खाऊ - मन खादाड खादाड

खाऊ : मनासाठी मराठी शाब्दिक पदार्थ : मराठी भाषा इतकी समृद्ध आहे हे की न खाता आपण बरंच काही खातो ( आणि मराठी वाक्प्रचार खातो)  पण तरीही पोट मात्र भारत नाहीच.

मन खादाड खादाड 

marathi blog on eating by mind
मनातला खाऊ  

रिकामे मन आणि सोबत रिकामे पोट हे सैतानाचे घर असते.
एकदा अशीच भूक लागली पण खाण्यालायक काहीही सापडलं नाही. घरात कोणीच नसताना माझंच घर मला  खायला उठलं .....

घर खायला उठलं ? कसं काय शक्य आहे?  घर का आपल्याला खाईल असा विचार मनात आला... आणि लांबलचक यादी तयार झाली. थेट बालपणात शिरलो जिथे जायला जास्त वेळ लागतं नाही.

आई–वडिलांचा 'मार' खाल्ल्याशिवाय बालपण गेले असेल तर बालपण अपुरे आहे किंवा तो खाऊ किती महत्वाचा आहे हे मोठे झाल्याशिवाय कळत नाही. आईसोबत जास्त वेळ जात असल्याने बऱ्याचदा ‘धपाटे’ खावे लागतात आणि ते दोन प्रकारचे असतात हे नव्याने कळते. वडिलांचा ‘ओरडा’ जरी खाल्ला तरी एका झटक्यात सगळं काही व्यवस्थित करू लागतो आणि ‘फटके’ खाण्यापासून वाचतो.

शाळेत प्रवेश घेतला. वहीची ‘पानं’ खाल्ली म्हणून बऱ्याचदा बाईंनी वर्गाबाहेर काढलं. लहान इयत्तेत असताना ‘टिंब’ गिळायचो, मोठा होऊ लागलो तसा 'काना, मात्रा, वेलांटी' खाऊ लागलो. उत्तर व्यवस्थित पाठ नसेल तर तेच उत्तर तोंडी परीक्षेत वेगाने बोलताना ‘शब्द’ तर लेखी परीक्षेत मी ‘वाक्य’ खात असे. काहीजण चित्रकलेत किंवा हस्तकलेत ‘लाईन’ खायचे आणि त्यामुळे पाठीवर ‘बुक्के’ही. काहीजण मोठे ‘परिच्छेद’ खात तर काहीजण कवितेच्या ओळी. निकाल लागला की त्यांना कळायचं की त्यांनी परीक्षेत ‘गटांगळ्या’ खाल्लेल्या. बरेच जण एखाद्या शिक्षकाला जबाबदार धरायचे कारण त्यांनी दुसऱ्या शिक्षकाचा ‘तास’ खाल्लेला असायचा.

सुट्टीत आपलं कारटं- कारटी ‘जीव’ खातील म्हणून सर्वांना गावी पिटाळलं जायचं आणि मुलं सुद्धा खुश व्हायची. मस्तपणे गावाची ‘हवा’ किंवा ‘कोवळं ऊन’ खात. ‘गोते’ खाणाऱ्या पतंगासाठी लांबपर्यंत धावायचं. क्रिकेटचे सामने रंगायचे, फलंदाज ‘बॉल’ खायचा आणि त्यामुळे इतरांच्या ‘शिव्या’सुद्धा.

कॉलेजमध्ये श्रीमंतांची मुलंमुली ‘भाव’ खाताना दिसायची तरीही एक तरी ग्रुप तयार व्हायचा आणि पिक्चरला जायचा बेत ठरायचा. पडद्यावर काही कलाकार ‘फुटेज’ खाताना दिसायचे; पण कसलेला कलाकार अगदी कमी वेळ समोर येऊन त्याने दुसऱ्या अभिनेत्याला अभिनयात खाल्लं असे काहीजण म्हणत. काहीजणांनी वाचन इतकं केलेलं असायचं की तो पुस्तकं वाचतो की चावून खातो असा प्रश्न पडतो.
बेढब सवयी, विचित्र स्वभाव, घाणेरड्या सवयी किंवा हलका खिसा यामुळे प्रेमाच्या विषयात ‘माती’ खाणारे बरेचजण सापडतात आणि सुंदर असूनही 'उंचीने मार खाल्लेल्या' मुली नाकारल्या जात. ज्यांचं जमलं त्यांच्याबद्दल बरेच जण ‘दातओठ’ खाताना दिसायचे.

बस-रेल्वेत लोकांचे ‘धक्के’ खात प्रवास करताना वाहन कधी ‘पलटी’ खाईल सांगता येत नाही. आजूबाजूला, छेडछाडी करणाऱ्यांना ‘चप्पल’ खावी लागायची. ‘शेण’ खाणाऱ्या नराधमाला लोकांकडून ‘जोडे’ खावे लागायचे.

कॉलेजचे दिवस संपले. हळूहळू पुस्तकं ‘धूळ’ खात पडू लागली. आणि मग सामान्य नागरिक म्हणून रस्त्यावर आलो. सहप्रवासी, सहकर्मचारी , बॉस ‘डोकं’ का खातात असा प्रश्न पडू लागला आणि आपण लहान असताना पालकांनी किती ‘खस्ता’ खाल्ल्या हे कळून चुकलं.

घरी जाऊन थोडा ‘दम’ खाईन तर मोबाईल इतका वाजतो की समजू लागलं की बोलताना हा मोबाईल ‘ बॅटरी’ खातो. याच मोबाईलने घड्याळाचं ‘मार्केट’ खाल्लं नाही का? आजच्या वेगवान जीवनशैलीत घड्याळ ‘पाणी’ खातंय असा अनुभव येतो का?.

गरजा वाढत गेल्या आणि घरात वस्तूंची संख्या वाढू लागली आणि त्या ‘जागा’ खाऊ लागल्या. अगदी महागाईनेसुद्धा ‘उचल’ खाल्ली.

घर शोधण्याच्या निमित्ताने बाहेर आलो की बिल्डरबरोबर बोलताना ‘अपमान’ गिळावा लागतो हे कळलं. कष्ट करून घर घेतलं तेंव्हा कळलं की बँका 'व्याज' खातात. ‘पेट्रोल’ खाणारी बाईक विकावी लागली. घर आणि गाडीचा व्यवहार करताना दलाल ‘कमिशन’ खातात. निरीक्षणातून कळत गेलं की बिल्डरांनी अनेकांच्या ‘जमिनी’ गिळल्या. या बिल्डरांच्या खिशात एकमेकांची ‘मतं’ खाणारे राजकीय पक्षसुद्धा आहेत, आणि  ‘पैसे‘ खाणारे अधिकारी सुद्धा आहेत.

देश स्वतंत्र होण्यासाठी कित्येकांनी ‘लाठ्या’ खाल्या, ‘लाथा‘ खाल्ल्या. आजही कित्येकजण सीमेवर आणि देशाच्या अगदी आतसुद्धा बंदुकीच्या ‘गोळ्या’ खायला तयार आहेत; पण काहीजण ‘लाच’ खाण्यात व्यग्र ! ‘चारा’ खात खात पूर्ण देश विकून खाल्ला. किमान एक दिवस या सर्वांना ‘तुरुंगाची हवा’ खाताना पहायचं आहे. आता कुंपणच ‘शेत’ खातंय म्हटल्यावर दाद कोणाकडे मागायची म्हणून 'मूग' गिळून गप्प बसलो, आवंढा गिळला....

सगळं निमूटपणे सहन करावं लागतं....

आणि मग माझं मन मला खातं, खरंच माझं मन मला खातं.


अजून काही मराठी लेख :


मराठी पुस्तक  - पहिले पाऊल , सफरछंद 
Online Books PDF on esahity.com : मुल्हेर ते साल्हेर, कधी सरस कधी कळस, गोरखगड ते सिद्धगड, अलंगाशी संग मदनाशी गाठ  
लोकसत्ता 'ट्रेक इट' मध्ये भैरवगड, कलावंतीण , वैराटगड, आजोबागड आणि इतर लेख प्रकाशित.
खाऊ - मन खादाड खादाड खाऊ - मन खादाड खादाड Reviewed by Marathi Blog by Pankaj Ghare on May 19, 2020 Rating: 5

No comments:

मनात आलं म्हणून

मनात आलं म्हणून
थोडं माझ्याविषयी
Powered by Blogger.