थोडंसं माझ्याविषयी- वैयक्तिक

 बर्‍याच जणांनी मला हे लिहिण्याबद्दल सूचना केली.  आपण आयुष्यात अजून काही केलं नाही तरी काही केलंच नाही हे मला पक्क ठाऊक आहे. 

थोडं माझ्याविषयी 

नमस्कार, 
मी पंकज प्रतिभा प्रकाश घारे, माझा ब्लॉग 'मनात आलं म्हणून मध्ये तुमचं स्वागत करतो. 

प्रसिद्धीचा हव्यास नाही असंही नाही पण माझ्यापेक्षा मी लिहिलेलं लिखाण, आयुष्यातले अनुभव, चांगली पुस्तके, न पटलेल्या विषयांवर माझं मत मांडण्यासाठी मी वेगवेगळी माध्यमं वापरत असतो. 
त्यापैकी 'ब्लॉगर' या माध्यमात केवळ मी लिहिलेलं लिखाण उपलब्ध असेल. त्यावर तुमच्या सूचना, सल्ला, टीका, सुधारणा, प्रोत्साहन, नवीन विषय याबद्दल 'कमेंट' करून कळवा.

marathi blog by blogger Pankaj Ghare
पंकज घारे

माझा जन्म २९ मे १९८६ साली रात्री ११:३५ ला  झाला. योगायोग हा की हा दिवस 'एव्हरेस्ट दिन' म्हणून साजरा केला जातो. २७ मे हा दिवस स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल  नेहरूंचा स्मृतीदिन तर २८ मे हा दिवस स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांचा जन्मदिन. २९ मे आधी येणारा हा योगायोग मला महत्त्वाचा वाटतो. आपणही समाजासाठी देशासाठी काहीतरी केले पाहिजे ही भावना केवळ या तीन तारखांमुळे कायम मनात राहते.

माझा जन्म मुंबईत सांताक्रूझ येथे  झाला. २ वर्षे आम्ही म्हणजे मी, आई, पप्पा आणि मोठा भाऊ तिथेच राहता असू. मी दोन वर्षांचा असेन आम्ही भांडुप ( पश्चिम) येथे प्रताप नगरला आलो.  माझं बालपण तिथेच  गेलं. प्रताप नगरमधल्या त्या भागाला आणि नेमक्या कोणत्या भागाला कोंबडीगल्ली का म्हणायचे हे नाही माहीत. आम्ही तिथे १९८८ पासून २०११ पर्यंत स्थायिक होतो. 

माझ्या बालपणात माझ्या शेजारी राहणारे मित्रांची आठवण विशेषकरून येते. चाळीतल्या छोट्या जागेत आम्ही एकत्र क्रिकेट, गोट्या, भोवरा, पतंग, लपाछपी, पत्ते, कॅरम, बुद्धिबळ, नवा व्यापार खेळायचो. चाळीत खेळणार्‍यांची संख्या जास्त झाली की आम्ही न्यू इंग्लिश स्कूल जवळच्या मैदानात डोंगराला लागून असलेल्या मोठ्या जागेत क्रिकेट खेळत असू. क्रिकेटची आवडसुद्धा याच मैदानात वाढत गेली. मी काही इतका चांगला खेळणारा नव्हतो. पण क्रिकेटप्रेम कायम होतं. चाळीत फिरणारे कुत्रे, मांजरी, विहीरीतील रंगीत मासे यांच्यामुळे कदाचित मला पक्षी-प्राण्यांचं कौतुक असावं. आमच्या घरी लहानपणी पिंजर्‍यात एक पोपट पाळलेला होता. आमचं घर पहिलंच होतं नि त्या घरशेजारी जास्वंदचं झाड होतं. मला माहीत झालेलं पहिलं फूल आणि झाड कदाचित हेच असेल. 

