त असते. ती कमी विकली जातात त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारे फार कमी असतात. त्या पुस्तकांकडे गर्दी होत नाही. पण उपास -तापास म्हणजे शॉर्टकट मार्गाने शांती, प्रगती सांगणार्‍या पुस्तकांकडे गर्दी होते. वैचारिक बदल समाजात आपल्या डोळ्यांसमोर होतील याची कोणीही अपेक्षा करू नये. (१३ व्या शतकात लिहीलेल्या पसायदान मधील 'अर्णव' हा शब्द नाव म्हणून वापरायला २० व्या शतकात झाली. )

हीच गर्दी सध्या पीडीएफ मागणार्‍यांची आहे. त्यात खरा चोखंदळ वाचक ओळखता येत नाही.  मोबाइल हॅंग झाला की सर्वप्रथम मोफत मिळालेली पुस्तके डिलिट होतील. विकत घेऊन वाचलेली पुस्तके वाचली जाण्याची नि ते चांगले नसेल तर त्या पुस्तकाविषयी नकारार्थी मत व प्रसार होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे अशी पुस्तके लिहिताना लेखकांवरही आवश्यक दबाव असतो जो मोफत लिहिले जाणार्‍या पुस्तकाच्या लेखकावर नसतो. त्यामुळे शक्यतो विकत मिळणारी पुस्तके घ्यावीत. 

सर्वांचा विचार करून लिखाण मांडण्याचा प्रयत्न केला आहे. विस्तारभयास्तव लिखाण थांबवतो.  


अधिक वाचा 


मराठी पुस्तक ( सशुल्क)  - पहिले पाऊल , सफरछंद ( बूकगंगा. कॉम वर उपलब्ध )
Online Books PDF on esahity.com ( Free) : मुल्हेर ते साल्हेर, कधी सरस कधी कळस, गोरखगड ते सिद्धगड, अलंगाशी संग मदनाशी गाठ  
लोकसत्ता 'ट्रेक इट' मध्ये भैरवगड, कलावंतीण , वैराटगड, आजोबागड आणि इतर लेख प्रकाशित.
 

पुस्तकाची पीडीएफ मिळेल का ? पुस्तकाची पीडीएफ मिळेल का ? Reviewed by Marathi Blog by Pankaj Ghare on May 28, 2020 Rating: 5

12 comments:

  1. पुस्तकांची पीडीएफ ज्या हौसेने मागतात त्याच हौसेने वाचुन पूर्ण करत असतील असे वाटत नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. बरोबर. फक्त माझ्याकडे एखादी वस्तू आहे याचा आनंद असण्यासाठी किंवा मी ते अनेकांना दिलं हे मिरवण्यासाठी अनेक पुस्तके, चित्रपट अनेकांच्या मोबाइलमध्ये पडून असतात.

      Delete
  2. हो खऱ्या पुस्तकांचा वाचनाचा आनंद ई पुस्तकांना येत नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. हो. तरीही काळानुसार आपल्याला सवय बदलावी लागेल.

      Delete
  3. I come here by facebook link...can i share thatfacebook post???

    ReplyDelete
    Replies
    1. Sure. Just to update you, today, I have added one more paragraph.
      If you share a link readers will come to know opinion of other readers also.
      However you can share this article as you want.
      Ultimate aim is to make everyone aware.

      Delete
  4. माहिती चांगली आणि परिपूर्ण आहे.

    ReplyDelete
  5. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  6. unique विषय आणि विषयाची उत्तम मांडणी

    ReplyDelete

मनात आलं म्हणून

मनात आलं म्हणून
थोडं माझ्याविषयी
Powered by Blogger.