गड-किल्ले हे मराठी माणसाचे नि निसर्गाचे मित्र आहेत. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात एखाद्या किल्ल्यावर Trek करून आम्ही मैत्रिदिन साजरा केला होता.
Marathi Blog - मनात आलं म्हणून
किल्ले सरसगड
खरंतर मित्रांशिवाय एकही दिवस जात नाही; पण या दिवशी मात्र आवर्जून भेट दिली जाते. त्यातही मित्रांचे प्रकार अनेक. काहींचे बालमित्र , वर्गमित्र , कॉलेजचे मित्र, आता तर फेसबुक फ्रेंड्स, प्रवासातले मित्र आणि चक्क व्यावसायिक मित्र ! काहीजण मात्र निराळे. ते म्हणजे सर्पमित्र, पक्षिमित्र , निसर्गमित्र , दुर्गमित्र, विश्वमित्र !!!... आम्हीदेखील त्यातलेच. त्यामुळे मैत्रीदिनी गडावर जायचे ठरले.
सरसगड डोंगर |
पेठचा किल्ला (कोथळीगड) पाहण्यासाठी कर्जत स्थानकावर बराच वेळ ‘आंबिवली’ जाणाऱ्या बसची वाट पाहून कंटाळा आला. पण पाली जाणारी बस बराच वेळ उभी असलेली दिसली. म्हणून ऐनवेळी बेत बदलून ‘सरसगड’ येथे जायचे ठरले आणि तेंव्हा कुठे बस सुरू झाली.
मित्रांचे मित्र, दुर्गमित्र वाटेत माणिकगडासाठी उतरले. नाहीतर दोनाचे चार (ट्रेकर्स) झाले असते. खड्डेदार रस्त्यांमधून बस जमेल त्या वेगाने धावू लागली. बनवलेल्या मुख्य रस्त्यापेक्षा दोन्ही बाजूला असलेले नैसर्गिक हिरवेगार मैदान बरेच सपाट होते. हिरव्या रंगाच्या विविध छटांमध्ये रंगीत गायी आणि काळ्या म्हशी दिसू लागला. दोन-अडीच तासांनी बल्लाळेश्वर मंदिराजवळ बस थांबली. सरसगडाची सुरुवातच मुळात हास्यरसाने झाली, जेंव्हा गावातल्या युवकांना “गडाकडे जाणारी वाट कोणती ?.....सरसगडाकडे ?” असे विचारल्यावर त्यांना काहीही कल्पना नाही असे उत्तर मिळाले.
मित्रांचे मित्र, दुर्गमित्र वाटेत माणिकगडासाठी उतरले. नाहीतर दोनाचे चार (ट्रेकर्स) झाले असते. खड्डेदार रस्त्यांमधून बस जमेल त्या वेगाने धावू लागली. बनवलेल्या मुख्य रस्त्यापेक्षा दोन्ही बाजूला असलेले नैसर्गिक हिरवेगार मैदान बरेच सपाट होते. हिरव्या रंगाच्या विविध छटांमध्ये रंगीत गायी आणि काळ्या म्हशी दिसू लागला. दोन-अडीच तासांनी बल्लाळेश्वर मंदिराजवळ बस थांबली. सरसगडाची सुरुवातच मुळात हास्यरसाने झाली, जेंव्हा गावातल्या युवकांना “गडाकडे जाणारी वाट कोणती ?.....सरसगडाकडे ?” असे विचारल्यावर त्यांना काहीही कल्पना नाही असे उत्तर मिळाले.
दगडात खोदलेल्या पायर्या : सरसगड |
बल्लाळेश्वर मंदिराच्या बाजूने डांबरी रस्त्याने चालू लागलो. पुढे तो एका थोड्या मुख्य रस्त्याला मिळतो आणि सरसगडाचा नकाशा आणि माहिती वाचायला मिळते. नकाशाशेजारील लाल रस्त्यावरून खरा Trek सुरू झाला. वाटेत अनेक उपवाटा होत्याच, पण तीव्र चढाव असलेली वाट निवडत होतो. पावसाळ्यातली वाट थोडी निसरडी होती. दमछाक होउन थोड्या वेळातच ‘कारुण्य’ दिसू लागले. शहरातल्या आळसाचा विरह झाला.
अगदी थोड्या वेळातच उंच झाडे आणि झाडी संपली आणि बारीक गवत असलेले तीव्र उतराचेच मैदान सुरू झाले आणि सरसगडाच्या लगतच्या दोन बुरूजांमधील्या चिंचोळ्या जागेतील पायऱ्या दिसू लागल्या. आजूबाजूची सृष्टी शृंगाररसात चिंब भिजलेली! जिथे माणसाने पोहोचणे कठीण ती जागा स्वच्छ हिरवी... ढगांची सावली पडल्याने काही ठिकाणी हिरवा रंग गडद झालेला... पायवाटेने जाताना आजूबाजूला व्यवस्थित जागा असली तरी गवतावर पाय ठेवून खराब करणे चुकीचे वाटले. आपल्या मातीला कितीतरी घट्ट धरून रहावे हे माणसाने गवताकडून शिकावे. पुन्हा एकदा बिलगणाऱ्या झाडीतून वाट काढल्यानंतर माळरानावर आलो. वीस ते पंचवीस जणांचा गट या गडाला ‘सुधागड’ समजून इथपर्यंत आला होता. सुधागड इथून १० किमी अंतरावर आहे.
रांगता शिरता येईल अशी गुहा : सरसगड |
सोपी चढण चढल्यानंतर वाटेत पुनःपुन्हा आराम करण्यासाठी ऐसपैस जागा मिळते आणि सभोवतालचे निसर्गसौंदर्य अनुभवत आपण पुढचे आव्हान स्वीकारण्यास तयार होतो. एका मोठ्या शिळेचा आधार घेत त्याच शिळेत खोदलेल्या पायऱ्यांच्या आकाराचे ठसे, आपले चढणे खूपच सोपे करतात. जसे उंच जावे तशी गवताची उंचीसुद्धा वाढलेली दिसते. आपले बूट पूर्ण झाकले जातील अशा रुतलेल्या पायवाटेतून चालताना अधूनमधून दगडांचा आधार घ्यावाच लागतो.
मध्येच एका सपाट जागेवर उभे राहून इथपर्यंतची पूर्ण पायवाट आणि कुठे काय चालले आहे ते अजिबात त्रास न घेता पाहता येते. हा किल्ला मुख्यतः टेहळणीसाठी वापरला जातो हे लक्षात आले. डाव्या बाजूच्या चौकोनी भुयारात कोपर जमिनीवर टेकवत रांगत रांगत शिरण्याचा प्रयत्न केला. टोर्चने अंधार सोडून काहीही दाखवले नाही. शिवाय श्वास घेतानाही त्रास होत होता. तेथूनच उलटा रांगत परत बाहेर येवून कातळात तयार केलेल्या पायऱ्यांपाशी उभा राहिलो.
दुरून दोन बुरुजांमध्ये दिसलेला अरुंद भाग वर जाताना अधिकच अरुंद होत जातो. या अरुंद भागाच्या अर्ध्या भागात असमान रुंदीच्या पायऱ्या आहेत तर अर्ध्या भागातून खाली झरा वाहत होता. एक पायरी चढताना पाऊल दुसऱ्या पायाच्या गुडघ्याजवळ, कधी वर तर कधी खाली ठेवावे लागते. असे करताना पूर्णपणे पुढे वाकून सावकाश चालावे. काही पायऱ्या तुटलेल्या तर काही पायऱ्या ओबडधोबड आहेत. पाऊस पडत नसला तरी पायऱ्यांवर शेवाळ होते. पायऱ्याही गुळगुळीत होत्या. आधार घेण्यासाठी नकळतच वापरला जाणारा डाव्या हाताचा डोंगर ओलसर त्याची फारशी मदत चढताना झाली नाही (पण किमान त्या बाजूला आपण पडणार नाही याची खात्री देतो). पायऱ्यांच्या उजवीकडचा डोंगर आणि त्याला पाहताना आपसूकच मागे आणि खाली दिसणारी दरी या ठिकाणी ‘रौद्र’ रूप म्हणजे काय याचा अनुभव देते.
पायऱ्या संपता संपता उजवीकडे दरड कोसळणे थांबवण्यासाठी बांधकाम केलेले दिसते, जे फार गरजेचे आहे. कारण बुरुज तसेच डोंगरामधील चिरा, चीरांमधील गवत, वाहणाऱ्या झऱ्याचे पाणी यामुळे कधी मोठे दगड निसटतील हे सांगता येत नाही शिवाय डोंगराच्या दोन सोंडांमधील जागा वगळता संपूर्ण वाटेत या दगडांना अडवेल असे झाड किंवा मोठा दगड नाही. या उलट तीव्र उतार वेगही वाढवेल. गडाची काळजी तर आहेच पण पायथ्याशी असलेली घरे आणि मंदीर यांनाही धोका उदभवू शकतो अशी भीती वाटते. पायऱ्या चढताना वाटेत थांबलो तर मागून येणाऱ्यांना आणि वरून खाली येणाऱ्यांना त्रास होतो. त्यामुळे एकदा चढले की चढतच राहावे लागते. माकडाप्रमाणे सर्वांचे चढणे संपले आणि भटकणाऱ्यांची दिंडी डावीकडे असणाऱ्या दिंडी दरवाजापाशी पांगते.
सरसगड प्रवेशद्वार |
दिंडी दरवाज्याची भिंत डाव्या बुरुजाच्या मागेच असल्याने जोरदार हवेचा मारा सरळ दरवाजावर न आदळता तो बुरुजावर आदळतो आणि दरवाजाचे रक्षण होते. शिवाय सर्व पायऱ्या चढून आल्याशिवाय दरवाजा दिसत नाही. दरवाजातून आत शिरताच समोर पहारेकऱ्यांसाठी देवड्या दिसतात. आपणही इथे मुक्काम करून काही काळ पहारेकरी म्हणून मिरवू शकतो. पण इथेही आतमध्ये काहींनी स्वतःची नावे लिहून बीभत्स मैत्री दाखवलेली दिसते. मैत्रीदिनी खरंतर मित्रांच्या हातांवर, जमेल तिथे नाव लिहिल्याचे पहिले असेलच. पण ‘दुर्ग’ या मित्राचे रूप खराब करणे योग्य नाही.
उजवीकडे काही पायऱ्या चढून आल्यास आपणच चढलेला मार्ग फारच ‘अदभूत’ दिसतो. गडाची तटबंदीही दिसते. कडेकडेने वळसा घेतल्यानंतर तटालाच जोडून पायऱ्या आहेत, जेथून बालेकिल्ल्याचा फक्त सर्वात अरुंद भाग दिसतो. अगदी काही अंतरावर असलेल्या टाक्यातील पाणी खराब आहे. त्याला जोडूनच एक छोटीशी गुहा आहे. आणखी काही अंतरावर असलेल्या पाण्याच्या टाक्यातील पाणी कमालीचे स्वच्छ आणि गोड आहे. आपण जे पाणी घरी पितो त्यापेक्षा कितीतरी पटीने मधुर !
गोड पाण्याचे गोडवे गात पुढे चालू लागतो. वाटेत एका छोट्या गुहेच्या वरच्या कडेमुळे अनावधानाने डोक्याला टक्कर लागू शकते. अगदी तेथेच चालण्यासाठी जागा फारच अरुंद असल्याने डाव्या बाजूला दरीत पडण्याचा धोका आहे. पुन्हा एक चढण चढताना दगडांच्या खाच्यांमध्ये आधी हातांची बोटे अडकवत शरीर वर आणून लगेचच तळहातावर जोर देऊन कसरत करत यावे लागते. पुन्हा उजवीकडे वळसा घालून शेवटचा टप्पा, झेंडा असलेला बुरुज दिसतो. पण तिथपर्यंत पोहचण्यासाठी सुरवातीला कौशल्य पणाला लागते. संपूर्ण वाटेत सोपी, मध्यम आणि कठीण चढण टप्या टप्याने अनुभवता येते. त्यामुळे नव्या ट्रेकर्ससाठी हा गड उत्तम !
बुरूज आणि तटबंदी |
सरसगडच्या पायर्या |
शेवटची चढण चढल्यानंतर डाव्या बाजूला असलेल्या टाक्यात खूपच कमी पाणी असून त्याच्या पलीकडे काही पायऱ्या आहेत. उजव्या बाजूला झेंड्याशेजारील जागेत बसून अगदी सुरवातीपासूनच दिसणारे तीन डोंगर, सुधागड, लांबलचक अंबा नदी असा विस्तीर्ण परिसर दिसतो. इथून पुढे सपाट जागेवरच्या वाटाच आपल्याला पूर्ण गड फिरवतात. एका उध्वस्त वास्तूनंतर थोडे उतरून केदारेश्वराचे मंदीर दिसते. मंदिराशेजारीच असलेला तलाव पूर्णपणे हिरवा आहे. पाणी पिणे सोडाच तिकडे पहावलेही जात नाही. मंदिरातच काही दगडी शिल्पे आहेत.
पिण्यायोग्य पाण्याचे टाके: सरसगड |
माथ्यावर पोहोचेपर्यंत आणि पोहोचल्यावर वेगवगळ्या ठिकाणाहून आलेले भटके एकत्र झाले. गडावरच्या टाक्यातले पाणी स्वतः पिऊन दाखवल्यानंतर आणि थोडी चव चाखल्यानंतर ते पिण्यायोग्य आहे असे मान्य केले. Trekkingमुळे माणसे जोडली जाऊन ते मित्र होतात हे खरे. गड उतरताना समोर दिसणाऱ्या भयानक उतारामुळे आपोआपच सर्वजण काळजी घेत उतरतात. कठीण टप्पे, पाण्याच्या टाक्या, दिंडी दरवाजा आणि घसरून पडण्याची भीती दाखवणाऱ्या पायऱ्या ‘वीर’तेने पार करून गवताळ मैदानावर आल्यावर हायसे वाटते. गडावर जास्त झाडे नाहीत त्यामुळे पक्ष्यांचा अजिबात आवाज नाही.
एका Trekच्या रसाळ अनुभवानंतर दमलेले मन शांत होते.
अजून काही किल्ल्यांविषयी :
Marathi Blog - मनात आलं म्हणून,
मराठी पुस्तक - पहिले पाऊल , सफरछंद
Online Books PDF on esahity.com : मुल्हेर ते साल्हेर, कधी सरस कधी कळस, गोरखगड ते सिद्धगड, अलंगाशी संग मदनाशी गाठ
लोकसत्ता 'ट्रेक इट' मध्ये भैरवगड, कलावंतीण , वैराटगड, आजोबागड आणि इतर लेख प्रकाशित.
सरसगड : Trek अनुभव
Reviewed by Marathi Blog by Pankaj Ghare
on
May 17, 2020
Rating:
No comments: