बत्तिशी - दातांनी चावू काही

दात घासणे ही फार महत्त्वाची क्रिया असली तरी आपण त्याचा खूपच बाऊ केला आहे. म्हणून हा विनोदी लेख 

बत्तिशी 

marathi comedy blog on teeth and dentist
बरेच अंक  विशेषण म्हणून हमखास वापरले जातात. उदाहरण म्हणजे ३६ चा आकडा, १२ घरचे पाणी, ४ पावसाळे पाहिले, नव्याचे ९ दिवस, दुष्काळात १३वा महिना, सतराशे साठ भानगडी, ४ दिवस सासूचे, सहावारी-नऊवारी साडी, असं बरंच काही. तसा ‘३२’ हा आकडा खास हसण्याचे वर्णन म्हणून वापरतात. नीट तपासून पाहिल्यास एकूण मिळून ३० दात असतात; परंतु ३२ पूर्ण होण्यासाठी अक्कलदाढ येताना ज्या असह्य वेदना होतात, त्या सोसताना अक्कलदाढेची आणि मुळात ३२ दात असण्याची गरज काय असा प्रश्न पडला.
मूळात दात हे अन्न चावण्यासाठी असतात, हसण्यासाठी असतात का जिभेला संरक्षण देण्यासाठी असतात हे लक्षात येत नाही. कारण लहान मूल, ज्याला दात नसतात तेही खूष असतं की ! आणि ज्यांचे सर्व दात पडले आहेत अशांचं सुद्धा दातांशिवाय कुठे काय बिघडलंय ?

याउलट, दात नसताना लहान मुलांचे गोड हसू पाहताना आपण आपले रंगीत दात उगाच दाखवू नयेत. हो, म्हणजे तसा दातांवर खर्च केला असेल तर काही हरकत नाही. तसा खर्च करण्याची वेळ आली, म्हणजे ‘तो’ भूर्दंड सोसण्याआधी दातांची काय अवस्था असेल ती कल्पना करवत नाही.... म्हणजे तंबाखू किंवा गुटख्याच्या व्यसनामुळे दात खराब झालेत असा गंभीर आरोप लागण्याची शक्यता असते. मग भले तुम्ही लहान असताना चॉकलेट भरपूर खाता  (हे खरे किंवा खोटे ) कारण सांगत असाल तरी विश्वास ठेवणं कठीण.

दातांमुळे माणसाचा खर्च अनावश्यक खर्च वाढला हे मात्र निश्चित. टूथपेस्ट किंवा टूथपावडरचा खर्च आणि त्यामुळे नेमके होणारे फायदे कधीच लक्षात येत नाहीत. कडूनिंबाची काठी, मीठ किंवा तंबाखूचा वापर होत असताना कोणाला शहाणपण सुचलं आणि टूथपेस्ट, टूथब्रश, टूथपिक यांचा शोध लागला आणि पुढेपुढे म्हणजे आजपर्यंत अनेकविध चव असलेल्या, तोंडात कीटाणू असतातच याबद्दल उदंड आत्मविश्वास असणाऱ्या आणि तिथे पेस्ट कंट्रोल करणाऱ्या, तोंडाला श्वास किंवा ताजेपणा आणणाऱ्या, मुलीला पटवणाऱ्या उत्पादनांची निर्मिती झाली. चॉकलेटमुळे दात किडतात या वाक्यावर मात करत चुईंगगममुळे तोंडाचा व्यायाम होतो, दात चकाचक होतात इथपर्यंत ‘दंत’कथा बनल्या आहेत.

बरं , एखादवेळी ब्रशसाठीचा खर्च टाळता येऊ शकतो किंवा दातांसाठी वापरलेला ब्रश, हा नंतर केस काळे करण्यासाठी छोट्या मशीन स्वच्छ करण्यासाठी वापरता येऊ शकतो. पण महागडी टूथपेस्ट दातांना लावल्यावर ते थुंकायचं म्हणजे अगदी जीवावर येतं हो... रोज सकाळी खास थुंकण्यासाठी इतका खर्च करायचा. महागड्या टूथपेस्टवर खर्च करायचा आणि सूट मिळण्याची अपेक्षा करायची  हे एकदमच भिकारपणाचं वाटतं. नेलपॉलिश ( मराठीत काहीच म्हणत नाहीत बहुतेक) प्रमाणे दातांसाठी एखादं बरेच दिवस टिकणारं पॅालिश असायला हवं होतं जे लावण्यासाठी सकाळी उठण्याची गरज नसेल.

तुम्ही जर दात घासले असतील किंवा तसा तुम्हाला अनुभव असेल तर एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल. समोरच्या  वरच्या चार दातांना आणि खालच्या दोन दातांना पेस्ट जास्त लावली जाते. इतर सर्व दातांवर कमालीचा अन्यायच होतो.  त्यामुळेच दाखवायचे दात आणि चावायचे दात असे वर्गीकरण होते आणि दातांमध्ये ‘फूट’ आणि मागच्या पेस्ट न लागलेल्या दातांमध्ये ‘ फट’ पडते. 
marathi comedy blog on brushing teeth

इतका सगळा खटाटोप करूनही लहानपणी दुधाचे दात पडतात आणि नवीन दात येतात. दूध पिल्यामुळे ऊर्जा मिळते इथवर माहिती होती. मग कमी किंवा जास्त दूध शरीरात गेले म्हणजे मूल श्रीमंताचं असो की गरीबाचं , एकूण मिळून येणाऱ्या दातांची संख्या सारखीच कशी असते हे एक न उलगडणारे कोडे आहे.

सांगायचं असं आहे की दात हा काही इतका महत्वाचा अवयव वाटत नाही. त्यामुळेच ‘डेंटिस्ट’ला कोणी डॉक्टर म्हणत नाही. म्हटलेच तरी त्याला कोणी देवाचे रूप मानत नाही. कारण दात पडला म्हणून जीव गेल्याचे ऐकिवात नाही. एखाद्या सेलिब्रिटीला आजार झाल्याची बातमी होते पण त्याचा किंवा त्याच्या अपत्याचा दात पडल्याची दखल पत्रकार घेत नाहीत.

पण थोडी दातांची बाजूही समजून घेणं महत्वाचं आहे. दातांमुळे बऱ्याच जणांना संबंधित उद्योग सुचले आणि सुरू झाले आणि अनेकांना रोजगार मिळाला. गाडी, विमानं त्यांचे इंजिन वापरून चालते, बंद झाल्यास धक्का मारून नेली जाते, तरीही काहीजण दातांनी ते ओढून दाखवतात. म्हणजे भविष्ययात पेट्रोलला पर्याय आहे तर. शिवाय कौशल्य, साहसाला चालना मिळते. आपलेही मनोरंजन होते कारण त्यावेळी आपले दात दुखत नाहीत.
प्रत्येक दात स्वतःच्या मुळाला आणि शेजारच्या दातांना नेहमी घट्ट धरून असतो. एकट्याने तो काहीच करू शकत नाही. दातांनी बऱ्याच जणांना दाते, सुळे, दातार अशी आडनावे दिली. आमच्या इंजिनिअरिंगमधल्या गिअर्सना दातच असतात. फणी किंवा कंगव्यालाही दातच असतात.

तुझे दात तोडीन. दात घशात घालीन, काय दात दाखवतोस, दातखिळी बसली, दातओठ खाल्ले अशा काही नकारात्मक वाक्यांचे योगदान दातांनी मराठीला दिले.

हे खरं असलं तरीही दातांच्या वाट्याला उपेक्षाच आली आहे. एखाद्याच्या हसण्याचे वर्णन चांगलं करायचं असेल तर ‘गालातल्या गालात ‘ असं केलं जातं आणि गालांना श्रेय मिळतं. मी मनापासून हसलो किंवा पोट धरून हसलो असं ऐकायला मिळेल पण मी दातांपासून हसलो किंवा दात धरून हसलो असं ऐकायला मिळत नाही.
दात या विषयावर इतकं लिहिण्यामागे सकाळी सकाळी उठून आधी दात घासावे लागतात. त्यामुळे सगळा राग दातांवर निघतो. हे नीट घासून झालेत की नाही हे कळेपर्यंत आई ओरडायला सुरुवात करते... आणि दात घासता घासता सुचलेले विचार कागदावर उतरवायचे किंवा ‘कोरायचे’ राहून जातात.

पुढच्या वेळेपासून फोटो काढताना ‘स्माईल प्लीज’ ऐवजी म्हणा ....’बत्तिशी’ !    

marathi comedy blog on brushing teeth
अजून काही विनोदी लेख :  

मराठी पुस्तक  - पहिले पाऊल , सफरछंद 
Online Books PDF on esahity.com : मुल्हेर ते साल्हेर, कधी सरस कधी कळस, गोरखगड ते सिद्धगड, अलंगाशी संग मदनाशी गाठ  
लोकसत्ता 'ट्रेक इट' मध्ये भैरवगड, कलावंतीण , वैराटगड, आजोबागड आणि इतर लेख प्रकाशित.
बत्तिशी - दातांनी चावू काही बत्तिशी - दातांनी चावू काही Reviewed by Marathi Blog by Pankaj Ghare on May 19, 2020 Rating: 5

No comments:

मनात आलं म्हणून

मनात आलं म्हणून
थोडं माझ्याविषयी
Powered by Blogger.