मी किंवा आम्हीच देशभक्त आहोत हे वारंवार वेगवेगळ्या मार्गाने बोलून दाखवल्याशिवाय देशभक्त असल्याचं सिद्ध होत नाही असं चित्र आहे.य गैरसमजबद्दल
Marathi Blog - मनात आलं म्हणून
देशभक्ती विकणे आहे
देश का नमक
"सरदार मैने आपका नमक खाया है।" असं शोले चित्रपटात कालिया गब्बरला म्हणाला. 'नमक' अर्थात मीठ. म्हणजे ज्याचं आपण मीठ खाल्लेलं असतं त्याच्याशी प्रामाणिक रहायचं. बरोबर ना ? टाटा मिठाची जाहिरात आठवते ? ते काही साधंसुधं मीठ नव्हतं. ते 'देश का नमक' होतं. हे मीठ खाणार्याने देशाशी प्रामाणिक रहावं लागत होतं म्हणून सरकारी कर्मचारी / राजकीय नेते बहुधा टाटा- मीठ वापरत नव्हते. सध्या ती जाहिरातही येत नाही. कारण एकतर सरकारी कर्मचारी कमी झाले असतील किंवा इथला प्रामाणिकपणा कमी झाला की काय ?
पण बरं झालं, फक्त मिठावरच भागलं. कालिया म्हणाला असता की मी तुमची साखर खाल्ली, चहा, दूध, बिस्कीट, तांदूळ, चपाती, मासे, मटण, आईसक्रिम, बडीशेप खाल्ली असं काही म्हटलं असतं तर फार पंचाईत झाली असती. ते विकत घेणार्या सर्वांना देशाशी फार प्रामाणिकपणे वागावं लागलं असतं आणि घराघरात देशभक्त जन्माला आले असते.
देश की धडकन
पण तरीदेखील आजही टीव्हीवर अनेक जाहिराती पाहताना विकल्या जाणार्या वस्तूशी देशभक्ती जोडलेली दिसते. 'अरे यही तो है देश की धडकन' असं म्हणत दुचाकीची जाहिरात होत होती आठवते ? रूग्णवाहिकेला (अॅम्बुलन्सला) जागा करून दिली की, सिग्नलला गाडी थांबवली की, 'वन-वे' ने जाणार्या चारचाकीला वाटच दिली नाही की, नंतर लगेच दुचाकी विकणार्या कंपनीचं नाव दिसतं.
आपण काय घेतो ? फक्त गाडी.
त्यातला संदेश ? ?
विकणार्या गाडी विकायची असते;
पण गाडी घेणारा देशभक्त ठरत नाही.
देशाचा कडक चहा
अजून काही जाहिरात आठवतात. लाच देणारा व्यक्ती सरकारी कार्यालयात आला की तो ज्याच्यासमोर जाईल तो देशभक्त. का ? कारण त्यांनी अमूक एका कंपनीचा साबण वापरून धुतलेल्या पांढर्याशुभ्र शर्टला डाग लागतील किंवा तो देशाचा कडक चहा पित असतो.
चहा नि साबण विकले जातात.
त्यातला संदेश ?
चहा / साबण विकले जातात;
पण विकत घेणारा देशभक्त ठरत नाही.
सध्या एक नवीन जाहिरात आली अाहे. KUBOTA ट्रॅक्टरची.
शेवटी एक वाक्य दिसतं.... 'तंत्रज्ञान जपानी हृदय हिंदुस्तानी'.
ट्रॅक्टरला हृदय नसतं हे काही सांगायला नको. आपल्या देशात वस्तू विकायची कशी हे अनेकांना नि कंपन्यांना व्यवस्थित माहिती आहे. आपल्याला जे मिळवायचंच आहे त्याला देशभक्तीशी काही करून जोडायचं.
जपानी कंपनीला ट्रॅक्टर विकायचा आहे.
ही ट्रॅक्टर घेणारा देशभक्त ठरत नाही.
जाहिरातीला देशभक्तीची जोड दिली की वस्तू किंवा सेवा जास्त विकली जात असावी आणि हीच कल्पना पुरेपूर वापरून सध्या देशात निवडणुकीच्या वेळी मते मागितली जात आहेत.
देशभक्त म्हणजे कोण ?
देशभक्त पक्षाविरूद्ध निवडणूकीत उभे राहणारे, त्यांच्या निर्णयांना विरोध करणारे, त्यांना निवडून देणारे, त्यांना मत देणारे हे सर्वच्या सर्व देशद्रोही ?! देशभक्त म्हणजे काय ? आणि ते कोण ठरवणार ? कारण सत्तेत आल्यानंतर या सर्व देशद्रोहींवर देशद्रोहाचा गुन्हा होत नाही. शिवाय जिथे देशभक्त उमेदवार निवडून आलेत तिथेही देशद्रोहींना मत देणार्या इतर देशद्रोही मतदारांचं काय ? तिथे विकास होणार की नाही ? आणि देशद्रोही पक्षाचा उमेदवार निवडून आला तर तो पूर्ण मतदारसंघच वाईट ठरतो बरोबर ना ?
युद्धात एखाद्या पक्षाचे कार्यकर्ते लढायला जातात का ? नाही. ते फक्त विरोधकांना विरोध करायला रस्त्यावर उतरतात. त्याला युद्ध नव्हे 'दंगल' म्हणतात आणि त्यांच्या या गुणाला देशभक्ती नव्हे 'दादागिरी' म्हणतात.
'आम्ही जे काही करतो ते देशभक्तीमुळे' अशी जाहिरातबाजी करणार्या मग अशा देशभक्त पक्षातल्या उमेदवाराला निवडून देणार ना ? मग भले त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असो वा त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असो. तो आमच्यासोबत आला म्हणजे वाल्याचा वाल्मिकी ऋषी झालाच.
अशा पक्षांनाही जे मिळवायचं आहे ती म्हणजे सत्ता.
अशांना मत दिल्याने मतदार देशभक्त ठरत नाही;
कारण मीठ, चहा, साबण विकत घेतल्याने विकत घेणारा देशभक्त ठरत नाही.
अधिक वाचा
Social Media चा परिणाम
Marathi Blog - मनात आलं म्हणून,
मराठी पुस्तक - पहिले पाऊल , सफरछंद
Online Books PDF on esahity.com : मुल्हेर ते साल्हेर, कधी सरस कधी कळस, गोरखगड ते सिद्धगड, अलंगाशी संग मदनाशी गाठ
लोकसत्ता 'ट्रेक इट' मध्ये भैरवगड, कलावंतीण , वैराटगड, आजोबागड आणि इतर लेख प्रकाशित.
देशभक्ती विकणे आहे
Reviewed by Marathi Blog by Pankaj Ghare
on
May 19, 2020
Rating:
No comments: