सांग भारता
न साधा रस्ता अजूनी डोंगरी तीच पायवाट
न डॉक्टर न दवा, न मास्तर न शाळेशी गाठ
पण नकली बाबा बुवा माता, यांचा मात्र दिसतो थाट
माझाच धर्म माझाच गुरु, माझ्याच देवाचा जगावर हात
लिंबू मिरची अंगात वारे, साखळदंडापरि चालिरिती
स्वातंत्र्यदिनी सांग भारता कशी करू तुझी स्तुती ||1||
उघडयावर टाकती कचरा, पाण्यात सोडती घाण
वेगाने हाकती गाड्या, होई चिरीमिरीची देवाण
दोष देती मागील पिढीस, असेल पुढची पिढी महान
हजार सबबी आज हजरजबाबी सांगती दीडशहाणं
नुसता झेंडा नुसते नारे, देशाभिमान जागे पाहून तिथी
स्वातंत्र्यदिनी सांग भारता कशी करू तुझी स्तुती ||2||
अपघात खून हाणामारी, अजूनी जिवंत उपासमारी
अत्याचाराची घटना घडते, आठवड्यातून एका वारी
भ्रष्टाचाराच्या रहस्यकथा, कित्येकाचे अनुभव भारी
गुन्हा करूनी ठगांची मग, ठरलेली असते विमानभरारी
किती उपद्व्याप करती इथे, समाज भाषा धर्म जाती
स्वातंत्र्यदिनी सांग भारता कशी करू तुझी स्तुती ||3||
खोटं बोलला नेता तरी, मानायचं खरं आपण
चुकीचं आहे त्याचं तरी, तोंडावर लावू झाकणं
खऱ्या समस्या बाजूलाच, दाखवी नुसती उदघाटनं
विसरून साऱ्या गरजा बघूया देशभक्तीची प्रदर्शनं
त्याची आरती देशप्रेम, अन्यथा देशद्रोही ठशाची भीती
स्वातंत्र्यदिनी सांग भारता कशी करू तुझी स्तुती ||4||
पुस्तकात भेटले महापुरुष, आता त्यांनाच शत्रू समजा
कोणत्या तुरुंगात गेले कितीदा याला गणितात मोजा
शहीद झाले नसतील तर करा तयांचे योगदान वजा
विसरून इतिहास जुना भूगोल आठवा, हीच तुमची सजा
छोटे करून महती त्यांची, स्वतःस महान करण्याची नीती
स्वातंत्र्यदिनी सांग भारता कशी करू तुझी स्तुती ||5||
भिक्षू चोर ठग लुटारू, दरोडे नसावे समाजात जर
आधी शिक्षण नंतर रोजगार व्यग्र असावे सर्वांचे कर
करोडजणांस मिळावे अन्न, लाखो भटक्यांना घर
साध्या जुन्या प्रश्नांना अजूनी नाही उपाय नि उत्तर
इथे पाण्यासाठी घाम गाळती अशी आमची स्थिती
स्वातंत्र्यदिनी सांग भारता कशी करू तुझी स्तुती ||6||
जळतो इतर देशांवर अन् पाहतो त्यांचे तंत्र
आपल्याच पूर्वाजांचा तो शोध, हा एकच रेटती मंत्र
कमी की नाहीच नवे संशोधन, याचीही नाही खंत
सशासारखे झोपतो आम्हीच, कूर्मासारखेही संथ
अडाणी नेते हिंसक गुंड, कमविती मग पैसा किती
स्वातंत्र्यदिनी सांग भारता कशी करू तुझी स्तुती ||7||
पण तरीही...
सागराच्या तळाशी जाऊ, हिमालयाच्या टोकाशी गाऊ
अंतराळात घेऊया गिरक्या, फिराया चंद्रावर जाऊ
कला दाखवू जगास अवघ्या, हरेक खेळ जिंकण्यास धावू
ठसा उमटवू देशाचा तर, बुद्धी शक्ती पणास लावू
शिस्त ध्यास संकल्प विद्या कर्म पराक्रम वाढवू गती
स्वातंत्र्यदिनी सांगतो भारता अशी वाढवू तुझी स्तुती ||8||
- © पंकज प्रतिभा प्रकाश घारे
पाऊस
कापसाचे बोळे धावती आकाशी
बदलती रूप करी मस्तीही जराशी
साचलेल्या थेंबाना उराशी धरून
भेटाया येती धरणीला
तळपती धरणी त्यास पाहूनी दाराशी
खुणावती प्राण्यास पक्षी नि झाडाशी
कुणास आलिंगन कुणास चुंबन
वर्षाव त्याचा ओवाळणीला
थेंबाथेंबाचा कणाशी होई तो स्पर्श
रोमारोमातूनी मग वाहतो हर्ष
सरून जाई तप्त आठवणींचे वर्ष
क्षणात जाई विसरणीला
कुठे ती सरसर कधी सततधार
कुठे तो धोधो कधी मुसळधार
कुठे तर थैमान कुठेही रूसतो
कुठे तर फक्त पाठशिवणीला
तरीही असतो हवाहवासा
चिमुकल्यांना नवानवासा
रंग धर्म जात अन् पक्ष न पाही
जरा जावे त्याच्या शिकवणीला....
शेतकऱ्याचे तो पुसतो अश्रू
ऊर्जेच्या जन्मास याचा आधार
सुरू नि पूर्ण होती व्यवहार
जीवनचक्र लागे धावणीला
गडगड खुळखुळ टपटप गाणी
सुंदर चित्रे क्षितिजाच्या पानी
कुंचल्यातूनही पडतो पाऊस
अन् कविता लागते गळणीला
तो कविता सांगतो लेखणीला
हा पाऊस
कविता सांगतो लेखणीला
-© पंकज प्रतिभा-प्रकाश घारे
तुझ्यात माझ्यात आई असते
काळजी नको पैशांची, सोय होईल तत्पर
खूप घाई आहे, आत चला लवकर
पेशंट आहेत बाहेर खूप, घरी बोलू नंतर
सगळं ठीक होईल विश्वास ठेवा तुम्ही सर
डॉक्टर सांगतात तेव्हा त्याच्या, मनात काळजी असते
तेव्हा त्याच्या काळजीमागे त्याची आई असते.
उद्या पूर्ण होईल, तुमचं सगळं काम
तुम्हाला त्रास होणार नाही, गाळू आम्ही घाम
माझ्या माणसांसाठी मात्र, वेळेत द्या दाम
पण काळजी घेऊन करा रे, मग करा आराम
जेंव्हा बॉसला कामगारांची नि कामाची चिंता असते
तेंव्हा त्याच्या चिंतेमागे त्याची आई असते.
पन्नास मुलं समोर, त्यांना सांभाळणं कठीण
सगळं यावं मुलांना, विषय आहे जटील
मोठं व्हावं मुलांनी, डॉक्टर इंजिनिअर वकील
स्वतःची मुलं बाजूला, पण विद्यार्थी नाव राखिल
जेंव्हा शाळेच्या बाईंना जबाबदारीची जाण असते
तेंव्हा त्यांच्या कर्तुत्वात त्याची आई असते.
मनापासून मनाने मातीत रूजवलंं बी
पुरेसा उजेड देऊन म्हणतो भरपूर पाणी पी
रोज त्या बाळाला मोठंं होताना पाहणं
कोणी त्याला मारणार नाही म्हणून प्रार्थना करणं
शेतकऱ्याच्या त्रासात जेंव्हा राबण्याची तयारी असते
तेंव्हा त्याच्या कष्टात त्याची आई असते
चौफेर बाजूस लक्ष देत, गाडी चालवत सावकाश
रस्ता ओलांडत असताना, थांबेल थोडा अवकाश
ट्रेनमधल्या गर्दीत जो, लक्षात ठेवे हमखास
की घर आहे सर्वांनाच, कोणी लावून बसलंय आस
सोबतच्या प्रवाशांना जो आधार देत फिरतो
तेंव्हा त्याच्या संस्कारात त्याची आई असते.
कुणी कोणतं काम करा, त्याचा पहिला गुरू आई
भाव जेंव्हा प्रामाणिक, त्याच्या कृतीमध्ये आई
सूर्याभोवती फिरताना, चक्कर घेते आई
मूलामागे धावत धावत, घास भरवते आई
© पंकज प्रतिभा-प्रकाश घारे-
जंगल
जंगलात चढली गाण्यांची रंगत
प्राण्यांना दिली पक्षांनी संगत
कोकिळ लागली गाणी गात
तबल्यावर दिली कोल्ह्याने साथ
पेटी वाजवतो साळिंदर छान
हरणाने केले वरती कान
लांडग्याला झाला तंबोरा जड
आधार देई एक मोठ्ठा वड
संतूर वाजवी उंदीर खास
गुणगुणू लागले भुंगे नि डास
हत्तीने लावला वरचा सा
दाद देई एक पांढरा ससा
टाळ वाजवण्यात माकडे दंग
डोलू लागले नागही मंद
आता ही मैफल संपवायची कशी
झोपू लागले अस्वल आळशी
दिवस लागला ढळूढळू
भूक लागली हळूहळू
रातकीड्यांची किरकिर सुरू
घुबड लागले घाबरून रडू
करून सिंहाने गर्जना मोठी
घरी पळाले सखे सोबती
-© पंकज घारे
एक सुंदर प्रवास
कधी जंगल तर कधी डोंगरी
कधी समुद्र तर कधी आभाळी
मन सोडून जाई, येते फिरूनी
थकवा ना खर्च ना कसला त्रास
एक सुंदर आठवण एक सुंदर प्रवास....!
शरीराचीही मग होते धडपड
नेत्रांचीही होते चडफड
अस्थि-स्नायू करीती गडबड
मेंदूला आधी होई आभास
करण्या सुंदर आठवण सुंदर प्रवास.....!
कुणी असो सोबत की नुसत्या शुभेच्छा
नुसते आशीर्वाद किंवा गालगुच्चा
पाठीवरची ब्याग रिकामी
अपेक्षा नि भेटी आणू खास
होईल सुंदर आठवण होईल सुंदर प्रवास....!
किती सुंदर माणसं किती ते सुंदर जेवण
किती सुंदर शहर-गावं, काय ती घरांची ठेवण
परक्यांशी हितगुज करताना
बोलण्यातली वाढे मिठास
अनेक सुंदर आठवणी जरी एकच सुंदर प्रवास......!
हवापालट नि निर्मळ पाणी
निर्जन रस्त्यावर गुणगुणतो गाणी
हरवू स्वतःला विसरून खिशातील नाणी
भरपेट जेवण कधी पण कधी घडेल उपवास
पण तरीही सुंदर आठवण नि तोच सुंदर प्रवास.....!
अनुभवाचे गाठोडे भारी
आयुष्यभराची गोड न्याहारी
दृष्टीकोन तो व्यापक होऊन
गर्वाचाही होतो ऱ्हास
नेहमीच सुंदर आठवण जेव्हा सुंदर प्रवास.....!
कणाकणात दिसते सृष्टी
क्षणाक्षणात वाढते दृष्टी
किती वेचू नि किती सोडू सण
पडतील कमी ते श्वास
पण किमान एक सुंदर आठवण एक सुंदर प्रवास....!
एक सुंदर साठवण एक सुंदर प्रवास.....!
-© पंकज प्रतिभा-प्रकाश घारे
बालदिन..... पण हालदिन
गाड्या पुसणारा छोटू
आणि गजरे विणणारी बाय
काम करणारी मुलं
शाळेत जातात की नाय ?
बालमजूरी थांबवयाच्या गप्पा जेंव्हा
चिंटू देऊन गेला चाय
भीक मागणारा दिसला की
दुर्लक्ष केलं जाय
मालिका, पिक्चर, जाहिरातीत
स्वतः पाठवते माय
पुढे करिअर यातच
कारण दिसलेत पाळण्यात पाय
गरीब बिचाऱ्याला मिळू दे की
बोलतोय बांधून टाय
तेंडुलकरला विसरलास का
बनला होता ना बॉल-बॉय
आमच्या बाब्याची ती 'आवड'
दुसऱ्याची ती 'गरज' हाय
युक्तिवाद तर चालूच राहील
पण असंच चालणार काय ?
-© पंकज प्रतिभा-प्रकाश घारे
पेन घेतलं नि घेतली वही
बसलो शांत जागी
आज कविता झालीच पाहिजे
म्हटलं, करू मनाला राजी
लॅपटॉप केला बंद
चक्क मोबाईलचा झालो त्यागी
टीव्हीवरची मॅचसुद्धा
बघितली नाही साधी
खिडकीतून दूर पाहताना
मन विचार करू लागी
तुला सुचणार पण नाही
हसेल तुझीच तुला मादी
फोकस....शांत....लक्ष दे
कर यमक शब्दांची यादी
जुळली तर होईल कविता
नाहीतर नुसतीच कागदांची यादी
कोण काय बोललं की
विषय शोधतोय आधी
सोडून दिले ते विषय लगेच
कशाला लागा कवितेच्या नादी
-© पंकज प्रतिभा-प्रकाश घारे
ती एकटीच बसली होती...
ती एकटीच बसली होती....
नजर दरवाजावर, करण्या स्वागत
प्रसन्न हसून नाव विचारत
गोड आवाज नि स्पष्ट बोलून
चहा पाणी नि बसण्यास सांगत
ती एकटीच बसली होती....
सुंदर मेकअप करून
छान केस मोकळे करून
लाल रंगाची लिपस्टिक लावून
सुंदर कपडे परिधान करून
ती एकटीच बसली होती....
मोबाईलला खांद्याने पकडत
एसी- लाईटच्या स्विचशी भांडत
फोनची टेबलवर रांगोळी मांडून
विखुरलेल्या एबीसीडीची वेणी बांधत
ती एकटीच बसली होती....
दरवाजावर लक्ष ठेऊन
इतरांच्या हाकेला ओ देऊन
सततच्या सूचना ऐकून ऐकून
तेच तेच काम रोजच करून
पण ते सुद्धा बसले होते....
ही माझ्याकडे पुन्हा बघेल का
पुन्हा तसंच सुंदर हसेल का
थोडा वेळ बोलेल का
नाव नंबर सांगेल का
पण ती एकटीच बसली होती....
सगळी तिची कामं करत
सर्वांशी अदबीने प्रेमाने बोलत
प्रसंगी कोणाला दम देऊन
कधी कोणाला विनंती करत
कारण ती एकटीच बसली होती....
संशयी नजरा तिला पाहत
स्वत:चेच मत खरे मानत
संधी मिळाली तर काय करू
याचा पुढचा प्लॅन बनवत
पण ती एकटीच बसली होती....
घरच्या लोकांची काळजी करत
काल जेवणात काय चुकलं
आज कोणाच्या आवडीचं करू
आजचा नि महिन्याचा हिशोब लावत
पण ती एकटीच बसली होती....
ऑफिसच्या खोट्या मैत्रीला पाळत
सुरक्षित दूर अंतर राखत
जबाबदाऱ्या पार पाडूनी
घड्याळातले सेकंद पाहत
मी केलेल्या काही कविता
Reviewed by Marathi Blog by Pankaj Ghare
on
March 16, 2025
Rating:

No comments: