आठवणीतील विनोदी कांदेपोहे

लग्नासाठी स्थळ पाहताना 'कांदेपोहे'चा कार्यक्रम करताना,  अनेक विचित्र अनुभव येतात. त्यापैकी एक विनोदी अनुभव 

आठवणीतील कांदेपोहे 

marathi wedding blog discussion between boy and girl
इतरांच्या लग्नाचा विषय सुरू असतोच तेंव्हा मी पाहिलेल्या मुलींसोबतचे चमत्कारीक अनुभव सांगून धीर देतो. प्रत्यक्ष प्रसंगानंतर मी फार हसलो होतो. तोच विनोद वारंवार सांगून त्याचा प्रभाव कमी होतोय किंवा मी विसरतोय म्हणून मनात आलं की हा प्रसंग सर्वांना सांगूया. (हा लेख लिहत असताना एकदा दूध उतू गेल्याचं बायकोने सांगितलं.)

मी सर्वात पहिल्यांदा जिला भेटलो त्या मुलीसाठीसुद्धा (तिच्या म्हणण्याप्रमाणे) मी पहिलाच होतो. आपण अजून काही 'Options' बघूया असं म्हणत आमची बोलणी थांबली. दुसर्‍या एका मुलीला मी किती वेगात कठीण मराठी बोलतो असं वाटलं. तिचं इंग्रजीतून शिक्षण झालेलं; पण पप्पा म्हणाले की पत्रिका छान जुळते म्हणून ती भेटायला आली होती. ( एक वर्षाने पुन्हा तिच्या पप्पांचा फोन आला तेंव्हा आम्ही आधी भेटलो होतो असं मी त्यांना सांगितलं.)  यानंतर हे मी तिसरं स्थळ बघणार होतो.


Internet Websiteवर त्या मुलीची Request आली. नाव, उंची, वय, शिक्षण, नोकरी, फोटो, जेवणाची सवय ( मांसाहारी ही माझी अपेक्षा), कोणतेही व्यसन नसावं अशा अपेक्षांसोबत कलेची आणि / किंवा प्रवासाची आवड असेल तर उत्तम असा मला नेहमी वाटायचं. या तिसर्‍या मुलीच्या माहितीमध्ये या सर्व गोष्टी होत्या. मी तिची Request स्वीकारली. मे महिनाअखेर तिची परीक्षा संपत आलेली. तोपर्यंत थांबाल का अशा विनंतीला मीही 'आठवडाभर गावी असेन' असं उत्तर दिलं. तिचा नंबर Save केला नि विषय सोडून दिला. मधल्या काळात गावी असताना फार कमी वेळा Internet असायचं. (तेव्हा 'Jio' नव्हतं); पण 'Whatsapp'च्या Statusवर तिने लिहिलेला 'AMBADNYA' (अंबज्ञ) हा शब्द वाचला होता. त्यामुळे माझा एक अपेक्षाभंग होऊन गावाहून आल्यानंतरही महिनाभर काहीच विशेष बोलणं माझ्या पुढाकाराने झालं नाही. तरीही अचानक एक दिवस भेटायचं ठरलं. मी एकटाच आणि ती, तिच्यासोबत तिचे बहीण-भावोजी, त्यांचं बाळ एका हॉटेलात शिरलो. चहा आणि फिंगर Chips ची Order दिली. बोलणी सुरू.
   " तुमचं Wedding Profile पाहिलं आम्ही. आवडलं. छान आहे."- भावोजी.
   " तुम्ही Regular Trekkingला जाता का ? कधीपासून आवड आहे आणि कधीपर्यंत करणार हे ?" - मुलीची ताई.
   " झाली आता पंधरा वर्षं . शंभरेक Trek झाले असतील. जवळपास ३५० किल्ले आहेत फक्त महाराष्ट्रात." -मी.
   " तुम्हाला भीती नाही वाटत ?" - ताई.
  " नाही. उलट जाऊन जाऊन भीती कमी झाली आणि मी कधीच पडलो नाही म्हणून कदाचित इतकं जात राहिलो".
   " म्हणजे काय जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत जाणार का? "- मुलीला कंठ फुटला.
   मी ताईकडे बघत काही बोलणार तितक्यात ताईने तिला कोपर मारून "अगं जरा नीट बोल" म्हणाली. दोघींच्या चेहर्‍यावर राग होता.
    साहजिकच मला आश्चर्य वाटलं. मी म्हटलं, " यांचं Wedding Profile पाहिलं मी. पण मला नेमकं समजलं नाही."
   तिने Commerceचं दुसरं वर्ष पूर्ण करून Scienceमध्ये शिक्षण पूर्ण केलं होतं त्यानंतर ती A.M.I.E. (इंजिनिअरिंगच्या पदवीला समांतर) परीक्षा देत होती. 


या शिक्षणाबद्दल माझा गोंधळ होताच. पण मी मला न पटणार्‍या मुद्दयाला हात लावला. मी सांगितलं,"हे बाबा, बापू, अम्मा, महाराज, आई, माँ यांना मानणार्‍या लोकांशी माझं नाही जमत. ते 'अंबज्ञ' लिहिलेलं पाहिलं म्हणून सांगतोय."
   "का असं ?" - ताई.
   "ते लग्न झालेल्या बायका स्वत:च्या नवर्‍याचा फोटो गळ्यात न घालता या लोकांचा फोटो मंगळसूत्रात घालतात ते विचित्र दिसतं." - मी
    पुढच्याच क्षणी "तू आज नाही घातलंस ना ?" म्हणत ताईने तिचा गळा तपासला.
  "पण आम्ही समाजसेवापण करतो. त्यांच्यामुळे ती संधी मिळते" -ती.
    " समाजसेवा करायची असेल तर मग थेट करायची ना, हे लोक कशाला पाहिजेत मध्ये?"
     "त्यांचं चांगलं असतं. आम्ही पवई तलावला गणपती विसर्जनालासुद्धा स्वयंसेवक म्हणून जातो."
    " हेच तर. जिथे भरपूर गर्दी असते तिथे त्यांचं नाव दिसावं आणि त्यांचे भक्त वाढावेत म्हणून लोकांना वापरतात", मी माझं मन मोकळं केलं.
     " पण शिकायलासुद्धा मिळतं तिथे. माझा Disaster Managementचा Course पण झाला तिकडेच" -ती.
     " हां. ही एक चांगली गोष्ट आहे. २६ जुलैच्या पावसानंतर मीपण हा Course केला होता. पण तो सरकारतर्फे होता."- तिची, तिच्या संस्थेची नि सरकारची मी स्तुती केली.
    थोडा वेळ गेला.
   "तर तुम्हाला प्रवासाची आवड आहे तर " - भावोजी.
   " कुठपर्यंत प्रवास आणि Trek केलाय तुम्ही ?" - ताई.
   " हिमालय, सह्याद्री, लडाख, ताडोबा,थोडासा दक्षिण नि उत्तर भारत."- ती कंटाळेल म्हणून मी थोडक्यात उत्तरलो नाहीतर १०० गडांची नावं सहज सांगितली असती.
  "आम्ही इतके नाही फिरलो.पण हिला पण फिरायची आवड आहे. कुठे जातेस गं तू सेवेला ?" - ताई.
   "कर्जत " - ती.
    हे उत्तर ऐकुन माझ्या हातातला काचेचा ग्लास फुटला असता.
   " अहो, तुमचा प्रवास जिथे संपतो तिथे माझा सुरू होतो " सहज अमिताभच्या Dialogशी जुळलेलं वाक्य ऐकून माझ्याबरोबर भावोजी हसले.
    भावोजी - " ठीक आहे. तुम्ही दोघं बोलून घ्या. Treking  आणि अनिरुद्ध बापू कसं जुळतंय बघा."


