श्रीनगर ते सोनमार्ग हा प्रवास 15 ऑगस्ट या दिवशी केला. त्या दिवशी कर्फ्यू होता. कर्फ्यूच्या दिवशी केलेला प्रवास आणि अनुभव
Marathi Blog - मनात आलं म्हणून
लक्षातला स्वातंत्र्यदिन
तिरंगा |
बरीच वर्षं (म्हणजे ३ वर्षे) मोठा Trek केला नव्हता. Trek अशा ठिकाणी करावा जिथे फारसं कुणी गेलं नसेल अशी माझी वृत्ती. आधीच आव्हान माहीत असेल तर मजा निघून जाते किंवा कमी होते. Trekला जोडून जिथे प्रवास होतो त्या ठिकाणची खास वस्तू, वास्तू, कला, माणसं, अन्न कायम लक्षात राहतं.
'सोन'मर्ग इथे 'द् काश्मीर ग्रेट लेकस्' इथे Trek करायचा ठरवलं. नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर पुढील नोकरीत रुजू होण्याआधी काही दिवस फक्त Trekसाठी म्हणजे आनंदाने मोकळेपणाने जगण्यासाठी द्यायचं ठरलं. दिवस: २०१७ चा १५ अॉगस्ट.
थेट काश्मीरमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा करून मग सोनमर्गला Trek करायचा बेत आखला. विमानाने श्रीनगरला उतरलो. त्या विमानातून जितके जण उतरले त्या प्रत्येकाने पुढील प्रवासासाठी वाहनाची सोय केली होती. सर्वचजण विमानतळाहून निघून गेले आणि त्या सकाळी दहा वाजता मी एकटा उरलो. पुढे सोनमर्गला जाण्यासाठी बस स्टँडचा रस्ता धरला. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर एका स्थानिकाला विचारले. त्याने म्हटले, "आज १५ अॉगस्ट है, इसलिये नही आयेगी शायद।" काहीसा गोंधळलो. पुन्हा विमानतळाकडे जाऊन टॅक्सीबद्दल विचारले. आठजणांसाठीचे वाहन असल्याने मला एकट्यालासुद्धा ₹ ३,६००/-सांगितले.
परवडणारे नसल्याने विमानतळापासून शहराच्या दिशेने चालत जाऊ लागलो. वाटेत अनेक वाहने तोच भाव सांगण्यासाठी थांबले अाणि माझा नकार ऐकून गेले. मात्र एकाने विमानतळापासून बंदीपुराला ३०० रूपयात सोडतो. तिथून बर्याच गाड्या 'सोनामार्ग'ला जातील म्हटलं. त्याच्यासोबत कमीतकमी मोठ्या बसस्टँडवर तरी पोहोचतो म्हणत निघालो. वाटेत अनेक सहप्रवासी चढले. लांबलचक पेहराव आणि मोठी दाढी असलेल्या अनेकांनी एकत्र गाडी थांबवली. त्यांच्या भाषेत काहीतरी संभाषण झालं. माझ्यासाठी काही वेगळी वाक्यं झाली. ती 'सोनामार्ग'शब्दामुळे कळली. सहप्रवासी उतरल्यावर चालकाला आज बस नसण्याचं नेमकं कारण विचारलं. तर तो म्हणाला, " आज वो १५ अगस्त है ना तो आज बंद है ।"
बोंबला आता. बंदच्या दिवशी मी चक्क श्रीनगरमध्ये ? आजच्या अाज मला सोनमर्ग नव्हे सोनामार्गला पोहोचायचं तर आहेच. नाहीतर १० दिवसांचा Trekचा बेत रद्द.
मी सहज चालकाला विचारलं, "आपको क्या लगता है, क्या होना चाहिए ?" तो म्हणाला,"देखो, यहां के लोग जो है ना, वो ना तो हिन्दुस्तान में रहना चाहते है ना पाकिस्तान में।" मी शांत झालो. इथे भारताला केवळ 'हिंदुस्थान' आणि स्वातंत्र्यदिनला केवळ '१५ अगस्त' म्हणतात इतकं कळलं.
'बंदीपुरा'ला उतरलो. तर तिथे सर्व प्रकारच्या गणवेशातील जवान रस्त्यावर होते. वाहन तर एकही नाही. श्रीनगर ते सोनामार्ग हे ३ तासांचं अंतर आज दिवसभरात काही शक्य अाहे असं वाटत नव्हतं. टीव्हीवर पाहिलेले काश्मिरी नागरीक गटागटांमध्ये उभे होते. काहीजण माझ्या बाजूने जात त्या गटात सामील होत. सर्वांची दाढी मोठी होती. यातला आतंकवादी कोण ? आणि मला कोणी किडनॅप करेल का ? असा प्रश्न पडला. बाईकने सोनामार्गच्या दिशेने जाणार्या एकाला त्याची कमी दाढी पाहून हात दाखवला. त्याने लिफ्ट दिली.
