गाडी शिकण्याच्या नावाखाली माझी फजिती झाली होती. आज हसू येतंय . तेंव्हा भयंकर राग यायचा. पण तेंव्हा पर्याय नव्हता.
Marathi Blog - मनात आलं म्हणून
धक्का द्या आणि गाडी शिका
२००६.
दुचाकीचा परवाना काढतोसच आहेस तर चारचाकीचासुद्धा काढून घे असं कुणीतरी दीडशहाणपणा सुचवला. शिवाय पुढेमागे (म्हणजे खूपच पुढे) तू कधीतरी चारचाकी घेशील असं माझ्यापेक्षा त्याला जास्त वाटत होतं. पुस्तकी शिक्षण न घेता, उपयोगी येईल असं काहीतरी शिकायला मिळणार म्हणून ड्रायव्हिंग शिकण्याचं ठरलं.
शनिवारी दुपारी अॅाफिसमधून निघालो. ड्रायव्हिंगचा पहिला दिवस. अगदी उत्साहात अगदी वेळेवर चार वाजता पोहोचलो. पैसे भरले. फॅार्म भरून घेणाऱ्याला क्लास नेमका कधी सुरू होईल विचारलं. तो म्हणाला, " आजच". मी खूष!!!!
दुकानाच्या दारासमोर वाईट अवस्थेतली गाडी बघून मी पैसे घेणाऱ्या मालकाकडे पाहिलं. "काही नाही, आजचा एकच दिवस ही गाडी वापरा "असं तो समजावत (हसत) म्हणाला. गाडीची अवस्था आतूनही वाईट होती. मालक येण्याची वाट पाहत त्या गरमागरम गाडीत मी ड्रायव्हरच्या जागेशेजारी बसलो. थोड्या वेळाने एक माणूस मध्यरात्रीच्या झोपेतून उठल्यासारखा गाडीजवळ आला. मळलेला शर्ट, विस्कटलेले केस, मोठे बटबटीत डोळे, पान खाल्लेलं तोंड, तोंडात जपून ठेवलेला तंबाखू, वैतागलेला चेहरा, पायात रबरी चप्पल ( नाही. रबरी चप्पलमध्ये पाय), सैल कपडे असा त्याचा अवतार. तो ड्रायव्हरच्या जागी बसला तेंव्हा कुठे लक्षात आलं की हा माझा चारचाकीचा गुरू.
शिवाजी तलावपासून जिजामाता विद्यामंदिरपर्यंत ती मारूती गाडी त्याने व्यवस्थित चालवली. 'गाडी डोंगी परि इंजिन नोहे डोंगे, काय भुललासी वरलिया रंगे' असा संतविचार येऊन मी स्वत:ची समजूत घातली.
पुढच्याच क्षणी गाडीतलं पेट्रोल संपलं असं गुरूंनी सांगितलं. "बाळ, जरा मंगतराम पेट्रोलपंपला जाऊन पेट्रोल आणशील?" विचारत त्याने पैसे आणि बाटली हातात दिली. शिकायचा पहिला दिवस वाया जाऊ नये म्हणत मीही तयार झालो. त्या काळात पेट्रोल ४५ रूपये होतं. पहिल्यांदा पेट्रोल, त्याचा रंग, सुगंध, पंप कुतूहलाने पाहिलं. बाटली भरुन पुन्हा गाडीकडे येईपर्यंत अर्धा तास गेला असेल. तेंव्हा तो जुन्या नोकीया मोबाईलवर कुणाला तरी सांगत होता,"हा-हा, मी एका पोऱ्याला पेट्रोल आणायला पाठवलंय". मी बाटली त्याला देऊन गाडीत बसलो. शिकवण्यासाठी एखाद्या मोकळ्या जागी जायचं असेल असा माझा अंदाज होता. पण दोन महिला गाडीजवळ आल्या. तेंव्हा "बाबू,आपण उद्या सुरू करू" म्हणाला, तेंव्हा अखेर बाबू हताश होऊन घरी आला.
'न कर्त्याचा वार शनिवार' म्हणत विषय सोडून दिला. माझी शिकण्याची खरंतर वेळ सकाळची होती आणि मालकाने वेगळ्या गाडीबद्दल सांगितलं होतं. सोमवारपासून आपण नक्की शिकू आणि चांगली गाडी वापरून चांगलं शिकू असं स्वतःला समजावलं.
सोमवारी लवकर उठून साडेसहाला पोहोचलो तर तीच गाडी तोच ड्रायव्हर!? यावेळी गाडी काही केल्या सुरूसुद्धा होईना. तिलाच दोघं ढकलत ढकलत शिवाजी तलावाशेजारी असलेला ४५ अंश चढ चढून दुकानापर्यंत आलो. दुकानमालक तर नव्हताच. चांगली गाडी न देता ही खटारा वाट्याला आली होती.
मी आयुष्यात पहिल्यांदा खर्या गाडीच्या ड्राइवरच्या जागी गाडी चालवण्यासाठी बसलो. विमानाचा पायलट झाल्यासारखं वाटलं. माझा गुरू हाच माझा पहिला 'को-पायलट' होता. त्यानेच चावी दिली आणि गाडी सुरू झाली. त्याने एक हात स्टेअरिंगवर ठेवला आणि योग्य ठिकाणी वळण देऊ लागला. मी त्याला प्रश्न विचारला तर चिडेल असा त्याचा सततचा चिडका चेहरा बघून वाटायचं. क्लच, ब्रेक, अॅक्सिलेटरबद्दल मला माहीत असूनही त्याने काहीतरी बोलावं म्हणून विचारलं. (इंजिनीअरींग शिकताना बर्याचदा वाचूनही त्याची फक्त स्पेलिंग पाठ झाली होती.)
तीन दिवस त्याच्या अंगात विक्रम गोखले शिरले होते. तो फार वेळाने कमी शब्द असलेलं एखादं वाक्य बोलायचा. खरंतर त्याला बोलता येतं याची अाठवण मला तेंव्हाच यायची. तीन दिवस काही शिकलो असं वाटलंच नाही. शिकवणार्याच्या पायाकडे सुद्धा क्लच-ब्रेक असतात हे काही इंजिनीअरींगमध्ये शिकवलं नव्हतं. इतकी फी भरून.... दगा झाला राजे.... दगा झाला.
रोज लवकर उठून पहिला पोहोचलो तर गाडी चढावावर ढकलत न्यावी लागते म्हणून नाइलाजाने एकदा उशिरा उठून उशिरा हजर झालो तेंव्हा एक गणिताचे सर ड्रायव्हिंग शिकायला स्वत:ची बॅच बदलून माझ्या बॅचला सामील झाले. मागे बसून त्यांना मी माझी समस्या सांगितली की सर हा ड्राइवर शिकवण्यासाठीचं काहीच बोलत नाही. गणिताच्या सरांनी नवा मंत्र दिला,"त्याच्या हातावर शंभर रूपये टेकव. मग बघ कसा पोपटासारखा बोलतो तो. मी पण हेच केलं." त्यावेळच्या पगारानुसार शंभर रूपये तर जड झाले पण तेच १०० रूपये २००० रुपये वसूल करणार होते.
पण आत्ता कुठे खरं शिक्षण सुरू झालं. तीन-चार दिवसात आत्मविश्वास असा आला की त्याला थेट म्हटलं, तुम्ही त्या क्लचवर पाय नका ठेऊ. काही दिवसांनी सकाळी सकाळी गाडी ढकलावी लागेल म्हणून मी आणि सर लपून रहायचो. खूप वेळ गेला की तो शोध नाही म्हटल्यावर पुन्हा गाडी ढकलायला जायचो.
शेवटचा दिवस. त्याच गाडीतून वडाळा इथल्या RTO आॅफिसपर्यंत त्यानेच गाडी चालवली. दोन तास वाट पाहिल्यानंतर तिथला अधिकारी आला. त्याच्यासमोर गाडी चालवायला सुरूवात करून रस्त्याच्या टोकाला गाडी वळवून पुन्हा मागे आलात की तुम्ही पास झालात.
इतकी सोपी परीक्षा! मला तर बंद पडलेली गाडी चढावावर ढकलत चालू करेन इतकं खडतर प्रशिक्षण मिळालेलं. दुचाकीसाठी आठचा आकडा काढावा लागला नाही. तिथे दिलेल्या चारचाकीला फक्त ड्राइवरच्या जागेकडे क्लच असताना, हासुद्धा माझ्यासारख्या प्रत्येक शिकाऊ ड्राइवरच्या शेजारी का बसायचा हा प्रश्न पडला. परवाना ( लायसन्स) मिळणारच अाहे या आनंदात गाडी चालवायला सुरूवात केली. गाडी चालवताना (बोलायलाही जमू लागलं म्हणून ) त्याच्याशी शेवटचं बोललो, "झालं ना सगळं ?" अगदी सरळ जाऊन टोकाला पोहोचलो अाणि गाडी वळवणार तेंव्हा तो पुन्हा म्हणाला,
" शंभर रूपये काढ. "
अजून काही विनोदी लेख :
Marathi Blog - मनात आलं म्हणून,
मराठी पुस्तक - पहिले पाऊल , सफरछंद
Online Books PDF on esahity.com : मुल्हेर ते साल्हेर, कधी सरस कधी कळस, गोरखगड ते सिद्धगड, अलंगाशी संग मदनाशी गाठ
लोकसत्ता 'ट्रेक इट' मध्ये भैरवगड, कलावंतीण , वैराटगड, आजोबागड आणि इतर लेख प्रकाशित.
धक्का द्या आणि गाडी शिका
Reviewed by Marathi Blog by Pankaj Ghare
on
May 19, 2020
Rating:
No comments: