Youth Hostel Association oh India (YHAI) युथ हॉस्टेल सोबत लडाख येथे सायकल प्रवास करताना वाटेत चिक्तन खर हा किल्ला पाहायला मिळाला तो अनुभव :
Marathi Blog - मनात आलं म्हणून
चिक्तन खर, लडाख
चिक्तन किल्ला , चिक्तन खर, लडाख |
बेत जमलाच नाही म्हणत पुन्हा लेहचा वाडा पाहीन असं ठरवून मुख्य सायकलिंग प्रवासाला सुरुवात केली. लेह ते लामायुरू बसने, नंतर सायकलने लामायुरू ते स्कुरबुचन (४५ किमी), स्कुरबुचन ते साकार-२ ( ३८ किमी) अशी दिवसभर सायकल चालवली. वाटेत अनेक डोंगर येणार का ट्रेकला असं खुणावत होते. त्यांची मस्करी कळत होती. एकाही डोंगराला एकही वाट नाही. त्यांना पाहताना नजर सुद्धा घसरते. कधी काळ्या कधी लाल मातीच्या ढिगाऱ्याचे फक्त प्रदर्शन आणि दुरून दर्शन. काही नदीकिनाऱ्यावर तर काही एका मागोमाग लपून खुणावणारे. मध्येच हिरव्या, लाल, जांभळ्या रंगाच्या मातीचे तिरकस तिरकस उतार पाहून मी माझा कॅमेरा खराब झाला आहे का ते तपासले. नंतर मी माझा गॉगल तपासून पुसून पहिला. वाटेत अतिअपेक्षा म्हणजे डोळ्यांचा डॉक्टरही नव्हता. हळूहळू इथल्या रंगीत डोंगरांची खात्री होऊ लागली.
साकार-२ पासून हेनिसकोटला जाण्यासाठी सायकलने जाण्यास सुरुवात केली. आधी सिंधू नदीच्या वळणाला समांतर प्रवाहाच्या दिशेने प्रवास केल्यानंतर आता विरुद्ध दिशेने प्रवास सुरू होता. उजवीकडे नदीकिनारी असलेली झाडं आणि डावीकडे गावातली रस्त्यावरची झाडं असल्याने सोबत सावलीसुद्धा नव्हती. वाटेत फोटो घेण्यासाठी निसर्ग स्वतः थांबवत होता. उंचावर घरे दिसणं लडाखमध्ये नवीन नव्हतं. पण यावेळी निघताना रस्त्याशेजारी किल्ला दिसला तर ‘होके आ सकते हो’ असं सांगण्यात आलं होतं. आपला धर्म, गुणधर्म, पिंड, जात Trekking असल्याने हा ‘होके आओ’ म्हणजे इतरांसाठी वेळ घालवणारा होता.
उंचावर असलेल्या एका पडक्या वास्तूचे छायाचित्र घेताना मित्र दिसले. स्वच्छ निरभ्र आकाशात भिंतीची तुटलेली किनार किल्ल्याचे वेगळेपण दाखवत होती. स्वच्छ आणि सपाट वेगळी भिंत आणि छोट्या खिडक्या हे थोडंसं काल्पनिक भय-चित्रपटातल्या हवेलीसारखं दृश्य प्रत्यक्षात पाहत होतो. मी सुद्धा फोटो घेऊन काही वेळाने पायथ्याशी आलो.
चिक्तन खर किल्ला |
शेवटी गेलो आपल्या जातीवर !! इथल्या माणसांचे स्वभाव आणि चिरीमिरी घेणाऱ्या पोलिसांऐवजी लष्कराचे जवान यांच्यामुळे इथे चोरी होण्याचा संबंध नव्हता. त्यामुळे सायकल बाजूला लावून चढण्यास सुरुवात केली.Helmet, knee-cap, elbow-guards आणि चमकणारं ( Reflective) जाकीट अंगावरच होतं.
वीस-पंचवीस डागडुजी केलेल्या पायऱ्या चढल्यानंतर दगड-मातीची पायवाट सुरू झाली. सगळीकडे पसरलेले छोटे-छोटे रंगीत दगड हे वास्तुचेच भाग असावेत. लगोरी खेळताना एकावर एकाच दगड ठेवून थर रचतात तसं इथे अनेक दगड एकमेकांवर रचून उंचच उंच भिंती दिसत होत्या.
भिंतीचा रंग समोरच्या डोंगराच्या रंगाशी काहीसा असा साम्य असलेला की किल्ल्यापलीकडे डोंगर दिसेल अशा दिशेने उभे राहून पाहिल्यास किल्ल्याची आकृती शोधावी लागते.
प्रत्यक्षात किती उंच भिंती होत्या हे आता सांगणे कठीण! पण लडाखमधल्या वादळात अशी थर रचून वास्तु बांधणे आणि ती टिकणे हेच आश्चर्य आहे. काही भिंतींना दिलेला मातीचा मुलामा टिकून आहे.
एखादा जरी दगड ओढण्याचा प्रयत्न केला तरी भिंत कोसळेल अशी भीती तेंव्हा कशी वाटली नाही ?
लडाखच्या इतर डोंगरांप्रमाणे किल्ल्याच्या डोंगरावरही एकही झाड किंवा रोपटेही नाही. त्यामुळे मागे वळून पाहिल्यास पूर्ण रस्ता व्यवस्थित दिसतो. गावात मात्र नदी आणि वृक्षांचे नैसर्गिक सुशोभीकरण !!!
दुरून एकसंध दिसणाऱ्या वास्तूचे खरंतर तीन भाग आहेत आणि ते टेकडीच्या तीन वेगवेगळ्या उंच भागावर तीन स्वतंत्र वास्तु आहेत. सर्वात उंचावरच्या अगदी कमी क्षेत्राच्या वास्तूमध्ये आत शिरणे जमले नाही. इथून उतरून त्याखालोखाल दुसऱ्या वास्तूच्या काहीच भिंती टिकलेल्या आहेत. त्याखालोखाल असलेल्या वास्तूत शिरणे काहीसे कठीण आहे.
चिक्तन खर किल्ला अवशेष |
सध्या असलेल्या लाकडी शिडीशिवाय पर्याय नाही. या इमारतीला मात्र अनेक दालने आहेत. चढताना त्या जाणवत नाहीत. पण वरून मात्र अनेक ‘रूम्स’ दिसतात.
सर्वत्र घसरणारे दगडच असल्याने उतरता उतरता एक Trek झाल्याचे समाधानही वाटले. इथे येण्यापूर्वी कोणीही किल्ल्याचे नाव सांगितले नव्हते, विचारलेही नव्हते, किल्ला चढून येणाऱ्या एका स्थानिकला नाव विचारले आणि तेंव्हा कुठे नाव कळले ‘चिक्तन खर’. अचानक परिचय झालेल्या किल्ल्याची Google वर बरीच माहिती मिळाली.
१४-१५ व्या शतकात कारगिल हे नाव पुढे आले. सध्याच्या कारगिल जिल्ह्यात बल्टीस्तानचा काही भाग (पूर्वीचा प्युरिक) होता. ‘ति सुंग गंगा सुग’ हे चिक्तनचे मूळचे रहिवासी. ‘ चिक्तन खर’ आधी ‘चिक्तन राझी खर’ नावाने ओळखला जात असे. राजा खोखोर बाघ्राम (१५३५-१५५०) याचा द्वितीय पुत्र म्हणजे राजा त्सेरिंग मलिक याने बाल्टीस्तानचा तेंव्हाचा प्रसिद्ध स्थापत्यकार ‘शिंगखान स्तंदन’ कडून खारदून या लहानशा खेड्यातील टेकडीवर बांधून घेतला. ही इमारत इतकी सुंदर होती की चिक्तनच्या राजा मलिकने त्याचे दोन्ही हात कापायचे ठरवले. जेणेकरून असा किल्ला पुन्हा कुठे बांधता येऊ नये. स्तंदनच्या पत्नीच्या प्रसंगावधानामुळे राजा हरला.
फ्र्यान्के याने १९०९ मध्ये राजवाड्याला भेट दिली आणि छायाचित्र काढले तेंव्हा तो अखंड होता. वाड्यात पाणी येण्यासाठी भुयारी कालव्याची रचना केली होती. सध्या चहूबाजूचा लडाखी हिमालय पाहण्यासाठी किंवा देखरेखीसाठी उंच टेकडी आणि किल्ल्याचा भाग वापरता येऊ शकतो.
अधिक वाचा
Marathi Blog - मनात आलं म्हणून,
मराठी पुस्तक - पहिले पाऊल , सफरछंद
Online Books PDF on esahity.com : मुल्हेर ते साल्हेर, कधी सरस कधी कळस, गोरखगड ते सिद्धगड, अलंगाशी संग मदनाशी गाठ
लोकसत्ता 'ट्रेक इट' मध्ये भैरवगड, कलावंतीण , वैराटगड, आजोबागड आणि इतर लेख प्रकाशित.
लडाख येथे YHAI सोबत Trek अनुभव
Reviewed by Marathi Blog by Pankaj Ghare
on
May 18, 2020
Rating:
No comments: