अंड्यात जीव रंगला -विनोदी लेख

अंड हे बरेचजण खातात. अंड्यापासून अनेक पदार्थही बनतात पण त्याचे अनेक विनोदी पैलू आहेत.  तुम्ही खा किंवा नका खाऊ आता अंड तुम्हाला आता हसवू शकतं. 

अंड्यात जीव रंगला

marathi comedy blog on egg dishes

फ्रिजमध्ये सर्वात वरचं म्हणजे मानाचं स्थान असतं बर्फाला. बंद करताना लक्षात आलं की तेच मानाचं स्थान उजव्या बाजूला अंड्यांना मिळालंय. दिमाखात नि शिस्तीत उभी अंडी नजरेत भरली.

बाहेरून कडक आणि आतून गोड असलेल्या व्यक्तीला नारळाची उपमा देतात; पण तो गोडपणा देण्याआधी नारळ खूप भाव खातो ('अॅटिट्यूड' दाखवतो). पण अंडं कसं? फोडलं नि खाल्लं. हो हो. कच्चंसुद्धा. आगीचा उपयोग करायच्या आधी माणूस सगळं कच्चंच खायचा ना?  'भाग मिल्खा भाग' चित्रपटात मी फरहानला कच्चं अंडं दुधात मिसळून खाताना पाहिलं. ( मिल्खासिंग माझ्या फार आधी जन्माला आले होते. त्यांना नाही पाहिलं) .

जगातली सर्वात सोपी पाककृती...एक साधं अंडं नुसतं उकडायचं. तसा तर बटाटा पण उकडता येतो. पण अंड्याची साल किती सहज निघते ! फक्त रवी घुसळल्यासारखं केलं की कवच निघून स्पर्श न झालेला पदार्थ समोर.  ( वातावरणाशी संपर्क न झालेला दुसरा मानाचा पदार्थ म्हणजे इडली).  मग त्यातला पिवळा बलक नेमका कुठे हे कुतुहलाने शोधायचं. (चमच्याने शक्य असले तरी ) त्याचे चाकूने दोन भाग करायचे. त्या सपाट भागावर मीठमसाला कांदा फिरवून खाल्ला तरी पावासोबत खाल्ला तरी आणि नुसताच खाल्ला तरी चालेल; पण नुसता बटाटा काही पावात ठेवून खाता येत नाही. पावाशी युती होण्यासाठी बटाटावडा हे रूप मिळेपर्यंत त्याला बरेच प्रयत्न करावे लागतात. उकडलेलं अंडं कशातही पडलं तरी ते विरघळत नाही. बिस्कीट-खारीसारखं जास्त वेळ भिजलं की अंड्यांची अस्तित्वाची लढाई संपत नाही.
marathi comedy blog on egg recipe
अंड्यांपासून केलेला जगभर माहीत असलेला तेल वापरून केलेला पदार्थ म्हणजे आम्लेट. कपात मीठासोबत फेटून किंवा थेट तव्यावर आतला द्रव पसरवून आम्लेट तयार.  अशी तर चपाती सुद्धा नाही बनत.  शिवाय ती गोल असावी अशी जागतिक अपेक्षासुद्धा आम्लेट बनवणाऱ्याकडून नसते. डिस्कव्हरी वाहिनीवर पाहिलं होतं की अंडी फोडून आतील कवचावर पाण्यात बुडवलेलं बोट फिरवलं की सगळा द्रव पूर्णपणे बाहेर येतो. ( परदेशी लोकांनी सांगितलं की वेगाने खरं वाटतं ना).

आम्लेट बनवताना कुणी मसाला, कांदा, लसूण, कडीपत्ता, कोथिंबीर  त्यावर पसरवली; पण कदाचित सवयीप्रमाणे त्याने ढवळाढवळ केली असावी आणि त्यातून बुर्जीचा शोध लागला असावा. मोठमोठे शोध असेच लागतात. आंघोळ करताना,  डोक्यावर सफरचंद पडल्यावर, गायीचं दूध काढताना, वगैरे वगैरे. बुर्जीमध्ये दोन प्रकार जुळ्या बहिणीसारखे आहेत. एकीला हळद लावलेली आवडते तर दुसरीला लाल मसाला. बुर्जी बनवणंसुद्धा किचकट काम नसलं तरी अंडं फोडल्यानंतर ते वेगाने मिसळावं लागतं. नाहीतर भजीच्या आकाराचे गोळे बनतात. अंड्यातील द्रवाचे कण जितके जास्त वेगळे होतील तितका बुर्जी बनवणारा स्वयंपाकघरात जास्त वेळ घालवलेला समजावा. लग्नासाठी मुलगी बघताना कांदेपोहे ऐवजी बुर्जी बनवून आणण्याची पद्धत असावी.

