ब्लॉग लिहू इच्छिणाऱ्या अनेकांना कधीकधी काय लिहू हा प्रश्न पडत असतो. त्या विषयांविषयी
Marathi Blog - मनात आलं म्हणून
पण लेखन कशावर करू?
सौजन्य : गुगलवरून साभार |
अनेकांना लिहिण्याची इच्छा असते पण सुरूवात कुठून करायची ते समाजात नाही. विशेषत: ब्लॉग लिहिणाऱ्या नि त्याद्वारे कमाई करू इच्छिणाऱ्या अनेकांना ब्लॉगमध्ये कमीतकमी कंटेंट लिहिता येईल का याची खात्री नसते. म्हणजे किमान वर्षभर किंवा किमान ५० पोस्ट लिहिता येतील का ? आणि त्या पोस्टमध्ये १००० शब्दसंख्या होईल का ? अशी भीती आधीच असते. आधीच लेखन करत आलेल्या अनेकांना अगदी साध्या विषयांवर लिहावेसे वाटत नाही. त्यामुळे थेट मोठेमोठे विषय सुरुवातीला हातात घेऊन नंतर त्याच ताकदीचे लेखन सुचत नाही म्हणून त्यांचे ब्लॉग मधले लिखाण बंद होते. ( मी सुद्धा यांच्यापैकीच एक. फक्त मनात येईल तो विषयच लिहायचा असं आधी ठरवलं होतं.) कधी कधी लिहिण्यासाठी विषय सुचत नाही किंवा तंद्री लागत नाही. पण लिहत राहिलं पाहिजे.
पेनाने लिहू की टाईप करू ?
खरंतर पेनाने वहीत लिहणं हे मेंदूसाठी फार उत्तम. कारण तेंव्हा मेंदू फक्त विचार व शब्द यांकडे फार लक्ष देतो. बोटांनी लिहिणं हे फार नकळत होत असतं. पण ब्लॉग लिहिताना आपलं लक्ष शब्द नीट लिहिला गेला आहे ना ? कीपॅडमधलं नेमकं बटण दाबलं जात आहे ना ? लॅपटॉपची बॅटरी किती याकडे लक्ष द्यावं लागतं. त्यामुळे मेंदूला अनेक इतर कामे करावी लागतात. मी स्वत: मोठ्ठं काहीतरी लिहायचं असेल तर केवळ वहीत लिहितो. मी माझं पहिलं पुस्तक वहीत लिहिलं पण प्रकाशित करायची वेळ आली तेंव्हा वाटलं की आधीच लॅपटॉपमध्ये लिहायला हवं होतं. काही जणांचे अक्षर फार वाईट असते. अशांनी लॅपटॉपवरच लिहिणे उत्तम. पण हस्ताक्षर किमान सुधारावे. शिवाय खाडाखोड नि पानांवर होणारे डाग टाळायचे असतील, वहीच हरवणं टाळायचं असेल तर नि कुठूनही कधीही लिखाण मिळवायचे असेल तर लॅपटॉप किंवा कॉम्पुटरवर लिखाण सुरक्षित करण्यासाठी अवश्य असावे.
हे असे. आहे. लेखन कोणते करावे या विषयावर लिहिता लिहिता सूचले नि आवश्यक वाटले ते अनुभवावरून मी लिहिलंसुद्धा. 😊
सुचत नसेल तर स्वत:विषयी लिहायचं.
कोणताही माणूस सर्वात जास्त कोणत्या विषयावर लिहू शकत असेल तर तो विषय म्हणजे तो स्वतः. स्वत:बद्दलची माहिती स्वत:ला जास्त माहित असते. त्यामुळे काहीच नाही सुचलं तर स्वतःचे छंद, शाळा, कॉलेज, नोकरी, व्यवसाय, घर, मित्र, नातेवाईक आई-बाबा, बालपण, गाव अशा अनेक विषयांवर लिहायला किमान सुरुवात जरी केली की अचानक एखादा असा धागा सापडतो की त्या विषयावर लेखक एखादी पोस्ट नक्की लिहू शकतो. आपल्याला अनेकदा जुने मित्र भेटले की त्याला भेटून ज्या गमतीजमती आठवत गप्पा मारतो त्या लिहिणं आणि त्या आठवणी इतरांना हसवत सांगणं यात फार मजा आहे. हे सांगता सांगता मलाच अनेक विषय सुचले. आमच्या शाळेत मी केलेली मस्ती, मी मिळवलेली बक्षिसं, मी केलेली कॉपी, मी मार का खाल्ला, मला न आवडणारे शिक्षक पण तेच कसे बरोबर होते नि आता मीही तसाच कुणाशी वागतो असे विषय लिहिताना विषयानुसार आपला आत्मविश्वास वाढवायला, आपल्या चुका मान्य करायला, आपण कष्ट करू शकतो हे आठवायला, दुसऱ्याच्या चष्म्यातून जग पाहायला आणि अशा अनेक परिणामांमुळे आपल्या विचार नि कृती करण्यात सुधारणा होऊन आपल्या स्वभावावर सकारात्मक परिणाम होत असतो. करून पहा. लिहून पहा.
आठवणींना उजाळा द्या
बालपणीच्या अनेक आठवणींपैकी अनेकदा मी पाळलेल्या प्राण्याविषयी, मित्रांबरोबर खेळताना येणारी धमाल, लग्नासाठी स्थळ पाहताना आलेला एक विनोदी प्रसंग, तसेच ड्रायव्हिंग स्कूलमध्ये झालेले कष्ट, काश्मीरमध्ये कर्फ्यू असताना केलेला प्रवास लिहिताना मला तर मजा आलीच पण वाचणारेही फार हसू लागले. काहीना प्रसंग भावले.
सांगायचं हे आहे की लिहायला सुरुवात केली की पुढचं लिखाण होत राहतं.
डोळ्यांसमोर पाहिलेलं दृश्य लिहिण्यासाठी
हे ही जमत नसेल किंवा लिहून झालं असेल तर सरळ मी वाचलेली पुस्तके, मी पाहिलेले चित्रपट, मला लक्षात राहिलेले क्रिकेटचे सामने, मी पाहिलेला अपघात फार सहज लिहिता येतो. माझ्या खिडकीतून आता काय दिसतं ? काहीच दिसत नसेल तर काय (किंवा कोण ) दिसायला पाहिजे होतं या विषयावर फार सुंदर लेख होतो ? मीसुद्धा लिहू का ? मला खिडकीतून किल्ला किंवा हिमालय दिसावा असं वाटतं. नंतर दरवाजातून दिसणारा रस्ता कसा असावा ? त्याच्या बाजूला कोणतं झाड असावं कोणते पक्षी प्राणी दिसावेत ? नदी, तलाव, कुठे नि कसे असावेत ? किती मोठा डोंगर असावा नि किती मोठा समुद्रकिनारा असावा असं लिहित गेलात की एखादं गाव तसं असेलही असं वाटून मग आपलं गाव आठवू लागतं. थोडक्यात काय एक काल्पनिक भूगोल तयार करता येऊ शकतो. कधी मोठे लेखन करण्याचा प्रयत्न असेल तर त्याचा उपयोग एखादी काल्पनिक कथा लिहिताना होऊ शकतो.
समस्यांविषयी
गाव आठवलं की तिथल्या अपुर्या सोयी, शिक्षण, पाणी, वाहने, आरोग्य, यांसाठी होणारी लोकांची वणवण आठवून अनेक सामाजिक विषयांवर लेखणी आपोआप वळते. त्या सगळ्यामागे कधी स्थानिक, कधी भौगोलिक, कधी राजकीय, कधी पारंपरिक कारणे लिहिताना आपण नीट ल विचार करत लिहितोय ना ? दुसऱ्यालाही समजेल असं लिहितोय ना यादृष्टीने लिहत जातो. एकंदरीत लिखाणासाठी अनेक विषय आपोआप सापडत जातात.
नोकरी मिळवताना येणाऱ्या समस्या, उद्योग किंवा धंद्यातील अडथळे, एखादी चुकीची गुंतवणूक, फसवले गेल्याचा अनुभव, एखाद्या अधिकाऱ्याचे गैरवर्तन; यांबद्दल लिहिल्यास अनेकांना पूर्वसूचना देण्यात किंवा सतर्क करण्यात किंवा वस्तुस्थितीबद्दल जाणीव करून देण्यात हातभार लागू शकतो.
मनाची साफसफाई करा.
- एखाद्या व्यक्तीचा, वृत्तीचा राग येत असेल. एखादा वाईट अनुभव असेल तर, एखादा निराश करणारा अनुभव असेल तर नक्की आणि नक्की लिहा.
- 'जब वुई मेट'प्रमाणे तो कागद फ्लश करा. किंवा फार मोठा प्रसंग लिहिता आला तर प्रसंगातील पात्रांची नावे बदलून कादंबरीसुद्धा होऊ शकते.
- नोकरी किंवा व्यवसायातील अपयश पुढच्या पिढीला मार्गदर्शक ठरू शकतं.
- नकारार्थी विषयांवर या मार्गाने केलेल्या कृतीने मन स्वच्छ होतं. अनेकांना नकळत आपण माफ करतो.
थोडा तांत्रिक सल्ला:
Quora किंवा Google Question Hub वर अनेकजण अनेक प्रश्नांची उत्तरे शोधत असतात. कधीकधी फार साधी नि सोप्पी प्रश्ने लोकांना पडत असतात. ती किती जणांनी विचारलेली आहेत तेही कळते.
Google Question Hub वर तुम्ही लिहिलेल्या पोस्टची थेट लिंक देता येते. Quora वर ज्या प्रश्नाचे सविस्तर उत्तर द्याल तेच कॉपीकरून त्या विषयावर ब्लॉगमध्ये पोस्ट लिहून वेळ वाचू शकतो.
मी निवडलेला हा विषयसुद्धा अनेकांनी विचारलेल्या नि माझ्यासाठी साध्या असलेल्या प्रश्नांवर आधारित आहे.
इतर अनेक महत्त्वाचे विषय ( यापेक्षा जास्त तुम्हालाच सुचतील.)
अनेक नेत्यांची चित्रविचित्र वक्तव्ये किंवा प्रतिक्रिया फार कंटाळवाण्या असतात. त्यावर....
शाकाहार की मांसाहार, आस्तिक की नास्तिकता, मातृभाषा की बहुभाषिकत्व.....
सध्याचे अनेक सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य, राजकीय विषय, समस्या....
अनेक महापुरुषांच्याविषयी: किमान एक पोस्ट एखादे पुस्तक वाचून त्या पुस्तकाबद्दल लिहिता येते.....
तुमच्या शहरातील, राज्यातील, देशातील प्रसिद्ध किंवा अजिबात प्रसिद्ध नसलेल्या ठिकाणांविषयी......
तुमच्या आईने, आजीने किंवा कोणीही बनवलेल्या पदार्थाविषयी.....
एखाद्या कार्यक्रमातील धमाल, किंवा एखाद्याचे सादरीकरणविषयी...
अनेक अपूर्ण इच्छा, स्वप्नांविषयी.....
आपल्याला सोडून गेलेल्या अनेक व्यक्तींविषयी.....
No comments: