भारत माझा देश आहे. पण ....


भारत माझा देश आहे; पण माझ्या काही अटी आहेत असे बरेचजण वागतात. त्यांची प्रतिज्ञा ही अशी किंवा याहून वाईट असते. 

भारताची प्रतिज्ञा 

marathi blog on pledge of India
भारताचा तिरंगा 

शाळेत वर्ग सुरू होण्याआधी म्हटली जाणारी प्रतिज्ञा कॉलेजमध्ये म्हणवून घेतली जात नाही. पुढे ती कधीही म्हटली जात नाही. राष्टगीताप्रमाणे नसल्याने ती वेगवेगळ्या भाषेत बोलली जाते त्यामुळे सामूहिकपणे बोलली जात नाही. पीएन हिंदी किंवा इंग्रजीमध्येही सार्वजनिक कार्यक्रमात ती बोलली जात नाही. का ? ती महत्त्वाची नाही. नसेल कदाचित म्हणून काहीजण बोलतात एक नि आचरणात वेगळंच असतं.

बोलताना: भारत माझा देश आहे.
मनात: पण त्यातलं फक्त महाराष्ट्र माझं राज्य आहे. मी राहतो तो जिल्हा आणि माझे अतिजवळचे नातेवाईक राहतात तेच माझे जिल्हे आहेत.  तोच माझा तालुका आहे जिथे माझं गाव आहे आणि त्या गावात आमची वाडी आहे. एखादी गोष्ट माझ्या आसपास घडत नाही तोपर्यंत मला वाटतं माझा देश सुरक्षित आहे आणि खरंतर तेवढाच भारत माझा देश आहे.


बोलताना:सारे भारतीय माझे बांधव आहेत.
मनात: पण 'मग मी लग्न कोणाशी करायचं?' हा मला 'नीट' कळलेला पहिला विनोद आहे.मी मुलगा असेन तर मुली-महिलांकडे वाईट नजरेने बघेन. मी मुलगी असेन तर मला हवं ते देणार्‍या मुलासोबत मी असेन. मी माझ्या या बांधवांशी बसमध्ये उभा राहण्यावरुन, रेल्वेत बसण्यावरून, रस्त्यात धक्क्यामुळे, कोणत्याही रांगेत, कुठेही बाजारात, कधीही सिग्नलवर, सोशल मीडियावर,हवं तेंव्हा, कितीही वेळा, कितीतरी बांधवांसोबत भांडतो, आई-बहिणीवरून शिव्या देतो. ते थोडी माझे सख्खे आहेत. सख्ख्यांसोबत मी प्रॉपर्टीसंबंधित भांडेन. 

बोलताना:माझ्या देशावर माझे प्रेम आहे. 
मनात: पण केंव्हा ? भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच सुरू असताना. देशभक्तीवर चित्रपट पाहताना. पाकिस्तान विरोधात भाषण ऐकताना. माझं प्रेम असलेल्या  त्याच देशात रस्त्यावर मी कुठेही थुकतो. कसाही बेशिस्तपणे वागतो नि दुसर्‍या देशातल्या शिस्तीची स्तुती करतो.  माझ्या देशापेक्षा, मी पाठिंबा देतो त्याच नेत्यावर नि त्यामुळे त्या नेत्याच्या पक्षावर माझे प्रेम आहे. तो जे सांगेल तेवढ्याच देशावर माझे प्रेम आहे. त्या नेत्याच्या विरोधातल्या नेत्याचा मतदारसंघात प्रगती नाही झाली तरी चालते. 

बोलताना:माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे आणि त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन.
मनात: पण त्या परंपरांपैकी माझ्या जाती-धर्माशी संबंधित परंपराच योग्य आहेत.  त्यामुळे माझ्या परंपराचा मी आधीच पाईक आहे. त्या कायम टिकल्या पाहिजेत आणि इतर लोकांनीही पाळल्याच पाहिजेत. बाकीच्या सर्व अंधश्रद्धा आहेत नि त्या ताबडतोब बंद झाल्या पाहिजेत.

बोलताना: मी माझ्या पालकांचा, गुरूजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
मनात: पण हे सर्व मी कॅमेरा सुरू असताना कॅमेरासमोर करेन. उगाच का मी मोठेपणा द्यायचा ? माझ्या पालकांनी मला नीट नाही सांभाळ केला, शेजारच्या मुलांच्या पालकांनी मुलांना फार सुखात वाढवलं.
माझ्या गुरुजनांनी शिकवलं ? नाही मी स्वतः शिकलो. गुरूंनी त्यांची फी घेतली, त्यांचं काम झालं. तसंही शाळेत, कॉलेजमध्ये शिकवलेलं कुठे कामाला येतं. खरा गुरू तर बुवा, बापू, महाराज, मैया, माता हे असतात. त्यांची कृपा म्हणून सगळं नीट चालू आहे. वडीलधारी माणसं माझ्याशी नीट वागली तर मी त्यांच्याशी नीट वागेन.
सध्या कोण कोणाशी सौजन्याने बोलत नाही. शिव्या दिल्या तर कामपण होतं. राग पण निघून जातो. 

बोलताना: माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करत आहे. 
मनात:पण मी विदेशी वस्तू विकत घेणार. त्या मला स्वस्त पडतात. मी एकाने  एक वस्तू बाहेरच्या देशातली घेतली तर  देशातल्या व्यावसायिकाच्या उद्योगावर थोडीच परिणाम होणार आहे ? काही होत नाही.
मी माझ्या देशातल्या बांधवांना संकटात पाहिलं की त्याचा मला कसा फायदा होईल हे मी पाहणार. एखादी वस्तू थोड्या फायद्यासकट कशी मिळेल याचा विचार करणार. मी व्यवहार करताना स्वतःचा फायदा हा दुसर्‍याच्या नुकसानात शोधेन. एखादा बराच आधी रांगेत असला तर मी रांगेत घुसण्याचा प्रयत्न करेन. मी ओळख काढून शाळा-कॉलेजमध्ये अॅडमिशन घेईन, डोनेशन देईन. नोकरी-व्यवसायात काम मिळवण्यासाठी लाच देईन. अहो सगळेच करतात.  मी टॅक्स वाचवणार. मी विजेची चोरी करणार. मी पाणी वाया घालवणार. मी अन्नाची नासाडी करेन. कुठे भंडारा असेल तर उपाशी माणसाआधी  मीच जेवायला बसेन.

बोलताना: त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी ह्यांतच माझे सौख्य सामावलेले आहे.
मनात:पण त्यांचं ते बघतील मला कुठे वेळ आहे. मी काही समाजाचं देणं लागतो का ?
marathi blog on pledge of India by placing hand over hand

आपल्याकडे पवित्र ग्रंथांवर हात ठेवून शपथ देण्याची पद्धत आहे. किमान त्याद्वारे लोक खरं बोलतील अशी अपेक्षा आहे. कंपन्यांमध्ये QUALITY POLICY असते नि त्याद्वारे योग्य वस्तू /सेवा देण्यासाठी बांधिल असण्यासाठी प्रत्येकजण बांधील असतो. त्याशेजारी भारताची प्रतिज्ञा असावी का ?


( वरील लेख लिहताना प्रतिज्ञेचे विडंबन करण्याचा हेतू नाही. पण जवळपास सर्व भारतीयांनी घेतलेली ही प्रतिज्ञा नि त्यांचं प्रत्यक्ष वर्तन यात विसंगती आढळली.)

मराठी पुस्तक  - पहिले पाऊल , सफरछंद 
Online Books PDF on esahity.com : मुल्हेर ते साल्हेर, कधी सरस कधी कळस, गोरखगड ते सिद्धगड, अलंगाशी संग मदनाशी गाठ  
लोकसत्ता 'ट्रेक इट' मध्ये भैरवगड, कलावंतीण , वैराटगड, आजोबागड आणि इतर लेख प्रकाशित.
भारत माझा देश आहे. पण .... भारत माझा देश आहे. पण .... Reviewed by Marathi Blog by Pankaj Ghare on May 25, 2020 Rating: 5

No comments:

मनात आलं म्हणून

मनात आलं म्हणून
थोडं माझ्याविषयी
Powered by Blogger.