मुलांसाठी सुद्धा ही अट असावी. मला बुर्जी बनवता येते पण आता माझं लग्न झालंय. 

अंड्यांचं सार किंवा अंडाकडी ही आधी सांगितलेल्या पदार्थांपेक्षा वरच्या दर्जातलं जेवण बनवणाऱ्यांसाठी आहे. इतर आमट्या किंवा कडी बनवणाऱ्यांना हा मसालेदार पदार्थ बनवता येणं शक्य आहे. या सारात अंडं फोडून टाकलं तर, ( घराला घरपण येतं तसं) पूर्ण कडीला 'अंडंपण' येतं. उकडलेलं अंडं कापून सपाट अर्धा भाग वर राहील अशी रचून ठेवल्यास पिवळ्या बलकामुळे पदार्थात एक नैसर्गिक रांगोळी दिसते.

अंडाबिर्याणी हा प्रकार तसा हॅाटेलवाल्यांनी आम्हाला बरंच काही बनवता येतं हे सांगत बराच सुखा भात देऊन'गि-हाईक' बनवण्यासाठी केलेला पदार्थ आहे. अंडाकडी भातात कालवली तरी अंडाबिर्याणी बनतेच. खणार्‍याला तशी ती बनवता आली पाहिजे . उकडलेलं अंडं उकडलेल्या भातात ठेवलं तरी ते एकजीव होत नाहीत.जिरं  जसं भातात जिरतं तसं अंडं भातात अंडलं किंवा जिरलं असं कधी झालं नाही.

अंड्यांचा वापर करून बनवलेला सर्वात लोकप्रिय पदार्थ म्हणजे केक. अहाहा.  (देव कसा? असतो पण दिसत नाही तसंच,) अंडं हे केकमध्ये असतं पण दिसत नाही. ( देव आहे की नाही आणि केकमध्ये अंडं आहे की नाही याची चर्चा होत असते.)

अंडं हा एकच पदार्थ आहे जो पाव, चपाती, भाकरी, पराठामध्ये, भात या कुणासोबतही आणि कोणासोबत न जाता स्वतंत्र पक्ष काढून नुसतासुद्धा खाता येतो. तो नूडल्ससोबत आणि नूडल्स बनवताना त्यात बुर्जीप्रमाणे बनवता येतो. ते स्वाभिमानीसुद्धा आहे आणि मिळून-मिसळूनही राहतं!

उत्तरपत्रिकेत कधी शून्य मिळाले तर भोपळा मिळाला असं म्हणतात पण भोपळ्याच्या आकाराचा शून्य मी पाहिला नाही. जगाची निर्मिती शून्यातून झाली आहे. अंडयांतूनसुद्धा नवीन जीव जन्माला  येतो. भोपळ्यातून येतो का?  नाही. खूप वेळ बसून असलेल्या व्यक्तीलासुद्धा 'इतका वेळ अंडी उबवत होतास का?' असं आपलेपणाने विचारलं जातं.
बसमध्ये बसून बसून मीसुद्धा हेच केलं.

अजून काही विनोदी लेख :  

मराठी पुस्तक  - पहिले पाऊल , सफरछंद 
Online Books PDF on esahity.com : मुल्हेर ते साल्हेर, कधी सरस कधी कळस, गोरखगड ते सिद्धगड, अलंगाशी संग मदनाशी गाठ  
लोकसत्ता 'ट्रेक इट' मध्ये भैरवगड, कलावंतीण , वैराटगड, आजोबागड आणि इतर लेख प्रकाशित.
अंड्यात जीव रंगला -विनोदी लेख अंड्यात जीव रंगला -विनोदी लेख Reviewed by Marathi Blog by Pankaj Ghare on May 19, 2020 Rating: 5

No comments:

मनात आलं म्हणून

मनात आलं म्हणून
थोडं माझ्याविषयी
Powered by Blogger.