बाईकवर असताना तो म्हणाला, " ये इन लोगों से परेशान हैं हम। ये इन लोगों को पॉलिटिशियन लोगो ने भडकाया है । हम लोग तो ये कुछ चाहते ही नहीं।" याने मला एका चौकात सोडलं आणि म्हटलं," यहॉं से आपको सोनामार्ग के लिये गाडी मिलेगी।" इथे बरेच जवान बॅरिकेड्स मागे उभे होते. सुरक्षित वाटावं म्हणून बंदोबस्ताला उभ्या असलेल्या जवानाला विचारलं, सोनामार्गला कसं जाऊ ? त्याने विचारलं, "मुस्लिम हो या नॉन मुस्लिम ? " मी, " नॉन मुस्लिम." जवान उत्तरला, "तो फिर आप किसी हॉटेलमें ठेहर जाओ। मैं भी नॉन मुस्लिम हूॅं । इसलिए कहता हूं ।"
मी त्या जागेहून सोनामार्गच्या दिशेने निसटण्याचा निर्णय घेतला. बर्याच बस आणि इतर वाहनांनी नकार दिल्यानंतर एका रिक्षात बसलो. रिक्षाचालक म्हणाला," मैं जहॉं आपको छोडूंगा, वहां से आपको सोनामार्ग जाने के लिए बहोत गाडीया मिलेगी।" इथल्या बंदची सर्वांना सवय अाहे म्हणाला; पण त्याने एक खात्री दिली. "आप टुरिस्ट हो ना, तो आपको कोई कुछ नही करेगा जनाब। और अगर आपको कुछ होता है तो माहोल बिघड सकता है, सबको प्रोब्लेम होगी।" काहीसा दिलासा मिळाला. त्याने एका चौकात आणून सोडलं. इथे सर्व दाढीवाले फक्त माझ्याकडे पाहत होते. मी एकटाच तुळतुळीत चेहर्याचा म्हणजे परप्रांतीय होतो. शिवाय पाठीवर मोठी Trekkingची बॅग अजून संशय निर्माण करतेय असं माझं मलाच वाटत होतं.
बर्याच वाहनांना हात दाखवून थांबण्याची विनंती केली. जो निघून जातोय तो मला घाबरून जातोय आणि जो थांबला तो आतंकवादी तर नाही ना असं वाटायचं. पण इथून निघायचंसुद्धा होतंच. एक मालवाहू रिक्षा ( छोटा हत्ती ) थांबली. छत नसलेल्या त्या वाहनात आडवा झालो. थोडं फिल्मी वाटत होतं. फक्त आकाश माझ्या ओळखीचं होतं. इथे बहुतेक घरांवर जम्मू- काश्मीर राज्याचा नकाशा असायचा. तो पूर्णपणे हिरव्या रंगाने रंगवलेला असायचा. खूप वाईट वाटायचं. एखादं चित्र समाजाचं असतं की समाजासाठी असतं याचा गोंधळ होत होता.
एक प्रवासी म्हणून महाराष्ट्र आणि भारताचा नकाशा माझ्या डोळ्यांसमोर नेहमीच असतो. या प्रवासातही होताच. सोबतच पाकिस्तानचा नकाशा बसलेल्या कुत्र्यासारखा दिसतो अशी पोस्ट फेसबुकवर पाहिली होती तीही आठवली; पण त्या चित्रातल्या कुत्र्याचा चेहरा हा तेंव्हाच होतो जेंव्हा भारतातल्या नकाशाचा काश्मीरचा भाग पाकिस्तानला जोडला जातो हे भारतीयांना माहीत असावं. कारण फक्त पाकिस्तानवर हसण्यासाठी बर्याच जणांनी ते like / share केलं होतं. असो.
तर प्रवासात कुणी सोबत नव्हतं. संशयाने पाहणारे दाढीवाले चेहरे सोडून. दोन तासांनी रिक्षा थांबली. पुलावर जवानांना पाहून यापुढे मी जाऊ शकत नाही म्हणाला. इथून पुढे एका गावात चालत जाण्यास त्याने सांगितले. त्या आधी पहिल्यांदा एक दुकान उघडं दिसलं. दोन बिस्किटचे पुडे, एक वेफरचं पाकीट आणि एक पाण्याची बाटली विकत घेतली. रस्त्यावर मी एकटाच. कोणत्याही वयाच्या पुरूषाला घाबरत.
एका ठिकाणी स्पीकरचा सूचनांचा आवाज आला. एका भिंतीबाहेर आणि प्रवेशद्वारापाशी बरेच जवान उभे होते. कारण आतल्या मैदानात एका शाळेत स्वातंत्र्यदिन साजरा होत होता. शाळेबाहेर त्याला '१५ अगस्त' इतकंच म्हणतात. शाळेपुढे बरंच चालल्यानंतर पुन्हा एका मोठ्या बस स्टॉपकडे उभा राहिलो. पुन्हा सगळं तेच चित्र.
माझ्यासोबत तिथला एक स्थानिक रहिवाशी वाहनाची वाट पाहत होता. त्याला माझा प्रवास सांगितला आणि आजच पोहोचणं किती महत्त्वाचं तेही सांगितलं. स्टॉपवर इतर सर्व प्रवाशांनी वाहनांना हात दाखवला, वाहन थांबलं आणि ते निघून गेले. पण ज्याच्याशी बोललो त्याने वाहन थांबवलं आणि त्याला विनंती केली, " इनको इनके मंजिल पे छोड दो।"
वाहनचालकाला मग माझी कहाणी सांगितली. तो म्हणाला,"आपने गलत दिन चुना जनाब।" मी म्हटलं, "अभी मे 'सोना' चाहता हूं।"
त्या वाहनात बसून मग थेट सोनमर्ग गाठलं..... नव्हे 'सोना'मार्ग गाठलं.
अधिक वाचा
Marathi Blog - मनात आलं म्हणून,
मराठी पुस्तक - पहिले पाऊल , सफरछंद
Online Books PDF on esahity.com : मुल्हेर ते साल्हेर, कधी सरस कधी कळस, गोरखगड ते सिद्धगड, अलंगाशी संग मदनाशी गाठ
लोकसत्ता 'ट्रेक इट' मध्ये भैरवगड, कलावंतीण , वैराटगड, आजोबागड आणि इतर लेख प्रकाशित.
लक्षातला स्वातंत्र्यदिन -काश्मीर
Reviewed by Marathi Blog by Pankaj Ghare
on
May 19, 2020
Rating:
No comments: