हा छंद जिवाला लावी पिसे

लॉकडाउनच्या काळात कुणी जर आनंदी असेल तर तो त्याच्या छंदामुळे. कोरोनामुळे उद्भवलेल्या या स्थितीत अनेकांना स्वत;च्या छंदाची आठवण आलेली दिसते. 

Marathi Blog - मनात आलं म्हणून

वाचन नि प्रवास छंद 

लॉकडाउन नव्हता तेंव्हा कामाची वेळ सांभाळत अनेकजण आपापला छंद सांभाळायचे. पण तरीही वेळ मिळत नाही रे अशी त्या प्रत्येकाची ओरड होती. सर्वांचा सामायिक झालेला 'सोशल मीडिया' या छंदालासुद्धा कंटाळले नि खर्‍या ज्याला छंद म्हणता येईल अशा छंदाला लागले. आज मी माझा आवडता छंद वाचन आणि प्रवासाबद्दल बोलू इच्छितो.

marathi blog on hobby of reading and travelling
मी लिहिलेले पुस्तक- सफरछंद- लडाख येथे सायकल प्रवास- पंकज घारे  

वाचन: 

कोणत्याही वयाच्या साक्षर व्यक्तीने जोपासावा आणि आयुष्य समृद्ध करून टाकणारा हा छंद. व्यक्ति कोणत्याही क्षेत्रातला असो त्याला जर वाचनाची जोड असेल तर वाचलेली कोणती गोष्ट केंव्हा कामाला येईल हे सांगू शकत नाही. इंटरनेट येण्याआधी ज्ञानाचं माध्यम पुस्तक नि वाचन हेच होतं. पण इंटरनेटपेक्षा हातात असलेलं कागदी पुस्तक वाचताना लक्ष केंद्रीत होण्याची तीव्रता अधिक असते. लहानपणी गोष्टी वाचण्याची असेल तर नंतर कथा कादंबर्‍या वाचण्याची आवड निर्माण होते. मग एखादा व्यवसाय, मोठा प्रकल्प किंवा शिक्षण घेताना जाड पुस्तकं, खूप वाचनाचा त्रास होत नाही.

वाचनामुळे माणूस म्हणून मी किती छोटा आहे, जग किती मोठं आहे याची जाणीव झाली की आपोआपच स्वभावात नम्रपणा येतो. तुम्ही कोणत्याही संस्कृतीत वाढले असाल, तुमची जात, धर्म, भाषा, राहण्याचे ठिकाण, भाषा, देश कोणताही असला तरी पुस्तक वाचता वाचता तुम्ही कोणत्याही देशाच्या कोणत्याही भागात प्रवास करून तिथल्या संस्कृतीत मिसळून जाता. तुम्ही कोणत्याही काळात जन्माला आले असाल तरीही तुम्ही कोणत्याही काळात कधीही शिरू शकता. म्हणून मी पुस्तकांना 'टाइम मशीन' म्हणतो. एखादं वाचन करता करता अजून काही प्रश्न पडतात नि आणखी काही वाचावं असं वाटतं नि मेंदूची भूक कधीही भागत नाही.

एखाद्या व्यक्तिच्या पेहरावाचं, चालण्या-बोलण्याचं वर्णन वाचलं की ती व्यक्ति डोळ्यांसमोर उभी राहते. म्हणून चित्रकार, मूर्तिकार, वेशभूषाकार, रंगभूषाकार, नट, दिग्दर्शक, वाचनावर जोर देतात. एखादा महापुरुष कसा महापुरुष झाला याचा अंदाज आला की आपली दु:ख छोटी वाटू लागतात. अनेक नेते तुरुंगातही वाचन करत. एखाद्या संकटातून बाहेर येण्याचा मार्ग सापडतो. किमान आपलं संकट कसं हाताळायचं याचा मार्ग मिळतो.

पुस्तकं दूरवरचे ग्रह, चांदण्या, विश्व दाखवू शकतात तसंच डोळ्यांनी न दिसणारे जीव, समुद्रातले न पाहिलेले जीव दाखवतात. जे अस्तित्त्वातच नाही तेही पुस्तकं दाखवू शकतात. वाचनाची आवड असलेल्या व्यक्तिला मित्रांची कमी भासत नाही. हा असा मित्र आहे की तुम्हाला नको ते व्यसन लागू शकत नाही. वादविवादात पुस्तक वाचणारा सहज जिंकू शकतो. हा मित्र तुम्हाला घरातून बाहेर न काढता प्रवास करून आणू शकतो. शिवाय प्रवास करायला भाग पाडतो.

आता मला प्रवासाच्या छंदाबद्दल सांगायला आवडेल. 

प्रवास:

पृथ्वी इतकी मोठी आहे की पूर्ण पृथ्वी किंवा जग बघून होईल असं नाही. पण आयुष्यात जितका प्रवास करता येईल तितका करावा. वाचनाप्रमाणे अनुभव घेणे हा एक उत्तम छंद आहे. या अनुभवासाठी प्रवास करणं महत्त्वाचं आहे. माणसांची भाषा, त्यांची विचार करण्याची पद्धत, त्यांचं जेवण, जेवण बनवण्याची पद्धत, पेहराव, घरांची रचना हे अनुभवण्यासारखं असतं. विमानाने महागडा विमान असो किंवा पायी केलेला एखादा ट्रेक असो. एका दिवसाच्या प्रवासामुळे दहा दिवसांच्या आयुष्याचा अनुभव मिळतो.
marathi blog on hobby of travelling
YHAI सोबत सर पास ट्रेक करताना मी -पंकज घारे
प्रवासाचं व्यवस्थापन प्रवास करता करता शिकता येतं. हे व्यवस्थापन कौशल्य आपल्याला आपल्या क्षेत्रात कामी येतं. प्रवासात भेटणारी माणसं कोणता धडा शिकवतील सांगता येत नाही. प्रवासात आपल्या सोबत मोजकं सामान असतं नि ते तसं असावं. त्यामुळे कमीत कमी वस्तूंमध्ये आनंदी राहण्याची सवय लागते.

प्रवास या एका छंदामुळे छायाचित्रण, लेखन, नाणी जमवणे, तिकिटे गोळा करणे, वस्तू-संग्रहालय, नवीन माणसांना भेटणे, नवनवीन पदार्थांची चव घेणे असे अनेक छंद पूर्ण करता येतात. प्रवासामुळे इतर प्रवास कळतात नि बेत आखता येतात.

सध्या स्वतःचं छायाचित्र चांगलं यावं म्हणून प्रवास करणारे वाढलेत. वाटेत वारंवार छायाचित्र घेणारे, मोबाइल पाहणारे प्रवासाचा आनंद नीट घेऊ शकत नाहीत. प्रवास करताना एकतर वाटेत भेटणार्‍या माणसांशी नाहीतर स्वतःशी बोलावं. प्रवासाच्या छंदासाठी खर्च जारी करावा लागला तरी एकदा छंद जडला की खर्च करण्याची क्षमता हळूहळू वाढू लागते कारण त्यातून मिळाणारा रिटर्न्स म्हणजे आनंद अनेकपटीने असतो. नि तो प्रवासावरून आल्यावर कळतो.

मी केलेल्या अनेक प्रवासांपैकी काही प्रवासाबद्दल लोकसत्ता वृत्तपत्रात ट्रेक-इट या सदरात लिखाण केले तर esahity.com या वेबसाइटवर ट्रेकिंगिरी या सदरात चार पुस्तके लिहून प्रकाशित केली.


प्रवास कुठेही असो, मंदिरासाठी, निसर्ग पाहण्यासाठी, किल्ले अभ्यासण्यासाठी, मजामस्तीसाठी, मनात कायमची आठवण प्रवास देतात. शारीरिक क्षमता असेपर्यंत प्रवास करत राहिलं पाहिजे.


माझ्याविषयी अधिक माहिती 

मराठी पुस्तक  - पहिले पाऊल , सफरछंद 
Online Books PDF on esahity.com : मुल्हेर ते साल्हेर, कधी सरस कधी कळस, गोरखगड ते सिद्धगड, अलंगाशी संग मदनाशी गाठ  
लोकसत्ता 'ट्रेक इट' मध्ये भैरवगड, कलावंतीण , वैराटगड, आजोबागड आणि इतर लेख प्रकाशित.
हा छंद जिवाला लावी पिसे हा छंद जिवाला लावी पिसे Reviewed by Marathi Blog by Pankaj Ghare on May 25, 2020 Rating: 5

No comments:

मनात आलं म्हणून

मनात आलं म्हणून
थोडं माझ्याविषयी
Powered by Blogger.