गड- किल्ल्यांची अवस्था फार वाईट आहे. सरकारी दुर्लक्षपेक्षा नागरिकांचं वागणं हे त्याला जास्त जबाबदार आहे. या विषयावर लेख
Marathi Blog - मनात आलं म्हणून
गड - किल्ल्यांची दुरावस्था
ब्रह्मगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली धर्मशाळा |
मानलं तर तुमचं आमचं सर्वांचं मूळ घर. अगदी शाळेत असताना वाचलं होतं की अश्मयुगीन माणूस गुहेत राहत होता. अनेक प्राण्याप्रमाणे माणसाचेसुद्गधा दगडाचे घर होते. त्याची अवजारे ही दगडाचीच. चित्रकलेसाठी कॅनव्हासही गुहेच्या भिंतीवरच....अजिबात फ्रेम नसलेला. एकंदरीत दगडी भावनांच्या माणसाचं दगडांशी नातं फार पूर्वीचंच. दगडानंतर गडांशी संबंध आला आणि स्वतच्या सुरक्षितेसाठी या गडकिल्याचे स्थान माणसाला योग्य वाटू लागले.
दुर्गम वाटा, खळखळणारे झरे, सूर मारणारे धबधबे, गार-गार वारा, पक्ष्यांची सुरेल गाणी आणि फुला-फळांचा सुगंध असे अनोखे ‘नैसर्गिक प्रदर्शन’ आयोजित करणारे गड ,पृथ्वीवर एका कोपर्यात आजही शांतता आहे याची जाणीव देतात आणि अशा दगडांना हृदयस्पर्श करून त्यांचा अस्तित्त्वाला एका माणसाने अर्थ दिला...ते म्हणजे ‘छत्रपती शिवाजी महाराज’.
महामानवांनी केलेल्या संघर्षाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी दुर्लक्षितांना एकत्र केलेले आढळते. उदा. आंबेडकरांनी दलितांना, रामाने वानरांना; पण शिवाजी महाराजांनी तर वेगवेगळ्या जातीच्या माणसांना नव्हे तर दगडधोंड्यांनाही एकत्र केले आणि तेही दुर्गम पर्वतावर. नाहीतरी दगडाचा ‘उपयोग’ किंवा त्यातून होणारा ‘फायदा’ आजच्या स्वार्थी माणसाला तरी पटणार नाही. हो, पण त्याच दगडाला वेगवेगळे आकार देऊन, मंत्र म्हणून प्राणप्रतिष्ठापना करण्याचा चमत्कार आजही जोरात चालू आहे.
खरंतर गडांचं अस्तित्व फार पूर्वीपासूनचं; पण निसर्गाच्या, संरक्षणाच्या, विकासाच्या व राजकीयदृष्ट्या गडकिल्ल्यांचे महत्व शिवरायांनी जाणले आणि त्यांच्याच आधारे इथली संस्कृतीही राखली. नाहीतर दौलताबाद, औरंगाबाद, उस्मानाबादसारखी नावे आज अनेक ठिकाणांना असती. महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांमुळे ‘दुरून डोंगर साजरे’ ही म्हण निरर्थक ठरते. काही डोंगरानी तर खास महाराजांनी किल्ला बांधून माझा उद्धार करावा असा आकार घेतल्याचे भासते.
म्हणजे किल्ल्याला माची असावी, मधोमध बालेकिल्ला असावा, पुरेसे पाणी असावे, बांधकामासाठी मोठमोठे उत्तम व भरपूर दगड असावेत आणि तरीही तो तितकाच दुर्गम असावा असे जणू प्रत्येक किल्ल्यांचं स्वप्न! एकाहून एक सर्रास बांधकाम कोणत्याही गडावर पाहायला मिळतात. मोठेमोठे बुरूज काय, दुहेरी-तिहेरी तटबंदी काय, एकेक दरवाजा आणि एकेक पायरी अगदी आश्चर्य वाटायला लावणारी अशीच आहे. गडावरच्या भिंतीला असलेल्या ‘खिडक्या’, जंग्या, देवड्या, सदर, तळी, सभागृह, धान्यकोठार पाहताना आपल्याला त्या वेळचा काळ कल्पना करायला लावतो, नव्हे तर डोळ्यांसमोर उभा राहतो.
आजही केवळ दुर्गप्रेमीच किल्ल्यांची निगा राखताना दिसतात. त्यामुळे काही किल्ले आवर्जून पाहण्यासारखे आहेत, यात शंकाच नाही, इंग्रजांनी इथे बरीच भटकंती केली आणि त्यावर साहित्य प्रकाशित केले, त्यांनी किल्ल्यांची तोडमोड केली असेही वाचायला मिळते पण एकाही गुहेत किंवा किल्ल्यावर जी नावे लिहिलेली असतात त्यावरून खरंतर इथल्याच कुपुत्रांनी किळसवाणे हे चित्रप्रदर्शन किंवा नावांचे कोलाज बनवल्यासारखे वाटते. खडू, भगवा रंग, चुना घेऊन अगदी अशक्य जागेवरही नावे लिहिलेली दिसतात. (म्हणजे टर्पेंटाईनने ती पुसूनही टाकली जाऊ शकतात.) ज्याच्या नावाला किंवा ज्यांच्या प्रेमाला समाजात स्थान नाही अशांनी किल्ल्यांना घर समजून भिंती रंगवलेल्या दिसतात पण त्यांना स्वत:च्या घरचा रंग गेलेला अजिबात चालत नाही. या बहाद्दरांनी एकही गड सोडलेला नाही.
प्रतापगडावरील गोमुखी प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर समोरच झेंडा दिसतो तेथून वळून पाहिल्यास दिसणार्या दरवाजातून किल्ल्यात शिरण्याचा दोनदा प्रयत्न केला पण कचर्यातून चालण्याची सवय नसल्याने प्रयत्न यशस्वी झाला नाही. (अगदी दसरा सणाच्या आदल्या दिवशीही?) अफझलखानाची समाधी आता मशिदीत रूपांतरित झाली आहेच. शिवाय तिथे जाण्याची परवानगी नाही. प्रतापगडावर जाणार्यांमध्ये दुर्गप्रेमींची संख्या कमी तर भाविकांची गर्दी जास्त दिसते. प्रतापगडावरील शिवमंदिराच्या गाभारात एका दांपत्याला फोटो काढत असताना पाहून त्यांच्याशी मी वाद घातला होता. जवळपास सर्वच मंदिरात फोटो न काढण्याची सूचना असते. इथे पाटी नाही तर तुम्ही थांबवणारे कोण? असे गुजराथी मध्ये ऐकून घ्यावे लागले.
गडावर असणार्या सर्वच गोष्टीचे तपशीलवार फोटो काढून प्रकाशित केले तर प्रत्यक्ष भेटणार्याची शंका कमी होते असा माझा समज आहे (कारण इंटरनेटमुळे लोकांचा प्रत्यक्ष सहभाग कमी झालेला दिसतो.) गडावर आलेला अनुभव शब्दांत किंवा छायाचित्रांद्वारे दाखवण्यास काहीच हरकत नाही, पण तपशीलवार माहिती प्रकाशित केल्यास दिल्लीतील ‘अक्षरधाम’ मंदिरावर जसा दहशतवादी हल्ला झाला. तसाच एखाद्या किल्ल्याचा आधार घेऊन दहशतवादी कारवाई होऊ शकते. इत्तंभूत माहिती जर आपल्याकडे उपलब्ध आहे, तर नक्कीच ती या माथेफिरुंकडेही असेल. (सागरी किनारा दुर्लक्षित राहिला तेव्हा कसाब प्रकरणाचा अनुभव आहेच. जो भाग दुर्लक्षित राहतो तिथे आश्रय घेत कारवाया करण्याचा प्रयत्न जास्त होतो.) सध्या गडकिल्ल्याकडे सर्वांचे दुर्लक्ष होत आहे. किल्ल्याचा आधार घेऊन अनेक शत्रूंनी किती महिने, वर्षे, दशक, शतके झुंजवून ठेवली आहेत. ‘जंजिरा’हे त्याचं सर्वोत्तम उदाहरण !
कोरीगडावर चदून गेल्यानंतर तिथल्या सुरक्षा रक्षकाने आमची विचारपूस केली होती. एखाद्या सुरक्षा रक्षकाला प्रथमच एका गडावर पाहून ही सुधारणा कधी झाली असा प्रश्न मनात आला पण तो पायथ्याशी असलेल्या कंपनीचा सुरक्षारक्षक आहे हे कळाले. तेव्हा त्या कंपनीने गडाचा वापर करताना रक्कम मोजली की नाही? जर मोजली तर किती? आणि जर ती रक्कम जमा झाली तर त्याचा वापर पुन्हा गडासाठी केला जातो का? असा प्रश्न पडतो.
एकेकाळी युद्धाचं प्लॅनिंग होणार्या रायगडावर राहण्याची सोय झाल्याने हनिमूनचं प्लॅनिंग केल जातं हे ऐकायला मिळतं. याला ‘रोपवे’चा सदुपयोग (?) म्हणावे का? अष्टविनायक करून येणार्यांना पाली येथील बल्लाळेश्वर मंदिर माहित असतो पण बाजूलाच असलेल्या ‘सरसगड’ माहीत नाही, वसईचा किल्ला समुद्रसपाटीवरच असल्याने तिथे जोडपी दिसली होती. सिंहगडाच्या पायथ्याशी झालेल्या ‘रेव्ह पार्टी’मुळे सिंहगडची बदनामी झाली. ताडोबा अभयारण्याला भेट देण्याच्या हेतूने जाताना सिंदखेडला आलो, तेव्हा ‘जिजाबाईंचा वाडा कुठे? असं विचारल्यावर ‘बिअरबार’च्या पुढे उजवीकडे वळा असे उत्तर ऐकल्यावर शरम वाटली. राजगडासाठी मुख्य रस्ता सोडून गावात शिरण्याच्या आधी रस्त्याच्या उजवीकडील घरात किंवा होस्टेलसदृश घरात ‘व्हिस्की’ मिळते याची आम्ही खात्री केली होती. अशा घटनांमुळे प्रामाणिक व स्वच्छ हेतूने किवा काहीच हेतू नसतानाही ट्रेकिंगसाठी पुन:पुन्हा घराबाहेर पडल्यास सभोवतालचा समाज ट्रेकरला संशयास्पद प्रश्न विचारतो. या अनावश्यक भीतीनेही काही पावले ट्रेकिंगकडे वळतच नाहीत.
सज्जनगडावर इमारतीचे बांधकाम पाहिल्यास, गड नेमका कसा असतो हे विसरून जाऊ अशी भीती वाटते. गडाचा उपयोग कोण कसा करेल याची भीती वाटते. बर्याच गडांवर कोणी न कोणी साधू असतात. सध्या साधू-बाबांचा व्यवसाय तेजीत असल्याने अजून चारशे वर्षांनी गड ही मुख्यत्त्वे आजच्या साधू-बाबांशी संबंधित गोष्ट असल्याची पक्की खात्री होऊ शकते.
महाराष्ट्रातील अनेक किल्ले दुर्गम आहेत हे खरे; पण त्याच गडावर आपले पूर्वज ज्यांना आपल्याइतकेच हात-पाय होते, त्यांची शारीरिक आणि मानसिक क्षमता आपल्यापेक्षा नक्कीच जास्त होती. हे पायर्यांची उंची , संख्या, किल्ल्यांची उंची, दरवाजा, सदरची जागा, इतर बांधकाम यावरून कळते. पण सध्या मात्र आर्थिक क्षमता वाढवण्याच्या हेतूने शारीरिक व मानसिक ऊर्जा प्रत्येकात कमी होत आहे. इमारतीमधील घरांच्या किवा ऑफिसच्या छोट्या छोट्या पायर्याही चढू न शकणार्याकडून गडाच्या पायर्या चढून उंचावर पोहचल्यावर (टॅक्स फ्री) आनंद मिळवून घेण्याची अपेक्षा करणे कठीणच! शिवाय ज्यांना साधे रस्तेही बांधता येत नाहीत. त्यांच्याकडून किल्ल्यांच्या डागडुजीची अपेक्षा करणेही मूर्खपणाचे वाटते.
कारण या गडकिल्ल्यांचा ‘तसा’ उपयोग नाही म्हणजे लाल किल्ला, ताजमहाल, आग्र्याचा किल्ला, गोवळकोंडयाचा किल्ला पाहण्यासाठी जशी तिकिटे काढावी लागतात तशी तिकीटे काढावे लागत नाहीत. सिमेंटच्या रस्त्याचा निरोप घेऊन गडाच्या दिशेने जाणार्या रस्त्यावर कुठेही टोलनाका नाही. गड 'स्केअर फूट'च्या भावात विकून परप्रांतीयांना किंवा उद्योगधंद्यासाठी विकता येत नाहीत. शिवाय लोकवस्ती जास्त नसल्याने निवडणुकीच्या आदल्या महिन्यात कुणी फिरकत असेल असं वाटत नाही. कारण अपरिचित गडांच्या जवळपास राजकीय बॅनर दिसत नाहीत. तेवढेच उपकार केलेले दिसतात. नाहीतर गडावर निशाण लावण्याएवजी एखाद्या पक्षाचा झेंडा आणि नगरसेवक वा आमदाराच्या नावाची पाटी दिसू शकली असती कारण सर्वत्र, महाराजांच्या पुतळ्याखाली, ज्याने त्याचे अनावरण केले त्याने नाव हमखास दिसते.
ही केवळ थट्टा नाही पण वाचनातून व प्रत्यक्ष अनुभवातून आलेल्या रागाचे रूपांतरण आहे.
प्रतापगड दुसर्यांदा पाहून उतरल्यानंतर एका पर्यटकाचे टॅक्सी ड्रायव्हरशी भांडण सुरू होते व तो पर्यटक आम्हाला समजवू लागला की रायगडावर पाहण्यासारखं काहीही नाही, तरीही हा टॅक्सीड्रायव्हर आम्हाला तिथे घेऊन गेला,वगैरे वगैरे .प्रतापगड न पाहताच तो पुढच्या प्रवासाला निघून गेला. मी त्याच्या बाजूने विचार कातरू लागलो....
प्रतापगडावर अफजलखानवधानंतर झालेल्या युद्धाच्या नकाशा डोळ्यासमोर आणू लागलो. धावणार्या घोड्यावर आणि त्यावर बसलेल्या मावळ्याचे (लाकडी किवा इतर पदार्थांचे) पुतळे नकाशानुसारच्या जागेत प्रत्यक्ष दिसल्यास घडलेला इतिहास वर्तमानकाळात, आणि जपणूक केल्यास भविष्यातही किल्ल्याच्याच माची, बुरुजावरून दिसतील या मोहिमेत ज्या मावळ्यांनी प्रत्यक्ष्यात भाग घेतला त्यांची नावेही पुतळ्याशेजारीही लिहिल्यास त्याच्या वंशजानाही अभिमान वाटेल व समाधान मिळेल. केवळ चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकापलिकडे इतिहास माहिती नसणार्यांना ज्ञान मिळू शकते. इतिहासातील नक्की माहीत असलेल्या व आक्षेप नसलेल्या घटनांचा आधार घेत अनेक किल्ल्यांभोवतालचा परिसर या प्रकारे सजवू शकतो .
शिवाजी महाराजाचे अनेक पुतळे महाराष्ट्रभर आधीच आहेत. प्रेरणा घेणाच्या निमित्ताने बांधलेल्या पुतळ्यावर आतापर्यंत किती जणांनी प्रेरणा घेतली? इतकी प्रेरणा पुरेशी नाही तर इतरही अनेक महामानवांच्या पुतळ्यावर खर्च होतो आता जागा नाही म्हणून की काय? किंवा स्वतःला विकत घेण्यासाठी जमिनी मिळाव्यात म्हणून की काय आता समुद्रातही पुतळा असेल. त्यावर कितीतरी करोडांचा खर्च होईल पण गड मात्र त्यांच्यावर होणार्या खर्चासाठी वाट पाहत राहतील.
मनातल्या एकाही किल्ल्यावर रोवलेल्या झेंड्याला विशिष्ट रंग नाही. विविध रंगांना धर्मानी ब्रॅंड एम्बेसेडर केल्यामुळे इतर धर्माच्या लोकांना भेदभाव न मानणार्या निसर्गाचा आनंद लुटता येत नाही. शिवाय शिवाजी महाराजांच्या धर्मनिरपेक्ष स्वराज्याच्या संकल्पनेलाही बांधल्यासारखे वाटते. पण इतर धर्मीयांनाही झेंडा नसलेल्या जागेवर कब्जा करू नये.
विविध मंदिरात त्या त्या देवांचे वाहन, एखादा प्राणी किवा पक्षी दिसतो. उदा. गणपतीसमोर उंदीर, शंकरासमोर नदी, काही मंदिरात वाघ, कासव, गाय, मोर, सिंह, नाग, वगैरेवगैरे या गोष्टींमुळे त्या त्या प्राण्याबद्दल, पक्ष्याबद्दल आदर निर्माण होतो आणि काही प्रमाणात त्यांची हिंसाही कमी होते. भारतासारख्या देशात अशी मंदिरे पाहिल्यानंतर शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर कुत्र्याचा पुतळा असणे, मनाला खटकते. कारण मी परदेशी पाहुणा म्हणून भारत पाहिल्यानंतर शेवटी रायगडच्या वर्णनात शिवाजी महाराज आणि कुत्रा याचा संबंध असल्याचा अंदाज परदेशी लेखक म्हणून लिहिताना चूक करू शकतो. त्यामुळे चुकीचा इतिहास खोडणे गरजेचे आहे.
असे सर्व असले तरी विचारांना कृतीची जोड मिळणे स्वप्नवत आहे. शारीरिक, आर्थिक, सामाजिक आणि अर्थात राजकीय अडथळे पार करेपर्यंत स्वत:ची मानसिक तयारी कितपत उरेल आणि कितीजणांची मानसिक तयारी होईल याचा अंदाज बांधणे जरा कठीणच आहे.
पण हे गडराज्य सांभाळावे ही श्रीशिवाजी महाराजांची इच्छा !
अजून काही किल्ल्यांविषयी :
Marathi Blog - मनात आलं म्हणून,
मराठी पुस्तक - पहिले पाऊल , सफरछंद
Online Books PDF on esahity.com : मुल्हेर ते साल्हेर, कधी सरस कधी कळस, गोरखगड ते सिद्धगड, अलंगाशी संग मदनाशी गाठ
लोकसत्ता 'ट्रेक इट' मध्ये भैरवगड, कलावंतीण , वैराटगड, आजोबागड आणि इतर लेख प्रकाशित.
गड -किल्ल्यांची दुरावस्था
Reviewed by Marathi Blog by Pankaj Ghare
on
May 25, 2020
Rating:
Good & informative article
ReplyDeleteधन्यवाद. काहीतरी परिणाम व्हावा हीच इच्छा.
Delete