कळसूबाई Trek अनुभव

 कळसुबाई....- महाराष्ट्राच्या सर्वोच्च शिखरावर Trekking अनुभव :

कळसूबाई शिखर 

marathi travel blog way to peak of maharashtra
कळसूबाई शिखर गाठण्याचा अंतिम टप्पा 

परस्पर विरोधी गुण असलेल्या गोष्टी एकमेकांकडे आकर्षिल्या जातात. शाळेतल्या अभ्यासक्रमात शिकलो होतो धन प्रभारातून ऋण प्रभाराकडे वीज वाहत जाते. उच्च दाबातून कमी दाबाच्या पट्टयात वारे वाहतात. चुंबकाचे परस्परविरोधी ध्रुव एकमेकांकडे आकर्षिले जातात. गावातून शहराकडे कामधंद्यासाठी आणि शहरातून गावाकडे आनंदासाठी लोक आकर्षित होतात. कमी उंचीवर राहणाऱ्यांना कधीकधी उंचावर जावेसे वाटते. म्हणून Trek साठी ठिकाण ठरवले..... महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर .......कळसुबाई

मुंबईपासून कसारा रेल्वे स्थानकावरुन इगतपुरी गाठावे. इगतपुरीपासून पहाटेच ‘भंडारदरा’ जाणारी बस पकडावी. त्यामुळे आदल्या रात्रीच घराबाहेर पडताना ‘कळसुबाई’ हे नाव माहीत नसलेल्यांनी ‘इतक्या रात्री कुठे जातोय?’ हे विचारल्यावर त्यांना फ़क़्त ‘कळसुबाई’ इतकेच सांगितले की त्यांच्या मनात वेगळ्याच आकर्षणाचा संशय आला.