माझं गाव तुळस, तालुका वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग. माझं आजोळ, शिरोडा तालुक्यात तिरोडा इथे आहे. लहान असताना आम्ही मे महिन्याच्या सुट्टीत जवळपास दरवर्षी गावी जायचो. कदाचित एक वर्षाआड आम्ही गणेशचतुर्थीनिमित्त गावी जायचो. गावातल्या मुलांबरोबर वेगळं क्रिकेट खेळतानाही मजा यायची.  गावी असताना पप्पांची 'जैतीर हायस्कूल' शाळेला भेट द्यायचो.  'जैतीर' ही आमच्या शाळेची ग्रामदैवत. मे महिन्याच्या सुट्टीत दरवर्षी जत्रेच्या निमित्ताने हजारो भाविक गावी जमा होतात. आमच्या लहानपणी या जत्रेत आम्ही इतर सर्वांप्रमाणे तात्पुरतं ( जत्रेच्या १२ दिवसांसाठी) हॉटेल उभं करायचो. आमचं गावी घराजवळ एक छोटं दुकानही होतं. दुकानात भजी, उसळपाव, लाडू, शेव, करंज्या, चहा, आजोबांनी बनवलेली विडी असायची. आम्ही बनवलेली कांदाभाजी गावात लोकप्रिय होती.  गावी असताना सायकल खूप चालवायचो. लहान असताना १, २, ३ नंबर असलेल्या लहान सायकल चालवायला मला पप्पांनी शिकवलेलं आठवतंय. त्यानंतर हळूहळू सर्वांची सामायिक असलेली आजोबांची सायकल मी चालवू लागलो.   

माझ्या या आजोबांचं मला विशेष कौतुक वाटायचं. पप्पांचे पप्पा म्हणजे 'डबल पप्पा' असा माझा समज होता. ते दिवसभर विडी बनवायचे. अगदी पहाटे उठून त्यासाठी कुठूनतरी पानं आणायचे. लहान असताना मला जेंव्हा पहिल्यांदा सायकलच्या मागे बसायला जमू लागलं तेंव्हा म्हणजे पहिली इयत्ता झाल्यानंतरच्या मे महिन्यात , मी आजोबांच्या मागे बसलेलो असताना माझं पहिला अपघात झाला होता. माझा सायकलच्या मागच्या चाकात पाय गेला नी मी पडलो ती खूण आजही पायावर आहे. आयुष्याच्या शेवटी म्हणजे जवळपास १० वर्षे अर्धांगवायूने ते बिछान्यावर पडून होते. आज ते आमच्यासोबत नाहीत. त्यांचं नाव होतं 'सोमा धोंडू घारे'.

या 'सोमा' नावावरून मी नी माझी पत्नी 'काव्या' आम्ही आमच्या मुलाचं नाव 'स्मित' ठेवलं. आज वैवाहिक आयुष्यात मी परिपूर्ण नी सुखी आहे. कारण मला माझ्यापेक्षा चांगल्या स्वभावाचा जोडीदार मिळाला. मी पुनर्जन्मावर विश्वास ठेवत नाही. पण ऐनवेळी मी 'स्वराज' या नावाऐवजी 'मुलाचं नाव आजोबांच्या नावातील अक्षरांपासून ठेवण्याचं सुचवलं. 

'स्वराज' नाव हे मी ज्यांना आदर्श मानतो त्यापैकी सर्वांत वरचे स्थान असलेल्या शिवाजी महाराजांशी संबंधित आहे. शिवाजी महाराज, आई, पप्पा, भाई, पत्नी , मुलगा यांविषयी खूप लिहत बसेन. त्यामुळे ते टाळतोय, 

माझं पूर्ण आयुष्य मी छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण करतो. 

मराठी पुस्तक  - पहिले पाऊल , सफरछंद 
Online Books PDF on esahity.com : मुल्हेर ते साल्हेर, कधी सरस कधी कळस, गोरखगड ते सिद्धगड, अलंगाशी संग मदनाशी गाठ  
लोकसत्ता 'ट्रेक इट' मध्ये भैरवगड, कलावंतीण , वैराटगड, आजोबागड आणि इतर लेख प्रकाशित.
थोडंसं माझ्याविषयी- वैयक्तिक थोडंसं माझ्याविषयी- वैयक्तिक Reviewed by Marathi Blog by Pankaj Ghare on May 09, 2020 Rating: 5

No comments:

मनात आलं म्हणून

मनात आलं म्हणून
थोडं माझ्याविषयी
Powered by Blogger.