   भावोजी, ताई बाळाला घेऊन गेले. आता तिला मोकळीक मिळाली.
   "मला एक सांगा की फक्त मीच का तुम्हाला फोन करायचे. तुमच्याकडून एकही फोन नाही. असं का?"
    "आता तुम्ही केला नि बोलून झालं की पुन्हा का फोन करू? आणि एकदा भेटल्यानंतर मग फोनवर बोलायला काही हरकत नाही. आणि मी मीही बोलत नाही जास्त फोनवर. समोरासमोर खूप बोलतो."
    "ते दिसतंच आहे ". - ती. " बरं, मी तुमची पत्रिका पाहिली आणि मला तुमच्याबद्दल एक गोष्ट कळली. "
    " मी पत्रिका नाही मानत; पण बोला तुम्ही."-मी.
    " तुम्हाला पटकन राग येतो. येतो ना ? नाही असं होणारच नाही."-ती.
     ही वाक्यं इतकी वेगात होती की, Finger Chip काही क्षण तोंडाकडेच येऊन थांबला. मी - "आता तुम्ही म्हणता तर असेन रागीट." 
    "आणि तुमचे केस इतके कमी आहेत. तुम्ही त्याचं काही करणारही नाही. बरोबर ?"- ती.
   " बरोब्बर "- ठामपणे मी.
    "कारण तुम्ही कंजूष आहात."
    "अहो, प्रवासावर इतका खर्च करणारा माणूस कंजूष कसा असेल ?" कंटाळा येत मान हलवत बाहेर पाहिलं तर बाहेर पाऊस सुरू झालेला.
    "अहो तुमच्या पत्रिकेत लिहिलंय असं."- ती.
    "पत्रिकेवर किती विश्वास आहे तुमचा?"
   " मला ज्योतिषशास्त्राचीसुद्धा आवड आहे." - ती.
   " अच्छा. मग समजू शकतो." - मी, "कधीपासून आवड आहे ?"
   " जास्त नाही. पण तुमची पत्रिका पाहिली ना तेंव्हापासून मी बर्‍याच मुलांच्या पत्रिका बघायला लागली. मग मला पण हळूहळू कळायला लागलं."- ती.
    " मग तुमचं भविष्य काय?" - मी.
    " नाही. मी पाहिलंच नाही." -ती.
    " बरं मला तुमच्या शिक्षण नि Career बद्दल सांगा. Commerce, Science, A.M.I.E असे इतके बदल कसे ?"
    ती म्हणाली, "मी जिथे नोकरी करत होते तिथल्या बॉसने सांगितलं सायन्स घ्यायला. मग Promotion झालं असतं."
   " मग झालं का प्रोमोशन ?" - मी.
   " नाही ना ते एक्सपायर झाले. मग मी पण Job सोडला. "
   " अच्छा. मग आता हे A.M.I.E. का करताय ?"
  " माझा इथला बॉस म्हणाला म्हणून."
   " तुम्ही बॉसचं ऐकून का शिक्षण घेताय ?"
   " अहो. कोणी गाईड करणारं नाही. ताईचं पण लग्न झालं तर आता कोण करणार ना गाईड."
   " किती वर्ष मोठी आहे ताई आणि बाकीची भावंडं किती लहान?"
   " ताई ४ वर्षं मोठी ( म्हणजे वय ३३),मग मी, माझ्या लहान बहीणीचं वय २२ ती शिकतेय आणि भाऊ दहावीत आहे ( म्हणजे वय १५)."
     "मग सध्या कमवणारे तुम्ही आणि तुमचे वडील."
    " हो आणि मला एक सांगायचं होतं. मला Actingची आवड आहे. तर लग्नानंतर मी नाटक-Serialमध्ये काम केलं तर चालेल ना ?"
     बाहेर पावसाचा जोर वाढला. मित्रच तो. मी बाहेर पडू नये म्हणून थांबायला तयारच नव्हता. संकटातून बाहेर काढायच्या आधी मजा घेत होता.
     तिला नकार द्यायचं पक्क झालेलं पण मी म्हटलं, "होहो. का नाही. मला खरंच कलेला प्रोत्साहन द्यायला आवडतं."
   "आणि माझी आई पण म्हणते की मी Serialमधल्या Villain चं काम छान करेन"-ती.
  "हा. हे मात्र तुमची आई परफेक्ट बोलली."- तिच्याबद्दलच्या माझ्या मताला चक्क तिच्या आईचा पाठिंबा !!
    मला ती आवडली नाही हे तिला समजलं पण हरामखोर पाऊस काही केल्या थांबेना. त्या दिवशी पहिल्यांदा झी मराठीवर ' कट्यार काळजात घुसली' दाखवणार होते. पण पावसामुळे चर्चा चालू राहिली.
   " आणि अजून एक. मी नेहमी टी-शर्ट जीन्स घालते. हे असलं घालत नाही मी. आई-पप्पा म्हणाले म्हणून घातले हे" -ती.
    " पण यात वाईट काय ? चांगला तर आहे."
    " खरंच चांगला आहे ?"-ती.
    " हो. " -मी. पिवळ्या पंजाबी ड्रेसवर एम्ब्रॉयडरी होती.
    " आणि मी फक्त स्पेशल डिशेसच बनवते. मला डाळ भात बनवायला नाही आवडत. आज पण मी चिकन बिर्याणी बनवली होती."-ती.
    " अहो मग आणायची ना, मला तुम्ही जेवण कसं बनवता तेसुद्दा कळलं असतं".
     ती लाजली.
    " अहो खरंच. तुमच्या ताई नि भावोजींना पण मिळाली असती ना."
    " तुम्ही हे इतकं मराठी का बोलता; म्हणजे हे भावोजी काय आहे? आम्ही जिजू बोलतो. तुम्ही नेहमी असंच मराठी बोलता ? का ?"
    " मग काय ? मी जसं मराठी बोलतो मला त्याचा अभिमान आहे." माझे दोन्ही हात भाषण देताना रूंदावतात तसे आपोआप पसरले.
   "तुम्ही हे Trekkingला जाता तर तुम्हाला सापाची भीती वगैरे नाही वाटत ?"- ती.
   "नाही हो. उलट मी त्या सापाचे फोटो काढतो. " म्हणत मी सोंडाई किल्ल्यावर रात्रीच्या Trekमध्ये काढलेला सापाचा फोटो दाखवला. तेंव्हा तिला खरं वाटलं.
   " पण तुम्ही हे बाहेरचं खाता. कुठलंपण पाणी पिता ते नंतर नाही चालणार "- ती.
   "हो पण त्याच्याशिवाय आपल्याला गावातले Problems कसे कळणार ? आणि तुम्ही जर Disaster Managementचा Course केला तर तुम्हाला पण असं खाता-पिता आलं पाहिजे" मुलगी निरूत्तर झाली. 

   पाऊसही निरूत्तर झाला. Finger Chipsचा कंटाळा आला. ते बटाटे गोडूस होते. सोबतचं दही चांगलं होतं. फक्त बोटाने खाण्यापेक्षा Finger Chipsसकट दही खाल्लं. या मुलीमुळे वेळ वाया गेलाच होता पण किमान पैसे तरी वाया जाऊ नये म्हणून मी ते संपवलं. ती हात धुवायला गेली तेंव्हा माझा Advanced मनोज कुमार झालेला. म्हणजे काय ? ते एका हाताने चेहरा लपवायचे मी माझा चेहरा दोन्ही हातांनी लपवलेला.

   मी खूप खुशीने बाहेर पडलो; कारण 'कट्यार काळजात घुसली' सूरवातीपासून बघायला मिळणार होता. तोपर्यंत ही कट्यार माझ्या डोक्यात घुसली. साहजिकच मी नकार दिला.

    नकारानंतरची कहाणी वाचकांच्या प्रतिसादानंतर. खालील लिंकवर.



अजून काही विनोदी आठवणी  :  

मराठी पुस्तक  - पहिले पाऊल , सफरछंद 
Online Books PDF on esahity.com : मुल्हेर ते साल्हेर, कधी सरस कधी कळस, गोरखगड ते सिद्धगड, अलंगाशी संग मदनाशी गाठ  
लोकसत्ता 'ट्रेक इट' मध्ये भैरवगड, कलावंतीण , वैराटगड, आजोबागड आणि इतर लेख प्रकाशित.
आठवणीतील विनोदी कांदेपोहे आठवणीतील विनोदी कांदेपोहे Reviewed by Marathi Blog by Pankaj Ghare on May 19, 2020 Rating: 5

No comments:

मनात आलं म्हणून

मनात आलं म्हणून
थोडं माझ्याविषयी
Powered by Blogger.