इगतपुरीस्थानकपासून बस निघाली आणि अर्ध्या तासात ‘बारी’ गावात आलो. खरंतर कंडक्टरने जागं केलं आणि उतरवलंही. जवळच्या दुकानात उत्कृष्ट चहा आणि उत्कृष्ट पोहे डोसले. जेवणासाठी चपात्या आणि पिठलं भाकरी सोबत घेतले. इतक्या वेळात कळसुबाईचं सौंदर्य डोक्यात साठवून घेत होतो. तिच्यात-आमच्यात फ़क़्त काही क्षणचंच अंतर...... पायाजवळ वळण घेणार पाणी म्हणजे जणू पायातलं पैंजण.... त्या पैंजणचा आवाज इथपर्यंत येत होता. दुडूदुडू धावत शेतामधून खेळत पाणी रस्त्यापर्यंत येत होते. गावातील लहान मुले वाटाड्या (गाईड) हवा का ? अशी आग्रहवजा विचारपूस करत होते; पण आमच्यासोबत अनुभवी होते.
रस्त्यावरच्या कमानीतून आत शिरलो. सिमेंटच्या रस्त्यावरून कधी मातकट रस्त्यावर आलो कळालेही नाही. दोन्ही बाजूंना असलेले हिरवेगार शेत आणि शेजारून जाणारे, कधी फेसाळणारे तर कधी शांत पाणी मन मोहून टाकते. सुरुवातीला गावात कुठून शिरायचे हे कळत नाही असे आमच्या चेहऱ्यावरून समजताच गावकऱ्यांनीही आम्हाला योग्य मार्ग दाखवला. चिखलाला आता बुटांचे आकर्षण वाटू लागले. त्यावर पाय ठेवल्यावर ‘पचपच’  आवाज येऊ लागला. वाटेतच मोठ्या शिळांनी बांध घातल्यामुळे कमी अधिक उंचीचे धबधबे तयार झाले आहेत. या  धरणाच्या आतून पाण्यातून चालण्याशिवाय पर्याय नाही. शिवाय बूट काय आतले सॉक्स, कपडेही धुवून निघतात. हे सर्व करताना आपण ठराविक उंचीदेखील गाठतो. घसरून पडलोच तर हिरव्या शेतात पडल्याचे सुख(?).
pankajpghare.blogspot.com
कळसूबाई शिखरावर जाण्यासाठी लोखंडी शिड्या 
उतारावर मोठ्या रुंदीच्या पायऱ्या बनवून केलेली शेती दिसते. त्यामुळेही बरेच पाणी अडवलेले दिसते. चिखलातून, आडव्या पडलेल्या मोठ्या ओंड्क्यावरून चालताना, घसरताना सावरण्याचा सराव होतो जो पुढे कामी येतो. सभोवतालच्या मांडून ठेवलेल्या वेगवेगळ्या रंगाच्या हिरव्या साड्या बाईंना खुश करतात. साड्यांना कधी फेसाळणाऱ्या पाण्याची आणि बांधलेल्या दगडांची काळी किनार कळसुबाईचे मन प्रसन्न करते. थोड्या रुंद जागेतून दोन्ही बाजूला व्यवस्थित झाडे असलेल्या मार्गातून काही वेळातच आपण एका पठारावर पोहोचतो. त्याचा उतार इतका तीव्र नाही पण त्याच्या किनाऱ्यावरून सभोवतालचे दृश्य डोळ्यात साठवून ठेवावे असेच आहे. चहूकडे हिरवीगार शेत, सभोवतालचे अनेक डोंगर  कळसुबाईकडेच पाहत आहेत. त्यांनी पाहू नये म्हणून वारंवार बाष्प मध्येच आडवं येत होतं. श्रावण महिना असल्यामुळे उन्हात अधूनमधून कळसुबाईच्या मुखाचे दर्शन होत होते; पण वारंवार  तीदेखील धुक्याच्या पदरामागे स्वतःला झाकून घेत होती. धुक्याचे प्रमाण इतके की शेतात बनवलेल्या वाफांमागून जणू वाफा बाहेर पडत आहेत असे वाटते. याच पठारावरून उंचापर्यंत जाणाऱ्या शिड्या दिसल्या. लांबूनच त्या संख्येने जास्त दिसत होत्या. पठाराच्या पायवाटेवरून चालत राहून जंगलात शिरलो. अगदी माणसाप्रमाणे शीळ घालणाऱ्या पक्ष्यांचा आवाज सुमधुर वाटला. त्यामुळे एकमेकांशी संवाद करून स्वतःचा आवाज त्यांना ऐकवण्यात काहीच अर्थ नसतो. शांत जागेतून पुन्हा एकदा थोड्या कमी उताराची अरुंद जागा आहे. उजवीकडे जाणारा निमुळता भाग किल्याच्या माचीप्रमाणे! त्याच्या कडेला लोखंडी दांडे रोवून सुरक्षेची काळजी घेतलेली दिसते. पूर्ण प्रवासात गावातले अनेक तरुण आणि लहान मुले-मुली चहा, सरबत वगैरेचा व्यवसाय करताना दिसतात.
marathi travel blog well at peak of mountain
कळसूबाई शिखरावरील पिण्यायोग्य पाण्याची विहीर 

 सर्वात उंच असलेल्या शिखराला स्त्रीचे नाव! इथून कळसुबाईला पाहिल्यास शाल देऊन स्त्रीचा गौरव केल्यासारखा आणि ओंजळीतून वाहणारे अनेक धबधबे म्हणजे अनेक आशीर्वाद...धबधब्यांच्या आजूबाजूला काही गुहा दिसतात. तिथपर्यंत पोहोचायचा मार्ग मात्र दिसत नाही. मागे वळून पाहिल्यास लांबपर्यंत ओढ्याचे पाणी वाहताना दिसते. सिमेंटचा चकाकणारा रस्ता आणि संथ वाहणारे पाणी यातला फरकही कळत नाही. सगळा निसर्ग पुढे जाऊन धुक्यामध्ये हरवतो आणि आपण पुढे जाऊन शिड्यांजवळ येऊन थांबतो. शिड्यांचा डोंगरांशी असलेला कोन थोडा घाबरवणारा आहे. लोखंडाच्या शिडीच्या पायऱ्या, आधारासाठी लोखंडी पाईप किंवा सळई ,शिडी वाकली जाऊ नये म्हणून दगड-माती आणि शिडीला जोडणारे लोखंडी दांडे हे काम खरोखर स्तुत्य आहे. शिडी रुंद असली तरी पाय ठेवण्यासाठी वापरलेले लोखंडी साहित्य कमी व योग्य आकाराचे आहेत. यापेक्षा जास्त आकाराचे सामान वापरल्यास शिडीचेही वजन वाढले असते. शिवाय एका शिडीवर अनेकजण एकाचवेळी चढताना-उतरताना दिसले. असे असले तरी शक्यतो एका वेळी एक किंवा दोन जणांनीच चढावे. 
         एक शिडी चढून वळण घेतल्यानंतर पुन्हा दुसरी शिडी चढताना मागची शिडी दिसेनाशी होते. शिवाय जास्त काळ उभे राहता न आल्याने उंचावर जाणे चालूच राहते. शिडीच्या खाली दिसणारी वाट कधी सोपी तर कधी कठीण वाटते....पण ती शिडीवर उभी राहूनच. पाणी पिण्याची इच्छा झाली तरी जमिनीवरून वाहणारे स्वच्छं पाणी पिता येत नाही. ओल्या, थंड, शिडीवरून चालताना हात थंड होतात. वाटेत थांबल्यास मच्छर आपले गालगुच्चे घेऊन जातात.  एक कीटक हाताला अर्धा मिमीचा दंश करून गेल्याने माझ्या हातावर किमान पंधरा सेमी जागेवर सुज आली; म्हणून Trekking साठी येताना आपले अंग शक्यतो झाकलेले असावे. अधूनमधून शिडीच्या बाजूला मोकळ्या जागेत उभे राहण्याचे धाडस केल्यास निसर्गसौंदर्य भुरळ पाडते आणि तेच तेच दृश्य पुनःपुन्हा जास्त उंचीवरून पाहण्यासाठी प्रोत्साहन देते. पुढे सरळ रेषेत एकमेकांना नट-बोल्टने जोडलेल्या चार पाच शिड्या उंचावर पोहोचण्यास मदत करतात. सर्व शिड्यांवर चढून झाल्यानंतर एक मोठा टप्पा पार पडल्याचा आनंद मिळतो.
पुढे काही पायऱ्या आहेत त्यावरूनही पाणी आनंदाने ओसंडून वाहत असते. उजवीकडे सपाट जागेवर दिसणाऱ्या वाटेवर हळूच पाय वळतात; कारण अजून माथा गाठायचा होता. इथे निळ्या रंगाची फुले दाटीवाटीने दिसतात, तर काही रोपटी एकत्रित येऊन घुमटाकार केल्याचे आढळते. पुन्हा काही झऱ्यामधल्या स्वच्छ पाण्यातून वाट काढत एका विहिरीजवळ आलो. या छोट्याशा ‘कळशी’तले पाणी अत्यंत गोड आहे. विहिरीजवळच असलेल्या दुकानात चहा-भजीचा आस्वाद जरूर घ्यावा. आम्हीही तेथेच जेवून पाठीवरचे काही वजन पोटात घेतले.
शिडीवरून उतरताना चढण्यापेक्षा जास्त वेळ लागतो. प्रत्येक पाऊल साभाळून ठेवताना पडण्याची भीती!.. पण एका सुंदर झाडीत अडकुनही पडू हा छुपा आनंद ! कळसुबाईच्या कुशीतून शिड्याद्वारे तिचाच हात धरत धरत पठारापर्यंत आलो आणि पुन्हा एकदा चिखलातून वाट काढत गावापर्यंत. धबधब्याच्या पाण्यात अगदी मनमुराद आनंद घेऊन बाईंचा निरोप घेतला. धुक्याच्या पदर डोक्यावरच आणि मोठे मोठे धबधबे डोळ्यातल्या अश्रूप्रमाणे !  
marathi travel blog temple at peak of Kalsubai
कळसूबाई शिखरावरील मंदिर 
अजून काही किल्ल्यांविषयी :  

मराठी पुस्तक  - पहिले पाऊल , सफरछंद 
Online Books PDF on esahity.com : मुल्हेर ते साल्हेर, कधी सरस कधी कळस, गोरखगड ते सिद्धगड, अलंगाशी संग मदनाशी गाठ  
लोकसत्ता 'ट्रेक इट' मध्ये भैरवगड, कलावंतीण , वैराटगड, आजोबागड आणि इतर लेख प्रकाशित.
कळसूबाई Trek अनुभव कळसूबाई Trek अनुभव Reviewed by Marathi Blog by Pankaj Ghare on May 25, 2020 Rating: 5

No comments:

मनात आलं म्हणून

मनात आलं म्हणून
थोडं माझ्याविषयी
Powered by Blogger.