उत्तर प्रदेश/ बिहार मधून मुंबईत येऊन स्थानिक झालेल्यांची संख्या जास्त आहे, ती अजून कशी वाढत जाईल याचा अनुभव हॉस्पिटलमध्ये आला.
Marathi Blog - मनात आलं म्हणून
लक्ष्मी आणि चिराग
आमच्या बाळाच्या जन्माच्या निमित्ताने सरकारी रूग्णालयात बर्याच वेळा जाणं झालं आणि त्यामुळे स्त्री-पुरूष (अ)समानता, अल्पवयात होणारी लग्न, अंधश्रद्धा, लोकसंख्यावाढ असे विषय दिसू लागले.
सर्वच विषयांचं राजकारण होऊ नये तसंच सर्वच विषयांवर लिहू नये असं कधीकधी वाटतं; कारण आपण प्रसिद्धीसाठी लिहतोय असा आरोप होऊन मुख्य विषय मग बाजूलाच राहतो. नुकत्याच जन्मणाऱ्या बाळांचं बोट पकडून सामाजिक विषयावर बोलणं काहीसं धाडसी किंवा निरर्थकही क्वचित वाटू शकेल पण जे डोळयांनी पाहिलं, त्याचा देशाच्या लोकसंख्येवर किंवा कोणत्याही राज्यावर परिणाम होतोय आणि तेही सरकारी सोयी किंवा योजनांमुळेच की काय असं वाटून हे लिहावंसं मनात आलं.
पहिल्यांदा गोड बातमी मिळाल्यानंतर, प्रसुती ही स्वाभाविक (normal) व्हावी आणि शस्त्रक्रिया शक्यतो होऊ नये हा मला कळलेला पहिला मुद्दा. स्वाभाविक प्रसुतीसाठी शक्यतो सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे हा अनेकांनी पहिला सल्ला दिला.
प्रायव्हेटमध्ये काय होतं याच्या अनेक कहाण्या ऐकल्या. प्रायव्हेटमध्ये सिझरिंग का होतं? तर ते पैसे मिळवण्यासाठी, असा ठाम समज लोकांमध्ये आहे. सिझरिंगचे शरीरावर होणारे अनेक वाईट परिणाम अनेक महिलांनी सांगितले होते.
हेच सिझरिंग टाळण्यासाठी निर्णायक वेळी आम्ही सरकारी रूग्णालयात जायचं ठरवलं. त्यानुसार सकाळीच हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. खरंतर त्याआधीही बर्याचदा तपासणीसाठी गेलो होतो. सरकारी असूनही हॉस्पिटल कमालीचं स्वच्छ होतं यात वादच नाही. अनेकदा जाऊन एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवली. काही गरोदर महिलांचं वय खूप कमी असल्याचा अंदाज यायचा आणि त्या गरोदर आईचा हात धरून एक मुलगी, कमरेवर एक मुलगी असायची. यातले बहुसंख्य हे युपी-बिहारचे असायचे.
महागाईच्या युगात केवळ याच लोकांमध्ये इतक्या मुलांना जन्म देण्याची हिंमत होतेच कशी याचं आम्हा दोघांना आश्चर्य वाटायचं.
हळूहळू अंदाज येत गेला. इथे सरकारी रूग्णालयात सर्वच औषधं मोफत मिळत होती. सोनोग्राफी, डॉक्टरांचा सल्ला, राहणं मोफत होतं. फक्त रक्त तपासणीचे पैसे मोजावे लागायचे तेंव्हा अचानक ही तर सरकारची लूट आहे असं काहींना वाटायचं कारण त्यांचं कॉन्ट्रॅक्ट दुसर्या टीमला असायचं. प्रसुतीपूर्व तपासणी ही अत्यल्प खर्चात होते. प्रत्यक्ष प्रसूतीचे ( स्वाभाविक असो वा सिझरिंग ) काहीच शुल्क आकारले जात नाहीत. नंतरसुद्धा कितीही दिवस राहण्याचे नि औषधांचेसुद्धा काहीच पैसे आकारले जान नाहीत.
हा खर्चच फार कमी आहे म्हणून मुलगा होईपर्यंत बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्रात आलेल्या तसेच कमी शैक्षणिक दर्जा असलेल्या आणि गरीब लोकांमध्ये बाईने गरोदर राहण्याची वारंवारता जास्त आहे.
