बसमध्ये खरं तर आधी कोणत्याही जागेवर महिला बसू शकते. पण आधी सर्व महिला राखीव जागा भरल्या जातात. उरलेल्या सर्व जागा जर पुरूषांनी भरल्या तर नंतर येणार्या सर्व महिलांना राखीव जागा रिकामी होईपर्यंत उभंच राहावं लागतं.
Marathi Blog - मनात आलं म्हणून
महिला आरक्षण
प्रातिनिधीक चित्र |
स्थानक १ :
मुंबईतली बेस्टची रिकामी बस पहिल्या स्थानकाजवळ आली. रांगेत असलेले सर्वच एकेक करत बसमध्ये चढले. वयस्कर गृहस्थ ज्येष्ठांच्या आरक्षित जागी पुढून चढत बसले. रांगेत असलेल्या महिला त्यांच्या राखीव जागी उजव्या बाजूला बसल्या. पुरूषमंडळी महिलांच्या जागी न बसता इतर जागी बसले. काही जोडपी वेगवेगळे बसले. एक जोडपं डाव्या बाजूला बसलं. मागे एक महाविद्यालयीन मुलगामुलगी एकत्र डाव्या बाजूला बसले आणि अभ्यासाबद्दल बोलू लागले.
अपंगांची एक, महिलांच्या दोन आणि ज्येष्ठांची एक अशा राखीव जागा रिकाम्या राहिल्या. बस सुरू.
प्रसंग २ :
पुढच्या स्थानकाला दोन पुरूष बसमध्ये शिरले. एकाने जोडप्यांपैकी महिलेला, महिलांच्या राखीव जागी बसण्याची विनंती केली. त्याप्रमाणे तिने जागा बदलली. मुलासोबत बसलेल्या मुलीला दुसऱ्या पुरूषाने महिलेच्या जागी बसण्यास सांगितले. दुसरी कोणतीच जागा रिकामी नसल्याची खात्री करून मुलगी राखीव जागी बसली. पूर्ण बस भरली.
प्रातिनिधीक चित्र |
प्रसंग ३:
पुढच्या स्थानकात दोन अपंग, सात महिला, चार ज्येष्ठ चढले. अपंगांपैकी जो पहिला बसमध्ये शिरला तो त्याच्या जागी बसला. त्यांना बसमध्ये शिरायला वेळ लागतोय हे पाहून चार ज्येष्ठांपैकी एक मागच्या दरवाजाने चढून धावत त्याच्या राखीव जागी बसला. संगीतखुर्चीप्रमाणे सातपैकी जी महिला पहिली आली ती महिलांच्या जागी बसली. संगीतखुर्चीचा हा खेळ पाहून सर्वजण हलकेच हसले. एक अपंग, सहा महिला नि तीन ज्येष्ठ जागा मिळण्याची वाट पाहत उभे राहिले.
अ] इथून पुढे प्रत्येक स्थानकावर जर महिलेची खुर्ची रिकामी झाली तरच उभ्या असलेल्या महिलेला बसायला मिळालं.
आ ] पुरूषांच्या बाजूला बसण्यास कुणी महिला तयार होत नव्हती. त्यामुळे एखादा पुरूष जागा सोडून गेला की उभ्या असलेल्या पुरूषास सहज जागा मिळाली.
इ] चाळीसपैकी कोणीही उठून गेलं की पुरूषाला आणि बारापैकी कोणी उठून गेलं तरच महिलेला जागा मिळे.
मग राखीव म्हणजे नेमकं काय?
आरक्षण म्हणजे काय?
आरक्षण म्हणजे जास्तीत जास्त पण मिळतंय कमीत कमी. म्हणजे अगदी उलट.
कमीत कमी बारा महिलांना बसमध्ये बसायला मिळणं अपेक्षित होतं; पण वरील घटनेत जास्तीत जास्त बारा महिलांना जागा मिळाली.
इतर जागी 'पुरूषांसाठी' असं लिहिलेलं असतं का? नाही. त्या जागा सर्वांसाठी असतात. महिला, अपंग, ज्येष्ठ कोणत्याही जागी बसू शकतात.
त्यांनी इच्छा असेल तिथे बसल्यास जास्तीत जास्त महिलांना बसायला मिळेल.
चूक कोणाची?
१. इथे खरंतर त्या महिलांची चूक जास्त ज्यांनी आधी आरक्षित जागा भरून टाकल्या.
२. नंतर त्या महिलांची चूक ज्यांनी सर्वांसाठी असलेल्या जागा सोडून दिल्या.
अपंग आणि ज्येष्ठंचंही तेच.
३. चूक त्या पुरूषांची जे महिलांना महिलांच्या जागी बसण्यास सांगतात आणि तिने रिकामी केलेली जागा नव्याने आलेल्या महिलेला न देता गप्प बसून राहतात.
प्रातिनिधीक चित्र |
मी इथे फक्त मुंबईच्या BEST बसचं उदाहरण दिलं आहे. नवी मुंबई, पुणे आणि ठाण्यात जास्त प्रवास केल्याने तिथेही हाच प्रकार दिसतो हे खात्रीने सांगतो. इतर जिल्ह्यात नि राज्यातही अशीच स्थिती असेल यात शंका नाही.
कारण मुळात आपल्याला आरक्षणाची अंमलबजावणी समजलीच नाही.
Marathi Blog - मनात आलं म्हणून,
मराठी पुस्तक - पहिले पाऊल , सफरछंद
Online Books PDF on esahity.com : मुल्हेर ते साल्हेर, कधी सरस कधी कळस, गोरखगड ते सिद्धगड, अलंगाशी संग मदनाशी गाठ
लोकसत्ता 'ट्रेक इट' मध्ये भैरवगड, कलावंतीण , वैराटगड, आजोबागड आणि इतर लेख प्रकाशित.
बसमधलं महिला आरक्षण
Reviewed by Marathi Blog by Pankaj Ghare
on
May 19, 2020
Rating:
No comments: