१५ ऑक्टोबर हा दिवस डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. त्याविषयी
Marathi Blog - मनात आलं म्हणून
वाचन प्रेरणा दिन
सध्या सर्वांचं वाचन फार वाढलं आहे. आधी लहानांची मोठ्यांसमोर मान वर करायची हिंमत नव्हती. आता तशी गरज भासत नाही. कारण बरेचजण मान खाली घालून वाचनात गुंग असतात. दिवसरात्र, जागा मिळेल तिथे , बसायला मिळालं नाही तर उभं राहून, दिसेल त्या विषयावर वाचत सुटतो. पण हीसुद्धा एक नवीन समस्या झाली आहे. कारण ते मोबाईलवर, इंटरनेटमधली कदाचित खरी किंवा कदाचित खोटी माहिती वाचत असतात.
म्हणजे नुसतं मोबाईलमधलं एक अॅप उघडलं की जे वाचण्यासाठी दिसेल ते स्वत:च्या आयुष्याशी किंवा कोणाच्याही प्रगतीशी संबंधित असेलच नाही.
मग त्यात कलाकारांचं खरं खासगी आयुष्य, ते कोणाबरोबर हॉटेलात गेले ? खेळाडूंची खरी कमाई किती ? तो मैदानात कोणाला काय बोलला? नव्याने खोट्या ठरवलेल्या इतिहासपुरूषांचा खर्या चुका, कोणामुळे स्वातंत्र्य मिळायला हवं होतं ? मग मध्येच जाड / बारीक व्हायचं असेल तर काय खायचं ? आपली जीवनशैली कशी चुकीची ? असं काहीबाही खेळातले पत्ते पिसल्यासारखे कोणतेही विषय समोर येतात नि केंव्हाही वाचायला वाचक सुरू करतो. त्यावर मनन- चिंतन अजिबात नाही.
त्यामुळे इतकं वाचून विचारांत / बोलण्या-वागण्यात काही परिणाम होताना दिसत नाही. एखादा चांगला लेख वाचला की तो रूजायला त्यावर विचार करायला त्या विचाराशी संबंधित पुढची माहिती मिळवायचा प्रयत्न होत नाही. कारण इंटरनेटवर सोशल मीडीयात एका लेखनंतर लगेच दुसरी लिंक समोर येते. पहिल्या (वाचलेल्या) विषयाचा पुढच्या वाचनाशी काही संबंध असेलच असं नाही. बस्स..... फक्त वाचत जायचं, वाचत सुटायचं. का ? कारण वेळ जात नसतो. वेळ जाण्यासाठी वाचलेलं वेळे बरोबर वाहूनही जातं आणि अर्धवट वाचल्याचे डागही ठेवून जातं. मनावर परिणाम ? शून्य.
शिवाय हे सर्व इंटरनेटवरून आलं म्हणजे ते खरंच आहे असा फार मोठा गैरसमज आहे. बर्याचदा योग्य माहिती मिळाली की त्यापुढचीही माहिती योग्य असेलच असं नाही. याउलट एखादी चुकीची माहिती वाचली की त्यापुढे माहिती १००% खरी असू शकते. हा गोंधळ तसा सर्वांनी अनुभवलेला असेलच. तरीही केवळ तेच वाचण्याची सवय लागली असते.
इंटरनेटवरील माहिती वाचण्यास माझा विरोध नाही पण केवळ तिन वाचली जाते याला माझा आक्षेप आहे.
इंटरनेट बनवणारा आणि त्यात माहिती भरणारासुद्धा माणूसच आहे तर तो त्याच्या हेतूनुसार, त्याला वेळ मिळेल तसा, त्याला पटेल तितकीच, त्याची हिंमत असेल इतकीच, माहिती देत असतो. म्हणजे तो स्वत: ,त्याचं कुटुंब, त्याचा ( म्हणजे त्याला वाटणारा तितकाच) समाज, त्याचे आदर्श, त्याचे विचार यांना छेद जाईल ,जगात अपमान किंवा निंदा होईल अशी माहिती तो कटाक्षाने टाळतो. शिवाय वाचणार्याला कंटाळा येऊ नये इतक्याच लांबीचा आणि शक्यतो वाट्याला टीका येऊच नये असं सांभाळत माहिती देतो.
पुस्तक लिहून प्रकाशित करतानाही ही असं केलं जातं.
पण काही पुस्तके याला अपवाद आहेत. 'डॉ. किशोर शांताबाई काळे' यांनी लिहिलेलं 'कोल्हाट्याचं पोर' हे त्यापैकीच एक. अतिशय वाईट परिस्थितीत शिकून डॉक्टर होणार्या त्या लेखकाची कहाणी आपल्यापासून काहीच लपवत नाही.
पण ते तर पुस्तक आहे. इंटरनेट नाही. पुस्तकाला आधी फक्त किंमत असते, नंतर फक्त वजन असतं, आणि वाचून झालं की त्याची फक्त अडगळ होते, अशी कारणं देत पुस्तकं सध्या फार वाचली जात नाहीत. त्याचवेळी पुस्तकापेक्षा महागडे मोबाईल, पुस्तकापेक्षा जड लॅपटॉप आणि अनेक वस्तूंची 'अडगळ' बॅगेत, घरात नि कायमची डोक्यात राहत आहे.
पुस्तकांचं एकवेळ राहू द्या. पण सध्या तर पूर्ण वर्तमानपत्रे वाचणारेही फार कमी जण आहेत. तेसुद्धा आता मोबाईलवर उपलब्ध झालंय. म्हणजे बातमी घडल्याक्षणी ती वेगाने पसरतेय. आधी बातमीला पू्र्ण घडण्यासाठी वेळ दिला जायचा. दिवस संपला की त्याची नीट मांडणी होऊन वर्तमानपत्रात दिसायची. बरेचजण ती बातमी वाचून दिवसभर वाचाये नि त्यानुसार अनेकांची स्वत:ची मतं बनत नि नंतर तज्ञांचे लेख बनत. आता बातमी घडत असतानाच तिचे छायाचित्र / ध्वनीचित्रफीत बनून वेगाने ती पसरली जाते. ब्रेकींग न्यूज बनतात. सर्वप्रथम बातमी आम्ही दिली ही सुद्धा बातमी होते. घडणारी घटना चांगली असली तर त्यात काहीतरी वाईट आहे नि ती कशी वाईट माणसांमुळे वाईट आहे यावर कुणाचं ना कुणाचं मत होतंच.
आणि मग वेगाने कोणत्याही विषयावरचं मत, कोणत्याही क्षेत्रातील सुशिक्षित, अर्धशिक्षित व्यक्ती आणि त्यांच्या शिक्षणाचा आधार घेत त्यांचे नातेवाईक/ मित्र / शेजारी / एकाच बसने जाणारे स्वत:चे मत मांडून तेच खरं असल्याचं सिद्ध करत असतात.
लोकांना गोंधळवणारा त्यांचा सध्याचा वाचनाचा छंद हेरून, आज अनेकजण स्वत:ची वैयक्तिक कहाणी स्वत:ला महान बनवण्यासाठी स्वत:च लिहून पसरवत आहेत. त्यासाठी वेगळी माणसं निवडून त्यांना मोबदला देऊन स्वत:ची प्रतिमा उजळ करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यांच्या प्रतिमा उजाळण्याच्या आड अगदी एखादा इतिहासपुरूष आला तरी केवळ नागरीकांच्या दुर्लक्ष करण्याचा, अज्ञानाचा नि अर्धज्ञानाचा फार धूर्तपणे वापर होतोय. त्यासाठी पद्धतशीर योजना आखून लोकांच्या मेंदूवर राज्य कसं करता येईल याचा यशस्वी प्रयत्न होतोय.
शिक्षणाचा हक्क जेंव्हा मोजक्या लोकांना होता तेंव्हासुद्धा स्वत:च्या वाचनाचा नि लिखाणाचा उपयोग त्यांनी केवळ स्वत:ला नि स्वत:च्या आप्तेष्टांना श्रेष्ठ ठरवताना त्याच काळातील इतरांचा उल्लेखही केला नाही किंवा त्यांच्या कहाणीत स्वत:ला जोडून त्यातही स्वत:ला श्रेष्ठ स्थान दिल्याचा इतिहास आहे.
हीच पद्धत आता इंटरनेट हे सध्याचे माध्यम वापरून स्वत:ला सर्वश्रेष्ठ आणि जे इंटरनेट युगात नव्हते त्यांना कायमचं कलंकीत म्हणून नोंदवू इच्छित तर नाही ना ?
आता सर्वांना सर्व काही कळू लागलंय. प्रत्येक विषयावर प्रत्येकाचं मत बनू लागलंय.
हे सर्व टाळण्यासाठी छापील लेख / बातमी वाचण्याकडे पुन्हा वळले पाहिजे. सोशल मिडीयावर खरं लिहिलंच पाहिजे असा काही नियम नाही. खोटं लोकांपर्यंत पसरवून नंतर ते मिटवता येतं.
आपल्याकडे एक पद्धत अाहे. आपण म्हणतो की 'खोटं वाटतं तर लिहून देतो'. असं म्हणण्यामागे आपण जे लिहू ते खरंच लिहू हे सांगण्याचा प्रयत्न असतो. खोटं लिहताना आणि लिहिलं तरी प्रकाशित करताना मन अस्वस्थ होतंच. त्यामुळे छापलेलं वाचण्याकडे अधिक विश्वास ठेवावा नि वाचन प्रेरणा दिन साजरा करावा. आज किमान काहीतरी नवीन पण 'छापील' वाचा.
डॉक्टर. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणार्या वाचन प्रेरणा दिनाच्या हार्दीक शुभेच्छा !!!
Marathi Blog - मनात आलं म्हणून,
मराठी पुस्तक - पहिले पाऊल , सफरछंद
Online Books PDF on esahity.com : मुल्हेर ते साल्हेर, कधी सरस कधी कळस, गोरखगड ते सिद्धगड, अलंगाशी संग मदनाशी गाठ
वाचन प्रेरणा दिन
Reviewed by Marathi Blog by Pankaj Ghare
on
May 19, 2020
Rating:
No comments: