मराठी माणूस आणि मुख्यत्वे व्यावसायिकांना 'सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट'ची ओळख व्हावी आणि त्यातून त्यांनी प्रगती साधावी म्हणून हा लेख .......
सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट
मराठी माणूस व्यवसाय करू शकत नाही,
एक मराठी माणूस पुढे जाताना दिसला की दुसरा त्याचे पाय ओढतो,
अंथरूण पाहून पाय पसरावे,
अशी वाक्ये ऐकत ऐकत लहानाची मोठी (म्हणजे फक्त वयाने मोठी) होणारी मराठी माणसे सर्वत्र आहेत. यालाच 'मोठ्यांनी दिलेली शिकवण' असे गोंडस नाव आपणच दिले आणि मोठ्यांनी सांगितले मग त्यांचे ऐकलेच पाहिजे असे म्हणत 'संस्कारी आणि भाऊक' मराठी माणूस नोकरीकडे झुकलेला दिसतो. वर्षानुवर्षे नोकरी करून स्वतःच्या आयुष्यात आर्थिक स्थैर्य आपल्या आधीच्या पिढीने काही प्रमाणात मिळवलं आहे यात शंका नाही. पण केवळ त्यालाच सर्वोत्तम यश मानून , 'मी २५ वर्षे अमुक अमुक कंपनीत नोकरी केली' याचा अभिमान वाटणं आणि पुढील पिढीनेही तेच करणं अशी अपेक्षा ठेवणं सध्याच्या मराठी माणसाच्या मागे राहण्याला कारणीभूत आहे. कोणत्याही क्षेत्रातील बोटांवर मोजता येईल इतकी तीच तीच मराठी नावं घेतली की 'मराठी माणूस मागे नाही' असे म्हणत त्या यशस्वी माणसांच्या नावाचा आधार घेऊन सगळीच मराठी माणसं महान असतात असा गोड गैरसमज आपणच करून घेतला नाही ना ? याचा विचार केला पाहिजे.
नवीन पिढीला व्यवसाय कसा करावा हेच समजत नाही पण व्यवसाय करणे कठीण असते हे मात्र त्याच्या मनात पक्कं बसलं आहे. ( एकेकाळी मीदेखील याच गटात होतो.) आपल्या वर्तुळात कुणी हॉकी खेळत नाही म्हणून आपल्याला हॉकी येत नाही. हॉकीची स्टिक पायाला लागेल याची भीती वाटते. पण क्रिकेटच्या चेंडूची भीती मात्र वाटत नाही. तो चेंडू कितीही जोरात आला तरी तो कसा टोलवायचा हे आपल्याला माहित आहे. हेच व्यवसायाबाबत झालंय.
व्यवसाय सुरू करणाऱ्याला किंवा विस्तार करणाऱ्याला अनेक प्रश्न पडत असतात.
- सध्याच्या मराठी पिढीला व्यवसाय मार्गदर्शन मिळणार कुठून ?
- जर व्यवसाय सुरू केला असेल तर येणाऱ्या अडचणींवर मात कशी करायची ?
- अडचणी येऊ नये म्हणून काय करायचे ?
- मुळात ती अडचण नसून व्यवसायाचा एक भाग असतो हे कसं समजेल ?
- व्यवसाय सुरू तर केला पण ग्राहक कसे मिळवायचे ? व्यवहार कसा करावा ? काम करणारे कामगार कसे हाताळायचे ?
- ग्राहक तर मिळाला पण केलेल्या कामाचे पैसे कसे मिळवायचे ?
- पैसे तर मिळाले पण त्याचं व्यावसायिकाने पुढे काय करायचे ?
- अगदी पिढीजात व्यावसायिकालाही स्वतःच्या व्यवसायाचा दर्जा सुधारायचा असतो किंवा विस्तार करायचा असतो ना ? पण तो नेमका कसा करावा ?
'सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट' शी का जोडून घ्यावे ?
- अनेक प्रश्न मनात घेऊन फिरणाऱ्या व्यावसायिकांना पडत असताना त्यातील अचानक अनेकांची 'सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट'ची ओळख झाली नि व्यवसायात प्रगती झाली आहे.
- ही फक्त आर्थिक प्रगती नसून व्यक्तिमत्त्वातसुद्धा झाली. ही प्रगती 'झाली' म्हणण्यापेक्षा त्यांनी ती स्वत: करून घेतली.
- अनेक आदरणीय आणि प्रेरणादायी मराठी व्यावसायिकांना भेटण्याची नव्हे तर त्यांच्याशी मैत्री होण्याची संधी 'सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट' उपलब्ध करून देते. (नाहीतर करोडोंची उलाढाल करणारे व्यावसायिक, नवीन उद्योजकाला का वेळ देईल ?)
- शालेय किंवा महाविद्यालयीन शिक्षणात व्यवसाय कसा करावा याचे थेट शिक्षण मिळत नाही. वस्तू किंवा सेवेनुसार आणि व्यक्तीनुसार प्रत्येक व्यवसायाचे स्वरूप वेगळे असते. त्यामुळे व्यवसाय करताकरता व्यवहारातून आणि चुकांमधून शिकता येते. पण ते शिकावे कसे , चुकादुरुस्ती कशी करावी याचे शिक्षण नकळत इतर व्यावसायिकांकडून मिळते.
- मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाला प्रगतीसाठी हात देतानाचे चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. (आणि मनावर बिंबवलेले उलट नि खोटे चित्र कायमचे निघून जाईल.)
- प्रत्येक व्यावसायिकाला इतर व्यावसायिकांची गरज भासते. त्यामुळे एका व्यावसायिकाला जरी एखादा प्रकल्प मिळाला की आपोआप त्याच्याशी जोडलेल्या इतरांना थोड्या कमी कष्टांत त्या प्रकल्पाशी जोडून घेता येऊ शकतो. एकाच प्रकल्पासाठी अनेक व्यावसायिकांची साखळी तयार होताना सर्वांना आपापल्या क्षेत्रात विकास साधता येतो.
एखाद्या ग्राहकाची गरज पूर्ण करताना अधिकाधिक मराठी व्यावसायिकांना संधी मिळावी म्हणून 'सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट' प्रयत्न करत आहे नि त्यासाठी अधिकाधिक मराठी व्यावसायिकांना आपल्या पंखांखाली घेत आहे. व्यावसायिकांना एकमेकांशी जोडत आहे.
सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट, कोपरखैराणे, नवी मुंबई |
वैयक्तिक अनुभवातून.....
- 'सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट' बद्दल प्रथमच वाचणाऱ्या व्यक्तीला / व्यावसायिकाला हे ' मल्टी लेवल मार्केटिंग ' नाही हे सर्वप्रथम सांगावेसे वाटते.
- 'सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट' ही एक चळवळ आहे. त्यात सामील होणाऱ्या व्यावसायिकाला सहाय्य करणाऱ्याला सदस्याला कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा नसते.
- नवीन मराठी उद्योजक घडावेत, जुने व्यावसायिकसुद्धा जोडले जावेत हा हेतू तर आहेच...
- स्वत:च्या ग्राहकाला त्याच्या इतर गरजांसाठी चांगले व्यावसायिक आणि व्यक्ती 'सॅटरडे क्लब'च्या माध्यमातून मिळावेत असा प्रामाणिक हेतू क्लबमधील सदस्य मनात बाळगून असतात. त्यासाठी प्रयत्नशील असतात.
- केवळ 'सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट'चा सदस्य आहे म्हणून त्याला व्यवसाय मिळावा असे उद्दिष्ट न ठेवता आधी प्रत्येक व्यावसायिकाला ओळखून पारखून नंतरच त्यावर विश्वास ठेवला जातो.
- नकळत क्लबच्या सदस्यावर उत्तम दर्जा देण्यावर ( चांगल्या अर्थाने) दबाव निर्माण होतो. याचा फायदा त्याच्याच गुणवत्तेत सुधारणेसाठी होत असतो.
- वस्तू किंवा सेवा देताना, दर्जा राखणारे व्यावसायिक 'सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट'द्वारे आपल्या ब्रँडला अधिक प्रसिद्धी देऊ शकतात. ब्रँडला मोठे करू शकतात.
- स्वत:चा व्यवसाय वगळता, वैयक्तिक नि सामाजिक आयुष्यात इतर अनेक कारणांसाठी आपल्याला इतरांची गरज भासते. त्या गरजांची पूर्ती करणारे व्यावसायिक क्लबमध्ये सहज मिळतात.
- आपण ज्या क्षेत्रात शिक्षण घेतले आहे केवळ त्यातील ज्ञान असताना आपल्याला सगळ्यातले सगळे कळते असा गैरसमज होतो. हा गैरसमज इतर क्षेत्रातील व्यावसायिकांना भेटून होतो. आयुष्यभर विद्यार्थी असण्याची नम्र इच्छा बाळगणाऱ्या अनेकांना ज्ञान नव्हे तर इतर क्षेत्रांची किमान माहिती तरी मिळते.
मराठी माणसाला एक आवाहन ....
- हा लेख वाचून, जर तुम्ही स्वत: व्यावसायिक असाल तर संपर्क करा किंवा आपल्या परिचित व्यावसायिकांना 'सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट' मध्ये सामील होण्यास सांगा.
- व्यवसायाची सुरुवात केलेल्यांना किंवा विस्ताराचे पाऊल टाकलेल्या व्यावसायिकांना 'सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट'च्या मीटिंगमध्ये उपस्थित राहण्यास सांगा.
- मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाला हात देतो असे सांगण्यास सुरुवात करा. त्यासाठी सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्टचे उदाहरण आहेच.
- मराठी माणसांना व्यवसायासाठी प्रोत्साहन द्या. किमान नकारार्थी वाक्ये, सल्ले, वाक्प्रचार म्हणी टाळा.
- यशस्वी व्हायचे असेल तर सुरक्षित वातावरणातून बाहेर पडा. नोकरीसुद्धा आर्थिकदृष्ट्या सुरक्षित नाही याची जाणीव असू द्या.
- कोणताही मराठी व्यावसायिक एकटा नाही हे माहित असू द्या.
- श्रीमंती म्हणजे फक्त भरपूर पैसे असणे आणि मोठे होणे म्हणजे फक्त वयाने, वजनाने, आकाराने मोठे होणे नसते हे लक्षात ठेवा.
- व्यवसाय करणे, ग्राहक मिळवणे, पैसे कमावणे , प्रामाणिक मार्गाने श्रीमंत होणे शक्य आहे याची जाणीव असू द्या.
स्वत:विषयी
Landscape Wall Systems
9819 663 630
( वरील लेख लिहिताना काही ठिकाणी ( पर्यायी शब्द माहीत असतानाही) जाणूनबुजून अमराठी शब्द वापरण्यात आले आहेत. त्याबद्दल क्षमस्व.)
हा पूर्ण लेख हा स्वत:च्या इच्छेने अनुभवातून लिहिला आहे. अनुभवानुसार नवीन लेख प्रकाशित होतील. यामागे 'सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट' ची जाहिरात करण्याचा मानस नाही पण चांगल्या हेतूचा प्रसार व्हावा हीच इच्छा.
No comments: