पुस्तक लिहिणे हा एक वेगळा भाग आहे आणि पुस्तक प्रकाशित करणे हे वेगळं आव्हान आहे असं मी अनुभवाने सांगेन. आपल्या मित्रपरिवारांत कुणी लेखक किंवा प्रकाशक नसताना पहिलं पुस्तक प्रकाशित करताना पहिलं पुस्तक प्रकाशन हे आव्हानच आहे. शिवाय ती जबाबदारीही असते. पुस्तक प्रकाशनाच्या अनुभवाविषयी:
Marathi Blog - मनात आलं म्हणून
पुस्तक प्रकाशन
सफरछंद - मुखपृष्ठ |
पुस्तक नव्हे हस्तलिखित लिहिल्यानंतर सर्वात प्रथम मनात भीती वाटू लागते ती ते हस्तलिखित चोरी जाण्याची. त्यामुळे 'कॉपीराइट' म्हणजे काय नि ते कसं मिळवायचं ? या उत्तरात मीसुद्धा होतो. एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या हातात ते हस्तलिखित गेलं तर त्याने स्वतःच्या नावाने प्रकाशित केलं तर ? आणि कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी कोणाला तरी ते वाचायला द्यावं लागणारच होतं. यावर तोडगा म्हणून मी GOOGLE वर पुस्तक प्रकाशनवर माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला तेंव्हा मला 'महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ' असं काहीतरी असतं हे कळलं.
मी मे महिन्यात पुस्तक लिहिलं नि दोन महिन्यात ते लिहून झालं. (मी कोणत्या विषयावर कसं लिहिलं हे या लिंकवर उपलब्ध आहे. त्यात कळेल की पुस्तक 2 महिन्यात कसे लिहून झाले.) पण मंडळासाठी हस्तलिखित देताना पानाच्या एकाच बाजूला मजकूर असावे अशी अट आहे. जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत ते त्यांना सादर करायचं होतं अशीही अट होतीच. मी नुकतंच हाताने लिहण्याचे थांबवल्याने आणि ते लिखाण टायपिंगसाठी दिल्याने टायपिंग करणार्याला वेग वाढवायला सांगितला. माझी शाळा अमर कोर विद्यालयच्या मराठीच्या शिक्षिका श्रीमती मीना सावंत यांनी पुस्तकासाठी प्रस्तावना लिहून दिली. तीन पानांच्या त्या प्रस्तावनेत महत्त्वाच्या सर्व गोष्टी नि टीकाही होती. २० ते २५ पाने टायपिंग करून झाल्यावर त्याचा संगणक ( COMPUTER) बंद झाला. मी स्वत: त्यांच्या घरी जाऊन तपासून आलो. शेवटी पूर्ण पुस्तक पुन्हा लिहण्याचा प्रयत्न केला. माझ्या डाव्या हाताचा स्नायू पूर्णपणे दुखू लागला. हे हस्तलिखित आता पुढील वर्षी मंडळात देण्याशिवाय पर्याय नव्हता, पण माझ्यासोबत प्रवासाला आलेल्यांनी व मामाने उरलेली पाने लिहून काढली. जुलै महिन्याच्या ३१ तारखेला मी सर्व पाने गोळा केली. तर एकाने शब्दावर शिरोरेषा दिल्या नव्हत्या. या शिरोरेषा देण्यात मी दीड तास घालवला. पूर्ण हस्तलिखितात काही पाने, टायपिंग केलेली, नि चार माणसांच्या हस्ताक्षराने भरलेली होती. शेवटी ते मंडळाने स्वीकारलं. रवींद्र नाट्यमंदिराबाहेर येऊन मी 'पुलं'चा पुतळा पहिला. ते हसत होते. माझ्या डोळ्यांत पाणी होतं. कुणाशी तरी बोलावं म्हणून मी भावाला नि लिहण्यासाठी मदत करणार्यांना फोन करून सांगितलं. मंडळाने दिलेलं पत्र मी माझ्यासोबत घेतलं.
आता माझं पुस्तक कुणीही चोरणार नाही अशी माझी धारणा होती. हस्तलिखिताची एक प्रत सरकारी विभागात होती.
एका बाजूला मी प्रकाशक मिळवण्याच्या प्रयत्नाला जोर दिला. बर्याच प्रकाशकांनी नकार दिला. काहीजण म्हणाले, " नाही हो, सध्या फार पुस्तकं रांगेत आहेत. तुमचं पुस्तक होण्यास २ वर्षे लागतील." काही म्हणाले." आम्ही फक्त मोठ्या लेखकांचं पुस्तकं छापतो. किमान पुस्तकाचा नायक तरी मोठा असावा. मी त्यांच्या ऑफिसमध्ये दाऊद, ओसामा यांची चित्रे बघितली नि ती त्यावेळी मला फार मोठी नि कर्तुत्ववान वाटली. एकजण फोनवर हसत हसत म्हणाले, " अहो, काय तुम्ही हिमालयात गेलात! छे ! बरेचजण जातात. एखाद्या नवीन ठिकाणी जाऊन या मग लिहा." एकाने तर "बसा बसा सगळं तयार आहे, फक्त पैसे भरले की आम्ही हवं तसं तुम्हाला छापून देऊ" म्हटले.
माझ्या मित्रपरिवारात एकाने एका मित्राचा संपर्क दिला. त्याला पहिल्यांदाच भेटलो तर त्याने कडकडून मिठी मारली. त्याच्या ओळखीच्या प्रकाशकाला हस्तलिखित दिल्यानंतर दोन दिवसांनी भेटून चेहर्यावर फार भारावून गेल्याचे भाव आणले. हस्तलिखितावर टिचकी मारत ' हे पुस्तक गाजणार' असे शांतपणे म्हटले. मी या दोन्ही व्यक्तींबद्दल पुन्हा माझ्या मित्राला विचारले तर त्याने मला " अरे दगडपेक्षा वीट मऊ" म्हणून मी तुला हा नंबर दिला. मी त्याला म्हटलं, "अरे तो टिचकी मारत म्हणाला की मराठीच्या पुस्तकासाठी एक लाख रुपये लागतील". मित्र म्हणाला, " सावध हो".
या मित्राच्या ओळखीच्या एका व्यक्तीने आणखी एका शिक्षिकेला मला भेटायला संगितले. मी एकदा त्यांच्या घरी त्यांना हस्तलिखित देण्यासाठी गेलो नि त्यांनी सांगितल्याप्रमाणे २ महिन्यांनी ते पुन्हा घेण्यासाठी गेलो. दोन्ही वेळा मी दोन तास त्यांच्या सोसायटीच्या दरवाजावर त्यांच्या येण्याची वाट पाहिली. दोन्ही वेळा ' संपादकीय संस्कार' या विषयावर त्यांनी मला लांबलचक प्रवचन दिले. पण हस्तलिखित उघडून पाहिलेही नाही. ते इतर लेखकांच्या पुस्तकातली वाक्य ऐकवायचे. मी शेवटी म्हणालो, " अहो यापेक्षा चांगली वाक्य नि विनोद माझ्या पुस्तकात आहेत.
मित्राच्या ओळखीच्या त्याच शिक्षिकेने मला एका पुस्तक प्रकाशित केलेल्या लेखकाला भेटण्यास संगितले आणि पुस्तक प्रकाशनाचा दरवाजा उघडला....
या शिक्षिकेने ज्या व्यक्तीशी मला भेट घालवून दिली त्या व्यक्तीने प्रकाशनविश्व नावाचे पुस्तक दिले. त्यात कॉपीराइट विषयावर सविस्तर माहिती होती. शिवाय त्यांनी मला पुस्तकासाठी एक दर्जेदार मलपृष्ठ दिले. पुस्तकात नेमकं काय आहे हे त्यांनी दोन परिच्छेदात सुंदर शब्दांत लिहून दिले. माझ्या डोळ्यांत पाणी आलं होतं.
आम्ही नवलेखकांना प्राधान्य देतो असं म्हणत त्यांनी पुस्तक अस्तित्त्वात आणलं. या मधल्या काळात मी टायपिंग व प्रूफ रीडिंग पूर्ण करून घेतलं तरीही प्रकाशकांनी ते पुन्हा केलं त्याचा फायदा झाला. वेळ वाचवण्यासाठी पहिल्या आवृत्तीसाठी आम्ही टिपलेल्या छायाचित्रांपैकी एक वापरले. कागदाचा दर्जा, अनुक्रमणिका, छायाचित्रे, त्यांना समर्पक नावे, शब्द-वाक्य-परिच्छेदांची मांडणी कशी असावी कशी नसावी याबद्दल चर्चा झाली. आर्थिक गणिते कळली नि ती जुळली. माझ्या काही मागण्या मी मागे घेतल्या.
दरम्यान, पहिलं पुस्तक प्रकाशित करण्यासाठी मंडळाद्वारे सरकारी अनुदान मिळतं ही माहिती मिळाली होती; पण फार उशिरा कळलं की त्यांना मंजूर झालेल्या आर्थिक पुरवठ्यानुसार मोजक्या पुस्तकांना अनुदान मिळते. माझ्यावेळी २०१२ मध्ये मान्यवर महापुरुषांवर आधारित अनेक पुस्तके होती. त्यामुळे मी एक वर्ष पाठपुरावा घेत शेवटी हस्तलिखित घेतलं.
सुंदर पुस्तक छापून आलं. मो कोणताही कार्यक्रम केला नाही. वाशी बस आगारजवळ मित्रांसोबत हातात पुस्तक घेऊन फोटो काढले. प्रकाशकाद्वारे अनेक सरकारी ग्रंथालयात पुस्तक पोहोचलं. जितक्या जणांना शक्य झालं त्यांनो ते विकत घेतलं. काहींना कृतज्ञता म्हणून ते मी दिलं. माझी शाळा, कॉलेजच्या ग्रंथालयात मी ते ठेवलं.
चार आठवड्यात पुस्तकाची पाहिली आवृत्ती संपली.
Marathi Blog - मनात आलं म्हणून,
मराठी पुस्तक - पहिले पाऊल , सफरछंद
Online Books PDF on esahity.com : मुल्हेर ते साल्हेर, कधी सरस कधी कळस, गोरखगड ते सिद्धगड, अलंगाशी संग मदनाशी गाठ
लोकसत्ता 'ट्रेक इट' मध्ये भैरवगड, कलावंतीण , वैराटगड, आजोबागड आणि इतर लेख प्रकाशित.
पुस्तक प्रकाशित करताना
Reviewed by Marathi Blog by Pankaj Ghare
on
May 25, 2020
Rating:
अप्रतिम..मीही लिहीत असतो. पण इंग्रजीमध्ये... तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
ReplyDeleteवाह. आपल्या लिखाणाबद्दल जाणून घ्यायला आवडेल.
Deleteनक्कीच शेअर करीन...
Deleteधन्यवाद. आर्थिक गोष्टींबद्दल या लेखात काही दिले नाही. ती माहिती / अनुभव फोनवर किंवा प्रत्यक्ष भेटून देऊ शकतो.
ReplyDeleteसहा वर्ष झाली मी हिंदी तुन पुस्तक लिहलय पण प्रकाशित करण्यासाठी मला खूप अवघड जातेय. आपण काही मदद करू शकाल का.
ReplyDeleteमला संपर्क करा. ९८१९ ६६३ ६३०.
Deleteमी कॉल उचलला नाही तर मेसेज करून ठेवा.
मला संपर्क करा. ९८१९ ६६३ ६३०.
ReplyDeleteमी कॉल उचलला नाही तर मेसेज करून ठेवा.
छान वाटलं आपला अनुभव ऐकून व धीर ही आला, मी पुस्तक लिहायला सुरुवात करणार आहे, आपली मदत नक्की लागेल मला.
ReplyDeleteमला संपर्क करा. ९८१९ ६६३ ६३०.
Deleteमी कॉल उचलला नाही तर मेसेज करून ठेवा.