सायकलचा इतिहास हा सायकलप्रमाणेच अनेक भागांनी जोडलेला आहे. त्याविषयी....
Marathi Blog - मनात आलं म्हणून
दुचाकी सायकलचा इतिहास
काळानुसार सायकलमध्ये होत गेलेले बदल ( सौजन्य : गुगल ) |
- थोडं सायकलविषयी
आनंद, खेळ, उपलब्ध वेळ, व्यायामाची गरज आणि फार कमी खर्च या सगळ्यांचा एकत्र विचार केला तर डोळ्यांसमोर सायकलचा छंद येतो. पृथ्वीची उत्पत्ती, पहिला माणूस, एखाद्या गोष्टीचा उगम हे आणि असे अनेक विषय नेहमीच माझ्यासाठी कुतुहलाचे आहेत. त्यामुळे सायकल कशी अस्तित्वात आली असा प्रश्न सहज मनात आला म्हणून इंटरनेटवर इंग्रजीमध्ये शोध घेतला तर आश्चर्य-वाद-ज्ञान तुकड्यांमध्ये विविध संकेतस्थळांवर मिळत गेले. सायकलप्रमाणेच ते भाग मी जोडण्याचा प्रयत्न करतोय. सर्व चित्रे गुगलच्या सौजन्याने साभार.
वाचनातून माहित झालं की सायकलला खूप मोठा इतिहास आहे. सायकलच्या शोधाचे श्रेय केवळ एकाला देता येत नाही. सध्याची सायकल बराच प्रवास आणि प्रगती करत इथपर्यंत येऊन ठेपली आहे.
- छोटेछोटे अनेक शोध
पण १८१८ मध्ये हान्स-एर्हार्ड लेसिंग (Hans erhard Lessing) या सायकलच्या इतिहासकाराने यावर आक्षेप घेतला. १६९० मध्ये एम. डी. सिव्हर्क (Comte Mede de Sivrac) या फ्रेंच माणसाने सायकलच्या कल्पनेची मूळ प्रतिकृती बनवली होती तेंव्हा एका दांड्याला दोन चाकं जोडली होती. या दोन्ही दांड्यांवर दोन्ही बाजूंना पाय सोडून पायाने जमिनीला रेटे देऊन ते वाहन परेड करत ओढावे-ढकलावे लागे आणि वळण घेताना उचलून दिशा बदलावी लागे.
लाकडाची रेटत न्यावी लागणारी सायकल (सौजन्य : गुगल) |
१८१६ मध्ये जर्मनीच्या कार्ल ड्रेज (Baron Karl von Drais) याने हे वाहन वळवण्यासाठी पुढच्या चाकावर हॅंडल बसवलं आणि वळणावर आणलं. ६ एप्रिल १८१८ रोजी त्याचं त्याने पेटंट केलं; म्हणजे शोधाची रीतसर नोंद केली. ती पूर्ण लाकडाची सायकल वजनाने २२ किलोची होती. इतर अनेक ब्रिटीश सुतारांनी ड्रेसची कल्पना उचलली. सायकलमुळे घोडागाडीचा वापर कमी झाल्याने ह्यंन्स-एर्हार्ड लेस्सिंग याने घोड्यांच्या उपासमारीचा संबंध सायकलशी जोडला. तो एका तासात तेरा किमी प्रवास अशाच सायकलने करून आला होता. बऱ्याच अपघातांमुळे हळूहळू ह्या सायकलवर बंधने आली. तरीही अशीच सायकल १८६६ मध्येसुद्धा चीनी प्रवासी बिन चून याला दिसली होती.
मधला दांडा वाकवलेली सायकल |
डेनिस जॉन्सनने १८१८ मध्येच सुधारित सायकल आणण्याचं जाहीर केलं. त्याने त्याच्या
नोंदलेल्या कल्पनेला 'व्हेलोसिपिड' असं नाव दिलं. ड्रेसच्या सायकलचा, हॅंडल
आणि उभे राहण्याची जागा जोडणारा आडवा दांडा हा सरळ होता. (दांड्याचा हा ताठ बाणा
आवडला नाही की काय) जॉन्सनने त्याला वाकवून, सापासारखा आकार देऊन मध्ये नीट उभं
राहायला जागा केली. सायकलही थोडी सुंदर दिसू लागली. त्यामुळे पुढे आणि मागे मोठे चाक
वापरून मधोमध बसण्याची जागा तयार होताना उंचावर बसावं लागत नव्हतं; पण सायकल ढकलताना
बुटांची झीज वेगाने होते या अजब कारणाने ही कल्पनासुद्धा मावळली.
पायाने पुढे मागे झोके दिल्याने पुढे जाणारी सायकल |
१८३९ मध्ये मॅकमिलन (Kirkpatrick Macmillan) या स्कॉटिश माणसाने पाय जमिनीला न टेकवता पुढे जाणारी सायकल बनवली. जसा झोका पुढे मागे होतो तसे एकेक पायाने एकेका पेडलला झोका दिला की चाक सरकत फिरायचं.
१८४० मध्ये पुढच्या चाकाच्या आसाला पायाने फिरवता येईल असे पेडलचे दांडे पुढच्याच चाकाला बसवण्याची पद्धत सुरू झाली. या वाहनात पेडल एकदा फिरवलं की चाक एकदाच पूर्ण फिरलं जाई. त्यामुळे जास्त अंतर कापण्यासाठी मोठी चाके असलेली सायकल अस्तित्वात येऊ लागल्या. पण ही सर्व तीन किंवा चारचाकी वाहने असल्याने त्यांचे वजनसुद्धा जास्त होते. दोन चाकांची तोल सांभाळावी लागणारी सायकल अजूनही बनायची होती.
सायकलचा इतिहासकार डेव्हिड हेर्ली (David V. Herlihy) म्हणतो की, १८६३ मध्ये लॅलेमेंट (Lallement) याने पेडल फिरवायची सायकल बनवली. डेनिस जॉन्सनने बनवलेल्या पेडलच्या कल्पनेवरून त्याची सायकल बनली. लॅलेमेंटने सायकलच्या फ्रेमवर सीटखाली स्प्रिंगप्रमाणे रचना करून सायकलप्रवास अधिक आरामदायी केला.
लॅलेमेंट त्याच्या सायकलसह |
सायकलच्या व्यापक वापरामुळे व्यापार नि व्यवसाय
वाढला होता. १८६० मध्ये पीर आणि अर्न्स्ट् मिकॉक्स (Pierre &
Ernest Michaux) या पितापुत्रांनी सामान
ठेवण्याची जागा, कॅरिअर असलेली सायकल बनवली. ऑलिव्हर (Aime and Rene Olivier) या दोघा भावांनी
डेनिस जॉन्सनची सायकल वापरून १८६५ मध्ये फ्रांसमध्ये पॅरिस ते आव्हियों असा आठ दिवस
सायकलप्रवास केला. या प्रवासानंतर त्यांनी ही सायकल बनवण्याचा आणि विकण्यामुळे
होणाऱ्या फायद्याचा विचार करून त्यांचा मित्र पीर मिकॉक्स सोबत भागीदारी करत ‘मिकॉक्स आणि कंपनी’ नावाने १८६८ मध्ये
उद्योग सुरू केला. अश्मयुगीन माणसाने दगडानंतर धातूचा वापर करायला सुरुवात केली.
तसाच सायकलसाठी ऑलिव्हर बंधू लाकडाऐवजी धातू वापरून कमी वजनाच्या भरपूर सायकल बनवू
लागले. ओटावा येथे विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागात ती संग्रहालयात आहे. ऑलिव्हर
बंधूंनी गॅबर्ट नावाच्या या यंत्र कामगाराच्या मदतीने लोखंडी चौकटीला एक कर्ण जोडून
मजबुती वाढवली. १८६८-७० पर्यंत तिचे वेड जरी लोकांना लागले असले तरी पुढचे मोठे
चाक स्थिरता आणि आराम देत नव्हते. खासकरून वळण घेताना त्रास होत होता. मिकॉक्सने
बनवलेल्या महाग सायकलींची ग्राहकांकडून तक्रारी होऊ लागल्या. फ्रांसमध्ये सायकलला ‘व्हेलोसीपेड’ आणि अमेरिकेत ‘बोनशेकर’ म्हणायचे.
