मुख्य प्रवास लडाखच्या निमित्ताने जम्मूमध्ये एक दिवस राहून बाहू किल्ला, अमर महल, मुबारक मंडी कॉम्प्लेक्स, दोग्रा आर्ट गॅलरी बघायला मिळाली.
Marathi Blog - मनात आलं म्हणून
जम्मूमधील प्रवास अनुभव
अमर महल पॅलेस , जम्मू |
‘युथ होस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया’ (YHAI) सोबत ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात सायकलिंगच्या निमित्ताने लडाखला जायचं होतं. मुंबईहून विमानाने लेहला जाणारी विमान तिकीट आधीच काढून ठेवली. त्या तुलनेत मुंबई ते जम्मू आणि जम्मू ते लेह असा एकूण विमानप्रवास खर्च कमी होता. (खरंतर जम्मू ते लेह हा प्रवास बसने एका दिवसात होईल असा माझा निर्णयही चुकणार असता.)त्यामुळे जम्मू मध्ये अर्धा दिवस वेळ मिळणार हे नक्की होतं. जम्मूत पाहण्यासारखं काय आहे याची माहिती मिळवून ठेवली होती. वाह ! विमानतळाबाहेर बरेच जण माझी वाट बघत होते. मुंबईत ते खाकी गणवेशात असतात. त्यामुळे मी चटकन ओळखले नाही. “जाणा कहा है” हा प्रश्न मला बऱ्याच जणांनी विचारला तेंव्हा मी एक यादी सांगितली. मला खूप लांब जायचे आहे असे चेहऱ्यावर भाव आणत त्यांनी एक रक्कम सांगितली जी मला माहित असलेल्या किमतीच्या सहा पट होती. सर्वजण घोळका करून मला वेड्यात काढू लागले आणि मी वेढा फोडून बाहेर आलो. विमानतळापासून कोणत्याही ठिकाणाचे भाडे जास्त असते त्यामुळे तिथल्या रिक्षा सोडून दिल्या. थोड्या अंतरावर काही पोलिसांनी एका रिक्षाला धाक दाखवून मला पटेल अशा किमतीत जम्मू मधल्या जागा दाखविण्यास सांगितलं.
बाहू किल्ला (जम्मू )
‘बाहू किल्ला’ दाखवण्यासाठी रिक्षा निघाली. ‘ तेरी गलिया , गलिया तेरी गलिया ‘ हे गाणं किल्ल्याजवळ पोहोचेपर्यंत तीन-चार वेळा लावलं. पंधरा मिनिटात बघून होईल म्हणाला आणि मी दहा रुपये प्रवेश फी देवून ‘बाग-ए-बाहू’ या बागेत शिरलो.
इथे संपूर्ण बागेत हिरवळ....जाळीदार पसरलेल्या पायवाटेच्या बाजूला फुलझाडे....अनेक अनोळखी पण तरीही....कॅमेराला बाहेर काढणारी फुलं.... बागेच्या किनाऱ्याशी लांबलचक, स्वतःची खोली दाखवणारी तावी नदी....किनाऱ्यापलीकडे मुबारक मंडी राजवाडा.......नदीच्या पात्रात कचराच नसल्याचे मुंबईकर आश्चर्य......नदीपलीकडे जुने (नव्यासाठी नवे) जम्मू शहर......शहराला जोडणारे तीन पूल.....पुलावरची विरळ शांत वाहतूक.....बागेत कारंजांभोवती खेळणारी सर्व वयाची लहान मुलं....वेगवेगळ्या आकाराच्या तलावात सुस्थितीत असलेल्या सर्व कारंजांचे तुषार....त्यापुढे विरुद्ध दिशेला चढणारी आणि पुन्हा उलट्या दिशेने चढणारी पायवाट....पुन्हा कारंजांचे तुषार.....पुन्हा अशाच एका टप्प्यावर चक्क बोटिंगसाठी तलाव....आणि एका उतारावर करड्या रंगाची छोटी छोटी शिल्पे....पुन्हा वळसा घेऊन अतिशय अतिशय अतिशय प्रसन्न चेहऱ्याची अनेक शिल्पे......संपूर्ण बाग पाहिल्यावर आपल्या मनातले भाव एखाद्या शिल्पावर पाहताना वेगळाच आनंद होतो.
बाग -ए - बाहू किल्ल्यातील शिल्प |
बागेपलीकडे किल्ल्यावर जाण्याआधी बूट, कॅमेरा आणि सामान एका खोलीत ठेवावे लागले. आणि चार वाजता सर्वांना आत जायला मिळाले.
आत शिरल्यावर कळले की फक्त मंदिरात जाण्यास परवानगी आहे. अगदी विनंती करूनही कुठेही जायला मिळाले नाही. पण तरीही google वरून मिळालेली माहिती काही प्रमाणात लांबून पहिली; ती आणि इतिहास पुढीलप्रमाणे:
बाहू किल्ल्याची तटबंदी |
सुमारे ३००० वर्षांपूर्वी सूर्यवंशी राजघराण्याचा शक्तिशाली राजा अग्निगर्भ दुसरा यांची मुलं जंबूलोचन आणि बाहूलोचन. अग्निगर्भच्या अठरा मुलांपैकी ज्येष्ठ मुलगा बाहू याला जम्मू शहर आणि बाहू किल्ल्याचे श्रेय दिले जाते. जंबूलोचनच्या नावामुळे आधी शहराचे नाव ‘जंबूपुरा’ असे होते. नंतर अपभ्रंश होऊन जम्मू झाले. तर राजा बाहुलोचनचा भाऊ राजा जंबूलोचन एकदा शिकारीसाठी गेला असताना तावी नदीकिनारी वाघ आणि बकरी बाजूबाजूला पाणी पिताना दिसले. या घटनेला ईश्वरी मार्गदर्शन मानून त्याने इथे किल्ला आणि नवी राजधानी बनवावी असे ठरवले. सन १५८५ मध्ये राजा कपूर देव याचा नातू अवतार देव याने प्राचीन किल्ल्याचे काम पुन्हा केले. कालानुरूप किल्ल्याची डागडुजी आणि पुनर्बांधणी होत गेली. सध्या असलेला किल्ला हा १९ व्या शतकात महाराजा गुलाब सिंगने पुन्हा बांधला व महाराजा रणबीर सिंगने सौंदर्य वाढवले. त्यांनी प्रथम संरक्षण देवतेची म्हणजे सध्याची कालीमातेची प्रतिमा स्थापन केली जी अयोध्यावरून आणली होती. कालीमाता हे वैष्णवदेवीचेच दुसरे रूप मानले जाते. सध्याचे मंदीर हे गुलाब सिंगच्या राज्याभिषेकानंतर १८२२ मध्ये बांधले गेले.
बाहू किल्ला बुरूज आणि तटबंदी |
किल्ल्याच्या भिंती वाळूचा खडक आणि चुना वापरून बांधलेल्या आहेत. किल्ल्याला जाड भिंतीचे आठ अष्टकोनी बुरूज आहेत. बुरुजाला खिडक्या आणि जंग्या असून भिंतीला फक्त जंग्या आहेत. बुरूजामध्ये रक्षकांसाठी पुरेशी जागा आहे. हत्तींना प्रवेश करता यावा म्हणून प्रवेशद्वार मोठे ठेवले गेले. द्वाराच्या डाव्या बाजूला मोठे खोल टाके असून आतील भिंतींवर माकडे खेळत असतात. उजव्या बाजूचे तोफांचे घाव झेलू शकेल अशा जाड भिंतीचे पिरामिडच्या आकाराचे दारूचे कोठार आहे. येथील भुयारी खोली त्या काळी तुरुंग म्हणून वापरली जात असे. संकटकाळी बाहेर जाण्यासाठी येथून छुपा दरवाजाही आहे. मंदिराच्या उजवीकडे असलेली दालने तेंव्हा सभागृह आणि किल्लेदाराचे किल्लेदाराचे कार्यालय म्हणून वापरले जात असे. असे असले तरी ते तितकेसे सांभाळले गेले नाही. तेंव्हा आत भव्य तबेलाही होता.
किल्ल्याला भेट देणारे कमी आणि मंदिरात येणारे भाविकच जास्त आहे, त्यामुळे मला प्रतापगडाची आठवण आली होती. किल्ल्यापेक्षा बाग पाहिल्याचे समाधान जास्त होते. आणि तितक्याच असमाधानाने तो रिक्षावाला मी इतका वेळ टाईमपास का केला म्हणून रागाने बोलू लागला. आता हा कधी आत गेलाच नसावा, याची रिक्षा कुंपणापर्यंत असं म्हणत त्याला अमर महलपर्यंत नेण्यास सांगितले; पण कृष्ण-जन्माष्टमीमुळे संग्रहालय पाहण्यास बंद होते. तिथून परतताना मुबारक मंडी राजवाडा येथील डोग्रा वास्तू-संग्रहालयही बंद होते. रिक्षावाल्याचा बराच वेळ वाचला. त्याला आता नवा भाडेकरू मिळणार होता. अतिशय वेगाने तो गल्ली-बोळातून रिक्षा नेवू लागला. म्हणूनच पुन्हा आणि पुनःपुन्हा ‘ गलिया , गलिया तेरी गलिया’.
आणि पुढच्या दिवशी विमानाने जम्मूला आलो. मी सरडा नसलो तरी प्रवासात माझा रंग कमालीचा काळा होतो, हा इतिहास, वर्तमान आणि भविष्य आहे. पण तरीही विमानतळावर याआधी एकदाच येऊनही सर्व रिक्षावाल्यांनी अकरा दिवसांनी मला बरोबर ओळखले. मी त्यांना दिलेली वेगवेगळी उत्तरेही त्यांच्या लक्षात होती. पण वातावरण बदलामुळे त्या उरलेल्या अर्ध्या दिवशी मी प्रवास करणे टाळले आणि दुसऱ्या दिवशी स्थानिक वाहतूक वापरून पैसे वाचवायचे ठरवले. माझी भटकंती ऐकून औरंगाबादहून आलेले चाचाही होते त्यामुळे मी काहीसा निवांतही होतो.)
अमर महल (राजा हरिसिंग यांचा महाल, जम्मू)
दोन ते तीन मिनीबस (मेटाडोर) बदलत मी अमरमहल जवळील स्थानकावर थांबालो. आत शिरतानाच जाणवले आपण चक्क एका वेगळ्या देशात आलो आहोत. तो स्वच्छ रस्ता त्यासमोरील हिरवे, नीट कापलेले गवत आणि मधोमध राजा गुलाब सिंग यांचा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा आणि त्यामागे अनेक झाडे आणि अनेक नवे पक्षी आणि अनेक नवे आवाज. आंघोळीपेक्षा या वातावरणाने जास्त ताजेतवाने झालो.
महाल बाहेरून लाल रंगाच्या खडकांनी सजवलेला. बाहेरून दालनात जाताना संपूर्ण महालाभोवती लांबलचक कॉरिडॉर आणि लाकडी फ्रेम आणि वर पाहिल्यास उताराचे छप्पर.
सकाळी दहा वाजता तिकीट घेऊन प्रवेश मिळाला. बाहेरून फिरताना १२० किलो वजनाचा सोन्याचे सिंहासन काचेतून पहायला मिळते. त्याला दोन्ही बाजूला सोन्याचे सिंह आहेत. हे इथले मुख्य आकर्षण आहे. राणी यशोराज्य लक्ष्मी आणि सध्याचे पद्मविभूषण डॉ. करण सिंग यांचे वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक जीवन दाखवणारी जुनी छायाचित्रे एका दालनात पाहिली. त्यांनी हा वाडा संग्रहालयासाठी दान दिला. पुढील सभागृहात दोग्रा कुटुंबातील मुख्य व्यक्तींची मुख्य व्यक्तींची सुरेख जिवंत चित्रे तसेच काहींच्या आयुष्यातील क्षणचित्रे आहेत. सभागृहात सेमिनार, व्याख्यान, वर्कशॉप भरवले जाते.
काश्मीर संस्थान भारतात विलीन करणाऱ्या राजा हरिसिंग यांच्या पुतळ्याशेजारी अनेक निसर्गचित्रे आहेत. त्यातील एका चित्रात अमर महालाच्या मागे दिसणारे तावी नदी आणि नदीपलीकडील शिवालिक पर्वतरांगा चितारलेल्या आहेत. ते चित्र आणि बाहेरचे दृश्य मी वारंवार तुलना करत होतो. ते चित्र तिथेच काढले असावे हे नक्की. त्याशेजारील दालनात मी जवाहरलाल नेहरूंना पाहिलं. ते माझ्याकडे पाहत होते, मी पुढे जाऊन मागे वळलो तरीही ते माझ्याकडेच बघत होते. हे असं मी त्या चित्रासोबत पाच मिनिटं करत होतो कारण ते ३-डी होतं...अप्रतिम.....अफलातून..!!! त्याच दालनात एम. एफ हुसेन यांची (कदाचित चुकीची) चित्रे आहेत. ही चित्रे पाहून मला मी लहान असताना काढलेली चित्रे आठवली; शिवाय माझा स्वतःच्या आजच्या रेखांकनाबद्दल आत्मविश्वास खूप पटीने वाढला. एका दालनात नल-दमयंतीची प्रेमकहाणी सांगणारी चाळीसेक चित्रे आहेत. प्रत्येक घटनेत मुख्य पात्रांसोबत दुय्यम पात्रे, गर्दीतील प्रत्येक व्यक्ती यांच्या चेहऱ्यावरील भाव पाहताना पूर्ण चित्रपट पहिल्याचा अनुभव येतो.
जर चलचित्रपट उद्योग नसता तर अनेक कहाण्या याच स्वरूपात मिळाल्या असत्या. तसेच विष्णूच्या दशावताराची कहाणी सांगणारी मुख्य चित्रेही आहेत. सभागृहाच्या मागच्या बाजूला बाहेर घोडेस्वारीचा सराव करण्यासाठी यंत्र आहे.
अमर महल ही वास्तु फ्रेंच स्थापत्यकाराने राजा अमरसिंग यांच्यासाठी त्या काळात जम्मूतील सर्वात उंच वास्तु बनवली होती. नंतर महाराजा हरिसिंग आणि महाराणी तारादेवी १९२५ मध्ये मुबारक मंडीमधील राजवाडा सोडून इथे राहण्यास आले.
अमर महल पॅलेस ( मागील बाजू) |
अमर महलच्या पलीकडील उजवीकडे उंच वास्तु दिसली. काही दिवसांपूर्वी येऊन गेल्याने मी ती पटकन ओळखली. पण रिक्षानेन जाता पक्षी बघत, परवानगी घेऊन सैनिकी कार्यालयाच्या बाजूने चालत पोहोचलो. आधीप्रमाणेच काही पाहण्यासारखे आहे असे वातावरण बाहेरून तरी नक्कीच नाही आहे.
१९५४ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी जम्मूमध्ये गांधी भवनात दोग्रा आर्ट गॅलरीचे उद्घाटन केलं. १९९१ मध्ये ती सध्याच्या ठिकाणी स्थलांतरित झाली. प्रवेश फी भरून सर्व वस्तू अंधारात पाहण्यास सुरुवात केली. दोग्रा घराण्याची वस्त्रे, भांडी, अस्त्रे, विशेषत: बंदुका, दागिने, कलाकुसरीच्या वास्तु, त्यावर हस्तिदंताची नक्षी, अनेक चित्रे , १४००० फुटांवर वाढणाऱ्या भूर्जपत्रावर लिहिलेले रामायण आणि अनेक ग्रंथ, नाणी सर्व काही पाहण्यासारखी आहेत. एका दालनात कारंजे असून तेंव्हाची वातानुकूलनासाठी वास्तूत असलेली रचना कमालीची आहे. आजही त्याचा अनुभव घेता येतो असे तिथे भेट देणाऱ्या काहींनी अनुभवले आहे.
मुबारक मंडी कॉम्प्लेक्स -प्रवेशद्वार |
शिवाय ही वास्तु चांगली होती असं पडक्या वस्तूकडे पाहून तरी सांगता येतं. पण इथे वास्तु असूनही आणि संधी असूनही नीट सांभाळलेली नाही. भरपूर काम सुरू आहे त्यामुळे मला जाणवलेला सल कदाचित नंतर नसेलही. पण ऐतिहासिक वास्तू पार पडायला आल्यावरच कशी कामं सुरू होतात ते नाही कळत.
दोग्रा आर्ट गॅलरी -जम्मू |
बाहू किल्लाच नसता तर सभोवतालची बाग-ए-बाहू ही बाग नसती. चिक्तन खरहून दिसणारा निसर्ग हा त्या परिसरातील याच ठिकाणावरून सुंदर दिसतो. अमर महल राजवाडा आहे म्हणून तिथे राजघराण्याचा इतिहास आणि कला, संग्रहालयच्या रूपाने जपता आला आहे आणि मुबारक मंडीमुळे दोग्रा संस्कृतीचे दर्शन झाले. याचा अर्थ आजचा निसर्ग, आज घडणारा इतिहास, संस्कृतीतील ‘चांगल्या’ गोष्टी, ‘चांगल्या’ कला टिकवण्यासाठी किल्लाश्रय असणं ही उद्याची गरज आहे.
अधिक वाचा
Marathi Blog - मनात आलं म्हणून,
मराठी पुस्तक - पहिले पाऊल , सफरछंद
Online Books PDF on esahity.com : मुल्हेर ते साल्हेर, कधी सरस कधी कळस, गोरखगड ते सिद्धगड, अलंगाशी संग मदनाशी गाठ
लोकसत्ता 'ट्रेक इट' मध्ये भैरवगड, कलावंतीण , वैराटगड, आजोबागड आणि इतर लेख प्रकाशित.
५ ठिकाणे जम्मूत फिरताना
Reviewed by Marathi Blog by Pankaj Ghare
on
May 19, 2020
Rating:
No comments: