इंडियन आयडॉल - माझा अनुभव

रिअॅलिटी शो  मध्ये मी एकदा भाग घेतला होता, माझ्यापेक्षा चांगले गाणारे माझ्या आधीच बाद झाले होते नि माझ्यापेक्षा वाईट गाणारे पुढची पायरी चढत होते, तो अनुभव:

इंडियन आयडॉल - माझा अनुभव

marathi blog on singing reality show
वर्ष २००५. नुकताच इंजिनिअरिंगचा डिप्लोमा पूर्ण झाला होता. त्याचवेळी पहिलं 'इंडियन आयडॉल' संपलं तेंव्हा गायन क्षेत्रात आपण नक्की करिअर करूच शकतो असं अनेकांना वाटू लागलं होतं आणि ( कदाचित इंजिनिअरिंगमुळेसुद्धा ;-) मीही त्यातलाच एक होतो. आजही आहे.

पण त्यावेळी माझ्या पहिल्या नोकरीत सुद्धा रुजू व्हायचं होतं आणि ज्या विषयात डिप्लोमा केला तेच आयुष्यभर करायचं असा अलिखित नियम माहीत झाला होता. नाहीतर इंजिनिअरिंगची एक सीट वाया घालवलीस असा आरोप झाला असता. हाच आरोप मी स्वत: अनिल कुंबळेवरसुद्धा करायचो.असो. पण कायम लक्षात राहिलेला तो अनुभव आज सांगावासा वाटतोय
इंडियन आयडॉल -२ सुरू होणार पण कधी ते माहीत नव्हतं. अशावेळी 'फेम गुरूकुल' नावाचा गायनाचा नवा रिअॅलिटी शो आला, त्याचा विजेता 'काझी तौकीर' झाला, जो निवडलेल्या १२ जणांमध्ये सर्वांत वाईट गात असे. आजचा सुपरस्टार 'अरिजित सिंग' त्या स्पर्धेत चौथा की पाचवा असेल. तो शो पुन्हा झालाच नाही. 'यु ट्युब'वर सुद्धा अरिजितची गाणी तो इंडियन आयडॉल मध्ये होता असं शोधल्यावर मिळेल. हा शो संपता संपता 'इंडियन आयडॉल-२' ची पहिली जाहिरात आली आणि मी उत्साहाने कामाला लागलो.

सर्वात पहिली गरज होती ती नावनोंदणीची. आणि त्यासाठी हवा होता मोबाईल. शिवाय फक्त एयरटेलचा मोबाइल नंबर हवाच होता. १५०/- रूपयांच्या  महिन्याचा रीचार्ज केला की चक्क महिनाभर इनकमिंग फ्री (?) होतं. ( हच ( वोडाफोन) का छोटा रिचार्ज अजून आला नव्हता.)

पहिला पगारसुद्धा झाला नाही आणि मोबाइल घ्यायचा ? हे काहीसं विचित्र होतं. पण स्पर्धेत भाग घ्यायचा म्हणून मामाच्या मित्राकडून १९९८ की १९९९च्या काळातला 'मोटोरोला'चा मोबाईल घेतला जो शाळेतल्या कंपास बॉक्ससारखा दिसायचा. फक्त कॉल, मेसेज, घड्याळ, फोन डायरी आणि सेटींग्स. त्यातली केवळ एक सेटींग माझ्यासाठी महत्त्वाची होती. मी चक्क मोबाइल वापरतोय हे घरी कळू नये म्हणून तो सायलेंट ( की सायलंट ) मोडवर नेहमी असायचा.

रजिस्ट्रेशनसाठी कॉल केल्यावर तीन की पाच रूपये गेले. रजिस्ट्रेशन झाल्याचा मेसेज आला आणि त्य‍ा मोबाइलचे पैसे वसूल झाले. अॉडीशनची तारीख अजूनही आठवतेय. ६ ऑक्टोबर २००५. माझ्याकडचे बेस्ट कपडे घालून मी अंतिम १० मध्ये असणारच अशा आवेशाने आईच्या पाया पडून घराबाहेर पडलो. रविंद्र नाट्यमंदीर गाठलं. बाहेर बघतो तर माझ्यासारखे हजारो जण !! प्रत्येक रांगेत किमान एक स्पर्धक असा होता ज्याच्या गायनाला घरून विरोध होता काहीजण असे की ज्यांना घरून बळजबरीने पाठवलं होतं. अशा अनेकांचं अनेक दिवस अनेक शहरात ऑडीशन्स.
marathi blog on singing reality show

इतक्या सगळ्यांमध्ये मी जिंकू शकतो असा आत्मविश्वास 'काझी तौकीर'ने दिला होताच. मुलामुलींच्या उत्साहात ऊनाची पर्वा नव्हती. इतक्यात अमन वर्मा, राहुल वैद्य नि अभिजीत सावंत तिथे पोहोचले. सर्वांनी अभिजीतला गाण्याचा आग्रह केला नि त्याने गाणं सुरू करताच शंभरजण गाऊ लागले. त्या गोंगाटात गाताना आवाज खराब होईल असं वाटून गप्प बसलो.

आत मोठ्या जागेत मांडी घालून बरेचजण बसले. अाता माझा नंबर येईल कदाचित. त्याआधी खूप टेन्शन आलं. गाणं नीट होईल की परीक्षक आपला अपमान करतील ? अपमानाचं ठीक आहे पण ते जर हसले आणि तेच टी. व्हीवर दाखवलं तर मात्र सगळीकडेच अपमान ? आयुष्यभर ? पण आपण इतकं वाईट तर नक्कीच गात नाही. आणि जर निवड झालीच तर नोकरी सोडून यातच करीअर होईल ? पण नेमक्या कोणत्या राऊंडच्या आधी नोकरी सोडावी लागेल आणि आपल्याला लगेच सोडतील का एक महिन्याने आणि पगार किती कापतील? शो चालू असताना चॅनेलकडून पैसे मिळतात की जिंकलेल्यांना लाखभर पैसे मिळतात ?

खूप गहन विचारात असताना शूटींग करणारा मला विचार करतानाच्या पोझमध्ये शूट करतोय हे बर्‍याच वेळाने कळलं नि मी त्याच्याकडे बघितलं. "यु कंटीन्यु थिंकींग" तो म्हणाला नि मी लगेच ती पोझ घेतली. पण टेन्शनचे नैसर्गिक भाव निघून जाऊन शांत भाव आल्याने तो निघून गेला.

रजिस्ट्रेशन नंबरनुसार दहा जण एका वर्गात गेलो. तर एक पडदा लावलेला नि पलीकडे काही स्पर्धक गात होते ते स्पष्ट ऐकू यायचं. वाटलं की त्यांचं झालं की आमच्या दहा जणांना गाणं म्हणायचंय. पण आमच्यातल्या एकेकाला गाणं म्हणायला सांगितलं तर एकाच वेळी दोन गायकांचं परीक्षण होत होतं. समोर सोनी वाहिनीचे दोनजण बसून होते. माझा ७वा की ८वा नंबर होता. एक‍ा स्पर्धकाचं गाणं चालू असतानाच मी शाहरुख खानच्या चित्रपटातलं 'बनके तेरा जोगी' हे ' फिर भी दिल है हिंदुस्तानी' चित्रपटातलं गाणं म्हटलं.

गाताना नि नंतर कोणालाही काहीच अभिप्राय दिला नाही. ते कोण होते हे शेवटपर्यंत कळलं नाही. फक्त एकाची निवड झाली. पण त्याच्यापेक्षा माझं गाणं फार चांगलं होतं आणि माझ्यापेक्षा दोघांचं गाणं तर अजूनच सुंदर होतं. त्यातला एकजण संगीत विषयातला पदवीधर होता. दिसायला आडदांड होता म्हणून रिजेक्ट झाला का ? पण तो दुसरा गायक तर शरीरानेही सडपातळ होता. शेवटचे दहाजण नेसतात तसे कपडे त्यानेही परिधान केले होते.
पण जो सिलेक्ट झाला, त्याच्या पायात रबरी चपला, तोकडी पॅण्ट, तोकडा जुना पिवळा टी शर्ट, विस्कटलेले कोरडे केस आणि तोंडात पुटपटल्यासारखं म्हटलेलं गाणं हे आजही लक्षात आहे.

मी का रिजेक्ट झालो हे स्वत:च स्वत:ला ठरवायचं होतं.  मी गाणं शिकलो नाही म्हणून की मला बघून लोकांच्या मनात दया येऊन मला एसएमएसद्वारे वोट मिळणार नाही म्हणून ?

रिअॅलिटी शोचा रिअलपणा रिअलायझ झाला. सत्यता समजली. बाहेेर येऊन पाहिलं तर अनेक खिन्न चेहरे नि रडणार्‍या मुली, त्यांना समजावणारे पालक. दोन तासांपूर्वी रांगेत उत्साहात गात होतो ती रांग अजूनही उत्साहातच होती. आता त्यांचं कौतुक कमी नि काळजी जास्त वाटू लागली. आपलं गाणं सोनू निगम किंवा अन्नू मलिकन तरीे ऐकावं अशा भाबड्या आशेवर कित्येकांचा वेळ वाया जात होता.

रविंद्र नाट्यमंदिरमधून बाहेर आल्यावर वळून पाहिलं तर 'पुलं'चा पुतळा हसत होता. एकाच वेळी एकाच वर्गात दोन जण गात असल्याची तक्रार काही दिवसांनी वृत्तपत्रात वाचली.
marathi blog on singing reality show

मराठी पुस्तक  - पहिले पाऊल , सफरछंद 
Online Books PDF on esahity.com : मुल्हेर ते साल्हेर, कधी सरस कधी कळस, गोरखगड ते सिद्धगड, अलंगाशी संग मदनाशी गाठ  
लोकसत्ता 'ट्रेक इट' मध्ये भैरवगड, कलावंतीण , वैराटगड, आजोबागड आणि इतर लेख प्रकाशित.
इंडियन आयडॉल - माझा अनुभव इंडियन आयडॉल - माझा अनुभव Reviewed by Marathi Blog by Pankaj Ghare on May 19, 2020 Rating: 5

No comments:

मनात आलं म्हणून

मनात आलं म्हणून
थोडं माझ्याविषयी
Powered by Blogger.