लॅलेमेंटने सायकल व तिच्याशी संबंधित अनेक
शोधांची नोंद केली आणि अमेरिकेत झेप घेतली. अटलांटिक महासागराच्या दोन्ही बाजूंना, म्हणजे युरोपात आणि अमेरिकेत, अगदी गावातही सायकल लोकप्रिय झाली. कॅनडामध्ये हॅलिफॅक्स या
गावी सायकलसाठी बर्फाची पाच मैदानं आणि शहरांत सायकल शिकवण्यासाठी चक्क शाळा सुरू
झाल्या.
पुढच्या मोठ्या चाकाला पेडल असलेली सायकल |
१८७० मध्ये फ्रांस-प्रशिया युद्धात व्हेलोसीपेडचा भाव उतरला आणि फ्रेंच बाजारपेठेवर मंदीचे सावट आले. अमेरिकेतही १८७० नंतर सायकल अयशस्वी झाली. ‘सायकली चालेना रस्ते वाकडे’ अवस्था होऊन तिथले खराब रस्ते सायकलसाठी कठीण आहेत असा वाद झाला. शिवाय कॅल्विन व्हिटी (calvin witty) याने लॅलेमेंटची कल्पना विकत घेतली पण रॉयल्टीच्या मागण्यांमुळे पूर्ण उद्योगाला चाप बसला.
१८७७
मध्ये बोस्टन व्यक्ती सायकली आयात करू लागले आणि अल्बर्ट ऑगस्टस पोप त्याची कोलंबिया ही
सायकल बनवू लागला. न्यायालयात खटला जिंकल्यानंतर कॅल्विन व्हिटीने इतरांना अधिभार
लावणे किंवा उद्योगातून बाहेर पडणे हे पर्याय ठेवले. पण ब्रिटीश साम्राज्य पसरू
लागल्याने इंग्लंडमधील दुचाकी आणि तीनचाकी जगभर पसरली. अशा प्रकारे वेगवेगळे भाग
जोडून बनलेल्या सायकलमुळे बरीच भांडणंही झाली. त्यामुळे सायकलच्या आयुष्यात अनेक
चढ-उतार आले.
साखळी आणि मध्साये चाक असलेली सायकल |
१८७६ मध्ये एच. जे. लॉसन याने पेडल आणि साखळी लावण्यासाठीचे मधले चाक व साखळी वापरून मागच्या चाकाला गती देण्याची पद्धत सुरू केली. मधले चाक कोणी जोडले यातही वाद आहेत. सुरुवातीला गिअरच्या सायकल वापरताना सायकल थांबवून, मागचे चाक काढून, गिअरनुसार व्यवस्था करून पुन्हा चाक लावावे लागे.
जेम्स स्टार्लीचा पुतण्या जॉन केम्प स्टार्ली याने जिचे पुढचे चाक वळवता येईल अशी पहिली यशस्वी सायकल बनवली. तिची दोन्ही चाके समान आकाराची होती आणि मागचे चाक साखळीने जोडलेले होते.
१८८८ मध्ये जॉन बॉइड डनलॉप (John Boyd Dunlop) याने हवेने भरलेल्या टायरचा शोध लागला. रबरी नळीत हवा भरून फुगविलेले रबरी टायर प्रचारात आले.
१९४० मध्ये सायकलसाठी स्टॅंड अस्तित्वात आला. १९५० मध्ये
वजनाने हलक्या, बोटांजवळ ब्रेक असलेल्या, अरुंद जाडीच्या, तीन गिअर असलेल्या सायकल
अस्तित्वात आल्या. तिला पुढे विजेचे दिवे, मागे सुरक्षेसाठी चमकणारे दिवे, पायाने
लावायचा स्टॅंड आणि ट्यूबमध्ये हवा भरण्यासाठी फ्रेमला बांधता येणारा पंपसुद्धा
होता. सायकल चालवणे हा युरोपात हळूहळू छंदच विकसित झाला.
बॉडन याची सायकल |
- सायकलचे जागतिक औद्योगिकीकरण
जर्मनीमध्ये १८९० नंतर सायकल उद्योग वेगाने वाढला. डच लोकांनी तो इंग्लंड मधल्या सायकलची नक्कल केली किंवा आयात केली. १८९५ मध्ये इंग्लंडमधील ८५% सायकल आयात केल्या गेल्या. विसाव्या शतकात ब्रिटनमध्ये सायकलचे वेड ओसरले पण जर्मनीमध्ये तसेच राहिले. त्यामुळे काहीजण सायकलला डच-बाईक म्हणत.
रिपब्लिक चीन मध्ये सायकल हे सरकारमान्य वाहन होतं आणि चीन देश पुढे सायकलच्या व्यवसायाचे साम्राज्य झाला. शिवणयंत्र, घड्याळ आणि सायकल या तीन वस्तू प्रत्येक नागरिकाकडे हव्यातच अशी स्थिती चीनमध्ये होती आणि या वस्तू असणं हे संपत्तीचं प्रतिक सुद्धा होतं. या सायकलला ‘फ्लाइंग’ असे म्हणत. या कंपनीचा लोगो हा सायकलचे चिन्ह बनला. १९८० मध्ये ती सर्वाधिक सायकली बनवणारी कंपनी होती. १९८६ मध्ये ३० लाख सायकल बनवल्या गेल्या. एक सायकल विकत घेण्यासाठी तेंव्हा काही वर्षे वाट पहावी लागायची. १९८० मध्ये वेगवेगळ्या स्पर्धांसाठी सायकल बनवल्या जाऊ लागल्या आणि १९९६ मध्ये सायकल ऑलिम्पिकमध्ये दिसू लागल्या.
- भारतात सायकलचे अस्तित्व
भारतात सायकल केंव्हा आली हे नक्की सांगता येत
नाही. लोखंडी नांगराला जन्म देणाऱ्या लक्ष्मण किर्लोस्कर यांना मुंबईत एक पारशी
गृहस्थ दोन चाकांच्या ज्या सायकलवरून जाताना दिसला. त्या सायकलचं एक चाक माणसाच्या
उंचीचं तर दुसरं चाक एका हाताएवढं होतं. त्यांनी या यंत्राविषयी माहिती गोळा
करेपर्यंत सेफ्टी सायकल अस्तित्वात आल्या. स्वतः सायकल चालवायला शिकून, नंतर ती
‘रामूअण्णा’ या
त्यांच्या भावाला शिकवली. सायकलचे भाग जोडून देण्याचे आणि दुरुस्तीचे काम
किर्लोस्कर करत असत. सायकलची मागणी वाढत गेल्यावर त्यांनी थेट कारखानदारांशी
व्यवहार सुरू केला. १८८८ मध्ये किर्लोस्कर बंधूंचे नाव सायकलचे विक्रेते म्हणून
महाराष्ट्राला माहीत झाले.
इतका मोठा इतिहास असूनही संशोधकांप्रमाणे सायकलला महत्त्व दिलं जात नाही. ‘फिरूनी नवी जन्मेन मी’ अशी सायकलची गरज उद्या नक्की भासेल आणि चित्र बदलेल.
- मी स्वत: सायकलचा चाहता
मी स्वत: सायकलचा चाहता आहे. सायकलने युथ होस्टेलसोबत गोवा परिक्रमा तसेच लडाख येथे सायकल परिक्रमा मी २०१४ साली पार पाडल्या. लडाखमधील सायकलसफरवर आधारित 'सफरछंद' हे पुस्तक ग्रंथाली प्रकाशनद्वारे २०१६ मध्ये प्रकाशित केले. २०१९ मध्ये ठाणे येथे पार पडलेल्या सायकल संमेलनात मान्यवरांना माझे पुस्तक भेट म्हणून देण्यात आले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. २०२१ मध्ये 'सफरछंद' अॅमेझॉन किंडलवर उपलब्ध केले. त्यातलाच एक भाग म्हणजे सायकलचा इतिहास.
लडाखमधील सायकलसफरवर आधारित माझ्या पुस्तकाविषयी
No comments: