गल्ली क्रिकेटच्या आठवणी

गल्ली क्रिकेट : चाळीतल्या क्रिकेटच्या आठवणी : लहानपणी चाळीतल्या छोट्या जागेत क्रिकेट खेळताना स्वतःच स्वतःचे नियम बनवून खेळत असू. आता ते बालपण नि क्रिकेटप्रेम आठवताना हसू येते. 

गल्ली क्रिकेट

marathi blog on childhood memories of cricket

मोठा शिशूमध्ये असताना मावशीने आम्हाला, मला आणि भाईला लाकडी बॅट भेट दिली होती आणि पहिला फटका मी भाईच्या गुडघ्याखाली हाडावर मारला होता. आणि   माझं क्रिकेट करिअर सुरू झालं.........?
 मोठेपणी डॅाक्टर होणार हे पहिलीत दिलेलं उत्तर आणि गणिताचा शिक्षक होणार हे उत्तर सातवीत येईपर्यंत बदललं.

   मी भांडुपला असताना तिथले सर्वजण गल्ली क्रिकेट खेळायचो. पाठ चिकटलेली घरं असलेल्या चाळीत आमचं घर पहिलंच. चाळीची ३०फूट रूंदी आमच्या खेळाच्या  जागेची लांबी होती. कारण आठ फूटांवर दुसरी चाळ सुरू झालेली. 

  आमच्या चाळीला चिकटून विजेच्या मीटरची केबिन तर दुसर्‍या चाळीला समांतर तीस फूट लांब नि एक फूट रूंद गटार. फलंदाजाने मारलेल्या एखाद्या फटक्याचा पहिला टप्पा या गटारात पडला की त्सुनामी यायची. त्यामुळे  अगदी जिंकायचचं असेल तरच तिथे क्षेत्ररक्षण होत असे. आमच्या चाळीच्या लांबीला समांतर दरवाजाखालून एक नाला होता. पण त्यात नेहमी झर्‍याचं स्वच्छ पाणी आणि त्यात बरेच मासे, खेकडे असायचे. कवटी (प्लॅस्टिक) चेंडूने खेळताना या झर्‍यात झाडूच्या काठ्या रोवून तीन स्टंप म्हणून वापरायचो.                              
        या स्टंपच्या मागे जो विकेटकीपर असायचा त्याची मुख्य जबाबदारी ही,
१. त्याच्या मागे असलेल्या घरात चेंडू जाता कामा नये.
२. दुसरी जबाबदारी ही त्या घराच्या दरवाजाला चेंडू लागू नये ही होती.
३. तिसरी जबाबदारी ही की चेंडू त्यांच्या घरात गेला तर चपळाईने तो पुन्हा खेळण्यासाठी आणायचा आणि
४. चौथी जबाबदारी ही की त्याने फलंदाजाला बाद करायचं.

 विकेटकीपरच्या मागच्या घरातले आजोबा ( भाऊ) माळ्यावरून पाणी ओतायचे. म्हणून बैठक घेतली आणि मैदान त्यांच्याच घराच्या उजव्या बाजूला २० फूट x२० फूट जागेत हलवलं.या बाजूला त्यांच्या चाळीची केबिन होती. जिच्या पत्र्याच्या दरवाजाला चेंडू लागला की भाऊ ओरडायचे. जागेशी जोडून असलेल्या चाळीतली मुलंच त्या जागेत खेळू शकतात या अलिखित नियमामुळे भूमिपुत्रांना न्याय मिळत होता. पण जुने संबंध टिकवण्यासाठी आधीेच्या खेळाडूंना आम्ही विसरलो नाही.

   भैयाची चाळ, काटकोनात केबिन,काटकोनात शौचालय आणि चौथी बाजू फलंदाजीसाठी. केबिनच्या उजव्या बाजूला सार्वजनिक शौचालय होती. तिथे शक्यतो कोणी चेंडू मारत नसे. केबिनच्या डाव्या बाजूला भैया राहतात. त्यांपैकी एकजण कधी खेळाचा समर्थक होता तर कधी विरोधी होता. पण भैय्यांचा त्रास आम्हाला फार आधीपासून होता. परप्रांतीयांचा मुद्दा खरा तर आमचाच! तो राजकारण्यांनी ढापला ! असो. 

marathi blog on childhood memories of playing cricket
भैयाच्या चाळीसमोरील घराच्या दरवाजा नसलेल्या भिंतीला लागून बेल्सच्या उंचीवर एक लांब आडवा पाईप होता. ही जगातली सर्वात मोठी बेल्स होती. भिंतीवर स्टंपच्या ३ रेषा काढल्याने तिची मर्यादित लांबीच, बाद होण्याचा निर्णय घेताना वापरली जायची. भैयाचं घर आणि केबिनमुळे झालेल्या कोपर्‍यात अंडरआर्म गोलंदाजीसाठी उभं रहायचं होतं. भैयाच्या घराच्या भिंतीला चेंडू लागला तर चौकार, केबिनला लागला की दोन धाव आणि  भैयाच्या पुढच्या घराला (फलंदाजापासून जवळ असल्याने ) लागला  तर एक धाव.  बॅटला स्पर्श झाला की एक धाव. कोणत्याही भिंतीला पहिला टप्पा लागला की खेळाडू बाद आणि पहिल्या टप्प्यानंतर लागला की एक धाव. चौकार मारण्याच्या भिंतीची लांबी जास्त असली तरीही क्षेत्ररक्षण भैयाच्या दरवाजाकडे असायचं. जबाबदारी तुम्हाला माहीत आहेच.
   
गोलंदाजापलीकडे म्हणजे चौकोनातून कोपर्‍यातून बाहेर चेंडू आला की तो कधीकधी दरवाजाकडे बसून तांदूळ निवडताना आईकडे जायचा. या कोपर्‍यातून चेंडू गेला तर चौकार असे. आई नसताना तिथे चौकार मारण्याचा प्रयत्न जास्त होत असे. नाहीतर परातीमधून तांदूळ सांडत. कुणाच्याही कौलावर चेंडू मारू नये हा अप्रत्यक्ष पण कडक नियम होता.

तर अशा या चौकोनात आमचा खेळ सुरू होई.

बॅटला स्पर्श झाला की नाही, चेंडू भैयाच्या भिंतीला लागला की त्याशेजारच्या ? चेंडू थेट भिंतीला लागून फलंदाज बाद झाला आहे की आधी जमिनीला लागला यावरून दोन्ही संघात वाद होत असत. चेंडू गटारात पडून वापरलेला असेल तर त्याचा ठसा जिथे जास्त ठळक तिथे त्याचा पहिला स्पर्श या पद्धतीने DRS System चाळीत तेंव्हा अस्तित्वात होती. पण चेंडू कोरडा असेल तर तो नेमका कुठे लागला हे लोकशाही पद्धतीने ठरवलं जायचं. कधीकधी मात्र सभागृहात होतो तसा गोंधळ या लाद्या असलेल्या मैदानात माजायचा.     
अशा वादग्रस्त सामन्यांचा शेवट विचित्र असे.

 आमचा गोंगाट ऐकून, तो थांबवण्यासाठी आजूबाजूच्या घरातल्या काकू ,आज्या बाहेर येऊन यथेच्छ ओरडायच्या. हा वाद शक्यतो ज्यांची मुलं खेळतात त्यांच्या आया आणि ज्यांची मुलं खेळत नाहीत त्यांच्या आया असा हळूहळू चढत जाई आणि विषय बदले. चाळीतून दरवाजासमोर वाहणारं पाणी, नालेसफाई, मुलं बिघडण्याची कारणं, बाहेर मोठा पिंप का ?, चालताना तुम्ही आमची चप्पल पुढे नेली असे अनेक वाद बाहेर पडत.

   तोपर्यंत वाद झालेले दोन्ही संघ बॅट- बॉल -स्टंप घेऊन एकत्र मैदानात खेळायला निघत.                                    



अजून काही विनोदी आठवणी:  

मराठी पुस्तक  - पहिले पाऊल , सफरछंद 
Online Books PDF on esahity.com : मुल्हेर ते साल्हेर, कधी सरस कधी कळस, गोरखगड ते सिद्धगड, अलंगाशी संग मदनाशी गाठ  
लोकसत्ता 'ट्रेक इट' मध्ये भैरवगड, कलावंतीण , वैराटगड, आजोबागड आणि इतर लेख प्रकाशित.
 
गल्ली क्रिकेटच्या आठवणी गल्ली क्रिकेटच्या आठवणी Reviewed by Marathi Blog by Pankaj Ghare on May 19, 2020 Rating: 5

No comments:

मनात आलं म्हणून

मनात आलं म्हणून
थोडं माझ्याविषयी
Powered by Blogger.