अग्निपंख - डॉ. कलाम

'अग्निपंख' - लेखक : भारतरत्न डॉ. ए. पी.जे अब्दुल कलाम हे अरुण तिवारी यांनी लिहिलेले व माधुरी शानभाग यांनी अनुवादीत केलेले पुस्तक सध्याच्या तरूण पिढीला मार्गदर्शक आहे. पुस्तकाविषयी ...

अग्निपंख 

महापुरूषांच्या आत्मचरित्रात सुविचारांची खाण असते, त्यातून प्रेरणा, मार्गदर्शन तर मिळतेच पण हे पुस्तक फक्त कलाम सरांचं चरित्र नसून भारताच्या तंत्रज्ञान क्षेत्राचं चरित्र वाटलं.

सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे सामान्य कुटुंबात जन्माला आलेले कलाम त्यांच्यावर झालेल्या संस्कारांविषयी सांगताना त्यांच्यावर धर्मनिरपेक्ष संस्कार कसे झाले याबद्दल सांगतात. त्यांचे शिक्षण, महाविद्यालय नि अनेक संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी, मुलाखत देतानाची धडपड ही बर्‍यापैकी सर्वसामान्यांशी मिळतीजुळती आहे. त्यामुळे ते आपल्याला आपल्यापैकीच एक वाटतात. 

डॉ. कलाम यांच्यासोबत डॉ. विक्रम साराभाई यांच्या योगदानाशी तसेच इतर अनेक शास्त्रज्ञांशी आपला परिचय होतो. कलाम स्वत: अनेकांना श्रेय देत देत पुढे जातात. त्यामुळे ते पुढच्या कामात पूर्णपणे गुंतले जातात नि इतिहासातील फक्त अनुभव पुढे नेतात हे त्यांचं वैशिष्ट्य अधोरेखित होतंय असं मला वाचक म्हणून जाणवलं. 

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना अनेक राष्ट्रीय नि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. बरंच  मोठं काम करूनसुद्धा प्रत्येक पानावर ते यश इतरांमुळे कसं मिळालं हे औपचारीकपणे न सांगता तसं ते सिद्ध करतात.   भारताचे उपग्रह, क्षेपणास्त्रे, अनेक संस्था, प्रयोगशाळा यांबद्दल किमान ओळख आणि त्यासाठी घ्यावे लागणारे कष्ट वाचकांनी जरूर वाचावेत. आज तंत्रज्ञान क्षेत्रातल्या यशाच्या अनेक बातम्या आपण वारंवार ऐकतो त्याचं बीजसुद्धा या पुस्तकात सापडेल.

मोठेमोठे प्रकल्प करताना ते खरंतर टीमवर्क असतं. जे जे सध्या कर्मचारी आहेत. त्यांनी काम कसं करावं, टीमचं ध्येय कसं गाठावं, आपली एकंदर वागणूक कशी असावी याबद्दल सर बरंच काही सांगतात. अगदी त्याचवेळी बॉसने आपल्या टीमशी कसं वागावं हेही स्वत:च्या कृतीतून दाखवतात. ( आता हे वाचल्यानंतर HR डीपार्टमेंट त्या पुस्तकातील वाक्ये भिंतीवर लावण्यासाठी पुस्तक वाचतीलही पण कुणी बॉस असेल तर 'बॉसने कसे वागायचं' याचा रीपोर्ट मला पुस्तक वाचून लगेच दे असं हाताखालील कर्मचार्‍यांना म्हणू नये. )

सर्व व्याप असताना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात घडणार्‍या दु:खद घटनांना ओवाळत बसताना कलाम काही दिसत नाहीत. 

विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक फार परिणामकारक आहे. शिक्षकांनीही आवर्जून ते वाचण्यास सांगायला हवं, स्वत:ही वाचावं. विशेषतंः अभियांत्रिकीच्या ( इंजिनीअरिंगच्या ) विद्यार्थ्यांना आपण सध्या काय शिकतोय आणि जग, भारत कुठे पुढे आहे, कशाची कमी आहे याबद्दल माहिती मिळेल. आज काम केलं की केंव्हा यश मिळतं, कसं मिळतं; याबद्दल अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना पुस्तक वाचून अंदाज येईल.

एका यशस्वी तरीही नम्र अशा महापुरूषाचं चरित्र जरूर वाचा.

मराठी पुस्तक  - पहिले पाऊल , सफरछंद 
Online Books PDF on esahity.com : मुल्हेर ते साल्हेर, कधी सरस कधी कळस, गोरखगड ते सिद्धगड, अलंगाशी संग मदनाशी गाठ  
लोकसत्ता 'ट्रेक इट' मध्ये भैरवगड, कलावंतीण , वैराटगड, आजोबागड आणि इतर लेख प्रकाशित.
अग्निपंख - डॉ. कलाम अग्निपंख - डॉ. कलाम Reviewed by Marathi Blog by Pankaj Ghare on May 22, 2020 Rating: 5

No comments:

मनात आलं म्हणून

मनात आलं म्हणून
थोडं माझ्याविषयी
Powered by Blogger.