निसर्गसौंदर्य, वनसंपत्ती, प्रस्तरारोहणाचा छोटा सराव, गावकऱ्यांनी केलेलं स्वागत व निरोप अनुभवण्यासाठी आसनगाव येथे आजोबांना भेटायला आजोबागडावर नक्की जा.
Marathi Blog - मनात आलं म्हणून
आजोबा गड
आजोबा ( सुलेखन पद्धतीने ) |
सकाळी ट्रेनमधून आसनगावला जाताना खिडकीजवळच बसून थंडीचा आस्वाद घेत स्वतःचे ‘तयार केलेले’ कारण आठवत हसतच निघालो. शहरापासून दूर जाताना खरा हिवाळा ऋतू जाणवू लागला. आसनगाव रेल्वे स्थानकापासून रिक्षाने शहापूर , शहापूरपासून बसने ‘डेणे’ गावी उतरलो. ४० किमी अंतर बसने एका तासात गाठले. बसमधून बरेच प्रवासी उतरले तेंव्हा आमच्या सोबत काही नवखे Trekसाठी आले असल्याचे कळले. उतरल्याक्षणी पुढील आठवड्यातली किंवा या वर्षातली योजना तयार झाली..... कारण अलंग, मदन व कुलंग ही पर्वतरांग दिसू लागली व आज..... आजापर्वत .... गडांचा आजोबा .... आजोबागड.
मुख्य रस्त्यापासून दूर जात असल्याने राजकीय पोस्टर कमी झाले आणि निकृष्ट रस्ताही सुरु झाला. रस्त्यावरची पायपीट सुरू झाली परंतु सकाळच्या प्रसन्न वातावरणात थकवा जाणवत नाही. रुंद व सपाट रस्त्याच्या दोन्ही बाजूना वाळलेले सोनेरी गवत जणू पिकलेल्या पिंगट केसांप्रमाणे. अधूनमधून झाडेही होती पण तरीही विजेच्या तारांवरच सुंदर पक्षी बसलेले दिसले. झाडांची संख्या कमी होत असल्याने ते कदाचित तारांवरच बसण्याची सवय करून घेत असतील.
या गडावर वाल्मिकी ऋषींचे वास्तव्य होते, इथे लव-कुशचां जन्म झाला आणि ते त्यांना आजोबा म्हणत अशी कथा ‘सांगितली’ जाते असे वाचले होते. (लव-कुश मराठी होते की परप्रांतीय किंवा परभाषीय ?) अशा कथांचे कथाकार कोण तेच माहित नाही. बरेच चालल्यानंतर डाव्या बाजूला गावातली घरे दिसू लागली आणि पुढे उंबराच्या फळाचा सुगंध सर्वत्र दरवळत असल्याचे जाणवले. जंगल सुरु झाले आणि येथील वनसंपत्ती दिसू लागली. झाडांना ठोकलेल्या लोखंडीपट्ट्या गंजलेल्या असल्याने नव्याने पाहिलेल्या एकाही झाडाचे नाव कळाले नाही. बांबूच्या झाडाला उसाचे तर घायपाताच्या झाडाला अननसाचे झाड म्हणत मी माझे शहरी अज्ञान ( बेशरमपणे) प्रकट करत होतो.
खडकाळ रस्त्यावरून चालत असतानाच समोरून बाईकस्वार आले. चारचाकीचेही ठसे दिसले. वर एका पठारापर्यंत गाडी नेण्यासाठी कौशल्य करावे लागते. पण चालत जाण्याचा व्यायाम करत आश्रमापर्यंत आलो. जवळच असलेला पाण्याचा झरा बाराही महिने वाहतो. त्या सभोवतालची जागा खूपच सुंदर आणि वास्तव्य करावेसे वाटेल अशी आहे. पण आम्ही तर श्रमासाठी आलो होतो, आश्रमासाठी नव्हे. आधी पोहोचलेल्या सोबतच्या गटाला विचारल्यावर त्याने हाताने दाखवलेल्या दिशेने निघालो, जिथे तीन रस्ते दिसत होते. अगदी थोड्या वेळाने रस्ता सापडेनासा झाला. तरीही मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी पावसाळ्यात धबधबा असावा. छोट्या छोट्या दगडांना बाजूला सारत मोठमोठ्या शिळांवर उड्या मारत निघालो. धबधब्याच्या मुखाशी विनासाहित्य प्रस्तरारोहण (Rock Cimbing) करणे शक्य नाही हे तपासून पाहिले.
ज्यांनी रस्ता दाखवला ते वेगळ्या मार्गाने जात असल्याचे त्यांच्या हुल्लडबाजीमुळे कळले. धबधब्याच्या मार्गाने उतरू लागलो, तर लहानमोठा कोणताही दगड साथ देईनासा झाला. पाय ठेवल्यावर दगड गडगडू लागले. पुन्हा त्याच मार्गाने उतरून आश्रमापाशी आलो आणि आश्रमातल्या महिलांनी योग्य वाट सांगितली.
आजोबा रागावले. सीतेच्या पाळण्यात जास्त वेळ न खेळता उतरण्यासाठी घाई करू लागलो. भक्कम भासणारे दगडही पाय ठेवल्यावर घरंगळू लागले. त्यामुळे गड उतरताना सावधानता घ्यावी लागली. वाटेत खाल्लेल्या (मार्गशीर्ष महिन्यातल्या) फळांच्या सालीमुळे उतरतानाचा मार्ग योग्य असल्याची खात्री पटत होती. एखाद्या फळाची बी रुजून ते झाड कधीतरी मोठे होईल हा विश्वास (कदाचित गोड अंधविश्वास) आहे.
पाऊलवाट ओळखीची वाटली.....गडाकडे जाणारी असते अशी पालापाचोळयाने भरलेली. वाटेत कुठेही काटेरी झुडुपे किंवा निवडुंग नाही हे या गडमार्गाचे वैशिष्टय. आता नातूच येणार आहे म्हटल्यावर आजोबांनीच ही तयारी केली असावी. वेगवेगळे पक्षी जोरजोरात शिट्या मारू लागले. झाडांची बरीच पाने वाळलेली. अगदी हिरवी पानेही धूळ साचल्याने जुनी, थकलेली वाटली. पण तरीही झाडांनी काही माकडांना पिल्लांसकट कडेवर घेतलेले दिसले. या गडावर सापांचे प्रमाण जास्त आहे असे वाचनात होते पण आमचा अपेक्षाभंग झाला. निसरड्या मातीवर तर कधी हलणाऱ्या दगडांवर पाय ठेवत उंची गाठू लागलो. मार्गशीर्ष महिना असल्याने गुरुवारी घरी आणलेली पाच फळे एक-एक करून ऊर्जा मिळवत होतो. कधी दम खात तर कधी फळ खात उत्साहाने चालत होतोच. गडावरची वाट जंगलातूनच जात असल्याने दुपारी बारा-एक वाजताही उन्हाचा तडाखा जाणवत नाही. बरेच चालून झाले तरी आजोबांची उंची पाहताना मान वर करावीच लागते. चढण अशी की Trek करताना वाटेत मध्येच थांबल्यास हृदयाची धडधड स्पष्ट जाणवते.
पण जंगल संपल्यानंतर प्रत्यक्ष डोंगराच्या शिळा आधारचा हात देतात आणि अर्ध्या उंचीवरच Trek पूर्ण झाल्याचे घोषित केले. इथून पुढे (डावीकडे) वर जाण्यासाठी प्रस्तरारोहणाचे साहित्य सोबत असणे जरूरीचे आहे. वाट संपली आणि पलीकडे लगेचच दरी सुरू झाली. डाव्या व उजव्या बाजूला डोंगर असून दोन्ही डोंगरांमध्ये दहा-बारा मीटर अंतर आहे. या अगदी छोट्या जागेला ‘सीतेचा पाळणा’ म्हणतात. उजव्या बाजूला असलेल्या डोंगरात एका खोलगट जागेत जाण्यासाठी प्रस्तरारोहण करण्याची संधी मिळाली. तिथे एक पालखी असून त्यावर तुकाराम असे लिहिले आहे. तसेच एका आयताकृती विटेवर दोन लहान मुलांच्या (कथेतील लव-कुशच्या) पायाचा आकार आहे (ठसा नाही). या दरीत Photography करण्याची संधी सोडून चालणार नव्हते. पण उंचावरून अचानक मोठमोठे दगड कोसळू लागले.डाव्या बाजूच्या डोंगरावरून मोठा दगड निसटून वाटेतच आदळला. त्याचे तुकडेहोऊन वेगाने सरळ रेषेत पडू लागले. कोणालाही, अगदी काही काळ आधी गड सोडलेल्यानाही इजा होऊ शकली असती.
गडावरून उतरताना वाटा स्पष्ट दिसतात. उतरत असताना एका दगडाला शेंदूर फासून देवत्व देण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. धबधब्याच्या मार्गाने जाण्याच्या प्रयत्नात एक तास वाया गेला व खूप उशीर झाल्याचे जाणवले. (येथे आदल्या दिवशी येऊन वास्तव्य केल्यास उत्तम). गावाचे ‘गावपण’ लक्षात येवू लागले. परतीच्या प्रवासात एकही वाहन दिसेना. बारा किमी अंतर पायी चालण्याची शिक्षा मिळण्याची चिन्हे दिसत होती. पण रेती वाहून देणाऱ्या एका ट्रक्टरमधून परतीचा प्रवास सुरु झाला. रेतीवर बसल्याने यावेळी रस्त्याचा खडकाळपणा अजिबात जाणवला नाही. खूप आग्रह करूनही चालकाने पैसे घेतलेच नाहीत. डोळखांब येथे बरेच गावकरी आमच्या मदतीला धावून आले आणि त्यांनी परतीच्या प्रवासासाठी टेम्पोची व्यवस्था केली.
अजून काही किल्ल्यांविषयी :
Marathi Blog - मनात आलं म्हणून,
मराठी पुस्तक - पहिले पाऊल , सफरछंद
Online Books PDF on esahity.com : मुल्हेर ते साल्हेर, कधी सरस कधी कळस, गोरखगड ते सिद्धगड, अलंगाशी संग मदनाशी गाठ
लोकसत्ता 'ट्रेक इट' मध्ये भैरवगड, कलावंतीण , वैराटगड, आजोबागड आणि इतर लेख प्रकाशित.
आजोबा गडावर Trek अनुभव
Reviewed by Marathi Blog by Pankaj Ghare
on
May 17, 2020
Rating:
No comments: