ऐरोलीचा राष्ट्रीय पक्षी

मी राहतो त्या ऐरोलीमध्ये मच्छरांचा त्रास फार आहे. त्याला राष्ट्रीय पक्षी का घोषित करत नाहीत ? अशी मागणी करावी लागेल इतके मच्छर आहेत. 

ऐरोलीचा राष्ट्रीय पक्षी : मच्छर 

मुंबई उपनगराला पूर्वेकडे ठाण्याची खाडी ऐरोली पूलाला गाड्या थांबतात नि भक्तीभावाने खाडीला हार अर्पण करून ऐरोलीच्या पोटात शिरतात. खाडीनंतर ठाणे- बेलापूर रस्त्यापर्यंत अनेक फांद्या फुटून ऐरोलीभर पसरलेल्या आहेत. या रस्त्यांवर स्कूटरवर पुढे अनेक जय-वीरू म्हणजे एजंट आणि मागे ग्राहक फिरतात. मागील काही वर्षांत सर्व सेक्टरमध्ये घरांची आणि इथली लोकसंख्या वाढली. बर्‍याच जणांनी कर्ज काढून घर घेतल्याने दोन पैसे सुटावेत (म्हणजे दोन टक्के मिळावेत) म्हणून मग तेही इस्टेट एजंट झाले. मनातल्या मनात बरेचजण एजंट आहेत हेही खरे आणि हो, ऐरोलीत काही सर्वसामान्य फक्त नागरिकही अाहेत. नाही असं नाही.
   मच्छरमुळे रोगराई पसरते तशी एजंटमुळे लोकसंख्या पसरते.

   हेच. हेच ते. ऐरोलीमध्ये कोणत्याही विषयावर बोलताना मध्येच मच्छर येते आणि मच्छर या विषयावर चर्चा सुरू होते. विषय कितीही गंभीर असो. म्हणजे 'आमच्या मुलाच्या लग्नाचं बघा जरा' या विनंतीला 'शी, या मच्छरचं काय करायचं ?' असा प्रश्न विचारतात. हा प्रश्न विचारला की आश्चर्य वाटलं नाही तर तोही ऐरोलीचाच समजावा.  ट्वेंटी -२०च्या सामन्यात 'बापरे किती स्कोर !!'  तसंच ऐरोलीत येणारा पाहुणा ' बापरे किती मच्छर !!' असं हमखास विचारतो. ' हल्ली जरा मच्छर जास्त आहेत ' असं ऐरोलीकर गेली अनेक वर्षे मान्य करतोय. तो नाही म्हणणं शक्यच नाही. कारण नाही म्हटलं की अगदी त्याच वेळी पाहुण्यांच्या समोर,  दोन्ही हात कितीही बिझी असू देत, माणसाच्या गालावर एक मच्छर बसते.

ऐरोलीतल्या घराघरात, (सोसायटीची मिटींग होत असेल तर ) शेजार्‍यांशी, प्रत्येक नाक्यावर , प्रत्येक दुकानात, मैदानांत, बागेत मच्छर या विषयावर चर्चा होते. इथे एखादी जागा, कार्यालय , बाग रिकामे करावे लागत नाहीत. संध्याकाळ झाली की लोक स्वत:च ती जागा रिकामी करतात. कारण संध्याकाळ होण्याअगोदर घराचे सर्व दरवाजे खिडक्या बंद कराव्या लागतात.  आणि मग 'श्रीमंतांच्या घराची दारं बंद असतात' तसा 'अॅटीट्युड' दाखवायची संधी कर्ज घेऊन वन रूम किचनमध्ये आलेल्यांना मच्छरमुळे मिळते.

ऐरोलीकरांचा अभ्यास नि अनुभवानुसार मच्छरला माहीत आहे की 'टाळी' हा मच्छर मारण्याचा पारंपारिक उपाय आहे. त्यामुळे तळहातावर न बसण्याची परंपरा तीसुद्धा पाळते. शरीराचा जो भाग तिला दिसेल तिथे ती ( न लाजता ) बसते. आपलं काही चुकलं किंवा वाईट झालं तर कपाळाला हात का लावतो ? हे तपासायला ती कपाळावर बसते. कपाळ हे खरंतर मच्छर बसण्यासाठीच असतं नाहीतर टीकली, टीळा, भस्म लावण्याशिवाय कपाळचा माणसाला तरी उपयोग नाही. ती गालावर बसली की लगेच कळतं. ती शक्यतो अशा ठिकाणी बसते जिथे हात वेगाने पोहचू शकत नाही. जिथे केस आहेत अशा भागावर तर ती बिनधास्त बसून टोचायला सुरू करते. अगदी त्याक्षणी मच्छर मारली तरच मच्छरला मारलं यापेक्षा जिंकण्याचा आनंद जास्त होतो. पण शरीराला चिकटलेलं किंवा केसांत अडकलेलं तिचं प्रेत उचलताना किंवा झटकताना ऐरोलीकर थेट प्रशासनाला शिव्या देतो.

ऐरोलीत इतक्या मच्छर आहेत की त्या मारण्याचा एकमेव सार्वजनिक पर्याय असलेला धूरवाला अधूनमधून येत रहावा असं सर्वांना वाटतं. तरीही कौटुंबिक पर्याय असलेले चकलीसारख्या अगरबत्ती अनेकजण वापरतात. पण हा जुना झालेला उपाय कदाचित मच्छरलाही माहीत झाला असावा. तिला फसवण्यासाठी आता देव्हार्‍यापुढे असतात तशा अगरबत्त्या बाजारात आल्या आहेत. मच्छर या विषयावर अभ्यास करून जाळायचा कागद , बाटलीतलं औषध, छोटीशी साबणासारखी वडी असे अनेक पर्याय आपण टी. व्हीवर पाहतो आणि विकतही घेतो. मच्छरमुळे अनेकांना अर्थप्राप्ती होते. त्यांची टी. व्हीवर जाहीरातही होते पण तीच मच्छरनेही थेट काचेवर बसून ती पाहिलेली असते.मग मच्छरला मारण्याचा उपाय हा टी. व्हीवर दाखवून कसं चालेल?तिलाही या वस्तू माहीत असतातच. म्हणून या सगळ्या वस्तू काहीच कामाच्या नाहीत.

मागील काही वर्षांत अनेक क्षेत्रात कितीही प्रगती झालेली असली तरी ऐरोलीकरांना सर्वांत जास्त कौतुक 'इलेक्ट्रिक बॅट'चं आहे. इथला नागरीक भाड्याने राहणारा असो की एका घरात राहून दुसरं घर भाड्याने देऊन तिसरं घर घेण्याचा प्रयत्न करणारा नि चौथ्या घराचं स्वप्न पाहणारा असो सर्वांच्या घरी ही बॅट असतेच. हे चिनी तंत्रज्ञान आहे. चिनी वस्तूंवर कितीही बहिष्कार घालण्याचं ठरवलं तरीही या तंत्रज्ञानासाठी एक ऐरोलीकर चीनचे आभार मानतो.

हा शोध ऐरोलीकराने लावला असता तर त्याला ऐरोलीभूषण पुरस्कार मिळाला असता. त्याच्यासोबत नेत्यांनी संशोधकासोबत सत्कार करत फोटो काढले असते. असे सत्कार कार्यक्रम केले की मनाने मोठे असल्याचा दिखावा करता येतो. एकदा का निवडून आलं की मग मुलांना, पुतण्यांनाही राजकारणात असं सांगत आणता आलं असतं की या घराण्याने गेली अनेक वर्षे मच्छर मारल्या होत्या. स्वातंत्र्यदिनापासून आतापर्यंतच्या सरकारने ६५ वर्षे मच्छरच मारली नाही; आम्ही त्या ५ वर्षात मारू असं म्हणत एखाद्याला सत्ता मिळू शकते. सत्ता मिळाली नि तुम्ही पाच वर्षांत किती मच्छर मारले असा प्रश्न विचारला की उत्तर द्यायचं टाळण्यासाठी गेली ६५ वर्षे जे सत्तेत होते आधी त्यांना विचारा असं म्हणत, आम्हालासुद्धा ६५ वर्ष विचारू नका अशा छुप्या अर्थाची तुलनात्मक भाषणे ऐकावी लागली असती. ५ वर्षे आधी ज्यांनी कचरा केला तो आम्ही करणार नाही  नि करू देणार नाही असं म्हटलं असतं. पण कोणी प्रश्न विचारला की लगेच त्याला थेट देशद्रोही ठरवून सोशल मिडीयावर त्याची वैयक्तिक पातळीवर खिल्ली उडवली असती.

सर्वांत जुन्या पक्षाचं चिन्ह टाळी असतं. त्याच्यापासून देशाला मुक्त करणार्‍या एकमेव देशभक्त नि एकमेव प्रामाणिक नि एकमेव संस्कृतीरक्षक पक्षाचं चिन्हं अगरबत्ती किंवा धूप असतं. या पक्षाचा मित्र आहे की शत्रू याचा गोंधळ असलेल्या पक्षाचं आणि वर्तमानपत्र म्हणजे केवळ दुसर्‍या पक्षांवर टीका करण्यासाठी आणि केवळ स्वत:चं बरोबरच असतं असं मानणार्‍या पक्षाचं चिन्ह मच्छर मारण्याची बॅट असतं. बाहेरून येणाऱ्या मच्छरना रोखण्याविषयी बोलणार्‍या पक्षाची निशाणी मच्छरदाणी असती.

असो. इतकं मच्छरमय वातावरण फार मेहनतीने ऐरोलीकरांनी बनवलं आहे. कबुतराला ज्वारी आणि कुत्र्याला चपाती दिली की पुण्य मिळतं तसं मच्छरसाठी  ऐरोली पूलावर रिक्षा, दुचाकी आणि अलिशान चारचाकी थांबतात आणि खाडीत जुनी झालेली फुलं नि हार भिरकावून अर्पण करतात. ऐरोलीत उघडे पडलेले नाले दिसत नाहीत. रस्त्यांच्या किनारी कचरा जमा झालेला दिसत नाही. पण पूलावर केलेल्या कर्माचा लाभ त्यांना रोज संध्याकाळी घरी मच्छरद्वारे मिळतो.

अशा प्रकारे ऐरोलीकरांनी फार जपलं आहे मच्छरना. कोणत्याही पक्षाच्या जाहीरनाम्यातही मच्छरबद्दल काहीतरी असावं असं सर्वांना वाटतं. जो प्राणी देशाची ओळख असतो पण देशात सर्वत्र दिसत नाही तो राष्ट्रीय प्राणी 'वाघ' असू शकतो तर मच्छर हा स्वच्छंद उडणारा , ऐरोलीत घराघरात नि कोपर्‍याकोपर्‍यात आढळणारा आणि देशात इतरही दिसणारा एकच पक्षी आहे. मच्छरला चोच नाही म्हणून तो पक्षी नाही असं म्हणत कोणी विरोध केला की तर माणसाला शेपटी नाही म्हणून माणूस हा प्राणी नाही असा युक्तिवाद दुसर्‍याला गप्प करण्यासाठी तयार आहे.

एखाद्या सुंदर पक्ष्याने दावा ठोकून वाद घालण्यापेक्षा आणि एखाद्या पक्षाने श्रेय घेण्याआधी आता जाहीरच करूया........
ऐरोलीचा राष्ट्रीय पक्षी कोण ?
मच्छर.


अजून काही विनोदी लेख :  

मराठी पुस्तक  - पहिले पाऊल , सफरछंद 
Online Books PDF on esahity.com : मुल्हेर ते साल्हेर, कधी सरस कधी कळस, गोरखगड ते सिद्धगड, अलंगाशी संग मदनाशी गाठ  
लोकसत्ता 'ट्रेक इट' मध्ये भैरवगड, कलावंतीण , वैराटगड, आजोबागड आणि इतर लेख प्रकाशित.
ऐरोलीचा राष्ट्रीय पक्षी ऐरोलीचा राष्ट्रीय पक्षी Reviewed by Marathi Blog by Pankaj Ghare on May 19, 2020 Rating: 5

No comments:

मनात आलं म्हणून

मनात आलं म्हणून
थोडं माझ्याविषयी
Powered by Blogger.