कायद्याचे पालन होत अाहे, लिंगनिदान होत नाही ही एक चांगली बाजू; पण जोपर्यंत मुलगा होत नाही तोपर्यंत आजही काही महिला गरोदर राहतात किंवा त्यांना तसं भाग पाडलं जातं असावं. यातील काही जणांशी बोलल्यावर 'हमका तीनो लक्ष्मी है बस एक चिराग चाहिए।' असं उत्तर मिळालं. ( तो स्वत: त्याच्या कुटुंबाचा तिसरा चिराग होता! ) शेजारी बसलेला सारखं एकच वाक्य म्हणत होता'"चलो अच्छा हुआ,लडका हुआ। वरना लडकी होती तो और एक बार चान्स लेना पडता।" तेच तेच वाक्य पुन:पुन्हा बोलताना तो सर्वांकडे बघायचा. न राहवून त्याला विचारलं, "ऐसा क्यों ?" तो म्हणाला, "नहीं तो क्या ? वरना उसकी जो भी प्रॉपर्टी होगी वो उसे उसके भाई के बेटे को देनी पडेगी । उसको क्यों देनेका ? सही है के नहीं ?" बोलता बोलता त्याने पुन्हा सर्वांकडे पाहिलं. अनेकांनी त्याला मूक समर्थन दिलं. घरी घरातली बरीच कामं असल्याने ती करण्यासाठी हॉस्पिटलमधून आई आणि बाळाला लवकर डिस्चार्जही मिळावा अशीही अपेक्षा असते.
त्या दिवसांमध्ये अनेकांना मुलगी झाली. ज्यांना पहिली मुलगी झाली होती तेंव्हा ती मुलगी झाल्यानंतर 'चालतंय, पहिली मुलगी झाली तरी चांगलं असतं' असं काहीसं सांत्वन केलं जायचं. म्हणजे झालंय वाईट पण तुम्ही सकारात्मक रहा. पुढच्या वेळी मुलगा होईल अशा 'शुभेच्छा' ऐकाव्या लागल्या. ज्यांना दुसर्या मुलीची बातमी कोणाला सांगितली की त्याला "अरे दुसरीपण मुलगीच झाली !" असं जणू काही लागोपाठ दोन वेळा नुकसान झाल्याची प्रतिक्रिया दिली. तिसर्यांदा मुलगी झालेल्या बापाला तर ' अरेरे! बिच्चारा ' असं लोक अापसात कुजबुजायचे. मुलगी झाल्याची बातमी कळली की काही सेकंदांची शांतता होते. बोलतानाचा स्वर नेहमीसारखा असतो. पण मुलगा झाला की मोबाइलवर जोरजोरात गप्पा होतात. काहीजण पुढे 'मूल काळं आहे की गोरं असं विचारायचे आणि मुल गोरं होण्यासाठीचे उपाय सांगत. मुलीला बाळ झाल्यानंतरच आमच्या मुलीच्या घरी जेवू शकतो नि मुलीचे सासू सासरे मुलीच्या माहेरी जेवू शकतात असं मुलीच्या आईकडून ऐकल्यानंतर फारच दु:ख झालं. 'फार पूर्वीपासून हे चालत आलं आहे हे ते काही उगाच नाही' असं म्हणत अशा अनेक फालतू परंपरा पाळल्या की आपण 'सुसंस्कारी' ठरतो. जो बाप तीन मुलींना घेऊन नुकत्याच जन्मलेल्या मुलाच्या नि आईच्या बिछान्याजवळ जायचा त्याला तर हॉस्पिटलमधल्या मावशा ( महिला कर्मचारी ) हसायच्या.
(.......सरकारी हॉस्पिटलमधल्या मावशा..... हा आणखी एक चर्चेचा विषयवहोता. यांना भूक लागली की बाहेरून काहीतरी खाऊ आणून द्यावा लागे. हो, त्यासाठी ते पैसेही देत. बरीच वर्षे त्यांनी एकाच हॉस्पिटलमध्ये काम केलेलं असतं, त्यामुळे त्यांना बरंच 'ज्ञान' असतं. रूग्णाशी त्यांच्या नातेवाइकांशी यांचा थेट संपर्क होतो. बाळाच्या जन्मानंतर किंवा हॉस्पिटलमधून बाहेर येताना यांना अंधारात किंवा कॅमेरा नसेल तिथे 'बक्षीस' द्यावं लागतं. कुणाला सांगू नका असं आपल्याला म्हणतात आणि स्वत: इतर मावशांना बाळाचा बाप कोण हे सांगतात. मग त्यासुद्धा बक्षीस मागायच्या. त्यांना बक्षीस नाही दिलं तर बाळाला नड / पनवती लागते असा शोध लागला अाहे. डॉक्टरांच्या खुर्चीपासून लांब असलेल्या बिछान्यावरच्या रूग्णाच्या नातेवाईकांना ते अनेक सल्ले देत. त्यांच्याकडून काही गोष्टी नव्याने कळतात. बाळाने लघवी केली नाही तर त्याच्या तोंडावर पाणी शिंपडलं की घाबरून तो लघवी करतो. याचा यशस्वी प्रयोग आम्ही केला. एखादं अपंग बाळ जन्माला आलं की बाईने गरोदर असताना सूर्यग्रहण पाहिलेलं असतं हे 'शास्त्र' त्या सर्वांना सांगतात. त्याचा लाभ हसत हसत नक्की घ्यावा.......)
हॉस्पिटलमधल्या मावशांचं रोजचं हे निरीक्षण आहे की विशिष्ट जाती-धर्म-भाषिक- आर्थिक स्तरातील लोक आणि विशेषकरून 'भैया लोक' या सरकारी रूग्णालयांचा पुरेपूर 'फायदा' घेतात. अनेक जोडप्यांना किमान एकापेक्षा जास्त अपत्य असतात मुलगा होईपर्यंत !!
बाळाचा जन्म झाल्यानंतर जन्माचा दाखला मिळवण्यासाठी एक लाल कागद देण्यात येतो. त्यामुळे आता अनेक परप्रांतीयांच्या मुलांच्या जन्माचे ठिकाण मुंबई आहे आणि असेल. म्हणजे आज मराठी माणूस मुंबई- महाराष्ट्रात जे सहन करतोय तेच त्यांची पुढची पिढीसुद्धा सहन करेलच. शिवाय नंतरचे भैया हे इथेच जन्मलेले भैयाच असतील. त्यांना तर परप्रांतीयसुद्धा म्हणता येणार नाही. प्रश्न हा उरतो की इथे जन्माला येणाऱ्यांची जास्त संख्या ही सध्याच्या परप्रातियांच्या मुलांची असेल तर पुढे मराठी शाळा, भाषा, पाट्या, चित्रपटगृह, अभिजात दर्जा हे राजकारणातले मुद्दे फारच लवकर दुय्यम होतील.हेच इतर राज्यांनाही लागू होतं. सर्व भारतीयांचं सर्वत्र स्वागत होतं; पण बहुतेकदा युपी-बिहारचेच पाहुणे जास्त सापडतात.
परप्रांतीयांचा मुद्दा सोडला तरीही भारताची लोकसंख्या आणि त्याचे परिणाम हा महत्त्वाचा मुद्दाही आहेच. घरात खाणारे जास्त कमवणारे कमी असतात तसंच देशात खाणारे जास्त पिकवणारे कमी असं होऊन महागाई वाढतेय. त्याचवेळी सरकारी हॉस्पिटलमध्ये इतक्या कमी खर्चात तिसर्या अपत्यासाठीही मोफत सोयी/योजना नुकसानकारक आहेत. या सोयी पहिलं बाळ (मुलगा असो वा मुलगी) आणि ते अपंग / गतिमंद असल्यास दुसर्या बाळासाठी असतील तर काहीच आक्षेप नाही. पण तिसर्या अपत्यापासून वैद्यकीय खर्चात ती सूट नसावी. (शाळेच्या वाढत्या फीमुळे जशी लोकसंख्या नियंत्रणात राहू लागली आहे तशीच ती या खर्चामुळेही राहू शकते.)
मुलींना वारस न मानणं ही फारच संकुचित मानसिकता आणि मानणं हा एक खूप मोठा पेच आहे. त्यामुळे मुलीच्या वडीलांची संपत्ती पाहून मुलाने तिच्याशी लग्न करण्याचं प्रमाण वाढू शकतं. त्यामुळे मुलींना 'पराया धन' म्हणणं शिवाय मुलं हेच 'संपत्तीेचे वारसदार' असतात हे गृहीत धरणं थांबलं पाहिजे.
अधिक वाचा
Marathi Blog - मनात आलं म्हणून,
मराठी पुस्तक - पहिले पाऊल , सफरछंद
Online Books PDF on esahity.com : मुल्हेर ते साल्हेर, कधी सरस कधी कळस, गोरखगड ते सिद्धगड, अलंगाशी संग मदनाशी गाठ
लोकसत्ता 'ट्रेक इट' मध्ये भैरवगड, कलावंतीण , वैराटगड, आजोबागड आणि इतर लेख प्रकाशित.
भैयांची लोकसंख्या अशीही वाढते
Reviewed by Marathi Blog by Pankaj Ghare
on
May 19, 2020
Rating:
No comments: